लढा समाजव्यवस्थेशी : कच्छ संस्कृतीचा समृद्ध वारसा! - प्रीती सोनी Print

वंदना अत्रे ,शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

स्थानिक भाषा, कला आणि कलाकार पुढील पिढीला माहीत व्हावेत. आपल्या संस्कृतीचं रेडियोच्या माध्यमातून संवर्धन व्हावं यासाठी १४ वर्षे लढा देणारी गुजरातच्या कच्छ मधील प्रीती सोनी. सातवीनंतर शाळा सोडायला लागूनही अथक प्रयत्नाने स्वत:ला ‘सुशिक्षित’ करणारी, पत्रकार होऊन स्थानिक महिलांना त्यांच्या अधिकारांसंबंधी जागरूक करणारी. महिला विकास संघटनेची कार्यकारी संचालिका असणाऱ्या प्रीतीचा हा लढा.
एखाद्या व्यवस्थेशी टक्कर देण्यासाठी उभं राहण्याचं बळ माणसांना नेमके कशामधून मिळत असतं? हातात नसलेल्या पदवीच्या कागदामधून? की गाठीशी असलेल्या भरभक्कम पुंजीमधून? आणि अशी हिंमत देणारी कोणतीच गोष्ट पाठीशी नसेल तर माणसं प्रचलित व्यवस्थेच्या डोळ्याला डोळा भिडवून तिला प्रश्न विचारण्याची हिंमत करीतच नाहीत का? प्रीती सोनीला भेटल्यावर या सर्व गैरसमजांची जळमटे एकदम निघून गेली.
प्रीती भेटली दोनेक वर्षांपूर्वी भूजमध्ये. ‘कच्छ महिला विकास संघटन’ नावाचे कच्छमधील महिलांचे एक सशक्त जाळे विणणाऱ्या सुषमा अय्यंगारला भेटण्यासाठी गेल्यावर तिने आवर्जून तिच्या ज्या सहकाऱ्यांची भेट घ्यायला सांगितली त्यात प्राधान्याने नाव होते प्रीतीचे! किरकोळ शरीरयष्टी, अगदी साधी सुती साडी अंगावर आणि चेहेऱ्यावरचे भाव बोलण्याची फारशी इच्छा न दर्शवणारे! पण तरीही, सुषमाशी गप्पा झाल्यावर प्रीतीच्या समोर जाऊन बसलेच. तिच्याशी बोलण्यासाठी. प्रीती तासभर बोलत होती. कच्छमधील महिलांच्या कष्टांविषयी, त्या भूमीतील संगीताच्या समृद्ध परंपरेविषयी आणि थोडय़ा संकोचाने, स्वत:विषयी! आमचा संवाद संपवून उठताना वाटत होते, या तरुणीशी गप्पा केल्या नसत्या तर एका सुंदर अनुभवाला मुकले असते!
व्यवस्थेशी लढणे हे प्रीतीच्या आयुष्याचे उद्दिष्ट कधीच नव्हते, पण परिस्थितीमुळे तिला ते करावे लागले. कच्छमधील हजारो कुटुंबांप्रमाणे तिच्याही कुटुंबाला दारिद्रय़ाचा शाप मिळाला होता. वडील-भाऊ घरात सोन्याचे कारागिरी काम करीत आणि प्रीती शाळेत शिकत असताना एका औषधविक्री करणाऱ्या दुकानात काम करीत होती. शाळेत जेमतेम माध्यमिक शिक्षणापर्यंत गाडी गेली, पण सहावी-सातवीत प्रगती पुस्तकावर नापास झाल्याची मोठी लाल रेघ उमटली आणि प्रीतीची शाळा बंद झाली. स्वेच्छेने नाही, तर कुटुंबाच्या दबावाने. तिचे शिक्षण तसेही घरात आणि आसपास राहणाऱ्या त्यांच्या समाजातील लोकांना मंजूर नव्हते, पण आता मात्र ते अधिकृतपणे बंद झाले. आसपासच्या इतर मुलींप्रमाणे प्रीतीने धुण्याभांडय़ाची कामे धरली आणि लग्न होईपर्यंत घराच्या चुलीला आधार देण्याचे ‘कर्तव्य’ ती निभावू लागली. घराने सुटकेचा नि:श्वास सोडला; अखेर शिक्षणाचे भूत प्रीतीच्या मानगुटीवरून उतरले म्हणून! पण प्रीतीला हे मंजूर नव्हते.
सुषमाने त्या वेळी कच्छमधील महिला संघटन बांधण्याचे काम सुरू केले होते आणि तिच्या दुसऱ्या सहकारी स्त्रीचे छोटे मूल सांभाळायला एखादी मुलगी हवी होती. प्रीतीने ती संधी घेत धुणं-भांडी करायची कामं सोडली आणि ते काम स्वीकारले. अर्थातच कुटुंबाच्या मनाविरुद्ध. घरात एव्हाना तिच्या लग्नाचा विचार सुरू झाला होता. सुषमासारख्या केस कापलेल्या (छोटे केस असलेल्या) बायकांबरोबर काम करणे हे केवळ प्रीतीच्या घरालाच नाही तर समाजालाही मंजूर नव्हते. सुषमा ही सीमेपलीकडे असणाऱ्या पाकिस्तानची हेर असणार किंवा वेष पालटून आलेल्या सीआयडी ऑफिसर असणार नाहीतर नक्कीच स्मगलर असणार, असा समज पाकिस्तानच्या सीमेच्या आसपास असलेल्या गावांमध्ये दृढ होता. अंगाखांद्यावर सौभाग्याचे एकही चिन्ह नसलेल्या या बायका मुळात बायका नाहीतच अशी प्रीतीच्या कुटुंबासह तिच्या समाजाचीही खात्री होती. त्यामुळे या कामाला तिच्या घरातून प्रचंड विरोध झाला, पण प्रीतीसाठी मात्र तो सुटकेचा मार्ग होता. लहान वयात लग्न, मग मुलंबाळं आणि त्यानंतर घरात येईल ते छोटे-मोठे सोन्याचे काम करीत आयुष्य घालवण्याचे तिच्या नक्कीच मनात नव्हते.
मुलं सांभाळण्यासाठी पश्चिम भागात ज्या खारेगावमध्ये प्रीती राहात होती त्या गावात शासकीय योजनेखाली तलाव बांधण्याचे काम सुरू होते. सुषमाच्या पुढाकाराने तिथे झाडाखाली किशोरवयीन मुलींसाठी अनौपचारिक शिक्षण सुरू होते. प्रीतीने त्यासाठी आपले नाव नोंदवले. बघता-बघता या वर्गाला केवळ मुलीच नाही तर महिलाही येऊ लागल्या आणि शिकता-शिकता प्रीती त्यांना शिकवू लागली. आता घराकडून आणि समाजाकडून ती जवळजवळ बहिष्कृतच झाली होती. त्यामुळे दिवसा मोठय़ा बायकांना शिकवायचे आणि रात्री स्वत:चे शिक्षण पुढे चालू ठेवायचे असा तिचा दिनक्रम होता. शिकवायला आणि लिहायला आपल्याला खूप मनापासून आवडते हे या काळात प्रीतीला उमगत गेले आणि मग तिने कच्छ महिला संघटनेच्या ‘उजास’ या न्यूज लेटरची जबाबदारी स्वीकारली. संघटनेमध्ये येणाऱ्या महिलांकडून लेख लिहून घेणे, ते वाचून दुरुस्त करणे, हे करताना तिने तिच्या आणि आसपासच्या गावात महिला बातमीदार आणि लिहिणाऱ्यांची एक दमदार टीमच उभी केली. आपले प्रश्न म्हणणे, मनातील आकांक्षा, संघटनेतील अनुभव हे सारे मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ देणाऱ्या ‘उजास’चे काम करणे म्हणजे प्रीतीसाठी एक ‘जुनून था’! याच कामासाठी ती स्क्रीन प्रिंटिंग शिकली आणि मग कच्छ महिला विकास संघटनेची छपाईची सर्व कामे प्रीतीकडे येऊ लागली. बायकांचे आरोग्य, साक्षरता यांवर केवळ बायकांपुरते लिहून चालणार नाही तर सर्वापुढे हे प्रश्न जायला हवेत म्हणून ती मुख्य माध्यमासाठी (main stream media) लिहू लागली.
महिलांना साक्षर, शहाणे करण्यासाठी माध्यमाचा किती प्रभावी आणि उत्तम वापर होऊ शकतो याचे भान आलेल्या प्रीतीने जी झेप घेतली आहे ती चकित करणारी आहे. आपल्या नावापुढे पदवीचे शेपूट लागावे यासाठी बाईने शिकू नये तर आपले प्रश्न सोडवण्याच्या- मांडण्याच्या प्रयत्नांना एक भाग म्हणून प्रत्येक बाईने शिकायला हवे असे तिचे म्हणणे होते आणि यासाठी आकाशवाणीसारखे माध्यम खूप उपयोगी ठरेल असे तिला वाटत होतं. रोजचा पेपर बायकांच्या हातात पडतोच नाही, पण भरतकाम करता-करता बाई रेडिओ ऐकू शकते. रेडिओ ऐकण्याची सवय बायकांना लावण्यासाठी आधी त्यांचे शिक्षण स्वत: घ्यायला हवे असे म्हणत तिने ध्वनिमुद्रण शिकून घेतले आणि त्याचबरोबर महिलांचे अधिकार, शिक्षण, आरोग्य यांविषयी छोटी नाटके लिहिली. पण सरकारी आकाशवाणी लोकांना हवे ते येतेच असे नाही आणि त्यांच्या भाषेतही देत नाही. हे तिला जाणवत होते. ७२ टक्के आपल्या भागातील रेडिओ ऐकतात, पण जे ऐकवले जाते तेच त्यांना ऐकावे लागते यावर उपाय म्हणून तिने आधी प्रायोजित कार्यक्रम केले आणि मग ‘कम्युनिटी रेडिओ’साठी प्रयत्न सुरू केले.
१९९८ साली अहमदाबादमधील दृष्टी मीडिया कलेक्टिव्ह या संस्थेच्या सहकार्याने कच्छ महिला विकास संघटनतर्फे कम्युनिटी रेडिओचा प्रयोग दोन गावांमध्ये सुरू झाला, पण या रेडिओसाठी विनामूल्य एअरवेज द्यायला शासनाची कोणतीही तजवीज नव्हती. प्रीतीने त्यासाठी प्रयत्न सुरू केला आणि त्यासाठी तब्बल चौदा वर्षे लढा दिला. देशभरातील कम्युनिटी रेडिओसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘कम्युनिटी रेडिओ फोरम’ या छत्राखाली एकत्र आणण्यात पुढाकार घेणारी प्रीती या फोरमच्या संस्थापकांपैकी एक आहे. २००० साली सुरू झालेल्या या प्रयत्नांना अखेर २००८ साली यश येऊन शासनाने ही मागणी धोरणात्मक पातळीवर मान्य केली. १४ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आता जून २०१२ मध्ये प्रीतीच्या आणि तिच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश येऊन ‘रेडिओ उजास’चे उद्घाटन कच्छमधील भीमसर गावात झाले. लोकांचा, लोकांसाठी, लोकांनी चालवलेल्या या रेडिओचा लाभ वीस हजारांहून अधिक लोकांना होणार आहे. स्थानिक भाषा, संस्कृती कला आणि कलाकार या सगळ्यांचा पुढील पिढय़ांसाठी सांभाळ करण्यासाठीही या रेडिओचा उपयोग होणार आहे.
दृष्टीच्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर रेडिओ चालवताना प्रीतीला कच्छमधील समृद्ध अशा संगीत परंपरेची अशी ओळख झाली की, त्यातून एका नव्या उपक्रमाला जन्म मिळाला. कच्छमध्ये जे अनेक समुदाय आहेत त्या प्रत्येकाचे आपले एक संगीत आहे. त्यात शृंगार आहे, तसे अध्यात्त्मही आहे. लैला-मजनूप्रमाणे सुहिनी-मेहार, ससई-पुनो यांच्या अमर प्रेमकहाण्या आहेत. भजन, लोकगीते, रास, मर्सिथा असे अनेक संगीत प्रकार आणि सुरंगो, जोडिया पाव, मोर्ली अशी तऱ्हेतऱ्हेची वाद्य हे सगळे स्थानिक संस्कृतीचे वैशिष्टय़पूर्ण संचित जेव्हा समोर आले तेव्हा तिला प्रकर्षांने वाटले, पुढील पिढय़ांसाठी हे सांभाळून ठेवले पाहिजे. भूजमधील विनाशकारी भूकंपानंतर विविध समुदायांबरोबर त्यांच्या रोजगारासाठी काम झाले होते. अपवाद फक्त या संगीतकार-गायकांचा. मग या कलाकारांना संघटित करण्याचे काम तिने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सुरू केले. आज कच्छ साधक संघ ही तीनशेपेक्षा अधिक संगीतकारांची संघटना या भागातील संगीत टिकवण्यासाठी, जगातील रसिकांपुढे नेण्यासाठी अनेक पातळीवर काम करते आहे. यामध्ये प्रीतीचा वाटा फार मोलाचा आहे.
प्रीती सध्या कच्छ महिला विकास संघटनेची कार्यकारी संचालिका आहे. हे संघटन आज अक्षरश: महिला रोजगारापासून पाणी प्रश्नापर्यंत आणि महिलांवरील अन्यायापासून महिला पंचायत सदस्यांच्या सक्षमीकरणापर्यंत अनेक पातळ्यांवर काम करते आहे आणि २० वर्षांपूर्वी आपल्या छोटय़ा गावात धुण्या-भांडय़ाची कामे करणारी प्रीती या संघटनेचे नेतृत्व करते आहे. या प्रवासात तिला एक समंजस साथीदार मिळाला, पण माहेरच्या माणसांना आणि तिच्या समाजाला तिच्या कामाचे महत्त्व कच्छमधील भूकंपानंतर विशेषत्वाने समजले.
या सगळ्या गदारोळात प्रीतीला विसावा कुठे मिळतो? त्या दिवशी आमच्या गप्पा झाल्यावर संध्याकाळी ती मला भीमसर तलावाच्या काठावर घेऊन गेली. मावळतीचे सूर्यकिरण तलावाच्या पाण्यावर चमकत असताना तलावाच्या काठावर उभारलेल्या छोटय़ा स्टेजवर अनेक प्रकारच्या वाद्यांची आणि कलाकारांची लगबग सुरू होती. समोरच एक किल्ल्यासारखी मोठी भिंत आणि त्याला जोडून अ‍ॅम्फी थिएटरसारख्या पायऱ्या होत्या. सूर्य मावळता-मावळता तिथे जलसा सुरू झाला. ‘संगीत रेहाण’ नावाचा! गावातील स्त्री-पुरुष तळ्याकाठी भरणाऱ्या या जलशाला येऊन निवांत झाले होते आणि आपल्या छोटय़ा मुलीला मांडीवर खेळविणारी प्रीती समाधानाने त्या सगळ्या वातावरणाकडे बघत होती.     
संपर्कासाठी- संकेतस्थळ www.kmvs.in
ई-मेल- This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दूरध्वनी-०२८३२-२२२१२४ / २२३३११