आई दे शक्ती.. Print

शैलजा शेवडे ,शनिवार,२०ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

हे कमलवासिनी, हातात कमल धारण केलेली, अति शुभ्र वस्त्र परिधान केलेली, गंध पुष्पमाला विभूषित आणि सर्व त्रिभुवनाला वैभवसंपन्न करणाऱ्या भगवती विष्णुवल्लभे, तू माझ्यावर प्रसन्न हो.. आई मला शक्ती हवी गं..
आई, जगदंबे, इतके दिवस कसं तुझं साधं, ओळखीचं रूप माझ्या मनात होतं. बुट्टेदार शालू नेसलायस. त्यावर हिरवी चोळी घातलीय. रत्नजडित हार गळ्यात आहे. तुझ्या भांगात माणिकमोती आहेत. सुवर्णकंकणं घातली आहेस. अशी तुझी सुंदर मूर्ती सिंहासनावर बसली आहे.
ही माझी आई आहे. मला कुठल्याही संकटांपासून वाचविणारी, मी जे काही मागीन, ते लगेच देणारी. किती माझ्या जवळची..!
 आणि अचानक जत्रेत गर्दीच्या ठिकाणी आईचं बोट सुटून  हरवलेल्या लेकरासारखी माझी स्थिती झाली. असं कसं बोट सुटलं? हळूहळू प्रसंगातलं गांभीर्य लक्षात येत गेलं. माझा साधा-सरळ भाव हरवून गेला होता. मी हरवलेय, माझी आई मला सापडत नाहीयं.. हे मला जाणवायला लागलं. पण कुणाला सांगणार कसं? अहंकार आड आला.
आणि कुणी तरी मला दाखवलं, ही बघ तुझी आई.. ही बघ आपली आई.. ही बघ साऱ्या विश्वाची आई!
तू अष्टभुजा देवी होतीस. सिंहवाहिनी होतीस.. महिषासुरमर्दिनी होतीस. तू विश्वजननी होतीस. सगळे उदो उदो करीत तुझा जयजयकार करीत होते.
ही माझी आई? मी गोंधळले. आनंदले.
तोपर्यंत आणखी कुणी आले. मला म्हणू लागले, ‘अरे, ऐक कशी आहे आपली आई.’ ही त्रिपुरसुंदरी, जगत निर्माण करणारी ही आपली आई आहे आणि तिचं वर्णन तर ऐक. तिच्या एका हातात रणरूपी पाश, दुसऱ्या हातात क्रोधरूपी अंकुश, तिसऱ्या हातात मनोरूपी इक्षूचे धनुष्य आणि चौथ्या हातात पाच तन्मात्रारूपी बाण आहेत. याप्रमाणे चार हातांत चार आयुधं आहेत. तिच्या अरुणप्रभेने सर्व ब्रह्मांड व्यापून राहिलंय. ती त्रिपुरसुंदरी आपली आई आहे.
आणि तिची नावंही ऐक.
मातंगी, भुवनेश्वरी च बगला धूमावती भैरवी।
तारा छिन्नशिरोधरा भगवती श्यामा रमा सुंदरी।
मी अजूनच गोंधळून गेले. हे सर्व माझ्या आकलनापलीकडचं होतं. पण आनंद देणारं होतं, अभिमान वाटणारं होतं.
पण खरोखरच समजणारं नव्हतं. हे नुसते शब्दांचे बुडबुडे वाटत होते. मला काही तरी साकार पाहिजे होतं. सगुण पाहिजे होतं. उपास्य पाहिजे होतं.
कुठं आहे माझी आई? आता केवळ मूर्तीच्या दर्शनाने माझं भागणार नाही. जिनं मला जन्म दिला. आणि जी माझ्यात आहे. जी माझं पोषण करते. ती मला हवीय. आणि जाणवलं,
या देवी सर्वभुतेषु मातृरूपेण संस्थिता,
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:।
सर्व भूतमात्रांमध्ये मातृरूपाने ती राहते. त्या देवीला माझा त्रिवार नमस्कार.
ती शक्ती प्राणिमात्रात चेतना आहे. तीच बुद्धिरूपाने राहते. ती निद्रारूपात असते. ती शक्तिरूपात असते. ती सुधारूपात क्षुधारूपेण? होय तीच भूक आहे, भुकेची जाणीव आहे. नाही तरी अन्न मिळविण्यासाठी आपण धडपड कशी करणार? ती तृष्णारूपात आहे. ती छायारूपात आहे. छायारूपात? हो.. वस्तुमान असेल तर प्रकाशकिरण आरपार जाऊ शकत नाही. सावली पडते. ती सावली म्हणजेसुद्धा देवीच आहे. ती श्रद्धा, कान्ति, क्षान्ति, शान्ति, वृत्ति, स्मृती, दया तुष्टी भ्रांति.. सर्व सर्व रूपांत तीच ती आहे.
ही शक्ती.. ही देवी.. ही माझी आई आहे.  नरहरी म्हणतात, ‘तिला वर्णन करताना चारही वेद थकले.. सहा दर्शनेही प्रवाहात पडली.’ त्यांनाही तिचे वर्णन करता आले नाही. पण अशी ती जगदंबा भक्तांना मात्र पावते.
ही महिषासुरमर्दिनी आहे. खरंच महिषासुर नावाचा असुर होता? पण एकनाथांनी तर वेगळेच सांगितलं. मी तर इतके दिवस आईपाशी काही मागायचं, तर ही लांबलचक यादी सादर करीत असायची. पण आता  कळलं, हे आईचं रूपही वेगळं आणि तिच्याकडे काही मागणंही वेगळं.
अनादी निर्गुण प्रगटली भवानी
मोह महिषासुर मर्दानी लागोनी
त्रिविध तापाची करावया झाडणी
भक्ता लागोनी पावसी निर्वाळी
आईचा जोगवा जोगवा मागीन।
जिला आदी अंत नाही, जिला गुण आकार नाही अशी ही जगदंबा मोहरूपी महिषासुराला मारायला आली आहे. तिचा जोगवा मागायचा तर एकनिष्ठ भक्ती हवी.
नवरात्रात नवविधा भक्ती करीन. नवविधा भक्ती म्हणजे श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन या मार्गानी भक्ती करेन आणि ज्ञानाचा पुत्र मागेन. आशा, इच्छा, तृष्णा यांना देहरूप घरातून घालवून देईन. मनात उठणारे विकल्प, विकार यांना सोडून, एकाग्रता निर्माण करून अमृतरसाची दुरडी भरेन. काम, क्रोध टाकून देईन.
अहाहा.. एकनाथ महाराज म्हणतात, असा भक्तीचा जोगवा तुझ्या दारात ठेवला. जनार्दन कृपेने एकरूपात तुला पाहिले. म्हणजे सगळीकडे जगदंबेस पाहिले.. तिला जाणवले.
तिचे स्वरूप दिसणे मला शक्य होईल? मी कुठे पूजा-अर्चना करते? मला कुठं तंत्रमंत्र माहीत आहेत? मी तर नाना कारणं सांगत तुझी पूजा टाळते. मी आळशी आहे. मी अडचणीत असले की तुझी आठवण काढते. मग तू का येशील?
शंकराचार्यही म्हणतात,
मत्सम: पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि।
एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यं तथा कुरू।
माझ्यासारखा पापी कुणी नाही.. (पण) तुझ्यासारखी पापमुक्त करणारीही कोणी नाही..
तू माझी आई आहेस. आई कधी अपत्याची उपेक्षा करील काय? नक्कीच नाही.
मला खरंच तू दिसावीस असं वाटतं.
हे आई मला संस्कृत येत नाही. मी माझ्या भाषेत तुला बोलावते.
कुमारी काली कापाली, कपिले कृष्णपिंगले ये,
अट्टहासे अनघे आर्ये, असुरमर्दिनी धावत ये।
महाभयंकारी, मुक्तकेशिनी, महाबले महाकाली ये,
लवलवत्या जिव्हेने गे, मुण्डमालिनी रणरागिणी ये।
मायावी हे असुर मातले, महामाये सत्वरी ये,
भक्त तुझे गे तुला पुकारती, भक्तवत्सले लगबग ये।
आई मला शक्ती हवी गं.. तुझ्याकडेच तर मागणार ना?
महाकाली तू महेश्वरी तू.. आई दे शक्ती
त्रिपुर सुंदरी, त्रिपुर भैरवी..  आई दे शक्ती
भद्रकाली तू भुवनेश्वरी तू  आई दे शक्ती
उमा पार्वती, गौरी चंडी  आई दे शक्ती
चामुंडी तू चक्रधारिणी  आई दे शक्ती
तारा धारा राका वीरा  आई दे शक्ती
नारायणी तू महादेवी तू  आई दे शक्ती
तुझी लेकरे तुला मागती  आई दे शक्ती
ज्ञानशक्ती दे, क्रियाशक्ती दे, द्रव्यशक्ती दे,
आई दे शक्ती..  आई दे शक्ती।