शक्तीस्वरूपीणे नमो नम: Print

मेधा सोमण ,शनिवार,२० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

दुर्गापूजा म्हणजे श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती यांची पूजा! श्री महाकाली ही शरीरसामर्थ्यांची देवता आहे. श्री महालक्ष्मी ही धन-धान्य-धैर्य व शौर्य लक्ष्मी आहे, तर महासरस्वती ही विद्येची देवता आहे. घरच्या स्त्रीमध्ये या तिन्ही देवतांचे गुण असायला हवेत. त्यासाठी प्रयत्न करणे हीच दुर्गापूजा.
भारतीय संस्कृतीत आदिशक्तीला खूपच मानाचे स्थान आहे, ते कसे प्राप्त झाले हे बघण्यासाठी प्राचीन भारतीय संस्कृतीत आदिशक्तीच्या स्वरूपाबद्दलची कल्पना कशी विकसित होत गेली हे पाहणे खूप मनोवेधक ठरते. भारतीय संस्कृतीचा इतिहास बहुरंगी विविध विचारधारांचे एकत्रीकरण असलेला आहे. प्राचीन काळी माणसे टोळ्या करून राहत असत. प्रत्येक टोळीमध्ये स्त्रीला मोठा मान दिला जात असे. टोळीतील कर्तुमकर्तुम शक्ती म्हणजे स्त्रीच असे. तीच ‘मा’ असे. मुलांची नावे ही मातेच्या नावावरून ओळखली जात. अन्न-पाणी मिळविण्यासाठी पुरुषांबरोबर कधी कधी स्त्रीदेखील बाहेर जाई. तर कधी कधी लहान मुलांच्या रक्षणासाठी स्त्री वस्तीवरच थांबत असे. सर्व टोळीवर तिचीच सत्ता असे. पुरुषांनी बाहेरून आणलेली शिकार तिच्यापुढे ठेवली जाई आणि तीच त्याची योग्य तऱ्हेने वाटणी करीत असे. लैंगिक बंधने नसल्याने पुत्र कोणता, पिता कोणता, पती कोणता किंवा भाऊ कोणता हे समजणेही कठीण असे. अशा काळात ‘मा’ ही शक्ती मुख्य होती. ‘माता’ म्हणून ती मानली जात होती. हीच मातृशक्ती होती.
नंतर कालांतराने परिस्थिती बदलली. एका मातेच्या सत्तेऐवजी जनसमितीचे राज्य आले. सत्तास्पर्धा सुरू झाली. टोळ्याटोळ्यांमधून संघर्ष वाढले. युद्धे होऊ लागली. युद्ध जिंकून देणारी कोणती तरी ‘शक्ती’ आहे, असे मानले जाऊ लागले. युद्धाची देवता- रक्षण करणारी देवता म्हणून शक्तीच्या स्वरूपात ती मानली जाऊ लागली.
मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व व्यवहारांवर देखरेख करणारी, वर्चस्व गाजविणारी एक शक्ती आहे. तीच दिवस-रात्र घडवून आणते. तीच पाऊस पाडते. जमिनीत पेरलेले बियाणे तिच्यामुळेच अंकुरते, वारा-पाऊस-भूकंप तिच्यामुळेच होतात, असे वाढल्याने पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनाच पंचमहाशक्ती मानले जाऊ लागले. या शक्तींना प्रसन्न करण्यासाठी उपासना सुरू झाल्या. त्यांना प्रसन्न करण्यासाठी स्तोत्रे, सुक्ते तयार झाली. सूर्यसुक्त, उषासुक्त, वायूसुक्त, जलसुक्त, पृथ्वीचे स्तवन अशा अनेक रचना देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी गायल्या जाऊ लागल्या.
भूमी सर्वाचे पोषण करते. वस्तू उत्पन्न होण्यासाठी बीजरूपांचा संयोग होणे आवश्यक असते या जाणिवेतूनच प्रकृती आणि पुरुष हा विचार मानला जाऊ लागला. निर्मितीसाठी पुरुष- प्रकृती यांचा संयोग झाल्यावरच प्रकृतीकडून निर्मितीची प्रक्रिया घडते. जिथे निर्मिती आहे तेथे नतमस्तक होण्याची मनुष्याची सहजप्रवृत्ती आहे म्हणूनच भूमी देवतेची पूजा होऊ लागली. याबरोबर मातृदेवतेचीही उपासना चालू होतीच. मातेकडे जननशक्ती आहे. विश्वाच्या निर्मितीसाठीही हीच मातृशक्ती जननक्रिया घडविणारी असते म्हणून तिला आदिशक्ती, जगत्धात्री, जगत्जननी, जगदंबा म्हटले जाऊ लागले. जगदंबा म्हणजे आदिमाता! ही ब्रह्मा-विष्णू-महेशाची माता मानली जाऊ लागली. भूमीतून धान्य पिकते. समृद्धी, संपन्नता प्राप्त होते, म्हणून तिलाच ‘श्री लक्ष्मी’ म्हटले जाऊ लागले.
शक्तीचे सामर्थ्य
‘शक्’ या धातूचा अर्थ ‘शक्नोति’ म्हणजे समर्थ असणे हा होय. म्हणून शक्ती म्हणजे सामथ्र्य, पराक्रम, प्राण होय. प्रत्येक पदार्थात कार्योत्पादनाला उपयोगी पडणारा आणि कधीही त्या पदार्थापासून वेगळा न राहणारा असा जो विशिष्ट धर्म असतो त्याला ‘शक्ती म्हणतात. म्हणजे ‘अग्नी’ हा सामथ्र्यवान आहे. ‘दाहकता’ ही त्याची शक्ती आहे. ती त्याच्यापासून कधीही वेगळी राहत नाही. तशी निर्मिती ही मातेची शक्ती मातेपासून वेगळी राहत नाही. ही शक्ती निर्गुण निराकार समजली जाते.
भारतीय संस्कृती आणि भारतीय तत्त्वज्ञान, धर्मविचार यामध्ये मातृपूजेला जे महत्त्व आहे ते तसे पूर्वीपासून होते. पूर्वी यज्ञयागाचे प्राबल्य अधिक होते. यज्ञाच्या वेळी अग्नी देवतेला ‘हवन’ केले जाई. यज्ञामध्ये अग्नी देवतेला केलेले हवन पंचमहाशक्तीपर्यंत जाऊन पोहोचते असा समज होता. या विचारांचा अतिरेक होऊ लागला. अग्नी देवतेला पशुबळी देण्याचे स्तोम वाढू लागले. पशुहत्येचे प्रकार खूप वाढू लागले. त्यामुळेच त्यानंतर कर्मयोग, स्वधर्म, स्वकर्तव्य आणि दानाचे महत्त्व सांगणारी संस्कृती उदयास आली.
नवरात्रौत्सव
आश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. माती भरलेल्या घटामध्ये नऊ प्रकारचे धान्य रुजविण्यासाठी पेरले जाते. नवरात्र हा कृषिप्रधान देशातला पृथ्वी देवतेची भूमातेची पूजा करण्याचा, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक लोकोत्सव आहे. ‘नऊ’ या अंकामध्ये नवनिर्मितीची जादू आहे. धान्यही नऊ दिवसांत अंकुरते. मातेच्या उदरात अपत्याची वाढही नऊ महिने नऊ दिवस होत असते म्हणूनच आदिशक्तीचा उत्सवही नऊ दिवसांचा साजरा केला जातो. वेदकाळात मूर्तिपूजा नव्हती. आर्यानी गंधाक्षत फुलांनी पूजा करण्याचा विधी द्रवीड लोकांकडून घेतला असा उल्लेख सापडतो. निर्गुण निराकार आदी तत्त्वांची उपासना करण्याची ताकद सर्वसामान्य माणसांमध्ये असतेच असे नाही. माणसाला आपले ताणतणाव, दु:ख, व्यथा, वेदना कमी करण्यासाठी, विसरण्यासाठी आणि मनोबल वाढविण्यासाठी कुठे तरी नतमस्तक व्हावे असे वाटते. त्यासाठी सुलभ अशा मूर्तिपूजेचा प्रारंभ झाला. समाजातील दुष्ट शक्तींना पराभूत करून सत् प्रवृत्तींना प्रभावी बनविण्यासाठी या आदिशक्तीला प्रत्येक काळात खूप संघर्ष करावा लागला. आदिशक्ती कालानुरूप चण्डमुण्डांना मारणारी सामथ्र्यवान चण्डिकादेवी; दुष्ट दुर्ग राक्षसाचा नाश करणारी दुर्गादेवी आणि महिषासुराचा वध करणारी महिषासुरमर्दिनी झाली, तसेच वेगवेगळ्या गावांचे नगरांचे रक्षण करणाऱ्या ग्रामदेवता, नगरदेवताही निर्माण झाल्या. आधुनिक काळात प्रत्येकाने मनातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंवर नियंत्रण मिळविण्यासाठी शक्तीची उपासना करावयाची असते. समाजातील अन्याय, भ्रष्टाचार, अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता, रोगराई, महागाई अशा अनेक राक्षसांना नष्ट करण्यासाठी आत्मशक्ती प्राप्त करून घ्यावयाची असते.
दुर्गापूजा म्हणजे श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती यांची पूजा! श्री महाकाली ही शरीर सामर्थ्यांची देवता आहे. श्री महालक्ष्मी ही धनलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी आहे. श्री महासरस्वती ही तर विद्येची देवता आहे. घरच्या स्त्रीमध्ये या तिन्ही देवतांचे गुण असावयास हवेत. ते निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हीच खरी दुर्गापूजा होय. तीच खरी आदिशक्तीची उपासना होईल. मातृशक्तीचे सामथ्र्य वाढले तरच राष्ट्रशक्तीची ताकद वाढेल.
सध्या मंदिरांमध्ये दुर्गा उपासनेसाठी खूप गर्दी होत असते; परंतु घरात जन्मणाऱ्या देवींचा जन्म नाकारला जातो. सध्या स्त्री भ्रूणहत्या वाढत आहेत. हे प्रगत समाजाला लांच्छनास्पद आहे. आदिशक्तीची उपासना करताना हे लक्षात घ्यावे लागेल. कन्या जन्म नाकारला गेला तर माता कशा निर्माण होतील? हे कालचक्र कसे चालेल? खरं तर यासाठी समाज जागृती करणे हीच खरी आदिशक्तीची उपासना होईल.