लढा बालविवाहाविरुद्धचा : छोटीसी गुडिया की लंबी कहानी Print

मनीषा सबनीस ,शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

पश्चिम बंगालमधल्या पुरुलिया या छोटय़ाशा गावातील शेतमजुराची अकरा वर्षांची मुलगी, बीना. स्वत:च्या बालविवाहाविरुद्ध सुरू झालेला तिचा लढा आता गावातल्या मुलींसाठीही सुरू झाला आहे. एका लढाईचं आंदोलनात रूपांतर करणाऱ्या बीनाच्या लढय़ाची  ही गोष्ट.
बीना कालिंदी- अकरा वर्षांची साधीसुधी मुलगी. आज भारताची शूर आणि धीट अशी ‘रियल हिरो’ ट्रॉफी राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारणारी एक छोटी विरांगना ठरली आहे. पश्चिम बंगालमधल्या पुरुलिया जिल्ह्य़ातील गरीब शेतमजुराच्या म्हणजे परिक्षित-कालिंदीच्या पोटी जन्मलेली बीना. जिल्ह्य़ातील बहुसंख्य लोकांचा शेती हा व्यवसाय. म्हणायला व्यवसाय पण प्रत्यक्षात मात्र ओसाड, नापीक जमीन, जलसिंचन आणि शेतीसाठी आवश्यक सेवा-सुविधांचा, यंत्रसामुग्रीचा पूर्ण अभाव. वरुणराजाच्या कृपेवर चालणारी शेती, त्यामुळे अर्थातच खूपच कष्टाची आणि तितकीच बेभरवशाची.
बीनाचे कुटुंब म्हणजे ४/५ भावंडे, आजारी नि अंथरूणाला खिळलेली आई आणि दारूडा बाप. बीनाला घरामध्ये एखाद्या मोठय़ा कर्त्यांसवरत्या व्यक्तीसारखे वागायला लागायचे. सकाळी लवकर उठून घरातले सगळे आवरून, धुणीभांडी, घर सारवणे, भावंडांची खाणीपिणी, स्वयंपाक करून त्यानंतर रानात जाऊन बांबूच्या टोपल्यांसाठी लागणारे विशिष्ट लाकूड घेऊन येणे अशी कामे ती न दमता-थकता करायची. मधूनमधून उपासमार, दारूडय़ा बापाचा तमाशा हेही असेच.
त्यात भरीस भर म्हणून कालिंदी जमातीत पक्की रुजलेली बालविवाहाची प्रथा नि बीनाच्या कुटुंबात एक मुलगा-तोही धाकटा, सोडल्यास बाकी सगळ्या मुलीच. जातीत राहायचे तर जातीच्या सगळ्या रूढी-परंपरा या सांभाळायला हव्याच. त्यामुळे बीनासह सगळ्या मुलींची घाईघाईने लग्ने उरकणे हा परिक्षितचा इरादा.
पण सरकारने सुरू केलेल्या शाळेत बीना जायला लागलेली. घरामध्ये हरवलेले बालपण तिला शाळेत गवसलेले. शाळेत तिला खेळण्यातली, शिकण्यातली मजा कळायला लागली. शाळेत मैत्रिणी मिळाल्या. प्रेमाने शिकवणारे, नव्या जगाची द्वारे उघडून देणारे शिक्षक मिळाले.
या शाळेतच ती शिकली की लहान वयात केले जाणारे लग्न फक्त चुकीचे किंवा मुलींच्या आरोग्यासाठी अपायकारक आहे असे नाही तर कायदेशीरदृष्टय़ासुद्धा मान्य नाही. बालविवाह हा बेकायदेशीर आहे आणि त्यासाठी शिक्षादेखील होऊ शकते. बीनासारख्या मुळातच तीक्ष्ण बुद्धिमत्ता असलेल्या मुलीला हे फार फार पटले. बालवयात विवाह केल्यामुळे तिच्या बहिणींच्या/ मैत्रिणींच्या आरोग्याची, स्वप्नांची आणि पर्यायाने संपूर्ण आयुष्याचीच झालेली वाताहात तिच्या डोळ्यांसमोर होतीच. त्यामुळेच लहान वयातील लग्ने आणि त्यांचे दुष्परिणाम तिला स्वत:ला भोगायचे नव्हते. त्यासाठी लढायचे तिने ठरविले.
वडिलांनी जेव्हा घरात तिच्या लग्नाबद्दलची चर्चा सुरू केली, तेव्हा तिने वडिलांना सांगितले की, मला अजून खूप खूप शिकायचे आहे. मला एवढय़ात लग्न करायचे नाही. घरच्यांनी ते फार मनावर घेतले नाही. सुरुवातीला सगळ्याच मुली लग्न नको म्हणतात. नंतर होईल तयार असे वाटून जातीतल्या वडीलधाऱ्या माणसांनी स्थळे आणणे सुरू ठेवले. बीनाचा विरोधही सुरू राहिला. वडिलांनी प्रेमाने सांगून समजावून बघितले. धाकधपटशाही दाखवून झाला. बीना कशानेही बधेना.
एके दिवशी आई खूप आजारी आहे लगेच घरी ये, असा निरोप घरून पाठवून तिला शाळेतून बोलावून घेतले. घरी तिला बघायला मुलगा आला होता. घरात आल्याबरोबर बीनाला परिस्थिती कळली. तिने चक्क त्या मुलालाच सांगितले की, हे बघा मला इतक्यात लग्न करायचे नाही. मला खूप शिकायचे आहे. तुम्ही तुमच्या घरी निघून जा. हे बघून वडिलांचा पारा चढला. तिचे जेवणखाण बंद झाले. तिला किमान स्वच्छतेसाठी आवश्यक असे पाणीही न मिळण्याची व्यवस्था केली गेली. अधूनमधून मारहाण, शिवीगाळ होतीच.
त्यातल्या त्यात एक रस्ता म्हणून काही स्थळांनी असे सुचवून बघितले की, आम्ही लग्नानंतरही शिक्षण सुरू ठेवू. पण बीनाने त्यांना ठणकावले की, माझ्या घरी राहूनही माझ्यासाठी शिक्षण ही एवढी कठीण गोष्ट ठरते आहे तिथे लग्नानंतर तर शिक्षण शक्यच नाही. त्यामुळे हेही बारगळले. बीनाला असेही काही प्रस्ताव आले की आत्ता लग्न ठरवून ठेवू आणि नंतर करू, त्यालाही तिने धुडकावून लावले. कारण प्रथेप्रमाणे असे ठरलेले लग्न मुलाकडचे कधीही मोडू शकतात, पण मुलीकडचे मात्र दुसऱ्या स्थळाचा विचारसुद्धा करू शकत नाहीत. ही पद्धत मान्य नसल्यामुळे बीनाने त्यालाही स्पष्ट नकार दिला.
आता तिच्यावरचा आणि तिच्या कुटुंबावरचा सामाजिक दबाव वाढत गेला. त्यांना समाजाने वाळीत टाकले. आधीच गरिबी आणि आजारपणामुळे गांजलेले कुटुंब बीनामुळे अगदी जेरीस आले आणि तिचा छळ वाढत गेला. त्याही परिस्थितीत एवढय़ा लहान वयातही तिने आत्मविश्वास गमावू न देता आपल्या शाळेतल्या मैत्रिणींना मदतीसाठी बोलावले. त्याही बीनाच्या धाडसाला दाद द्यायचे ठरवून आल्या आणि सगळ्यांनी मिळून बीनाच्या वडिलांना, घरच्यांना समजावून सांगितले की बीना जे म्हणते आहे ते खरे आहे. आई-बाप म्हणून तुम्ही तिच्या पाठीमागे ठामपणाने उभे राहा. समाजाचा दबाव हळूहळू कमी होईल.
बीनाचा हा संघर्ष पूर्ण वर्षभर चालला. बीना आता १२ वर्षांची झाली. बीनाला जाणवू लागले की आता फार दिवस आपण हा एकतर्फी लढा चालवू शकणार नाही. तिने धीराने तडक लेबर कमिशनरांचे ऑफिस गाठले. न घाबरता असिस्टंट लेबर कमिशनरांना सगळे सांगितले आणि मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी ही परिस्थिती समजावून घेतली आणि बीनाच्या वडिलांशी समक्ष चर्चा केली. त्यांना व्यवस्थित समजावून सांगितले. बीनामध्ये असलेली बुद्धिमत्ता, नेतृत्वगुण याचीही माहिती दिली. तिच्या उज्ज्वल भवितव्याची जाणीव करून दिली. या सगळ्याचा परिणाम म्हणून हळूहळू बीनाच्या वर्षभराच्या लढय़ाला यश लाभू लागले. घरच्यांचा विरोध थोडा मंदावला आणि बीनाचे म्हणणे मानले गेले.
बीना आका कालिंदी जमातीमधील सर्वात प्रौढ कुमारिका ठरली. पण बीनाचा हा लढा आता एकटीचा राहिलेला नाही तर ते एक आंदोलन झाले आहे. तिच्या आसपासचे बालविवाह तर तिने थांबवले आहेतच, पण जवळपासच्या गावांमध्ये जाऊन मोठमोठय़ा सभांमध्ये ही मुलगी अगदी साध्या-सोप्या भाषेत बोलते. आपले अनुभव सांगते. पालकांना आवाहन करते की, मुलींना शिकू द्या, त्यांच्या पायावर उभे राहू द्या. मग त्यांचे लग्न करा. तुमच्या मुलींवर प्रेम करा. भले मग त्यासाठी समाजाचा थोडा रोष ओढावून घ्यायला लागला तरी चालेल. तिच्या सहज ओघवत्या वाणीमुळे आणि प्रचंड आत्मविश्वासामुळे अनेकांना तिचे म्हणणे पटायला लागले आहे.
आपल्या समंजस वागण्या-बोलण्यामुळे आणि लहान वयातच आलेल्या परिपक्वतेमुळे तिला मैत्रिणीचा, शिक्षकांचा आणि समाजाचाही पाठिंबा मिळविणे सोपे जाते आहे. सर्वसामान्यपणे ११-१२ व्या वर्षी मुली जे करतात त्यापेक्षा खूपच वेगळे आणि महत्त्वाचे कार्य तिने लहान वयातच हाती घेतले आहे. त्यासाठी गटबांधणीही केली आहे. तिला एक आदर्श शिक्षिका व्हायचे आहे आणि असे अनेक गट स्थापन करून स्त्रियांसाठी काम करावयाचे आहे. स्त्रियांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून द्यायचा आहे.