लढा हिंसाचाराविरोधातला : क्षण एक पुरे जगण्याचा.. : Print

स्वरूप पंडित, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

मृत्यूच्या छायेत कुंथत जगण्यापेक्षा धमक्यांना न जुमानता तेजस्वितेचा एकच क्षण जगावा या विचारातूनच जन्माला आलेल्या ‘मणिपूर विमेन गन सव्‍‌र्हायवर्स नेटवर्क’ची स्थापना करणाऱ्या बीणालक्ष्मी आता इथल्या हिंसाचाराला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वाचा फोडतात. आपल्या लेखांमधून-भाषणांमधून अगदी संयुक्त राष्ट्रांच्या सभेसमोरही त्या धाडसीपणे राष्ट्रनिहाय आकडेवारी सादर करीत शस्त्रसंधीसाठी आवाहन करतात. त्या मणिपूरच्या बीणालक्ष्मी नेप्राम यांच्या लढय़ाची ही कहाणी..
हिंसाचार हा जेथील स्थायीभाव झाला आहे, रक्तपात पाहणे हे ज्यांच्या बाल्यावस्थेचे अविभाज्य अंग बनले आहे, जी भंग पावण्यासाठी पाहायची असतात त्यांनाच स्वप्ने म्हणतात हीच ज्यांच्या तारुण्याची कहाणी ठरू लागली आहे.. देशातील अशा एका अत्यंत दुर्गम भागात एक युवती शांततेचे-सौहार्दतेचे, स्वप्न पाहते. ते स्वप्न जगते.. शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ दणाणून सोडते.. विधवांना सबला बनवत आत्मसन्मान मिळवून देते.. आणि तरीही या देशातील प्रसिद्धीमाध्यमांच्या झोतापासून स्वत:ला बऱ्यापैकी अलिप्त राखते.. आपण अशा व्यक्तीची कल्पना करू शकतो का?
बीणालक्ष्मी नेप्राम.. मणिपूर राज्यात राहणारी एक तरुणी. अगदी लहान असल्यापासून शस्त्रांची ‘ओळख’ झालेली. कुटुंबावरील भीतीची छाया जणू पाचवीला पुजलेली. त्या शस्त्रांनी स्वत:च्या बाल्यावस्थेचा ताबा घेतला एवढेच कळले, मात्र तो कधी-कसा आणि कोणत्या प्रसंगामुळे याबद्दल संपूर्ण अनभिज्ञ. किशोरावस्थेत असताना आपल्या एका भाचीचा बाँबस्फोटात झालेला मृत्यू तिने पाहिला आणि या हिंसाचाराविरुद्ध लढायचे हे त्याच क्षणी नक्की झाले . कदाचित भीतीच्या अतिरेकामुळे असेल पण हळूहळू या लढाईत येणाऱ्या धमक्यांबाबत मनातील संवेदना जणू मरत गेल्या. मृत्यूच्या छायेत कुंथत जगण्यापेक्षा धमक्यांना न जुमानता तेजस्वितेचा एकच क्षण जगावा, असा पवित्रा होत गेला. आणि त्यातूनच ‘मणिपूर विमेन गन सव्‍‌र्हायवर्स नेटवर्क’ या स्वयंसेवी संस्थेची कल्पना रुजत गेली.
६५ वर्षीय स्वतंत्र भारतातील मणिपूर हे एक असे राज्य आहे ज्याच्या अनेक उपविभागांत आजही माहिन्यातून १५ दिवस वीज नसते. जिथे असते तिथेही दिवसाचे अवघे पाच-सहा तास! या राज्यात जमीन-महसूल पद्धती अस्तित्वात नाही. ४० घुसखोर गट येथे ‘अधिकृत’पणे कार्यरत आहेत, इतके की त्यांची समांतर सरकारे असतात. त्यांची समांतर मंत्रिमंडळे असतात. कोणत्याही सरकारी योजनेसाठी केंद्राकडून येणाऱ्या निधीत त्यांचा ‘वाटा’ मागणारी (म्हणजे खंडणी मागणारी) पत्रे अधिकृतपणे- छापील लेटरहेडवर आणि आवक-जावक क्रमांकासह येतात. महिन्याचे किमान दहा दिवस तरी येथे अतिरेकी संघटनांनी बंद पुकारलेला असतो. तामिलाँगसारख्या भागात कोलकात्याच्या बँकेची एकच शाखा आहे. जिथे सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॉप्टरने ‘कॅश’ पाठवली जाते. आणि या बँकेतील रोकड संपली तर संपूर्ण जिल्ह्य़ात रोकड नाही अशी परिस्थिती असते. घुसखोरी ही येथील मुख्य समस्या. त्याला पायाभूत सुविधांच्या अभावाची जोड. यामुळे उद्योजक येथे गुंतवणूक करीत नाहीत, त्यामुळे बेराजगारी हटत नाही. परिणामी अतिरेकी संघटनांना आयतेच मनुष्यबळ उपलब्ध होते. नेप्राम यांनी नेमके कोणत्या परिस्थितीत कार्य उभे केले आहे याचा आवाका यावरून लक्षात येऊ शकेल.
‘‘लहानपणापासून मी निरपराध्यांना मरताना पाहिले. घरातील कर्त्यां पुरुषाच्या मृत्यूमुळे उद्ध्वस्त झालेल्या विधवा पाहिल्या. स्वप्न भंगलेली मुले पाहिली. का कोणास ठाऊक पण हे सारे निमूट सहन करणे मला जमले नाही,’’ बीणालक्ष्मी सांगतात. बीणालक्ष्मी हे नाव वीणा धारण करणाऱ्या सरस्वतीवरून पडले आहे. आणि याच सरस्वतीचा वरदहस्त लेखनरूपाने आपल्या कार्यासाठी लाभला असल्याचे नेप्राम नमूद करतात. समाजातील हिंसाचारामुळे ज्यांच्या नशिबी वैधव्य आले अशांना स्वावलंबी करायचे, स्वत:च्या पायावर सन्मानाने उभे करायचे आणि एकेका कुटुंबाचे आयुष्य मार्गी लावायचे हे नेप्राम यांचे ध्येय ठरले. २००४ मध्ये यातूनच उभी राहिली ‘कंट्रोल आर्मस् फाऊंडेशन ऑफ इंडिया’ ही संस्था. भारतभरातून शस्त्रास्त्र वापरास विरोध असणाऱ्या समविचारी नागरिकांची ही संस्था संरक्षण दले, सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिकांना विकासाच्या मुद्दय़ावर एकत्र आणू पाहत होती.
मात्र त्याच वेळी पुरुषांपेक्षा स्त्रियांना शांततेच्या कारणास्तव एकत्र आणणे अधिक सोपे तसेच परिणामकारक आहे हे नेप्राम यांच्या लक्षात आले. स्त्रीमधील मातृत्वाचा ओलावा हे यामागील मुख्य कारण असल्याचे त्यांना जाणवले. यामागे कारणही तसेच होते. २४ डिसेंबर २००४ रोजी २७ वर्षीय बुद्धी मोईरंगथेम या युवकाची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. त्याची तरुण पत्नी रिबेका अखम हिला आजही हे मारेकरी कोण होते आणि आपल्या नवऱ्याला का मारले गेले हे कळू शकले नाही. मात्र आपला चरितार्थ चालविण्यासाठी मदत मिळणे गरजेचे असल्याचे तिला जाणवले. बीणालक्ष्मीने या प्रसंगी आपल्या खिशातून साडे चार हजार रुपये पुढे केले. रिबेकाने यातून शिलाई यंत्र विकत घेतले, आज ती सन्मानाने आपले आयुष्य कंठत आहे. याच प्रसंगातून ‘मणिपूर विमेन गन सव्‍‌र्हायवर्स नेटवर्क’ ही स्वयंसेवी संस्था उभी राहिली!
मणिपूरमध्ये होत असलेली शस्त्र तस्करी थांबविणे, या तस्करीविरोधात जनजागृती करणे,  भूसुरुंग स्फोटात मृत पावलेल्या निरपराध नागरिकांच्या कुटुंबीयांना उपजीविकेचे साधन मिळवून देणे, अशा कुटुंबीयांची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचविणे अशा उद्दिष्टांनी ही संस्था काम करू लागली.
स्पष्ट उद्दिष्ट, सुनियोजित कार्यक्षेत्र, भविष्यातील योजनांबद्दल नेमकेपणा आणि केलेल्या कामाचे अप्रतिम संहितीकरण या पायावर ही स्वयंसेवी संस्था आज १००० सभासदांसह उभी आहे. (मणिपूरची लोकसंख्या २० लाखांच्या घरात आहे!)  महिलांमधील कलागुणांना नेप्राम यांनी उत्तम प्रकारे वाव दिला आहे. एकीकडे विधवांना रोजगार तर दुसरीकडे मणिपूरी ‘अस्मिते’ची ओळख जगभरात पोहोचविणे अशा दोन्ही बाबी बीणालक्ष्मींनी सहजतेने एकत्र गुंफल्या आहेत. हातमागावर विणलेला ‘फनेक’ हा स्कर्ट, ‘इनफी’ ही शाल, पुरुषांसाठी असलेला ‘पैजॉम’ अर्थात पायजमा आणि ‘लेईरूम’ हा स्कार्फ ही ‘मणिपूर विमेन गन सव्‍‌र्हायवर्स नेटवर्क’मधील ‘सबलां’नी तयार केलेली उत्पादने आहेत. या उत्पादनकर्त्यांमध्ये पंचविशीतील रिबेकापासून आपल्या दोन्ही मुलांना गमावणाऱ्या साठीतील सिनाम चांदरजनीपर्यंतच्या महिलांचा समावेश आहे. मात्र या सर्वजणींचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शन केंद्र आहे अर्थातच बीणालक्ष्मी नेप्राम. संकटग्रस्त महिलांना बँकेत खाते उघडून देण्यापासून ते त्यांना स्वावलंबी होण्यासाठी ३  ते ९ हजार रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्यापर्यंत - त्यांनी निर्मिलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यापर्यंत सर्वकाही एकाच ‘नेटवर्क’मध्ये होते.
पण इथेच नेप्राम यांचे कार्य थांबत नाही. ज्या देशांना मणिपूर हे राज्य कुठे आहे याची नेमकी माहिती नाही अशा देशांकडून या राज्यात शस्त्रास्त्रे कशी येतात, जी-८ म्हटल्या जाणाऱ्या देशांपैकी ७ देशांकडून एकूण शस्त्र विक्रीपैकी ९० टक्के शस्त्रविक्री कशी केली जाते, निरपराध्यांच्या जीवाशी खेळणारी पिस्तुले चीनकडून अवघ्या ५००० रुपयांत तर ग्रेनेडस् अवघ्या २०० रुपयांत मणिपूरमध्ये कशी पोहोचतात, अशा अनेक ज्वलंत विषयांना नेप्राम आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वाचा फोडतात. आपल्या लेखांमधून-भाषणांमधून अगदी संयुक्त राष्ट्रांच्या सभेसमोरही त्या धाडसीपणे राष्ट्रनिहाय आकडेवारी सादर करीत शस्त्रसंधीसाठी आवाहन करतात. हे सगळे करताना तुम्हाला भीती वाटत नाही का, असे विचारताच ‘पवित्र-पारदर्शक आणि मानवतेचे काम करताना भीती कसली बाळगायची,’ असा प्रतिसवाल ही आधुनिक दुर्गा करते.
एकीकडे शहरी भागांत पोलीस-गुप्तचर संस्था विश्वास गमावत असताना अविकसित, दुर्गम आणि संशयाचे वातावरण असलेल्या मणिपूरमध्ये आपल्या कार्यातून एक तरुणी विश्वास निर्माण करते. म्हणूनच रोजगार-विकास, शांतता-सौहार्दता आणि आत्मसन्मानाने जगणारी स्त्री हेच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या निडर तरुणीकडून ‘आपण त्यांच्यासमान व्हावे’ अशी प्रेरणा मिळाल्यावाचून राहत नाही.