तिची वाटच वेगळी Print

alt

अलकनंदा पाध्ये , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मळलेली पायवाट सोडून आदिवासी, मतिमंद मुलांसाठी जव्हार-मोखाडा यासारख्या अविकसित प्रदेशाकडे वळणाऱ्या आणि या मुलांनाही समृद्ध आयुष्य जगण्याचे बळ देणाऱ्या प्रमिलाताई कोकड यांच्याविषयी..
‘‘स्व त:च्या सुखासाठी प्रत्येक माणूस धडपडतच असतो, पण दुसऱ्यांच्या सुखासाठी काही करण्यातला आनंद बहुमोल असतो,’’ असे प्रमिलाताई कोकड आपल्याला सांगतात तेव्हा त्यांच्याबद्दल कुतूहल दाटून आलं आणि त्यांचा जीवनप्रवास जेव्हा ऐकला तेव्हा तर थक्कचव्हायला झालं.
पाच भावंडांतील सर्वात वडील असलेल्या प्रमिलाताईंना पहिल्यापासून कर्णबधिर मुलांबद्दल कायम उत्सुकता वाटे. ते अभ्यास कसा समजून घेतात? समजलेले व्यक्त कसे करतात वगैरे.. त्या दृष्टीने त्यांनी पुण्याच्या टिळक महाविद्यालयात कर्णबधिर शिक्षकांचा अभ्यासक्रम शिकून घेतला. सुदैवाने तिथल्या शिक्षकांनी या वेगळ्या अभ्यासक्रमादरम्यान प्रमिलाताईंना सामाजिक बांधिलकी, विद्यार्थी-पालक यांची मानसिकता याबद्दल उत्तम रीतीने मार्गदर्शन केले. त्याचाच परिणाम म्हणून याच क्षेत्रात काहीतरी भरीव कार्य करायचे हा निश्चय करून त्या ठाण्याला स्वगृही परतल्या.
एक संधी जणू त्यांची वाटच पाहात होती. त्या वेळचे ठाण्यातील आमदार आणि तळमळीचे कार्यकर्ते कै. वसंतराव पटवर्धन यांनी जव्हार-मोखाडा या भागात आदिवासींसाठी काम करण्यासाठी ‘प्रगती-प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना केली होती. तिथल्या कर्णबधिर मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी प्रमिलाताईंना विचारले. वास्तविक त्याच वेळी त्यांना उल्हासनगर आणि डोंबिवली येथील शाळेकडूनही विचारणा झाली होती. पण मळलेली पायवाट सोडून काहीतरी चाकोरीबाहेरचेच करायचे हा त्यांचा स्वभावविशेष इथे प्रत्ययाला आला आणि शहरी भागात सहजपणे शिक्षक मिळतील, पण दुर्गम भागात शिक्षक मिळण्यास अडचण होईल म्हणून प्रमिलाताईंची ध्येयवेडी पावले घरच्यांचा विरोध पत्करून जव्हारसारख्या अविकसित प्रदेशाकडे वळली.
२७ वर्षांपूर्वी त्या जव्हारला पोचल्या तेव्हा इथल्या मुलांसाठी काहीतरी करायचे एवढा दृढनिश्चय फक्त गाठीशी होता. त्यांच्या स्वागताला अत्यंत प्रतिकूल अशी परिस्थिती होती. राममंदिरात शाळा भरत असे. मुलांबरोबर राहताना, त्यांना शिकवताना स्वयंपाकी, शिक्षक, लिपिक, पालक अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत. शहरी कर्णबधिर मुलांपेक्षा या आदिवासी मुलांच्या समस्याही खूपच वेगळ्या होत्या. या मुलांचे आई-वडील बरेचसे व्यसनाधीन. त्यातून शिक्षणाशी त्यांची तोंडओळख नाही, म्हणून मुलांच्या शिक्षणाबद्दलही उदासीन होते. त्यात कर्णबधिर मुलातले व्यंग इलाजाने बरे होऊ शकते हे त्यांना कळतच नसे. उलट अनेकवेळा ‘एक वेडे मूल’ म्हणून ते दुर्लक्षिले जाई. तिथली पाणीटंचाई, स्वच्छतेविषयी अज्ञान यासारख्या समस्यांमुळे सुट्टीत घरी गेलेली मुले शाळेत परतली की त्यांच्या डोक्यातल्या उवा काढणे, हातापायाला खरूज झाल्यामुळे त्यावर औषधोपचार करणे यासारखी शिकवण्यापलीकडची अनेक कामे प्रमिलाताईंना करावी लागत आणि पुन्हा हे सर्व होऊ नये म्हणून स्वच्छतेच्या, नीटनेटकेपणाच्या सवयी शिकवाव्या लागत. अर्थात, भविष्यात त्याचा नक्कीच उपयोग झाला.
मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्यातील उपजत चित्रकला, नृत्यगुण तसेच क्रीडागुण हेरून त्यांची त्या दृष्टीने तयारी करून मुलांना जिल्हापातळीवर, राज्यस्तरीय स्पर्धामध्ये पाठवले. मुलांनीही विश्वास सार्थ ठरवला. २००० साली दिल्लीला राष्ट्रीय स्तरावर अशा अनेक कलास्पर्धा एकत्रितपणे आयोजित केल्या होत्या. जिथे संपूर्ण भारतातून ८७ संस्थांचा सहभाग होता. तिथे प्रमिलाताईंच्या विद्यार्थ्यांना आदिवासी लोकनृत्य स्पर्धेत, तारपा नृत्यात आणि चित्रकला स्पर्धेतही प्रथम पारितोषिक मिळाले. हे सांगताना त्यांचा ऊर अभिमानाने भरून येतो.
जव्हार-मोखाडा हीच आपली कर्मभूमी आणि हे आदिवासीच आपले कुटुंबीय आहेत हे प्रमिलाताईंनी मनाशी निश्चिती केल्यामुळे सेवानिवृत्तीपूर्वीच त्यांनी समविचारी लोकांशी विचारविनिमय करून ‘श्री गुरुदेव बहुउद्देशीय सामाजिक संस्था’ स्थापन केली आणि निवृत्त झाल्याबरोबर या संस्थेतर्फे मतिमंद आणि अंध मुलांच्या समस्या सोडविण्याचे काम हाती घेतले. त्यांच्या मते शहरी भागात मतिमंद मुलांसाठी शाळा आहेत, परंतु या दुर्लक्षित भागातील मुलांचे पूर्ण भवितव्य अंधारमय असते. म्हणूनच समाजातील काही देणगीदार, हितचिंतकांना आवाहन करून त्यांच्या आर्थिक पाठबळावर ‘गुलमोहर मतिमंद आणि अंध मुलांची निवासी शाळा’ सुरू केली. ठाणे जिल्ह्य़ात ही एकमेव मतिमंद मुलांची निवासी शाळा आहे. सध्या जरी भाडय़ाच्या जागेत शाळा भरत असली तरी संस्थेने अलीकडेच शाळा आणि वसतिगृहे उभारण्यासाठी जमीन घेतली आहे. शाळेत प्रशिक्षित शिक्षक मुलांना जिव्हाळ्याने शिकवतात. अंध मुलांना ब्रेल लिपी, अबॅकस गणित पाटीच्या माध्यमातून शिकवले जाते, तर मतिमंद मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार शिकवले जाते. मुलांना स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने शाळेच्या परिसरात नर्सरी, गुलाबशेती, मधुमक्षिका पालन, गोशाळासारख्या उपक्रमांची तयारी चालू आहे. तिथेच पुढे-मागे वृद्धाश्रमही सुरू करण्याचा प्रमिलाताईंचा विचार आहे. जेणेकरून मुलांना आणि वृद्धांना एकमेकांची साथ मिळेल. विनाअनुदान तत्त्वावर चालणाऱ्या शाळेला आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी लायन्स क्लब, रोटरी क्लबसारख्या संस्थांकडे प्रमिलाताईंना धावपळ करावी लागते.
मुलांप्रमाणे मुलांचे पालक जे अल्पभूधारक शेतकरी किंवा शेतमजूर आहेत, त्यांचे ४ महिने शेती आणि ८ महिने मजुरी मिळवण्यासाठी इथे-तिथे स्थलांतर ही नित्याची बाब आहे. पण त्यामुळे त्यांच्या जीवनाला स्थैर्य नसते. हे थांबवण्यासाठी त्यांनी ‘कोहिनूर आदिवासी कला-केंद्रा’ची स्थापना केली. तिथे टाकाऊ लाकडापासून शोभेच्या वस्तू बनविणे, वारली पेंटिंग्ज करणे यासारखे अर्थार्जनाचे उपक्रम योग्य मार्गदर्शन करून राबवले जातात. त्यामुळे स्थलांतरात लक्षणीय घट झाली आहे. तसेच महिलांना एकत्र करून आदिवासी आणि सर्वसामान्य महिला यांचा एक बचत गट तयार केला आहे. त्यामार्फत अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. तसेच सुहासिनी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचीही स्थापना करून त्यायोगे अनेकांना रोजगार निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. आज अशा लाभार्थीची संख्या शेकडय़ाच्या घरात आहे. निवृत्तीनंतर आपल्या कर्मभूमीत प्रमिलाताईंनी या संस्थेमार्फत अनेक उपक्रमांना चालना दिली आहे आणि आपले सेवानिवृत्तीचे दिवस आरामात काढण्याऐवजी त्या प्रत्येक उपक्रमात जातीने लक्ष घालत असतात. नव्हे ते यशस्वी होण्यासाठी स्वत:ला त्यात झोकून देतात.
त्यांच्या या कार्याची दखल अनेक संस्थांनी घेतली आहे. २००९ साली त्यांना दिल्लीला ‘अपंग व्यक्ती सक्षमीकरण’ हा राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्याचा गौरव करणारे असंख्य पुरस्कार त्यांना मिळाले आहेत, परंतु त्यांच्या मते ही जव्हारची वेगळी वाट चोखाळताना त्यांनी कुठल्याच पुरस्काराची अपेक्षा ठेवली नव्हती. जव्हार- मोखाडय़ातील आदिवासींचा विकास व्हावा हाच ध्यास मनी ठेवून त्याही वाटचाल करीत आहेत. त्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा नक्कीच देऊ शकतो!