र. धों.च्या निमित्ताने.. : एकटं राहण्याचा हक्क Print

alt

डॉ. मंगला आठलेकर , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
स्त्रीला एकटं राहण्याचा हक्क का नाही? बहुतेक स्त्रिया लग्न करतात म्हणून प्रत्येकीनं लग्न केलंच पाहिजे हा कुठला कायदा? स्त्रीनं एकटं राहता कामा नये हे कोण ठरवणार?  स्त्री काय किंवा पुरुष काय.. कुणालाच मन मारून जगावं लागू नये. त्यातही ते शरीर स्त्रीचं आहे म्हणून तिनं कायम मन मारीतच जगलं पाहिजे, तोच तिचा धर्म आहे, असं मानणं ही केवळ निर्दयता आहे. पुरुषापेक्षा आपणच विधवेला, अविवाहितेला, घटस्फोटितेला अधिक दु:ख देतो हे स्त्रियांना कधी कळणार?
व्य क्ती म्हणून जगताना दुर्बलांच्या वाटय़ाला नेहमीच मानभंग येतात, पिळवणूक येते. त्यातही ती व्यक्ती ‘बाई’ असेल तर तिच्या वाटय़ाला दुहेरी जाच! बाई म्हणूनही आणि दुर्बल म्हणूनही. ‘बाई’ म्हणून समाज तिच्याकडून अवाजवी अपेक्षा करतो, तिला गृहीत धरतो आणि तिच्या मर्यादा स्पष्ट करणारं एक रिंगणही तिला आखून देतो. लग्नसंस्था हे रिंगण अधिक मजबूत करते. लग्नानंतर तिचं जीवन विविध नात्यांत आणि त्या नात्यांनी निर्माण केलेल्या विविध भूमिकांत अडकून पडतं. पूर्वी स्त्री हे सगळं  मुकाट स्वीकारीत होती. आजही मुली ‘लग्नच नको’ असं म्हणत नाहीत, पण आपलं करिअर, आपल्या आवडी-निवडी यांनाही त्या प्राधान्य देऊ लागलेल्या आहेत. हे प्राधान्य देताना समजा लग्न मागं पडलं तर त्यांना त्यात काही चुकतंय असं वाटत नाही.
आज भरपूर शिकलेल्या, ‘व्यक्ती’ म्हणून स्वत:च्या जगण्याचा विचार करणाऱ्या मुली ‘नको असलेली लग्नं’ काहीही करून टिकवून ठेवण्याच्या फंदात पडत नाहीत किंवा काही मुली नको असलेल्या माणसाशी स्वत:च्या मनाविरुद्ध लग्न करण्यापेक्षा लग्न नाही जमलं तरी चालेल असं म्हणत एकटं राहणं पसंत करतात. अशा मुलींची संख्या कमी असेल पण असं चित्र समाजात दिसायला लागलं आहे खरं. अर्थात स्वत:च्या मनाप्रमाणे निर्णय त्या घेतात म्हणून त्या सुखी होतात असं अजिबात नाही. लग्न केलेली स्त्री दु:खी असते आणि लग्न न केलेली स्त्री सुखात, मोठय़ा चैनीत जगते असं काही समीकरण स्त्रीच्या आयुष्याच्या संदर्भात मांडता येणार नाही. एकटं जीवन स्वीकारणाऱ्या मुलीही वेगळ्या प्रकारे मानसिक ताणातून जात असतात आणि त्यांचं जगणंही समाजानं कठीण करून ठेवलेलं असतं.
       आपण लग्न करू नये, एकटं राहावं, असं एखाद्या बाईच्या मनात का येतं? समाज, रीती-परंपरा.. यात अनेक जागी आपल्याला गटांगळ्या खायला लावणारे भोवरे आहेत हे तिच्या लक्षात यायला लागलंय? नवऱ्याचा वरचष्मा सहन करणं, घरातल्या सगळ्यांचं खाणं-पिणं, आजार, मुलांचे अभ्यास, घरची सारीच जबाबदारी पार पाडणं हेच शिक्षण आपल्याला ‘आयुष्याचं सार्थक’ म्हणून जन्मापासून दिलं जातं यात आपल्या आयुष्याची होणारी गोची तिला आता स्पष्टपणे जाणवायला लागलेली आहे? तसंच असावं. ‘व्यक्ती’ म्हणून जगण्याचं भान तिला शिक्षणानं आणि आर्थिक स्वावलंबनानं दिलं आहे. त्यामुळे आवडीनं लग्न केल्यानंतरही कालांतरानं जर तिच्या अनुभवाला घुसमटच येत असेल तर समाजासाठी म्हणून ते लग्न टिकविण्याची आवश्यकता प्रत्येक स्त्रीला वाटतेच असं नाही.
एकटं राहणाऱ्या बायकांच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी मुळात ‘आपण लग्न केलंच पाहिजे’ असं बऱ्याच बायकांना का वाटतं, याचं उत्तरही शोधायला हवं. आयुष्यात ‘लग्न’ ही गोष्ट आवश्यक, अपरिहार्य आहे, असं त्या मानतात. नोकरी करीत नसतील तर त्यांच्या खाण्या-पिण्याचा, राहण्याचा, लैंगिक भुकेचा, आई बनण्याचा, सामाजिक प्रतिष्ठेचा.. एवढे सगळे प्रश्न केवळ लग्न करण्यानं सुटतात. समजा काही कारणामुळे त्यांचं शिक्षण पूर्ण झालं नाही, नोकरी मिळाली नाही किंवा त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली नाही तर त्याचं त्यांना काही वाटत नाही, पण लग्न नाही झालं तर मात्र त्यांची मनं नैराश्यानं काळवंडून जातात. ही निराशा घराच्या प्रतिष्ठेच्या प्रश्नाशी संबंधित असते. बाईची आणि तिच्या घराची प्रतिष्ठा ती ‘उजवली’ जाण्यानंच टिकणार असते. तिलाही एकदाचं लग्न करून नवऱ्याच्या घरी जाण्याची घाई असते. गळ्यातल्या एका काळ्या मण्याच्या पोतीवर ती सगळ्या त्रासांकडे सहनशील नजरेनं पाहायला तयार असते. एक घर, नवरा, मुलं-बाळं, सामाजिक प्रतिष्ठा, मंगळसूत्र, भांगातलं कुंकू, वटसावित्रीची पूजा, मंगळागौर, हळदीकुंकू, ओटीभरणं.. इतके सगळे अधिकार एका लग्नानं तिला मिळणार असतात. या प्राप्तीच्या बदल्यात आपलं मन मारणं हा सौदा तिला फारसा तोटय़ाचा वाटत नाही.
दुसरी गोष्ट अशी की, ‘एकदा लग्न झालं की बाई सुरक्षित असते.’ अशी दृढ भावना आपल्याकडे आहे. अगदी नवऱ्यानं मारलं, छळलं तरी बाहेरच्या दुष्ट जगापासून ती सुरक्षित आहे, हीच शिकवण अंगी बाणवत ती मोठी झालेली असते. घराच्या परिघात होणारे बाईचे छळ आपल्या धारणेनं स्वीकारलेले छळ आहेत. याउलट बाहेरच्या जगात एकटीनं राहण्यात धोके अधिक आहेत म्हणून बाईनं लग्न केलंच पाहिजे ही समाजाची आणि खुद्द बाईचीही धारणा आहे. या ठाम धारणेपोटी बाई लग्नं करते. वय वाढत जाईल तसं आजूबाजूच्या लोकांचे प्रश्न आणि त्यांच्या शंकास्पद नजरा तिचं जगणं कठीण करून ठेवत असतात. साहजिकच वेळेत आपलं लग्न नाही झालं तर ‘लोक काय म्हणतील’ या प्रश्नाचं भय आणि त्यातून आलेली असहायता तिला नैराश्याच्या वाटेवर नेत असते.
मात्र ज्या स्त्रिया न आवडलेल्या, सक्तीच्या लग्नाला नकार देतात, लग्नानं मिळू शकणाऱ्या कुठल्याही प्रतिष्ठेच्या आमिषापेक्षा ज्यांना आत्मसन्मान मोठा वाटतो, त्या स्त्रिया लग्न नाकारून एकटं, स्वतंत्र जगणं पसंत करतात, वहिवाट डावलतात. त्यांचा पुरुषांना तर राग येतोच, कारण या स्त्रियांनी लग्न नाकारून जणू पुरुषाचं सार्वभौमत्व आणि स्वामित्व यालाच शह दिलेला असतो, पण लग्न केलेल्या अनेक स्त्रियाही अशा स्वतंत्र वृत्तीच्या स्त्रियांचा राग करतात. कारण त्यांनी जे धाडस दाखवलं ते यांना दाखविता आलेलं नसतं. अशा वेळी या समदु:खी विवाहित स्त्रिया पुरुषप्रधान मनोवृत्तीच्या पुरुषांच्या जणू हातात हात घालून स्वतंत्र वृत्तीच्या, एकटं राहणाऱ्या स्त्रीवर आड-आडून हल्ले करीत राहतात. तिला जगणं नकोसं करतात.
लग्न ही गोष्ट टाकाऊ मुळीच नाही. आयुष्यातल्या अनेक गरजांप्रमाणे लग्न हीदेखील एक गरजच आहे, पण एखादीला मनासारखा नवरा मिळाला नाही तरीही तिनं मनाविरुद्ध तडजोडी करीत कोणातरी पुरुषाशी लग्न केलंच पाहिजे, अशी सक्ती तिच्यावर तिचे आई-वडील कशी करू शकतात? काहीजणी आई-वडिलांनी आणि समाजानं टाकलेला हा दबाव झिडकारून टाकतात आणि ज्या असा दबाव झिडकारून एकटं राहणं निवडतात, त्यांचा अनुभव हाच असतो की, आप्तस्वकीय आणि जवळचे म्हणविणारे सर्वजण त्यांचा एकटं राहण्याचा आनंद विस्कटून टाकण्यात आघाडीवर असतात. कारण एकच, त्यांचं जगणं ‘समाजसंमत’ नाही.
एकटं राहणाऱ्या स्त्रियांचे अनेक प्रश्न आहेत. एकटी राहणारी, विनापाश, मोकळी बाई आपल्याला मिळायला काय हरकत आहे, असं काही पुरुषांना वाटत असतं. तिच्यावर आपला हक्कच आहे असंही त्यांना वाटत असतं. पुरुषाची सोबत नाकारून समर्थपणे तिचं ‘एकटं जगणं’ ही गोष्ट त्यांना तिच्या चारित्र्याच्या संदर्भात मोठी ‘काळजी’त टाकणारी आणि भयंकर वाटते. पण तिला माहीत असतं, यांना वाटणारी आपली काळजी अगदी खोटी आणि स्वार्थी आहे. त्यात आपला किंवा आपल्यासारख्या एकटं राहणाऱ्या बाईचा थोडय़ाही सहृदयतेनं विचार नाही. जी काही ‘काळजी’ असते ती या बिचारीला ‘आधार’ कसा देता येईल याचीच! एखाद्या निराधार, अपंग, एकटय़ा पुरुषाला किंवा दारिद्रय़ानं गांजलेल्या मुलाला मदत करायला, आधार द्यायला ते पुढे येणार नाहीत, पण स्त्रीच्या ‘मदती’साठी धावून येतील. आधार देताना ही बाई आपल्याला वश कशी करून घेता येईल, याचेच आराखडे, योजना आखतील. एकटी राहणारी बाई हे सगळं ओळखून आहे.
ती हेही ओळखून आहे की, पुरुषाइतकीच पुरुषप्रधान संस्कृतीत वाढलेली, स्वत:ला ‘गरती’ म्हणविणारी स्त्रीही आपलं जगणं असह्य़ करते आहे. मुंबईतल्या विद्या प्रभुदेसाईंची इथं आठवण होते. काही वर्षांपूर्वी विद्या प्रभुदेसाई नावाच्या एका अविवाहित प्रौढेला तिच्यावर प्रेम असल्याचा दावा करणाऱ्या तरुणानं एकतर्फी प्रेमातून रस्त्यावर तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिलं होतं. तिला जाळणाऱ्या पुरुषाबद्दल कुठल्याही स्त्रीनं आवाज काढला नाही, पण तिला जळताना पाहून ‘अरेरे.. बिचारी..’पासून सुरू झालेल्या प्रतिक्रिया, यासाठी स्त्रीनं एकटं राहू नये.. लग्न करावं.. आम्ही लग्नं केली ती काय मूर्ख म्हणून? एकटं राहायचं, नाना ढंग करायचे.. स्वातंत्र्य हवं.. घ्या स्वातंत्र्य.. त्याच कर्माची फळं आहेत ही.. अशा शब्दांत ती मेल्यानंतरही तिलाच दोषी ठरवून संपल्या.
मनात प्रश्न येतो की, स्त्रीला एकटं राहण्याचा हक्क का नाही? बहुतेक स्त्रिया लग्न करतात म्हणून प्रत्येकीनं लग्न केलंच पाहिजे हा कुठला कायदा? स्त्रीनं एकटं राहता कामा नये हे कोण ठरवणार? यामागचा पुरुषाचा हेतू उघड आहे, पण स्त्रियासुद्धा पुरुषप्रधान समाजव्यवस्थेचा एक भाग बनून गेल्या आहेत ही चिंतेची बाब आहे. पुरुषाच्या ताबेदारीबरोबरच घरातील सासू, मंगळसूत्र मिरविणाऱ्या आणि अविवाहित स्त्रीच्या चारित्र्याविषयी कुत्सितपणे बोलणाऱ्या रिकामटेकडय़ा विवाहित स्त्रिया, ‘विधवेनं नटायचं कशाला?’ असं म्हणत विधवेकडून निरिच्छ, विरक्त जगण्याची अपेक्षा करणाऱ्या तिच्या आजूबाजूच्या सधवा.. या सगळ्या पुरुषप्रधान व्यवस्थेचा भक्कम पाया आहेत. त्यांच्याचमुळे पुरुषप्रधान व्यवस्था टिकून आहे, त्यांच्याचमुळे अविवाहित स्त्रियांचं जगणं दु:खप्रद झालं आहे आणि त्यांच्याचमुळे मनात असूनसुद्धा ‘एकटी’ स्त्री सुखानं जगू शकत नाही.स्त्री काय किंवा पुरुष काय.. कुणालाच मन मारून जगावं लागू नये. त्यातही ते शरीर स्त्रीचं आहे म्हणून तिनं कायम मन मारीतच जगलं पाहिजे, तोच तिचा धर्म आहे, असं  मानणं ही केवळ निर्दयता आहे.
पुरुषापेक्षा आपणच विधवेला, अविवाहितेला, घटस्फोटितेला अधिक दु:ख देतो हे स्त्रियांना कधी कळणार?