एकत्रित कुटुंबाचं श्रेय Print

अमिता ठकार , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
आज माझा मुलगा शौनक सोळा वर्षांचा आहे. शौनकचा जन्म झाला आणि आमच्या घरात त्याच्या रूपानं जणू चैतन्यच आलं. त्या आधी आमच्या एकत्र कुटुंबामध्ये आम्ही, मी, माझे पती, सासू-सासरे, दीर-नणंद अशी मोठी सहा माणसं होतो. सर्व जण बऱ्यापैकी गंभीर प्रवृत्तीचे असल्याने दंगा-मस्ती विरळच असे. शौनकच्या जन्मानंतर आमच्या घरातील वातावरण बदलूनच गेलं.
कोल्हापूरमध्ये बऱ्याच वैद्यकीय दिव्यातून पार पडल्यानंतर त्याचा जन्म झाल्याने त्याचा सहवास, त्याच्या बालपणातील क्षण न् क्षण आनंदाने अनुभवायचा असं मी ठरवलं होतं. प्रसंगी नोकरी सोडायचीही तयारी होती. त्याच्यासाठी मी माझ्या नोकरीमध्ये पहिले सहा महिने रजा घेतली व नंतर वर्षभर अर्धवेळ नोकरी केली. त्यानंतर त्याला त्याच्या आजी-आजोबांनी सांभाळलं. सोबत काका-काकूचं अपरंपार प्रेम होतंच, कारण तोपर्यंत आत्या सासरी गेली आणि काकू घरी आली होती.
आमच्या घरी जेवताना आम्ही सर्व जण एकदमच जेवायला बसतो. ‘हे आवडत नाही, ते खाणार नाही’ असे कोणाचेच नखरे नाहीत. अगदी लहान असल्यापासून शौनक जेवताना आमच्यासोबत असल्याने त्याला सगळं आवडीने खायची सवय लागली. स्वच्छतेच्या सवयी, टापटीप हे तो शिकत गेला. घरी सर्व जण असल्याने नाती जपणं आपोआपच शिकला. अतिशय सूक्ष्म निरीक्षणशक्ती असल्याने सभोवतीचं सर्व जाणून घेत गेला. आम्ही सर्व जण त्याच्या प्रश्नांना नेहमी उत्तरं द्यायचा प्रयत्न करायचो. त्याचे आजोबा तोंडी हिशेब घालायचे, त्यामुळे अंकगणित पक्कं झालं. मी त्याच्याशी खूप गप्पा मारायची, गोष्टी सांगायची. देवाची स्तोत्रं मी त्याला जवळ बसवून कधीच शिकवली नाहीत. मी म्हणत असताना ऐकून त्याला पाठ झाली.
शाळेत मन लावून शिकणं, घरी नियमित अभ्यास करणं असं वेळापत्रक असल्याने परीक्षेच्या दिवसातसुद्धा ठराविक वेळ टीव्ही पाहणं, खेळ खेळणं यात कधी बदल झाला नाही. परीक्षेच्या काळातसुद्धा घरी नेहमीसारखंच वातावरण असल्याने त्याला कधी ताणतणाव जाणवला नाही.
त्याच्या दहावीनंतर पुढे काय करायचं हे त्याने ठरवलं नव्हतं. त्याच्यासमोर वेगवेगळे पर्याय ठेवले तरी काहीच निर्णय घ्यायचा नाही. मला काळजी वाटायची, पण त्याचे बाबा म्हणायचे काळजी करू नकोस. त्याच्यासाठी एक क्षण पुरेसा आहे, जो त्याचं ध्येय निश्चित करेल आणि झालंही तसंच. १०वीची परीक्षा झाल्यानंतर मावशीकडे सुट्टीला पुण्याला गेला तेव्हा एम. प्रकाश अ‍ॅकॅडमी या संस्थेचा प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरला. ही परीक्षा देतानाच त्याच्या आयुष्यातील ‘तो’ क्षण त्याला भेटला आणि आयआयटीमध्ये प्रवेश मिळवणं हे ध्येय निश्चित करून गेला.
दहा-बारा वर्षांपूर्वी माझं बोट पकडून रस्ता ओलांडणारं माझं बाळ आता माझ्यापेक्षा किती तरी उंच झालंय, मला रस्ता ओलांडायला मदत करतंय. मी आणि तो त्याच्या अभ्यासासाठी पुण्यात राहतो. तो खूप जबाबदारीने वागतो. त्याचं अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करतो आहे. परिचयाचे बरेच जण म्हणतात की, शौनकवरचे संस्कार चांगले आहेत. तेव्हा मला मुद्दाम नमूद करावंसं वाटतं की, त्याचं हे संस्कारित व्यक्तिमत्त्व आमच्या एकत्र कुटुंबाचं श्रेय आहे.