पालकत्वाचे प्रयोग : चंचलपणाला दिशा मिळाली Print

alt

आई - बाबा तुमच्यासाठी
प्रा. डॉ. विद्या शिंदे  , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२

माझी धाकटी मुलगी प्रचंड मस्तीखोर. एका जागी बसणं शक्य व्हायचं नाही. सतत धडपडणं आणि तोडणं-फोडणं. हळूहळू या तिच्यातल्या ऊर्जेला धावण्याचं वळण लावलं. आता ती धावण्याच्या स्पर्धामध्ये भाग घेते आहे. विजयी होते आहे.
लहान मुलं म्हटली की खोडकरपणा, पडणं, धडपडणं, फोडणं यांसारख्या गोष्टी नित्याच्याच असतात. म्हणूनच मुलांच्या बाबतीत आई-वडिलांकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोन असणे आवश्यक असते.
आजच्या काळात तर मुलांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागत आहे. माझी मोठी मुलगी शांत असल्यामुळे तिला जे आम्ही सांगत असू त्याप्रमाणे ती ऐकत असे. त्यामुळे तिच्या निकोप वाढीकडे फारसं मला लक्ष द्यावं लागलं नाही, पण छोटी मुलगी खूपच मस्तीखोर होती. शांत बसणं तिला जमायचंच नाही. घरात नुसता गोंधळ चाललेला असायचा. तीन वर्षांची होईपर्यंत तिच्याकडे आम्ही गंमत म्हणून पाहत होतो. त्याचा परिणाम असा झाला की, ती कुणाचंच ऐकत नसे. दीदीला मारत असे. आता हिला जर शाळेत घालायचं असेल तर शिस्त लावावीच लागेल याची खूणगाठ मी मनाशी बांधली. हळूहळू तिच्या कलाने घेत तिला शांत बसवण्यासाठी प्रयत्न करू लागले, पण तिच्यामध्ये वयाच्या मानाने उत्साह जास्त होता. एका गोष्टीत तिचं मन रमत नसे. सतत तिला नवीन खेळणी मोडायला-तोडायला लागत असत. कधी-कधी दीदीची नजर चुकवून तिच्या वहय़ा फाडून टाकत असे. कागदाचे बारीक बारीक तुकडे केले की तिला ‘मज्जा’ वाटत असे. मी धाक दाखवून पाहिलं, मारून पाहिलं पण काहीच उपयोग होत नव्हता. अशी मुलगी उद्या शाळेत गेल्यावर तिथे वर्गात ती कशी बसणार? आणि अभ्यास कसा करणार? हा प्रश्न मला सतावत होता.
 एक दिवस मी माझ्या मैत्रिणीकडे माझ्या मनातील चिंता व्यक्त केली. ती सहजपणे म्हणाली, तू फक्त तिला जास्त काय करायला आवडतं ते शोधून काढ आणि तशा प्रकारच्या कलात्मक छंदाकडे तिला वळव म्हणजे तिचा हा हूडपणा कमी होईल. तिच्याकडे उत्साह खूप होता म्हणून तिला शाळेत घातल्यापासून ‘मॉर्निग वॉक’साठी जाताना तिला माझ्याबरोबर पळायला सांगू लागले. हळूहळू तिला सवय झाली. पाहता पाहता वर्षभरात तिच्या धावण्याचा वेग वाढला. मग टीव्हीवर संध्याकाळच्या वेळी वैयक्तिक स्पर्धा मी तिला दाखवू लागले. वय लहान असल्यामुळे तिला काही कळत नव्हतं, पण असं काहीतरी मोठ्ठं बक्षीस मिळवायचं हे तिच्या लक्षात आणून दिलं. दीदीच्या शाळेच्या स्पर्धा होत असत तेव्हा तिला मुद्दामहून मैदानावर घेऊन जायचे. त्यामुळे आपोआपच खेळाविषयी आकर्षण वाटू लागलं. घरी दोघी बहिणी मिळून चमचा-लिंबू, संगीत खुर्ची, पकडापकडी, लंगडी असे खेळ खेळत. आता तिचा अस्थिरपणा बराच कमी झाला, पण अभ्यासाला बसली की, पेन्सिल पडली, पाटी पडली किंवा पाणी प्यायला तरी ती सारखी उठत असे. एका जाग्यावर बसून शांतपणे अभ्यास करणं तिला जमत नसे. मग कविता पाठांतर करताना उभं राहून नक्कल करत कविता पाठ करणं, गोष्टीरूपाने धडा सांगून लक्ष केंद्रित करणं, गणित शिकवताना गोळ्या, बिस्किट घेऊन शिकवणं सुरू केलं. एकदा मन रमलं की तिला स्वत:लाच यायला पाहिजे असं वाटू लागलं. चांगला अभ्यास केला की, तिला दीदीपेक्षा हुशार म्हटलं की आनंद व्हायचा. अशा पद्धतीने तिला शांत बसवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू होते. पाच ते दहा वयोगटापर्यंत मी तिचा धावण्याचा सराव नियमित घेत होते, त्यामुळे शाळेत खेळांमध्ये तिचा क्रमांक नेहमी पहिला असायचा त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. शाळेत त्यांच्या क्रीडा शिक्षकांनी तिला एक दिवस थाळी कशी फेकायची हे शिकवलं. नंतर ती दररोज शाळेत मनापासून प्रॅक्टिस करू लागली. पहिल्या स्पर्धेला तालुक्यात थाळी स्पर्धा आणि धावणं यामध्ये ती प्रथम आली. आम्हांला सर्वानाच तिचं कौतुक वाटलं. त्या दिवशी तिचे शिक्षक मला म्हणाले, ही तुमची मुलगी ऑलिंपिकमध्ये नक्कीच आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करणार यात शंकाच नाही. तिने हे ऐकलं आणि मनाशी निश्चय केला. आत्तापर्यंत राज्यामध्ये प्रथम येण्याचा मान दोन वेळा हुकला असला तरी ती तो मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. खेळासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. त्यामुळे अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष होतं, पण ७५ ते ८० टक्क्य़ांपर्यंत मार्क्‍स तिला मिळतात. तिच्या या मार्क्‍सबद्दल आम्ही तिला एवढंच म्हणतो की, जेवढं तू चांगली खेळशील तेवढा तुझा अभ्यास चांगला होईल. खेळामुळे आरोग्य चांगलं राहतं. मनाची एकाग्रता वाढीस लागते. जीवनात खेळाडू वृत्तीच आपल्याला मदत करते.
पुढच्या वर्षभरात राज्यातील स्पर्धा जिंकून देशासाठी खेळण्याची तिची इच्छा आहे. लहानपणीचा खोडकरपणा, चंचलपणा ओळखून वेळीच तिला दिशा देता आली म्हणून आज ती आपल्या ध्येयाकडे वाटचाल करते आहे. आम्हांला खात्री आहे की, निश्चितच ती यामध्ये आपलं करिअर उत्कृष्टरीत्या करू शकते.