स्त्रीबीजाचे अश्रू Print

alt

डॉ. स्नेहलता देशमुख , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मासिक पाळी म्हणजे नैसर्गिक प्रक्रिया. रक्तस्राव होणे म्हणजे काही संसर्गजन्य रोग नव्हे त्यामुळे या काळात देवपूजा जरूर करावी ती एक चित्तशुद्धी असते, प्रसाद करायला व खायला कुठलीच आडकाठी नाही. आपण आता मंत्रयुगातून तंत्रयुगात चाललो आहोत. ज्ञान व विज्ञानाची सांगड घालतो आहोत. मग जुन्या चालीरीती, रूढी-परंपरा पाळतानाही शास्त्रीय दृष्टीने विचार करायला हवा. ‘स्त्रीबीजाचे अश्रू’ असं वैद्यकीय नाव असलेल्या मासिक पाळीत देवपूजा हा असाच नव्याने विचार करावा, असा विषय आहे.
शे जारच्या अलकाताईंच्या मुलीचं लग्न ठरलं ही आनंदाची बातमी घेऊन शरयू माझ्याकडे आली आणि अलकाताईंना तुम्हाला तातडीने भेटायचे आहे असं म्हणाली. संध्याकाळी अलकाताई आल्या, मुलीला स्थळ चांगले मिळाले. नवरा इंजिनीअर आहे. अमेरिकेत स्थायिक आहे.

लग्न पुढच्याच महिन्यात आहे. हल्ली हॉल मिळेल त्या तारखेला तारीख जुळवून घ्यावी लागते म्हणून १८ तारीखच सोयीची होती, पण नेमकी अडचण आली म्हणून तुमच्याकडे आले. माझ्या सुनेची मासिक पाळी नेमकी त्याच दिवशी आहे. म्हणजे तिचा काहीच उपयोग होणार नाही तिला तयारी करता येणार नाही, गौरीहार मांडायला, सकाळचे देवक ठेवायला कशालाच तिला हात लावता येणार नाही म्हणून एक आठवडाभर पाळी पुढे ढकलण्याचे औषध विचारायला आले आहे. प्रश्न वरवर साधा वाटला तरी मला मात्र विचार करण्यासारखा वाटला. मासिक पाळी आली तर देवपूजा का करायची नाही? नैवेद्याचा स्वयंपाक का करायचा नाही? देवळात का जायचे नाही? आपण आता मंत्रयुगाकडून तंत्रयुगाकडे चाललोय ना? ज्ञान व विज्ञान यांची सांगड घालतोय मग जुन्याच चालीरीती, रूढी-परंपरा पाळताना शास्त्रीय दृष्टीने विचारांना चालना दिली तर? मासिक पाळी येणे म्हणजे काय हे समजून घेतले तर? असे विचार मनात आले आणि मी अलकाताईंना या हार्मोनच्या गोळ्यांचे दुष्परिणाम समजावू लागले.
आपल्या शरीरात दोन ओव्हरी (अंडकोश) असतात. दर महिन्याला ओव्हरीतून अंडे बाहेर पडते ते नलिकेमध्ये येऊन वाढू लागते. साधारण बारा-चौदा दिवसांनंतर ते परिपक्व होते त्याचा जर शुक्रजंतूशी समागम झाला तर त्यातून गर्भधारणा होते. असे न झाले तर अंडे मोठे होते. गर्भाशयात पडते फुटते व रक्तस्राव होतो हीच मासिक पाळी. आमच्या डॉक्टरी भाषेत त्याला क्राय ऑफ अनफर्टिलाइज्ड अनसॅटिसफाईड ओव्हम (cry of unfertilised unsatisfied ovum) असे म्हणतात. या सगळ्या नैसर्गिक कामात म्हणजे अंडे मोठे होण्याच्या प्रक्रियेत ढवळाढवळ केली तर निसर्गाविरुद्धच काम करतो, असे होईल पुढल्या वेळचे अंडे नीट वाढेल का हीसुद्धा शंका येतेच शिवाय एकदा अशी हार्मोनच्या गोळ्या घेण्याची सवय लागली की मग ट्रिपला जातानासुद्धा किंवा कामानिमित्तही या गोळ्या घेतल्या जातात. पाळी अनियमित होते, कधी या गोळ्यांमुळे मळमळते, डोके दुखते, थोडी चिडचिड वाढते म्हणून शक्यतो अशा गोळ्या वारंवार घेऊन पाळी पुढे ढकलण्याचे किंवा आधी येण्याचे टाळावे.
हे विचार ऐकूनसुद्धा अजूनही आपल्या रूढीतच आपण अडकलो आहोत. पाळी येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे हे लक्षात घेतच नाही. या वेळी थोडी विश्रांती हवी ही गोष्ट मान्य आहे, परंतु म्हणून कुठलेही काम करायचे नाही. शरीराला हालचालच करू द्यायची नाही असे म्हणणे चुकीचे ठरते. त्यामुळे स्वयंपाक करणे, ऑफिसला जाणे, मुलांचा अभ्यास घेणे ही जशी कामे आपण करतो तसेच देवपूजा करायला कुठलीच हरकत नसावी. माझे सासरे डॉक्टर होते समाजसुधारक गणले जात. जुन्या-नव्याची खूप सुंदर सांगड ते घालीत. उपास जरूर करा, परंतु आपल्या शरीराला कष्टवू नका. साबुदाणाच फक्त चालेल, भात चालणार नाही, असा आग्रह नको. कारण हे दोन्ही पदार्थ म्हणजे कबरेदकेच आहेत. उपास म्हणजे थोडी पोटाला विश्रांती असा अर्थ घ्यावा त्याचे स्तोम माजवू नये. त्याचप्रमाणे मासिक पाळी म्हणजे नैसर्गिक प्रक्रिया रक्तस्राव होणे म्हणजे काही संसर्गजन्य रोग नव्हे, तेव्हा त्या काळात हलका आहार परंतु पोषक आहार असावा. शरीराची स्वच्छता असावी असे ते आवर्जून सांगत. देवपूजा जरूर करावी ती एक चित्तशुद्धी असते, प्रसाद करायला व खायला कुठलीच आडकाठी नाही. आजच्या काळात पेढे, बर्फी प्रसाद म्हणून देतो ते पदार्थ बनविणाऱ्या स्त्रिया मासिक पाळी चालू असताना काम करतात. तो प्रसाद आपल्याला चालतोच ना. मग आपण स्वत: शरीराची स्वच्छता करून केलेला नैवेद्याचा स्वयंपाक का चालू नये. हा प्रश्न आपण जरूर विचारावा.
मासिक पाळी चालू असताना पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे चौथ्या दिवशी डोक्यावरून आंघोळ झाली की बायकांना देवळात जायला परवानगी असे. अगदी रक्तस्राव चालू असला तरी मग पाचव्या दिवशी तो रक्तस्राव शुद्ध व पहिल्या दिवशी अशुद्ध असतो का? हे कुठल्या शास्त्रात बसते. मुळातच काही लोकांना म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती जतन करण्यासाठी हे नियम केले गेले असावेत. स्त्रियांचे तापमान रजोदर्शन होत असताना वाढते. म्हणून गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश निषिद्ध मानतात. खरं म्हणजे जेव्हा ओव्ह्य़ूलेशन होते. त्यावेळेस शरीराचे तापमान वाढते व पाळी सुरू झाली की, तापमान कमी होते हे प्रयोगाने सिद्ध झाले आहे. वरील सगळे आक्षेप खोडून काढले तरीसुद्धा समाजमान्यता मिळत नाही. कारण आपल्यावर असलेला परंपरेचा प्रचंड पगडा. कधीतरी एखाद्या स्त्रीने मासिक पाळी चालू असताना देवपूजा केली आणि लगेच महिन्याभरातच कुटुंबावर संकट कोसळले. म्हणून कदाचित स्त्रीवर पूजा न करणे, प्रसाद न घेणे, देवळात न जाणे, धार्मिक कार्यात सहभागी न होणे लादले गेले असेल. त्याला वैज्ञानिक आधार अजूनही सापडला नाही.
तेव्हा आपणच विचार करायला हवा व समाजाच्या रूढी बदलायला हव्यात. ‘बदलायचं आहे इथे नाही वेळ, जुन्या आणि नव्याचा बसेल कसा मेळ’ असे न म्हणता जुन्या नव्याची, ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालूया.