काळानुसार बदलायला हवंच... Print

जयंत साळगांवकर , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
धर्म हा माणसासाठी असतो म्हणजे आधी माणूस मग त्याचा धर्म. जन्माला येतानाच ज्याचा धर्म निश्चित होतो तो हिंदू धर्म. मासिक पाळीची बंधने सनातन हिंदू धर्मात जी सांगितली आहेत ती थोडीफार कठोर आहेत. बंधन कठोर असल्यानंतर ते पाळणे अवघड होते आणि अवघड बंधन पाळण्यापेक्षा त्याचा पूर्णपणे त्याग करण्याकडेच माणसाची वृत्ती बळावते. ओबडधोबड रस्ता पार करण्यापेक्षा न केलेलाच बरा, अशी प्रवृत्ती होते. मुळात पाळीचे बंधन हे आरोग्याशी संबंधित असले पाहिजे आणि आरोग्य म्हटले की धर्म कुठलाही असला तरी त्याचे यमनियम, तापप्रताप सगळीकडे सारखेच.
पाळीचे दिवस पाळण्यामागे पूर्वी जे अनेक हेतू असतील त्यातील एक हेतू स्वच्छता हाही असू शकतो. आता नवीन जमान्यात मासिक पाळीच्या बाबतीत पूर्वीसारखा खटाटोप उरलेला नाही. पूर्वी पाळीचे कपडे वेगळे ठेवले जात. पाळीतील स्त्री ते काढून घेई. वापरी आणि पुन्हा धुवून ठेवी. आता नवीन जमान्यात सॅनिटरी नॅपकीन हा एक असा प्रकार रूढ झालेला आहे की, त्यामुळे ही सगळी कटकट आणि खटाटोप वाचतो. पूर्वी आतासारखी जंतुनाशके नव्हती. स्वच्छता राखण्यासाठी अनेक प्रकार उपलब्ध नव्हते. त्यामुळे पाळीचा विषय आता पूर्वीसारखा उरलेला नाही. केवळ लोकसंख्या वाढली, लोकांमधील अभिसरण वाढले एवढाच भाग नाही. तर जीवनमानही बदलले, जीवनपद्धती अधिक सोप्या झाल्या, हेही लक्षात घेऊन पाळीचे बंधन पूर्वीसारखे कठोर पाळणे आवश्यक उरलेले नाही. याबाबतीत प्रकटपणे मतप्रदर्शन करणे टाळले जाते. स्त्रिया संकोचाने हा विषय बोलत नाहीत आणि पुरुषवर्ग मौन पाळणेच अधिक पसंत करतो. कारण हा विषय प्रकटपणे बोलणे पुरुषवर्गालाही थोडे अवघड होऊन बसते.
मी हा विषय थोडा विस्ताराने मांडण्यामागे काही कारणे आहेत, माझ्या जवळच्या नात्यातील एक  बाई साडी पेटल्यामुळे जळूून मृत्यू पावली. ती दुपारी चहा करीत होती. नऊवारी नेसावयाची. तिच्या साडीच्या निऱ्या स्टोव्हच्या ज्वाळेला लागल्या आणि ती क्षणार्धात भाजली गेली. तिची मुलगी तिच्यापासून काही फुटांवर होती, पण ती मुलगी पाळीच्या दिवसांत असल्यामुळे आणि त्यांच्या घरात सोवळ्याओवळ्याचे प्रस्थ बरेच असल्यामुळे तिने आईला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त आरडाओरड तेवढी केली. पण दरम्यानच्या काळात ती ऐंशी टक्क्य़ांहून अधिक भाजली असल्यामुळे रुग्णालयात नेल्यानंतर ती दोन दिवसांनी परलोकी गेली.
आणखी एक घडलेली गोष्ट. एका राजकीय पुढाऱ्याला मूलबाळ नाही, ते आणि त्यांची पत्नी मुलाबद्दलचा प्रश्न विचारण्यासाठी म्हणून माझ्याकडे आले आणि त्या पत्नीने मला भाबडेपणाने एक प्रश्न विचारला. ती म्हणाली की, लग्न झाल्यानंतर आम्ही एका क्षेत्रावर दर्शनासाठी म्हणून गेलो होतो. त्या क्षेत्रात पोहोचल्याबरोबर मला पाळी आली. पण हे इतरांना कसे सांगावयाचे म्हणून मी गप्प राहिले. तसेच देवदर्शन घेतले आणि तेव्हाच देवळाच्या ओसरीत एका सत्पुरुषाचा मुक्काम होता. त्यांना मी वाकून नमस्कार केला. कसे कोणास ठाऊक, पण मी नमस्कार करताच त्या सत्पुरुषाने माझ्याकडे डोळे वटारून पाहिले. त्यांनी तसे का पाहिले ते मला कळले नाही. पण आता मूलबाळ न झाल्यामुळे मला त्या सत्पुरुषाचा कोप तर नसेल ना, असे वाटते. मुलाचा विचार मनात आला की ते वटारलेले डोळे माझ्या नजरेसमोर नाचू लागतात. मी त्या बाईची समजूत घातली, पश्चात्तापासारखे दुसरे प्रायश्चित्त नाही, हे तिला सांगितले. सोबत असलेला तिचा नवराही म्हणाला की, आम्ही त्या चुकीसाठी अनेक उपाय केले. ज्या दाम्पत्याला मूलबाळ नाही, अशी दाम्पत्ये खूप असतात. मात्र योगायोगाने हा प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडल्यामुळे त्यांना त्या सत्पुरुषाची अवकृपा असावी असे वाटत राहिले आणि तो सल त्या बाईच्या मनात राहिला. अनेकदा काय होते, शाळा-कॉलेजातील मुले-मुली ट्रीप म्हणून एखाद्या गावी जातात व तेथे गेल्यावर त्या गावात एक जुने मंदिर असल्याचे कळते. त्या मंदिरात जाण्याची टूम निघते आणि एखाद-दुसरी मुलगी पाळीत असली तर इतरांबरोबर तिला त्या मंदिरात जावे लागते. ती आपण येणार नाही, असे सांगू शकत नाही. पाळीच्या दिवसात का होईना, पण मुलींबाळींच्या मनात असा सल डाचत राहणे ही गोष्ट बरोबर नाही. इतर लोकांबरोबर वागताना जे सामाजिक बंधन आणि मोकळेपणा हे दोन्ही ठेवणे भाग असते ते बंधन आणि तो मोकळेपणा आपणास ठेवता आला पाहिजे. पूर्वी पाळीच्या दिवसांत बाई बाजूलाच बसत असे तेव्हा असा प्रश्न नव्हता. पण आता मात्र जुन्या-नव्याच्या संधिरेषेवर उभे असताना आपणासमोर हा प्रश्न आहे हे खरेच.
स्त्रियांच्या पाळीच्या विषयात इतक्या विस्ताराने बोलणे क्रमप्राप्त वाटले कारण या विषयातले जे प्रश्न आज निर्माण झाले आहेत त्याची कल्पनाच पूर्वीच्या काळात नव्हती. जे जुने धर्मशास्त्रविषयक ग्रंथ आहेत त्यात या विषयाचा फारसा ऊहापोह केलेला आढळत नाही. पाळीच्या दिवसांतील स्त्री सध्याच्या जमान्यात एका मानसिक कुचंबणेत सापडते. त्याबद्दल काही निश्चित बोलणे जरुरीचे आहे. कारण एकूण परिस्थितीमुळे स्त्रियांना सामाजिक, कौटुंबिक स्नेहसंबंध, ऋणानुबंध राखण्यासाठी म्हणून कार्यात भाग घ्यावा लागतो. यात सत्यनारायणाच्या पूजेपासून अगदी महायज्ञापर्यंत सर्व प्रकारचे कार्यक्रम येऊ शकतात. अशा कार्यक्रमाच्या वेळी एखादी स्त्री मासिक पाळीत असेल तर मोठय़ा मानसिक द्वंद्वात सापडते. एका बाजूने सामाजिक स्थान, प्रतिष्ठा यामुळे धर्मकार्यात तिला सहभागी होणे भाग असते. काही ठिकाणी आपली प्रकृती अचानक बिघडली असे सांगून ती अशा कार्यक्रमापासून दूर राहू शकते. पण ते नेहमीच शक्य होते असे नाही आणि लग्नकार्यात तिला प्रत्यक्ष सहभागी झाल्याशिवाय गत्यंतरच नसते. जुन्या काळात लग्नाच्या वेळी वधू पाळीत असणे शक्य नव्हते. कारण त्या वयाच्या आधीच तिचा विवाह होत असे. तरीही विवाह होत असताना वधू पाळीत आली तर त्यासाठी प्रायश्चित्त सांगितलेले होते. मात्र मुलाची मुंज किंवा मुला-मुलीचे लग्न या वेळी मुलाची माता जर पाळीत आली म्हणजे रजस्वला झाली तर ते मंगलकार्य पुढे ढकलावे आणि पाळी संपल्यानंतर करावे, असे जुने धर्मशास्त्र सांगते. नजीकच्या काळात विवाहयोग्य दिवस किंवा मुहूर्त मिळत नसेल तर महालक्ष्मीची पूजा करून तो विवाह करावा, असा अपवादाचा निर्णय काही ठिकाणी दिलेला आढळतो. अन्यथा विवाह वा मुंज पुढे ढकलणे योग्य, असे धर्मशास्त्र मानते. अलीकडे काही औषधे अशी उपलब्ध आहेत की त्यामुळे पाळी मागे अथवा पुढे येऊ शकते. काही गोळ्या घेतल्या असता पाळी पुढे ढकलता येते किंवा काही औषधे घेऊन पाळी अलीकडेही आणता येते. पण असे केले तरी पाळी येण्याच्या भयापासून पूर्णपणे मुक्तता मिळते असे नाहीच. मानसिक ताणतणावामुळेही काही वेळा पाळी लवकर येऊ शकते. हा विषय नाजूक आणि अवघड आहे, असे जे म्हटले त्याची कारणे अनेक आहेत. धार्मिक कार्य करताना मानसिक प्रसन्नता आणि सुदृढता याची आवश्यकता असते. आपणांतच काही उणेपणाची भावना निर्माण झाली तर ते बाधक ठरू शकते. त्यात त्या कार्याचा आनंद घेता येत नाही आणि शिवाय मन:स्थितीही लाभत नाही. पुन्हा त्यानंतर काही अघटित घडले तर ते आपण पाळीत घडल्यामुळे घडले काय, अशा रुखरुखही लागून राहते. म्हणूनच हा विषय थोडा तपशिलाने आणि बारकाईने हाताळणे आवश्यक आहे. ज्याला जे सोयीचे असेल ते त्याने करावे, असे म्हणून झटकून देण्याचा हा विषय नाही.
 अत्री ऋषींचे एक सुप्रसिद्ध वचन सांगितले जाते. विवाहात, यात्रेत, नदी पार करताना स्पृश्यास्पृश्यात भेद पाळू नयेत, अशा अर्थाचे ते वचन आहे. या वचनाचा आधार घेऊन जेथे अधिक गर्दी जमा होते अशा ठिकाणी शिवाशिवीचा विधिनिषेध नसावा, असे आपण म्हणू शकतो. आणि एकदा ही गोष्ट मान्य केली की, शिवाशिवीचा नियम म्हणजे यात पाळीतील स्त्री संदर्भातील र्निबधही आलेच, हे आपल्या घराच्या उंबरठय़ाच्या आत पाळले जावेत, असाही एक मार्ग निघू शकतो. हेही पाळणे ज्यांना अवघड आहे त्यांनी घरात एकापेक्षा अधिक स्त्रिया असतील तर पाळीतील स्त्रीने स्वयंपाकाला हातभार लावू नये, वरची कामे तेवढे करावीत, असा निर्णय घेता येईल. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या अनेक ठिकाणी काही कुटुंबांनी हा नियम स्वीकारला आहे. देवाची पूजा करणाऱ्या व्यक्तीने आंघोळ केल्यानंतर शक्यतो ओलेत्याने किंवा धूतवस्त्र वा सोवळे नेसून देवाची पूजा करावी. स्त्रीच्या पाळीचा र्निबध देवाच्या विषयात पाळला जावा असे माझे मत आहे.
 धर्माच्या बाबतीत त्याचे शिथिलीकरण करणे हे आवश्यक आहे ही गोष्ट निर्विवाद आणि त्या दृष्टीने कौटुंबिक, सामाजिक कार्यात तिने भाग घेण्यास हरकत नाही, म्हणजे अशी स्त्री सत्यनारायणाच्या पूजेला गेली तरी तिने तीर्थप्रसाद घेण्यास हरकत नाही. मात्र सत्यनारायणाच्या कलशावर फुले वाहू नयेत, दुरून नमस्कार करावा. वाढदिवसाला, लग्नसमारंभाला, गृहप्रवेशाला मोकळ्या मनाने जाण्यास हरकत नाही. तेथे मनात कोणताही किंतु बाळगण्याची गरज नाही. कुठेही यज्ञ असेल, नवचंडी, शतचंडी अशांसारखे धार्मिक कार्यक्रम असतील तर तेथे जाणे शक्यतो टाळावे आणि तेथे जर खूप लोक येण्यासारखे असतील तर त्या लोकांत सहभागी होण्यासही हरकत नाही. जिथे धर्मकार्यात सामाजिक संदर्भ मिळाला आहे तिथे तो सामाजिक संदर्भ महत्त्वाचा आहे, हे जाणून पाळीच्या दिवसातील स्त्रीनेही सहभागी होण्यास हरकत नाही. जिथे धर्मकार्यास सामाजिक संदर्भ मिळाला आहे तिथे तो सामाजिक संदर्भ महत्वाचा आहे हे जाणून पाळीच्या दिवसातील स्त्रीनेही सहभागी होण्यास हरकत नाही. मात्र जिथे केवळ धार्मिक कार्यच असेल तिथे सारासार विचार करून धर्माचा आदर राखण्याच्या दृष्टीने जर बंधन पाळता आले तर ते पाळावे.
 आपण पाळीचे बंधन पाळण्याबाबत जो थोडासा उदार विचार स्वीकारला आहे तो सांप्रतच्या बदललेल्या जीवनमानाशी सुसंगत असा ठेवण्याचा प्रयत्न आहे. जुन्या धार्मिक भावनेचा आदर करीत असतानाच नवीन सामाजिक वातावरणाशी स्वस्थ भावनेने समरस होता यावे, असा त्यामागील हेतू आहे. या सगळ्या विषयांत नवीन कालमान, नवीन संशोधन आणि नवीन जीवनप्रणाली यांचा जुन्या परंपरेतील लोक विचार करीत नाहीत. धर्मशास्त्राप्रमाणे स्त्रियांच्या पाळीच्या दिवसानंतर स्राव थांबल्यावर जर पुन्हा १७ दिवसांच्या आत स्राव सुरू झाला तर त्याबद्दल काही निषेध पाळण्याची गरज नाही. १७ दिवसांत पुन्हा पाळी सुरू झाली तर ती पाळी समजू नये. तिने स्नान करून नेहमीप्रमाणे कामाला लागावे, असे धर्मशास्त्र सांगते. या बाबतीत काही तज्ज्ञांशी, डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर आणि संशोधनाचे निष्कर्ष पाहिल्यावर असे ध्यानात आले की, ठराविक कालावधीनंतर म्हणजे २८ किंवा ३० दिवसांनंतर येणारी पाळी आणि १७ दिवसांच्या आत येणारी पाळी यामधील स्राव सारखाच असतो. मग १७ दिवसांपर्यंत पाळी मानू नये याला अर्थ काय? केवळ व्यवस्था आणि सोय पाहण्याच्या दृष्टीने असे सांगितले असावे हे उघड आहे.
 या बंधनात आधी सांगितल्याप्रमाणे जर माहीत नसताना अज्ञानामुळे पाळीच्या दिवसांतील स्त्रीचा स्पर्श झाला तर त्याचा दोष मानू नये, असेही धर्मशास्त्र सांगते. म्हणूनच या बाबतीतले नियम कठोर असले तरी मुळातली धर्मशास्त्राची दृष्टी व्यापक आणि उदार आहे हे दृष्टिआड करून चालणार नाही. जुन्या काळात लहानसे बंधन पाळा, असे सांगितले तरी त्यासाठी खूप मोठा बाऊ करून ते सांगितले जाई. या सगळ्या विषयांत जुन्या धर्मपंडितांची जी दृष्टी होती, ती स्त्रियांना त्यांची मासिक पाळी हे उणेपणा किंवा वैगुण्य आहे असे सांगण्याचा हेतू स्पष्ट दिसतो.
(‘धर्मबोध’ या पुस्तकातील हा संपादित लेख)