रजस्वला स्त्रीचा देवधर्म Print

alt

डॉ. किशोर अतनूरकर , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या गाभाऱ्यातील प्रवेशाचा प्रश्न असो वा याच मंदिरातील प्रसादाचे लाडू करण्याचा प्रश्न असो रजस्वला वा मासिक पाळीतील स्त्रीला तिथे नकार मिळतो. त्यामागे धर्मातील रूढी परंपरांचा घट्ट पगडा आहे की पुरुषप्रधान संस्कृतीचा वरचष्मा? पण तोही इतका जबरदस्त आहे की नोकरी-घर-व्यवहार बिनधास्तपणे हाताळणाऱ्या स्त्रिया या काळात देवधर्माच्या बाबतीत मात्र पाय मागे घेताना दिसतात. सृजनाशी थेट संबंध असणाऱ्या मासिक पाळीत देवाशी संबंधित व्यवहार करण्याच्या बाबतीतली त्यांची भीती त्यांच्या शिक्षणावर, वैज्ञानिक सत्यावर मात करते आहे. काय आहेत त्या मागची कारणं? ही भीती खरंच व्यवहार्य आहे का? आणि कसा काढायला हवा यातून मार्ग? सांगणारे अभ्यासक, जाणकारांचे तीन लेख...
स्त्रियांनी रजस्वला असताना वा मासिक पाळीच्या कालावधीत देवधर्म पाळावा का नाही? देवपूजा करावी का करू नये?  या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच आहे -  ‘एक मोठ्ठा नाही ’- गरीब असो वा श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित, ग्रामीण-शहरी, विवाहित-अविवाहित, अगदी नुकत्याच वयात आलेल्या मुलीपासून ऋतुसमाप्ती होऊन अनेक वर्षे उलटून गेलेल्या आजीच्या वयाच्या स्त्रीपर्यंत कोणालाही विचारा उत्तर तिचं उत्तर ‘नाही’ असंच आहे. अगदी पौराणिक काळातील स्त्रियांचे या संदर्भातील विचार आणि एकविसाव्या शतकातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विश्वात वावरणाऱ्या मुली किंवा स्त्रियांच्या विचारात काळानुरूप थोडासा बदल झाला असला तरी मासिक पाळीच्या कालावधीत देवधर्म पाळू नये किंवा देवपूजा करू नये, असंच मानलं जातं. त्याबद्दलची प्रचंड भीती स्त्रियांच्या मनात असते. म्हणूनच आत्ताच्या काळात एक प्रश्न आवर्जून विचारायला हवा, असं का ?
वास्तविक पाहता मासिक पाळी म्हणजे स्त्रियांच्या शरीरात प्रजनन संस्थेशी संबंधित ज्या घडामोडी होतात, त्याचं दृश्य स्वरूप आहे. पचनसंस्था आणि उत्सर्जन संस्थेत होत असलेल्या घडामोडीचं दृश्य स्वरूप म्हणजे अनुक्रमे मलविसर्जन आणि मूत्रविसर्जन होय. दिवसातून जसं आपण शौचास आणि लघवीसाठी जातो तसं स्त्रिया महिन्यातून एकदा मासिक पाळीचा अनुभव घेतात. मासिक पाळीचं ‘येणं’ हे इतकं नैसर्गिक आहे. असं असूनही मग देवपूजेच्या दृष्टीने फक्त मासिक पाळीच निषिद्ध किंवा वज्र्य का समजली जाते? देवपूजा करताना शरीर स्वच्छ असणं गरजेचं आहे. या सर्वसाधारण नियमाचं पालन व्हावं यासाठी मासिक पाळीच्या कालावधीत देवस्थानी जाण्यास मनाई करण्यात आली असावी. फक्त शरीर स्वच्छता हेच एकमेव कारण असावं असं वाटत नाही. पूर्वीच्या काळात मासिक पाळीत होणारा रक्तस्राव ‘सांभाळण्यासाठी’ ज्या वस्त्रांचा किंवा कपडय़ाचा उपयोग केला जायचा तो सर्व प्रकार गैरसोयीचा होता. त्या दरम्यान स्त्रियांना घरकाम, स्वयंपाक, झाडलोट करताना करावी लागणारी ऊठबस आणि शरीर स्वच्छ ठेवणं अडचणीचं असणार.  पण आज तसं नाही. आजचा जमाना वापरण्यासाठी अतिशय सोयीस्कर अशा सॅनिटरी नॅपकिन्सचा आहे. या नॅपकिन्सचा उपयोग करून मासिक पाळीच्या कालावधीत ‘फ्री’ कसं राहता येईल, शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना तर अजिबातच अडचण असणार नाही अशी जाहिरात नको तेवढय़ा प्रमाणात जरी करण्यात येत असली तरी अत्याधुनिक प्रकारच्या नॅपकिन्सच्या वापरामुळे मासिक पाळीच्या कालावधीत मुलींचं आणि स्त्रियांचं जीवन सुसह्य़ झालं आहे, हे मान्य करावं लागेल. ज्ञानाचं मंदिर समजल्या जाणाऱ्या शाळा-कॉलेजमध्ये मुली, शिक्षिका मासिक पाळीच्या कालावधीत शारीरिक स्वच्छतेची काळजी घेऊन जात असतील, तर देवपूजा करण्यासाठी उभारलेल्या मंदिरात तितक्याच मोकळेपणाने जावयास काय हरकत आहे हा विचार मनातून जात नाही. केवळ स्वच्छतेच्या बाबतीत बोलायचं तर कितीतरी मंदिरे म्हणावी तितकी स्वच्छ नाहीत, हे सत्य आहे. त्या अस्वच्छतेकडे आपण दुर्लक्ष करून देवपूजा करून घरी परत येतो, ही वस्तुस्थिती आहे.
दर महिन्यात स्त्रियांना मासिक पाळी येणं हा स्त्री जातीला मिळालेला एक शाप आहे, असं समजलं जातं. पुराणात या संदर्भात एक कहाणी आहे. एकदा भगवान श्रीकृष्णाला युधिष्ठिराने सांप्रत सर्व पापांचा नाश करणारे व्रत सांगा, असं म्हटल्यानंतर श्रीकृष्णाने युधिष्ठिरास ऋषिपंचमीचे व्रत कथन केले. या व्रताचं आचरण केल्यास स्त्री सर्व पापांतून मुक्त होते. पाप तर अनेक प्रकारचे आहेत. ऋषिपंचमीचे व्रत केल्याने नेमकं कोणत्या पापापासून स्त्रिया मुक्त होतात, असं विचारल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जी स्त्री रजस्वला झाली असून अज्ञानाने किंवा जाणूनबुजून घरातील वस्तू, पदार्थाना व दुसऱ्या व्यक्तींना स्पर्श करून विटाळ करते तिला मोठे पाप लागते. ती अवश्य नरकात जाते. श्रीकृष्ण  सांगतात, रजस्वला स्त्रीला इतकं निंद्य मानून चारही वर्णानी तिला घरातून बाहेर का ठेवावी याचं कारण असं की, पूर्वी इंद्राने वृत्रासुराला युद्धात मारले. वृत्र हा ब्राह्मण होता. त्यामुळे इंद्राचे सर्व तेज नष्ट झाले. या पातकापासून मुक्तता व्हावी म्हणून इंद्र ब्रह्मदेवाला शरण गेला. त्याने इंद्राला ब्रह्महत्येपासून मुक्त केले आणि त्या हत्येच्या पापाची चार ठिकाणी विभागणी केली. त्यातील चौथा भाग स्त्रियांच्या रजात ठेवला. अशी ही कहाणी ‘सार्थ ऋषिपंचमी व्रतकथा- पूजा विधान’ या पुस्तकात १८ ते २० या पृष्ठ क्रमांकावर दिली आहे. या कहाणीवरून स्त्रियांच्या मासिक पाळीस ‘शाप’ असं का संबोधलं जात असावं, याची कल्पना येते.
इंद्राच्या हातून नकळत ब्रह्महत्येचं पाप घडलं म्हणून ब्रह्मदेवानं इंद्राला पापातून मुक्त करण्यासाठी एक चतुर्थाश का होईना पातक स्त्रियांच्याच माथी का मारावं? या संपूर्ण घटनेत स्त्रियांचा काय दोष? कथा वाचल्यानंतर या गोष्टींचा काही खुलासा होत नाही.
मासिक पाळी आणि देवधर्म या संदर्भात अनेकांनी संशोधन करून आपले विचार मांडले आहेत. कोणत्या धर्मात या बाबतीत काय सांगितलं आहे याचा अभ्यास केला आहे. एक स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसाय करताना अनेक स्त्रियांना धार्मिक कारणांसाठी मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठीच गोळ्या हव्या असतात आणि त्या लिहून देताना त्यांच्या अनेक बारीकसारीक शंकांचं समाधान करावं लागतं. त्यांचे प्रश्न- गोळ्या किती दिवसांसाठी घ्याव्या लागतील? कधी सुरू कराव्यात? कधी बंद कराव्यात? यापूर्वी गोळ्या घेण्याची मला कधीच गरज पडली नाही, पण आता अमुक चारीधाम यात्रेला जायचं, तमुक महालक्ष्मीची पूजा आहे, म्हणून गोळ्या घेणं भाग आहे. गोळ्या घेतल्यानंतर काही साइड इफेक्ट्स तर होणार नाहीत ना? गोळ्या बंद केल्यानंतर पाळी पुन्हा नेहमीसारखी येईल ना? अशा ‘संकट’ काळातून मार्ग काढण्यासाठी विचारल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. सगळं काही सुरळीत होईल ना? का मध्येच काही ‘घात’ होईल या विचाराने तो धार्मिक कार्यक्रम पार पडेपर्यंत तिच्या जिवाची घालमेल चालू असते. काही वेळेस स्त्रिया उद्या मासिक पाळीची अपेक्षित तारीख आणि आज गोळ्या विचारण्यासाठी येतात. इतक्या ऐन वेळेवर गोळ्या सुरू केल्यास ‘फायदा’ होईल याचा नेम नसतो. अशा वेळेस गोळ्या घ्या, पण परिणाम झाला नाही तर मनात कोणताही ‘किंतु’ न बाळगता धार्मिक कार्यात सहभागी व्हा, असा सल्ला दिला तर निराश होतात, त्यांना प्रशस्त वाटत नाही. स्त्रियांची या बाबतीतील ओढाताण त्रासदायक ठरते. एकदाही आपल्या हातून चुकूनही मासिक पाळीच्या कालावधीत देवपूजा केली जाऊ नये, असं प्रत्येक स्त्रीला का वाटत असावं?  याला स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ असलेल्या काही स्त्री डॉक्टरांचादेखील अपवाद असू नये याचं आश्चर्य वाटतं.
याचा काही समाधानकारक खुलासा होईल या उत्सुकतेपोटी मी अनंत महाराज आठवले यांचे चिरंजीव चंद्रशेखर महाराज यांना भेटलो. त्यांनी या बाबतीतील पुढीलप्रमाणे आपले विचार मांडले. चंद्रशेखर महाराज म्हणतात, वेद आणि मंत्रांचा उच्चार एका ठराविक पद्धतीने केला गेला पाहिजे. ऋषी, मुनी, तपस्वी जेव्हा मंत्रोच्चार करत तेव्हा वातावरणात पसरणाऱ्या ध्वनिलहरींमुळे अपेक्षित परिणाम साध्य व्हायचा, एवढी शक्ती त्यांच्या मंत्रोच्चारात होती. गर्भवती महिलांना अशा प्रकारे मंत्रोच्चार करण्याची त्या काळात मनाई होती. मंत्रोच्चारामुळे उत्पन्न होणाऱ्या ध्वनिलहरी गर्भजलात कंप निर्माण करून गर्भाच्या वाढीसाठी अपायकारक ठरण्याची शक्यता असते. गर्भवती राहण्याचं प्रमाण त्या काळात अधिक होतं म्हणून कदाचित गर्भवती महिलांसाठीच काय कोणत्याच स्त्रियांनी वेदाचं पठण किंवा मंत्रोच्चार करू नये असा नियम आला असावा. अशाच काही कारणास्तव म्हणा किंवा रजस्वला स्त्रीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या लहरींचा वातावरणावर विपरीत परिणाम होऊ नये अशा काही कारणांसाठी स्त्रियांनी मासिक पाळीच्या कालावधीत किमान तीन दिवस ठराविक कुटीराच्या बाहेर पडू नये, असा नियम झाला असावा. आजच्या बदलत्या जीवनशैलीत हे नियम सुसंगत नाहीत हे मान्य करून चंद्रशेखर महाराज विचारतात,‘‘ या काळात तिला शारीरिक विश्रांती नको? एरवी स्त्रियांना घरकामातून सुट्टी केव्हा मिळावी? स्वयंपाक, घरकाम, मुलांचं संगोपन, आलेल्या पाहुण्यांची खातीरदारी यातून रविवार, १५ ऑगस्ट, आदी कोणत्याच दिवशी सुट्टी नाही. आपण कॉम्प्युटरवर सतत काम करणाऱ्यांना दृष्टिदोष निर्माण होऊ नये म्हणून दर दोन तासांनी पाच-दहा मिनिटांची विश्रांती घ्या म्हणून वैद्यकीय सल्ला देतो, पाठीचं दुखणं मागे लागू नये म्हणून दर तीन-चार तासांनंतर १५ मिनिटे तरी रिलॅक्स व्हा म्हणून सांगतो, मग स्त्रियांना मासिक पाळीच्या निमित्ताने दर महिन्याला तीन दिवस आराम का नको? या निमित्ताने पुरुषांनादेखील घरकामात मदत करण्याची सवय व्हायला नको का?’’
चंद्रशेखर महाराजांचे वडील अनंत महाराज आठवले ऊर्फ वरदानंद भारती आपल्या ‘मनुस्मृति-भूमिका अक्षेपाच्या संदर्भात’ (पृष्ठ क्र. ४४, ६६, ६७) या पुस्तकात म्हणतात, ‘‘चार वेदांपैकी अथर्ववेद बहुतांशी सात्त्विक, राजस, तामस, अभिचार मंत्रांनी युक्त आहे. या मंत्रशास्त्रासाठी ‘सोवळे’ ही कल्पना आली. यज्ञ, पूजा, संस्कार विधीसाठी शरीर पवित्र, निर्मल राखणे आवश्यक आहे. मासिक पाळीच्या तीन-चार दिवसांत स्त्रीची शारीरिक व मानसिक कार्यक्षमता कमी असते, त्या काळात तिला अधिक विश्रांती मिळावी म्हणून बाजूला बसण्याची पद्धत रूढ झाली.’’
मासिक पाळीच्या कालावधीत तिची शारीरिक व मानसिक कार्यक्षमता कमी झालेली असते म्हणून तिला घरकामापासून तीन-चार दिवस सुट्टी मिळाली पाहिजे हे मान्य केलं पाहिजे. ठीक आहे, पण मानसिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी स्नान करून शांतचित्ताने देवपूजा केली तर मदतच होईल असंदेखील वाटतं.
‘चिंता करितो विश्वाची’ या पुस्तकात सुनील चिंचोलकरांनी समर्थ रामदासांच्या स्त्री शिष्यांबद्दल माहिती दिली आहे. १६४८ मध्ये कराडजवळ शहापूरला जे मारुती मंदिर स्थापन केलं त्याचं व्यवस्थापन सतीबाई शहापूरकर पाहत. मिरजला वेणास्वामी मठाधिपती होत्या. त्या विधवा असूनदेखील सज्जनगडावर उभं राहून कीर्तन करण्याचा त्यांना सन्मान मिळाला. सज्जनगडावरील कारभार अक्कास्वामी बघायच्या. अंबिकाबाई कराडजवळ वाळवे मठाच्या मठाधिपती होत्या. एकूण १५ स्त्रीशिष्या मठाधिपती होत्या. मठाचा कारभार त्या पाहायच्या, पण मासिक पाळीच्या कालावधीत देवपूजा मात्र करावयाच्या नाहीत. मंदिरात जाऊन पूजा करण्यासाठी आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी जरी हिंदू धर्मात मनाई केलेली असली तरी मासिक पाळीच्या कालावधीत नामस्मरणाची परवानगी आहे. दासबोधाच्या दशक ४, समास ३ मध्ये नास्मरण भाकीत या अंतर्गत- नामस्मरणाला आचाराची व विधीची बंधने नाहीत. नामस्मरण कोठेही, केव्हाही, देहाच्या कोणत्याही अवस्थेत करावं असं सांगितलं आहे.
मासिक पाळीच्या कालावधीत स्त्रिया देवधर्म पाळू शकत नाहीत, कारण त्या अवस्थेत त्या ‘शुद्ध’ राहू शकत नाहीत, असे सांगितले जाते. पारंपरिक शुद्धतेचे नियम काय सांगतात? स्वच्छ स्नान करा, स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा वगैरे. सततच्या रक्तस्रावामुळे स्त्री स्वत:ला मासिक पाळीच्या कालावधीत शुद्ध ठेवू शकत नाही, त्यामुळे ती ‘अशुद्ध’ समजली जाते. शुद्ध-अशुद्धतेचे नियम हे आपण ठरवले आहेत. या नियमानुसार तुम्ही शुद्ध आहात का अशुद्ध याची पर्वा देव करत नसतो (श्रीमद्भगवद्गीता अध्याय ५ वा) आपलं मत अशुद्ध असेल तर आपण अशुद्ध आहोत, अशी आपल्या मनाची धारणा होते. शुद्ध-अशुद्धतेच्या बाबतीत नेमकं काही महत्त्वाचं असेल तर ती आहे आपल्या मनाची अवस्था! आपलं अंत:करण शुद्ध आहे, असं तुमच्या मनाने स्वीकारलं तर तुमच्या कोणत्याही शारीरिक अवस्थेत तुम्ही शुद्ध राहू शकता.
सारांश असा की, मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती स्त्री जीवनातील एक अटळ बाब आहे. त्या कालावधीत स्त्रियांना शारीरिक विश्रांतीची नितांत गरज असते. (आजकालच्या बदलत्या परिस्थितीमुळे तिला विश्रांती मिळत नाही) मासिक पाळीच्या कालावधीत देवधर्म पाळण्यासाठी धर्माने मनाई केलेली आहे. पूर्वीसारखे मासिक पाळीच्या बाबतीत नियम पाळणे आता अशक्य आहे. नोकरी, व्यवसाय करणाऱ्या मुली किंवा स्त्रियांना महिन्यातून तीन म्हणजे वर्षांतून ३६ दिवस शारीरिक विश्रांतीसाठी सुट्टी मिळणे अशक्य आहे.
आपल्या देवधर्माच्या कल्पनेत बदल करावेत का करू नयेत हे त्या मुलीच्या अथवा स्त्रीच्या मानसिक शक्तीवर अवलंबून आहे. समजा, एखाद्या स्त्रीने जुन्या नियमांचं बंधन सोडून मासिक पाळीच्या कालावधीत देवपूजा केली आणि त्याच दरम्यान तिच्या जीवनात काही अघटित घडलं तर आपण ‘पाप’ केल्यामुळेच असं घडलं असं तिला वाटतं, की त्या घटनेचा आणि देवपूजेचा काहीही संबंध नाही असं वाटतं? प्रत्येकाच्या मानसिक शक्ती अथवा मानसिक स्थिरतेवर ते अवलंबून असतं. ज्या मुली आणि स्त्रियांना अशी मानसिक शक्ती प्राप्त आहे, असा आत्मविश्वास आहे त्यांनी मासिक पाळीच्या कालावधीत जरूर देवधर्म पाळावा, अन्यथा नको. आपला स्वत:वरचा विश्वास आणि देवावरची श्रद्धा या दोन वैयक्तिक बाबी आहेत, हे विसरून चालणार नाही.