एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा.. Print

अमृता सुभाष ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

ती मुलं वेगळी असतात. समाजालाच काय त्यांच्या कुटुंबीयांनाही त्यांच्या अस्तित्वाचा अर्थ न कळणारा. तरीही प्रत्येक जण जगत असतो आणि त्यांचे आई-बाप त्यांना जगवत असतात. कुठलीही किंमत देऊन..
तो खूप आरडाओरडा करायचा. त्याच्या ओरडण्याचे आवाज विचित्रच वाटायचे. मी तेव्हा लहान होते, तरी तो विचित्रपणा जाणवायचा. त्या विचित्र आरडय़ाओरडय़ाचा आवाज यायला लागला की, मी हळूच आमच्या घराच्या बाहेरच्या खोलीतल्या खिडकीत यायचे. खिडकीचा पडदा किलकिला करून तिथून श्वास रोखून बघत राहायचे. आमच्या घराच्या त्या खिडकीसमोर ‘त्याच्या’ घराच्या दोन खिडक्या होत्या. एक स्वयंपाकघराची आणि एक बेडरूमची त्यापैकी एका कुठल्या तरी खिडकीतून आवाज येत असायचा. खिडकी बंद असेल आणि रात्र असेल तर आतल्या सावल्या हलताना दिसायच्या. कधी कधी खिडकी उघडीच असायची त्यांची आणि आतलं दिसायचं. आत मारामारी चालू असायची. तो कर्कश्श पक्ष्यासारख्या आवाजात चीत्कारीत असायचा. त्याच्या वडिलांना वेडेवाकडे हातवारे करीत मारल्यासारखं काही तरी करीत असायचा. वडील त्याचे बेबंद हातवारे पकडायचा प्रयत्न करीत त्याच्यावर ओरडत असायचे. मी जेव्हा आमच्या त्या घरात राहायला आले तेव्हा ‘तो’ ‘मुलांचा आवाज फुटतो’ त्या वयाचा होता. त्यामुळे त्याच्या घशातून चिरकट आवाज येत असायचे. कधी कधी त्याची आईपण त्याला आवरण्यासाठी आरडाओरडा करीत असायची. त्याला एक लहान भाऊ होता. तो बऱ्याचदा घरी नसायचा. शाळेत जात असेल. जेव्हा घरी असायचा, तेव्हा हे घडत असेल त्या खोलीला सोडून दुसऱ्या खोलीत तिसरंच काही तरी करीत बसलेला असायचा. म्हणजे मारामारी जर स्वयंपाकघरात चालू असेल तर हा बेडरूममध्ये अभ्याससदृश काही तरी करताना दिसायचा आणि मारामारी जर बेडरूममध्ये चालू असेल तर हा स्वयंपाकघरात टेबलावर बसून दूध पिताना दिसायचा. तो कर्कश्श आरडाओरडा ऐकूच येत नसल्यासारखा शांतपणा त्याच्या चेहऱ्यावर असायचा. मला त्या सगळ्याचीच भीती वाटायची. मी लहान होते त्यामुळे त्या मोठय़ा मारामारी करणाऱ्या मुलांत काही तरी वेगळं आहे हे कळायचं; पण नक्की काय ते कळायचं नाही. त्याचे वडील त्या लहान वयात दुष्ट वाटायचे. त्यांचीही भीती वाटायची. कारण ते एरवी लाजरे आणि शांत दिसायचे. मी शाळेत जाण्यासाठी बस स्टॉपवर जायला निघाले की, क्वचित कधी ते दिसायचे. काळे, साधे, गरीब. खाली मान घालूनच जायचे. त्या मुलाला मारीत असलेले ‘ते’ आणि आता माझ्यासमोरून जाणारे बापुडवाणे ‘ते’ ही दोन वेगळीच माणसं वाटायची. ते दुरून येताना दिसले की, मी खाली मान घालायची आणि तेही. आम्ही कधीच एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं नाही. त्यांचा बापुडवाणेपणा बघून ‘हे मुलाला मारीत असताना आपल्याला दुष्ट वाटतात’ याबद्दल लहानग्या मला शरमिंदं व्हायला व्हायचं. एकदम त्यांची दया यायची. मी त्यांच्या समोरच्या इमारतीत त्यांच्या समोरच्या घरात राहणारी मुलगी आहे हे त्यांनाही अर्थातच एव्हाना माहीत झालेलं होतं. मी चोरून, पडद्याआडून त्यांच्या घरातलं जे पाहू नये ते पाहते आहे हे त्यांना माहीत नसेलही, पण त्यांच्या घरातली कर्णकर्कश्श भांडणं घराबाहेर दुमदुमत असणारच या भावनेने असेल, तेही शरमिंदे वाटायचे. मला त्यांच्या आतलं कळू नये ते काही तरी कळलं आहे, असं वाटायचं, पण काय ते कळायचं नाही. त्यांचा राग यायचा आणि खूप दयाही.
‘तो’ मुलगा आणि त्याची आई हे खूप क्वचित मला त्यांच्या घराबाहेर पडलेले दिसले. एकदा, कुठलीशी सुट्टीची दुपार होती. घरात, ‘मोठे झोपलेले असतात आणि छोटय़ांना झोप येत नसते’ अशी दुपार. मी आमच्या घराच्या बाहेरच्या खोलीत काही तरी करीत असताना सहज खिडकीतून बाहेर पाहिलं तर ‘तो’ खिडकीत उभा होता. आमच्या घराकडे बघत. तंद्री लागल्यासारखा. त्याच्या खिडकीचा आडवा गज जिभेने चाटत तो समोर बघत होता. आमच्या खिडकीचा पडदा उघडा होता. त्याच्या ‘डोळ्यांना’ मी दिसत होते नक्कीच, पण ‘नजरेत’ माझ्या असण्याची काहीच जाणीव किंवा खूण नव्हती. मी आमच्या खिडकीला लागून असलेल्या गॅलरीत आले आणि त्याची नजर वेगळी झाली. मी तेव्हाच त्याला अचानक दिसल्यासारखा तो ताठ उभा राहिला. मी पहिल्यांदाच त्याला ‘शांत’ बघत होते. धडधडत होतं, पण बघत राहिले. अचानक घशातून काही तरी विचित्र चिरका आवाज काढून तो हसला. मी आतल्या खोलीत पळून गेले. त्याला दिसणार नाही, अशा खोलीत. दुसऱ्याच क्षणी मला माझं हे असं पळून येणं बावळटपणाचं वाटलं. तरी बाहेर नाही गेले. थोडय़ा वेळाने न राहवून बाहेर गेले तर त्याच्या खिडकीत कुणीच नव्हतं. ती रिकामी खिडकी बघून खूप शरमिंद वाटलं. तो माझ्यावर रागावला असेल का असं वाटलं.
त्यानंतर त्यांच्या घरातलं भांडण ऐकू आलं तरी ते बघायचं मी टाळलं. हळूहळू जशी मी त्या नवीन जागेत रुळत गेले तसं त्या आवाजाचंही काही वाटेनासं झालं.
पुढे त्याच काळात मी आमच्या एका ओळखीच्यांकडे राहायला गेले. गेल्या गेल्या त्यांच्या घराच्या हॉलमध्ये एक पस्तिशीचा वाटेल असा माणूस दिसला. त्याने जाड भिंगाचा चष्मा घातला होता आणि तो हॉलभर स्वत:शी पुटपुटत, तरातरा चालत होता. त्याला बघून एकदम त्या घरासमोरच्या मुलाची आठवण झाली. या घरात आपण पुढचे बरेच दिवस राहणार आहोत तेव्हा, हा ‘वेगळाच’ वाटणारा काका आपल्या आसपास असणार म्हणून थोडी भीतीच वाटली. त्या घरात एक मावशी होत्या. त्या माझा चेहरा बघून मला म्हणाल्या, ‘घाबरू नको. तो मोठा झाला असला ना, तरी मनाने अडीच-तीन वर्षांचाच आहे, एवढंच.’ तो काका त्या मावशींचा धाकटा दीर होता. मावशीचं आणि त्याचं फार वेगळं नातं होतं. त्या काकाला चहा खूप आवडायचा. मावशींनापण आवडायचा. त्यामुळे ते दोघे सारखा चहा प्यायचे. काकाला बाहेर कुणाकडे जरी नेलं तरी तो गेल्या गेल्या म्हणायचा, ‘मला चआ.. चआ’. मावशींनी बनवलेलं काहीही त्याला खूप आवडायचं. बऱ्याचदा मावशी त्यांच्या मुलासाठी नाश्त्याची ताटली टेबलावर ठेवून काही तरी आणायला आत जायच्या तर मुलगा त्याचं आवरून टेबलापाशी यायच्या आधीच ताटलीतलं सगळं गट्टम झालेलं असायचं. त्या काकाचं सगळं काही त्याचे म्हातारे वडील करायचे. ते काकाची दररोज दाढी करायचे आणि काकाला इस्त्रीचेच कपडे घालायचे. त्यामुळे काका एकदम तुळतुळीत आणि स्वच्छ दिसत असायचा. काकाचे वडील काकाला उद्देशून म्हणायचे, ‘हा माझा देव आहे.’त्या काही दिवसांत काकाबद्दलची भीती जाऊन तो खूप खूप गोड माणूस वाटायला लागला मला!
मग कॉलेजमध्ये असताना काकासारख्या या आगळ्या, अनोख्या गोड मुलांच्या अजूनच सहवासात आले. माझी सख्खी मावशी अरुणा सांब्राणी अशा अनेक इटुकल्या-पिटुकल्यांना गाणं शिकवते. नाच शिकविते. ती सगळी मुलं तिला अरुणा सांब्राणीऐवजी अरुणा साम्राज्ञी म्हणतात आणि मला वाटतं तिचं त्या मुलांबरोबरचं काम बघता ती खरोखरच सामाज्ञीच आहे! तिच्यामुळेच मलाही या दोस्तांचं फार अनोखं प्रेम मिळालं. मी या दोस्तांना गाणं शिकवायला जाताना जर सलवार-कमीज घातला असेल तर ते सगळे मला ‘गाववाली मावशी’ आली असं म्हणायचे आणि जर मी पॅण्ट-शर्ट घालून गेले तर ते म्हणायचे, ‘पॅण्टवाले गाणंवाले काका आले!’ या माझ्या दोस्तलोकांनी मला खूप भरभरून निर्मळ प्रेम दिलं.
हे माझे सगळे आनंदी दोस्त मला अलीकडेच भेटले.  ‘सेरेब्रल पाल्सी’ दिवसाच्या निमित्ताने संचेती हॉस्पिटलमध्ये या दोस्तांच्या फॅन्सी ड्रेस आणि चित्रकला स्पर्धा होत्या. त्या स्पर्धेसाठी ‘सेरेब्रल पाल्सी’बरोबरच इतरही काही कारणांनी आगळे असलेले माझे किती तरी दोस्तलोक आले होते. कुणी फॅन्सी ड्रेसमध्ये साईबाबा झालं होतं. कुणी लोकमान्य टिळक. त्या दोस्तांचे आई-वडील त्यांना मन लावून नटवत होते. कुणी रमाबाई रानडे झालेल्या. एका गोडूलीच्या नाकात नथ घालत होते. कुणी उभंही राहू न शकणाऱ्या शिवाजीला झुपकेदार मिशा काढत होते. त्यांच्या त्या इटुकल्या बाळांना नटवत होते. बाळ जन्मणार असतं तेव्हा किती स्वप्नं असतात आई-बाबांची! आपल्या मनातल्या स्वप्नांपेक्षा काहीसा वेगळा आकार घेऊन जन्माला आलेली ही आगळी इटुकली. त्यांचं हे वेगळेपण स्वीकारणं त्या आई-बाबांना सुरुवातीला किती अवघड गेलं असेल. पण ते वेगळेपण वेळेत स्वीकारलेले आणि स्वीकारून त्या वेगळेपणातलाही आनंद भरभरून घेणारे ते आई-बाबा त्या दिवशी पाहिले. ते सगळे खूप आनंदी होते. स्पर्धा संपल्यावर त्या अनोख्यांना कडेवर घेऊन जाणारे.. हाताला धरून नेणारे.. चेहऱ्यावरून हात फिरविणारे.. त्यांची बटणं लावणारे.. त्यांना व्हीलचेअरवरून नेणारे ते आई-बाबा त्या माझ्या अनोख्या मित्रांइतकेच अनोखे.. त्या प्रत्येक अनोख्याची आणि त्याच्या आई-बाबांची त्यांची त्यांची एक गोष्ट असेल. त्या गोष्टीत या निखळ हसण्याबरोबरच काळं, गहिरंही किती काही असेल. माझ्या अशाच एका मित्राने एकदा त्याची आई माझ्याशी बोलत असताना माझ्यासमोरच खाडकन तिच्या मुस्काटात ठेवून दिली. तेव्हा तिने त्याचा हात धरला. खोल श्वास घेतला आणि ती परत माझ्याशी बोलायला लागली. तिचा तो खोल श्वास मी विसरू शकत नाही. कुणी एक आई, तिचा अनोखा मुलगा वयात आला आहे, त्याने इतर कुणाला विचित्र त्रास देऊ नये म्हणून दररोज ऑफिसला जाण्याआधी त्या मुलाला हस्तमैथुन करते आणि मगच ऑफिसला जाते. त्यामुळे तो मुलगा कमी व्हायलंट होतो.
वरवर पाहता तुमच्या-आमच्या सारख्याच दिसत असतील या सगळ्यांच्याही घराच्या खिडक्या.. पण त्या वरवर साध्या दिसणाऱ्या भिंतीच्या आणि खिडक्यांच्या आत वरवर साध्या वेषात साधी वाटली तरी ही फार फार मोठी माणसं वावरत आहेत, हे आपण कुणीही विसरायला नको..