उत्सव नात्यांचा Print

alt

गैारी कानिटकर , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ही दिवाळी ‘चतुरंग’च्या समस्त सुजाण वाचकांच्या सक्षमीकरणाचा परीघ विस्तारणारी, आत्मभानाच्या तेजाने लखलखणारी, खूप खूप आनंदाची आणि भरभराटीची जावो, ही शुभेच्छा!
दिवाळी हा नात्यांचा उत्सव. नातं जोपासण्याचा, नातं दृढमूल करण्याचा, नवीन नाती जोडण्याचा! कुणी नातं जोडतं इतरांशी, कुणी नातं जोडतं स्वत:च निर्माण केलेल्या विश्वाशी, कुणी संगीताशी, तर कुणी निसर्गाशी नातं जोडायची हौस या दिवसांत भागवून घेतो; तर सुजातासारखी माणसं वाचनाच्या निमित्ताने स्वत:शीच स्वत:चं असलेलं नातं अधिक दृढ करण्यात दंग होतात. या दिवाळीला तुम्हीही साजरा करा नात्यांचा उत्सव आणि कुटुंब करा अधिक विस्तारित..
‘‘या वेळी मी दिवाळीला आपल्या सोसायटीमध्ये रांगोळी स्पध्रेत भाग घेणारेय आणि यावेळी ठिपक्यांची आणि कुंदन रांगोळी अशा दोन्ही विभागांत भाग घेणारेय. तू शिकवशील नं?’’ आठ-नऊ वर्षांची प्रांजली तिच्या आईला, रसिकाला विचारीत होती.
‘‘बाई, अभ्यासाचं पाहा. दिवाळीच्या आधी परीक्षा आहे त्याचं काय?’’
 ‘‘हो गं आई! अभ्यास काय नेहमीचाच आहे, पण दिवाळी कशी वर्षांतून एकदाच येते. आणि यावेळी चांगली भरपूर सुट्टी आहे. गेल्या वर्षी नाही का तू मला फुलांची रांगोळी शिकवली होतीस आणि मी पहिली आले होते. यावर्षी मला नवीन रांगोळी शिकायचीय.’’
प्रांजलीशी बोलताना रसिका भूतकाळात हरवली. सुट्टी लागताच आजोळी पळायची ती! खूप सारे नातेवाईक जमायचे. सगळ्या बहिणी, मामी, मावश्या असायच्या. आजी तर तिथेच होती. पहाटे पहाटे रामाच्या देवळातला काकड आरतीच्या झांजांचा आवाज आत्ताही तिच्या कानात घुमत होता.. तिच्या आजोळच्या गावात एक छान तळं होतं. पहाटेच्या झुंजूमुंजू वातावरणात रिकाम्या काडेपेटीत वाती लावून त्या तळ्यात सोडायच्या.. अशा कितीतरी दिव्यांमुळे ते तळंच्या तळं  झगमगू लागे..  त्याकाळात खूप सारी भावंडं एकत्र यायची त्यामुळे आजोबा प्रत्येकाला फक्त दोन-तीन लवंगी सर देत असत. ते सरसुद्धा सोडवून सोडवून एक एक फटाका उडवायचा. फराळ तयार करायला सगळीच असायची. प्रत्येक पदार्थ तयार होता होता सगळ्याच मुलांची नजर आणि अर्थात हातही तिथे जायचे. आजी नवेद्याची अट घालायची. मग जाता येता चकल्या, कडबोळी खाता यायची नाहीत..’’
‘‘आई अगं, लक्ष कुठाय तुझं? मला शिकवशील नं रांगोळी?’’
‘‘हो अगं, शिकवीन ना.’’
प्रत्येकाच्या आठवणीत अशी लहानपणीची दिवाळी खोल रुतून बसलेली असते, प्रत्येकाच्या मनातली स्वतंत्र दिवाळी.. जणू दीप क्षणांचं कोरीव लेणं. अनेक र्वष उलटली तरी त्या आठवणींच्या समृद्धतेची चित्रं मनात कायमची उमटलेलीच आहेत. या साऱ्या आठवणी प्रत्येकाच्या स्वतंत्र असल्या, तरी त्याच्या एकटय़ाच्याच नसतात. त्याच्या भोवती वेगवेगळ्या नात्यांची गुंफण असते. दिवाळीचे अनेक संदर्भ बरोबरीच्या नात्यांसह येतात..
खरंतर दिवाळी हा नात्यांचा उत्सव. माणसं जोडण्याचा उत्सव. जोडलेल्या माणसांना भेटण्याचा उत्सव!  तसं पाहिलं तर आता कुटुंबं छोटी होत चालली आहेत. पण प्रत्येक जण आता आपापलं एक वेगळं विश्व तयार करतो. प्रत्येक जण आपापल्या नात्यांचा परीघ विस्तारत असतो. कारण मुळातच दिवाळी हा माणसांना एकत्र आणण्याचा सण! ..
‘‘ए, यंदाचा दिवाळीचा प्लान काय आहे गं? आम्ही तर या वर्षी केरळ ट्रिपला जायचं म्हणतोय. चांगले दहा दिवस. त्यामुळे यंदाची दिवाळी एक्स्टेन्डेड असणारेय. तुम्ही सगळ्यांनी काय ठरवलंय?’’ - वीणा सगळ्यांना विचारत होती. सुरेखा, जयश्री, शालिनी रिमा, ललिता, वीणा आम्ही सगळ्याजणी आज जमलो होतो. आमचा हा खास अशा मत्रिणींचा ग्रुप आहे.
जयश्री म्हणाली, ‘‘या वर्षीची भाऊबीज माझ्याच घरी करायची ठरवलीय. त्यामुळे सगळेजण माझ्याकडेच येणारेत. १२-१५ जण तीन-चार दिवसांसाठी येणारेत. खूप धमाल येईल. कितीतरी वर्षांनी जमतोय आम्ही असे.’’
प्रत्येकीचंच काही ना काहीतरी दिवाळीचं नियोजन झालेलं होतं. खरंच, दिवाळी आली की कसं मस्त वाटतं ना? मी तर दसऱ्याला पुढच्या वर्षीचं कॅलेंडर आलं की लगेच त्यात त्या वर्षीची दिवाळी कधी आहे ते पहिल्यांदा बघते, आणि मनातल्या मनात प्लानिंगही सुरू होतं..
दिवाळीचं वातावरण प्रसन्न असतं. सगळीकडे लखलखाट, आकाशकंदील, हवा पण मस्त असते त्या वेळी. शेतकऱ्यांकडे पीक तयार झालेले असते. अनेकांना बोनसही मिळतो. खरेदी होतेच. नवीन कोऱ्या कपडय़ांचा वास आणि आनंदाचा सण..
 आता घराघरात पूर्वीसारखे खूप नातेवाईक नाहीत. एकच भाऊ, एकच बहीण. त्यातही अनेक घरांतला मुलगा किंवा मुलगी नोकरीच्या निमित्ताने परदेशी गेलेली. त्यामुळे भावाबहिणींची गाठ प्रत्येक दिवाळीला पडेल असं नाही. तनुश्रीची वेगळीच खंत आहे. ती म्हणाली, ‘‘अगं ५-६ वर्षे मी इंग्लंडमध्ये होते, आणि आता भारतात परत आले आहे तर मंदार- माझा भाऊ - गेलाय परदेशी. त्यामुळे गेल्या कितीतरी वर्षांत आमची दिवाळी एकत्र साजरी झालेलीच नाही.’’
प्राजक्ती राहते ती तिची हौसिंग सोसायटी म्हणजे एक छोटंसं नगरच आहे. ११ मजल्यांच्या तीन इमारती असलेली तिची सोसायटी. सोसायटीतले सगळेजण मिळून दिवाळीत वेगवेगळे उपक्रम करतात. त्याची तयारी महिनाो-दीड महिना आधी सुरू होते. या वर्षी त्यांच्या सोसायटीने फटाकेमुक्त दिवाळी अशी थीम ठरवली आहे. ही थीम ठरवण्याच्या मीटिंगला त्यांच्या लहान मुलांना आवर्जून निमंत्रित केलं. अगदी वय वष्रे ८-१० पासून २०-२५ वयाचीही मुलं त्यात सहभागी झाली. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करायची पोस्टर्सही त्यांनी तयार केली आहेत. ४-५ मुलांच्या काही टीम्स त्यांनी तयार केल्या आहेत. आणि ही सर्व मुले घरोघरी जाऊन फटाकेमुक्त दिवाळीचं आवाहन करत आहेत. तसेच सोसायटीचा एकच एक मोठा कंदील सगळेजण मिळून स्वत: बनवत आहेत. या वर्षी रांगोळीही एकच एक, पण मोठीच्या मोठी, सगळे मिळून काढणार आहेत. दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या स्पर्धाही घेतल्या जाणार आहेत. त्यांना खात्री आहे, यानिमित्ताने सगळेजण एकत्र येणार.. अनेक नवी माणसं जोडली जाणार.. त्यातून एक अनोखं नातं तयार होणार..
सागर म्हणाला, ‘‘मला खूप मित्र आहेत. पण आता आम्ही सगळे जण नोकरी करतो. एरवी वर्षभर सगळ्यांच्या सुट्टय़ा जुळत नसल्याने सगळ्यांच्या एकत्र भेट-गप्पा होत नाहीत. दिवाळीत मात्र सगळ्यांना सुट्टी असते. त्यामुळे दिवाळी हवीहवीशी वाटते. वातावरणही मस्त असतं. सगळेजण सजलेले असतात. घराघरात फराळ असतो. वर्षभर चकली-चिवडा- शेव सगळं काही विकत मिळत असलं तरीही दिवाळीच्या फराळाची चव न्यारीच! रस्त्यावरच्या एखाद्या गिरणीसमोरून जरी गेलं तरी भाजणीच्या वासानं जिभेला पाणी सुटतं. आणि दिवाळीच्या दोन दिवस आधी घराघरातून येणारा तळणीचा खमंग वास वातावरणात तरंगत असतो. वा! मस्त!’’
 तन्वी, वय वष्रे २४. तिच्या शाळेतले तिचे काही मित्र-मत्रिणी आणि त्यांचे पालक दरवर्षी नरक चतुर्दशीच्या दिवशी दुपारी जेवायला तन्वीकडे येतात. तन्वी शाळेत असतानाच तिने हा उपक्रम तिच्या आईला विचारून सुरू केला. आता तो पायंडाच पडला आहे. तन्वी म्हणाली, ‘‘मी एकुलती एक मुलगी आहे, आणि फारसे नातेवाईकही नाहीत आमचे. दिवाळीला खूप माणसं हवीत. त्यामुळे एका वर्षी ते सुरू झालं ते आजही चालू आहे. मजा येते! शिवाय पाडव्याचा दीपोत्सव- सारसबागेतला आणि पर्वतीवरचा. तसंच दिवाळी पहाटेचे शास्त्रीय संगीताचे भरगच्च कार्यक्रम.!’’
चिरायू त्याच्या अनेक मित्र-मत्रिणींसह दरवर्षी वेगवेगळे गड सर करत असतो. या वर्षी तो नाशिक जिल्ह्य़ातल्या अलंग मदन आणि कुलंग या गडांवर स्वारी करणार आहे. वर्षभरातले कामाचे ताण बाजूला सारून उत्सवी वातावरणाची सगळेच जण वाट पाहत असतात.
सुजाता एका कंपनीत खूप वरच्या पदावर काम करणारी. तिच्यासाठी दिवाळीचं महत्त्व काय, असं तिला विचारलं असता ती म्हणाली, ‘‘अगं, घरात सलग ४-५ दिवस राहण्याचा हा उत्सव. इतकी सलग सुट्टी कधीच मिळत नाही गं. खूप सारे ‘दिवाळी अंक’ विकत घेऊन घरातच पडी टाकणे आणि भरपूर वैचारिक फराळाचा आनंद लुटणं म्हणजे माझ्यासाठी स्वर्गीय आनंद. शंभर वर्षांची परंपरा असणारे दिवाळी अंक म्हणजे साहित्याची मेजवानी. अनेक उत्तमोत्तम दिवाळी अंकांद्वारा लेखक साहित्याचा खजिनाच उलगडत असतात, आणि दिवाळीत मी अक्षरश: लूट करत असते या खजिन्याची, त्यासाठी मी माझ्यासाठी असा खास वेळ काढते या दिवसांत.’’
मात्र समाजातले काहीजण असे असतात की त्यांच्या घरी दिवाळी नसते. काही कारणांमुळे ते वेगवेगळ्या संस्थांमध्ये राहत असतात. सुनील मग दर दिवाळीला अशा अनेक सामाजिक संस्थांमध्ये जाऊन तिथल्या लोकांबरोबर दिवाळी साजरी करतो. नीलम अपंग संस्थेत जाते, तर सुकन्या, विराज वृद्धाश्रमात जातात, तर मधुश्री आणि तिची मित्रमंडळी रिमांड होममध्ये. तिथल्या आपल्या या ‘विस्तारित कुटुंबीयांना’ दिवाळीचा आनंद मिळवून द्यावा म्हणून कमी आवाजाचे काही फटाके, कंदील, पणत्यांची आरास करतात आणि सोबतीला नेतात भरगच्च दिवाळी फराळ! वर्षभरातल्या या एका कृतीमुळे तिथल्या लोकांना पुढच्या  वर्षभरासाठी जगण्याची नवी ऊर्जा मिळते. आणि या सगळ्यांना नवी नाती जपल्याचा आनंद.
नातं जोपासण्याचा, नातं दृढमूल करण्याचा, नवीन नाती जोडण्याचा हा सण! कुणी नातं जोडतं इतरांशी, कुणी नातं जोडतं स्वत:च निर्माण केलेल्या विश्वाशी; कुणाला संगीताशी, तर कुणाला निसर्गाशी नातं जोडायची अनावर ओढ; तर सुजातासारखी माणसं वाचनाच्या निमित्ताने स्वत:शीच स्वत:चं असलेलं नातं अधिक दृढ करण्यात दंग!..
 दिवाळी आली की सुरू होतो असा नात्यांचा उत्सव!