विशेष : पंढरीची वाट.. : सोयरा जिवलग.. Print

गुरुवार, १४ जून २०१२
वारकरी कीर्तनपरंपरेचे आद्य प्रवर्तक म्हणून संत नामदेव प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रापासून पंजाब प्रांतापर्यंत कीर्तनाद्वारा श्री नामदेवांनी धर्माचा प्रसार केला. भविष्यकाळातही त्यांच्या भगवद्भक्तीचा खोल ठसा अनेकानेक पिढय़ांवर मुद्रित होऊन राहील इतका तो समर्थ आहे. श्री नामदेवांची वाणी स्वभावत:च मृदू आहे, प्रेमळ व अंतर्मुख वृत्तीची आहे. नामदेव वारीचे माहात्म्य भावस्पर्शी शब्दांत खालील अभंगात व्यक्त करतात.


पंढरीची वारी जयाचिये कुळी । त्याची पायधुळी लागो मज ।।१।।
तेणे त्रिभुवनी होईन सरता। नलगे पुरुषार्था मुक्तिचारी ।।२।।
नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा । क्षण जिवावेगळा न करी ।।३।।
नामा म्हणे माझा सोयरा जिवलग । सदा पांडुरंग तया जवळी ।।४।।
नामदेवांना देवाचा अखंड शेजार आहे. तरीही त्यांना वारी आणि वारकऱ्याचे विलक्षण प्रेम आहे. कारण पंढरीच्या सुखाला अंतपार नाही. पंढरीच्या सुखाचा अधिकारी तोच, ज्याला जन्मोजन्मी वारी घडली. नामदेवमहाराज म्हणतात, की वैकुंठापेक्षाही माझे पंढरपूर श्रेष्ठ आहे. वैकुंठात काय आहे? ती तर जुनाट झोपडी! पंढरी आधी आणि मग वैकुंठ नगरी! सारे काही नष्ट झाले तरी पंढरी मात्र अविनाशी राहील. कारण ती विष्णूच्या सुदर्शनचक्रावर वसली आहे. सुखाची राशी असलेली पंढरी आमची कामधेनू आहे. संतसज्जनांकरिता ती प्रेमामृताने अखंड पान्हावते आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष रूप तिचा पान्हा आणि दोहन करणारा पुंडलिक दोघेही धन्य आहेत. नामा तर भाग्यवंतच आहे, कारण त्याला दूधच नाही तर कामधेनूच्या दुधाची खीर लाभली आहे. त्यामुळे त्याला पंढरीचे फारच अप्रूप वाटते.
वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्यासाठी प्रस्थान ठेवतो, पंढरीची वाट चालू लागतो आणि पांडुरंगाचे भक्तिप्रेम त्या वाटेवर आपोआप उचंबळून येतच राहते आणि आनंदाने केलेल्या नामघोषाच्या गर्जनेत परिणत होते. सारी प्रापंचिक दु:ख आणि देहभाव वारकरी केव्हाच विसरून जातो. चतुर्विध पुरुषार्थासाठी सायास न करताच त्रिभुवनाचे पाश सुटून जातात. नामाची आवड, केशव प्रेमाचा जिव्हाळा आणि भावभक्तीचे बळ या वारीने लाभते आणि संतसत्पुरुषांचा संग सहजी प्राप्त होतो. एवढा भाग्यवान वारकरी नामदेवांचे दैवत आहे.
संत नामदेव या अभंगात म्हणतात, की माझ्या पंढरीला कुलपरंपरेने येणारा जो वारकरी आहे त्याची पायधुळी माझ्या मस्तकावर मी मोठय़ा भूषणाने धारण करतो. एवढय़ाने माझे समाधान होत नाही म्हणून मीच त्याची चरणधूळ होतो. त्या नामामृताची वैष्णवाला गोडी आहे आणि पंढरीच्या प्रेमाचा जिव्हाळा आहे म्हणून मला त्याचे प्रेम आहे. ‘ईशावास्यं इदं सर्वम्।’ असे ईशावास्य उपनिषदात म्हटल्याप्रमाणे परमात्मा या जगात जानोसा घेऊन चराचरात भरून राहिला आहे म्हणून संतांना या जगाचे अपार प्रेम आहे म्हणूनच वारकरी नामदेवांचा प्राण आहे, नव्हे तो आपल्या प्राणापेक्षाही प्रिय आहे. त्याला आपल्या जिवावेगळा करण्याची कल्पनाही नामदेवांना सहन होत नाही. त्यांचा तो सोयरा-जिवलग आहे, कारण पांडुरंग वारकरी भक्ताजवळ अहर्निश निवास करून आहे.
नामदेवांचे, संतसज्जन वारकऱ्यांचे प्रेम, नामदेव पायरीच्या रूपाने विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वारावर मूर्तिमंत विराजले आहे. संतचरण हिरे या नामदेव पायरीचे चिरे स्पर्शतात आणि मगच विठूरायाच्या दर्शनाला जातात.
डॉ. कल्याणी नामजोशी