विशेष :पंढरीची वाट.. : नामाची शिवण! Print

 

शुक्रवार, १५ जून २०१२
ज्ञानदेवांच्या समाधीनंतर संत नामदेवांच्या मनाला उदासीनता आली. त्यामुळे नाममाहात्म्य आणि हरिभक्ती प्रसार-प्रचाराच्या कार्यासाठी नामदेव महाराष्ट्राबाहेर पडले. राजस्थान, माळवा करीत थेट पंजाबात पोहोचले. ते शीखपंथीयांमध्ये विलक्षण लोकप्रिय तर होतेच, परंतु त्यांच्या अभंगांचा अंतर्भाव शिखांच्या उपासनेत असलेल्या गुरुग्रंथसाहिबात ‘नामदेवबानी’ नावाने केला आहे. नामदेवांच्या हिंदी अभंगरचनाही अतिशय मधुर आहेत.

नामदेव एका हिंदी अभंगात म्हणतात,
कहाँ करू जाती कहाँ करू पाती। राजाराम सेऊ दीनराती।।१।।
मन मेरो गंगा मन मेरो कासी। रामरमे काटू जमकी फाँसी।।२।।
सीवणा सीवणा सीऊ सीऊ। रामबिना हूँ कैसे जीऊँ।।३।।
अनंत नामका सिऊ बागा। जा सीवत जमका डर भागा।।४।।
सुरतकी सुई प्रेमका धागा। नामेका मन हरिसी लागा ।।५।।
नामदेवांना विठ्ठलाच्या अनंत नामांमध्ये विशेष आवडीचे नाव म्हणजे केशव. त्यामुळे नामदेवांनी अनेक अभंगांमध्ये आपली नाममुद्राही ‘नामा म्हणे केशवा’ अशी घेतली आहे. हिन्दी अभंगात विठ्ठलनामानेही पांडुरंगाचा उल्लेख असणारे अभंग आहेत. तसेच रामनामाचा महिमा सांगणारे अभंगही पुष्कळ आहेत.
या अभंगात नामदेवमहाराज म्हणतात की, अरे जातिपातीचा विचार कुठे करीत बसता. मीही करीत नाही. प्रभुरामचंद्रांची उपासना दिवसरात्र भक्तिभावाने करतो. माझे मन गंगा आहे. त्याला ओढ आहे ईश्वरभेटीची. सागराच्या भेटीची उत्कट आस असणारी गंगा पवित्र आहे. तसेच अविरत नामस्मरणाने निर्मल झालेले माझे मन काशी आहे. कारण या मनगंगेने रामनामजपाने या जिवाला जन्मजन्मांतरीच्या फाशीरूपी बंधनातून व यमपाशातून मुक्त केले आहे.
मी जातीचा शिंपी आहे. माझा शिलाईचा उद्योग आहे. तरीही मला पांडुरंगाला विसरून व्यवसायात रमता येत नाही. हा हरिचा बंदा पारमार्थिक शिलाईचा धंदा बढिया जमके करतो, जिथे जिथे फाटके दिसते तिथे तिथे जोडण्याचे काम करतो.
अमृताहूनही गोड असणाऱ्या विठ्ठलनामाच्या दोऱ्याने भक्तीचा कपडा शिवला की तो पक्का जोडला जातो. आपल्याला सांगतो, वस्त्र फाटून जीर्ण होईल, पण नामाची पक्की शिवण कधी उसवायची नाही, नामाचे विस्मरण कधी व्हायचे नाही. अहो! हा शिवण्याचा धंदा दिवसरात्र चालू ठेवल्याने शरीररूपी वस्त्र फाटण्याचे भय चारी वाटांनी दाही दिशांना सैरावैरा धावत सुटते. आवडीने घेतलेल्या हरिनामाची सुई आणि नामप्रेमाचा हरिनामाचा धागा घेऊन हा नामा ब्रह्मानंदाचे वस्त्र सतत शिवतो आहे. त्यामुळे नाम्याचे मन आता हरिचरणाला जोडून राहिले आहे.
अहो काय सांगू, राम आणि नाम या नाम्याचा प्राण आहे. रामनाम घेण्याने सारी पातके हडबडली-गडबडली तर चित्रगुप्ताने लेखणी टाकली, संसाराचे पाश दूर झाले आणि नामा पंढरपुरात निरंतर वास्तव्य करणारा विठ्ठलाचा किंकर झाला. साराचेही सार आणि भक्तीचे भांडार असलेल्या रामनामधारकासमोर ऋद्धी-सिद्धी हात जोडून उभ्या राहतात, तर मुक्ती लोटांगण घालत येते. माझे हे बोलणे लटके असेल तर खुशाल माझे मस्तक छेदावे.
डॉ. कल्याणी नामजोशी