विशेष :पंढरीची वाट.. : प्रवृत्ती-निवृत्तीच्या पलीकडे.. Print

 

शनिवार, १६ जून २०१२
नामदेवांनी भागवतधर्माचा आवार वाढण्यासाठी भाषाभेद सोडून अभंग रचना केली. त्यांचे मराठी वळणाचे हिंदी अभंग फार मधुर आहेत. खालील अभंग त्याचाच एक उत्तम नमुना आहे.
मन मेरे गज जिव्हा मेरी काती। माप माप काटो जमकी फासी।।१।।
कहा करू जाती कहा करू पाती। रामको नाम जपो दीन और राती।।२।।
रागबिन रागो सिवबिन सीवो। रामनाम बिन कही न जीवो।।३।।


हम तो भगति करू हरीके गुन गाऊँ। आठ प्रहर आपना खसमकू त्यागु।।४।।
सोनेकी सुई रुपेका धागा। नामाका चित्त हरसू लागा।।५।।
संत नामदेवांनी आपल्या शिलाईच्या व्यवसायातील उपयोगाला येणाऱ्या वस्तूंच्या रुपकानेच आपली नामभक्ती आणि भक्तीतली अनुभूती निवेदित केली आहे. कापड मोजण्याचे माप त्याला उर्दूत गज म्हणतात. नामदेवमहाराज म्हणतात, की माझे मन हेच मोजमाप करण्याचे साधन म्हणजे मोजपट्टी आहे. भक्तीची खोली किती हे मोजण्याची पट्टी मनच आहे. तर माझी जिव्हा मापी लावलेल्या पूर्वकर्माला कापून संपवणारी कात्री आहे. जन्मजन्मांतराला गरजेचे असणारे अनेक देहरूपी वस्त्र खूपच लांबलचक आहे, नव्हे कपडय़ाचे ठाणच आहे. मला ठाणभर कापड मापात कापून त्याची भारंभार वस्त्र शिवायची नाहीत. म्हणजे मला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचे नाहीत. याच जन्मासाठी जी देहरूपी खोळ घेऊन आलो आहे, तेवढीच पुरी आहे. आता पुन्हा खोळ शिवण्याचा प्रसंग न यावा, यासाठी मी माझे प्रारब्ध भोगून संपवणार आहे. पुढचा व त्याबरोबरच या जन्मीचे निर्माण होणारे क्रियमाण म्हणजे पुढचा जन्म घेण्यासाठीचे वस्त्र ते मात्र मी फार काटेकोरपणे बेतत आहे. म्हणजे मी अखंड नामस्मरणाने नवीन क्रियमाण भोगण्यासाठी निर्माणच करत नाही. त्यामुळे पुढचा जन्म घ्यावाच लागणार नाही.
नामदेव म्हणतात, भगवंताचे गुणानुवाद भक्तिभावाने गाणे व अहोरात्र नामस्मरण करणे हा एकच उपाय यमपाशातून मुक्त होण्यासाठी आहे आणि मी जो जातपात, सगेसोयरे, स्थावर जंगमाचा मोह सोडून अवलंबत आहे.
संत नामदेव म्हणतात, की मी सारी आसक्ती सोडून केवळ विठ्ठल चरणाची आसक्ती धरली आहे. मी अजूनही शिवणकाम सोडलेले नाही. पण आता पूर्वीसारखे प्रवृत्ती-निवृत्तीचे दोन किनार शिवून जोडायचे, उसवलेले दिसले की शिवण घालायला घ्यायची. हा उद्योग आता संपला आहे. प्रवृत्तीनिवृत्तीच्या पलीकडे गेलेला हा नाम जीवाला शिवाशी जोडण्यासाठी टाके घालतो आहे. हे टाके मीपणाला शपथपूर्वक विसरून अष्टौप्रहर घालत बसतो. ही शिलाई करणारा नामा पोलादाची सुई आणि कापसाचा धागा घेऊन शिवत नाही. तर या नामदेव शिंप्याची सुई आहे सोन्याची आणि धागा आहे रुप्याचा; त्यामुळे आता नामा अहोरात्र विठ्ठल दर्शनात सूर्याचे सुवर्णासारखे तेज आणि रुपेरी चांदण्याची शीतलता अनुभवतो आहे.
आता नामदेवाला अहर्निश हरिगुण गाणे एवढे एकच काम शिल्लक उरले आहे. ज्या नामाचा महिमा गाताना वेदशास्त्र, शेषवाणी, भीष्म-पाराशर, ब्रह्मदेव-मुचकुंद मौनावले तिथे त्या नामाचे सामथ्र्य नामा काय गाईल?
डॉ. कल्याणी नामजोशी