विशेष : वार्ता ग्रंथांची.. : ‘बिकमिंग’चं यशापयश.. Print

 

शनिवार, १६ जून २०१२

आकाश कपूर यांचं ‘इंडिया बिकमिंग’ हे पुस्तक अखेर अमेरिकेतही गाजलंच. मे महिन्यात त्यांचा अमेरिका-दौरा प्रकाशकांनी याच हेतूनं आयोजित केला होता, त्यानंतर सर्व महत्त्वाच्या अमेरिकी वृत्तपत्रांत ‘इंडिया बिकमिंग’ला चांगलं म्हणणारी परीक्षणं छापून आली. हे पुस्तक भारतात १५ मार्च रोजीच प्रकाशित झालं, त्याआधी जानेवारीपासूनच त्यांच्या प्रकाशकांनी प्रसिद्धी सुरू केली होती. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या व्यासपीठावर (जानेवारी २०१२) या आगामी पुस्तकाबद्दल खास चर्चाही झाली होती.

तरीही भारतात काही हे पुस्तक भारतात बेस्टसेलर वगैरे ठरलं नाही. यापूर्वी बेस्टसेलर ठरलेल्या ‘मॅग्झिमम सिटी’चे लेखक सुकेतू मेहता जसे परदेशातच जन्मून- शिक्षण आणि करिअरही करून मग भारतात आले, तसाच आकाश कपूर यांचा आयुष्यक्रम असूनही मेहतांना जो मान मिळाला, तो कपूर यांना नाही. भारताबद्दल आशावादी सूर लावणारं आणि भारतीय लोकांच्या जीवनसंघर्षांतल्या कहाण्या मांडणारं पुस्तक मेहता यांनी लिहिलं होतं. कपूर यांचंही पुस्तक तशाच वळणाचं आहे. पण मेहता यांच्या पुस्तकात मुंबई होती आणि कपूर यांच्या पुस्तकात दक्षिण भारत आहे. नवी वाट मेहतांनी शोधून काढली आणि मुंबईबद्दल वाचणं भारतीयांना अधिक आवडतं, यापैकी कोणतं बरं कारण खरं मानावं?