विशेष : शिवसेना-मुस्लिम लीग युतीचा इतिहास Print

 

डॉ. बशारत अहमद - सोमवार, १८ जून २०१२
(जिल्हाध्यक्ष, जनता दल (से.), उस्मानाबाद)

ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या अन्य संघटनांपेक्षा शिवसेना वेगळी ठरते, ती राजकीय यश मिळवून दबदबा निर्माण करण्याच्या तिच्या स्थानिक नेत्यांच्याही कौशल्यामुळे. या यशाची वाट खडतर होती आणि अनेक तडजोडींतून जाणारी होती. हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याआधी शिवसेनेला मुस्लिम लीगशीही तडजोड करणे वज्र्य नव्हते. एका राजकीय विरोधकाने करून दिलेले हे त्या इतिहासाचे स्मरण..


शिवसेनेचे मुंबई महापालिका, औरंगाबाद महापालिका आणि नांदेड-वाघाळा महापालिकांवर सत्तासंपादन सुरुवातीला मुस्लिम लीग आणि मुस्लिम सदस्यांच्याच पाठिंब्याने झाले, हा इतिहास कदाचित बहुतेकांच्या विस्मरणात गेला असेल. बहुतेक तरुण शिवसैनिकांना ज्ञातही नसेल; परंतु मनोहर जोशींसारखे बुजुर्ग शिवसैनिक आणि छगन भुजबळांसारखे माजी शिवसैनिक हा इतिहास गैरसोयीचा आहे म्हणून कदाचित विसरल्यासारखे भासवत असतील. बाळ ठाकरेंसारखे नेते तर हा इतिहास नाकारायलाही कमी करणार नाहीत.
१९७४-७५ साली मुंबई महापालिकेवर सर्वप्रथम शिवसेनेचा झेंडा फडकला तोच मुळी मुस्लिम लीगच्या सहकार्याने. त्या वर्षी दंगल वगैरे घडवून दोन्ही पक्षांनी आपापली व्होट बँक संघटित केली होती. त्यामुळे त्या वर्षी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला प्रथमच काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. जवळपास ७४ जागांवर शिवसेनेचे सदस्य निवडून आले होते. त्याचप्रमाणे मुस्लिम लीगला १६ जागा मिळाल्या होत्या. मुस्लिम लीगचे नेते बॅ. गुलाम मोहम्मद बनातवाला यांच्याशी संपर्क करून शिवसेनेच्या नेत्यांनी मुस्लिम लीगचा पाठिंबा मिळविण्यात यश मिळविले होते आणि सुधीर जोशी शिवसेनेचे पहिले महापौर झाले होते. त्या काळातील बाळ ठाकरेंची वक्तव्ये पाहिल्यास, त्यात ‘हिरवे साप’, ‘पाकडे’, ‘लांडे’ अशा शब्दांऐवजी ‘मुस्लिम बांधव’, ‘काही थोडे सोडल्यास बहुतेक मुसलमान राष्ट्रीय वृत्तीचेच असतात’, ‘मी मस्तान तलाव (भेंडी बाजारमधील एक मैदान) येथे मुस्लिम बांधवांच्या कार्यक्रमाला जाणार आहे’ वगैरे वाक्ये आढळून येतील. त्या वेळी उपमहापौर कोण होते हे मला नक्की आठवत नाही; परंतु मुस्लिम लीगचे पालिकेतील गटनेते ख्वाजासाहब (कदाचित त्यांचे नाव ख्वाजा निजामोद्दीन होते) जे नागपाडा भागातून निवडून आले होते. त्या काळी मी शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईतच होतो. नागपाडा नेबरहूड हाऊसमध्ये ख्वाजासाहेबांच्या सत्काराच्या निमित्ताने झालेल्या ‘मुशायरा’मध्ये हजर होतो.
औरंगाबादेतील तडजोड
औरंगाबाद नगर परिषदेची महापालिका झाल्यानंतर तेथे १९८८-८९ साली पहिली निवडणूक झाली. त्यापूर्वीदेखील १९८८ साली औरंगाबाद शहरात मोठी दंगल घडविण्यात आली आणि शिवसेनेचे व मुस्लिम लीगचे मतदान संघटित करण्यात आले. त्या वेळच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य शिवसेनेचे निवडून आले तरी त्यांना पूर्ण बहुमत मिळाले नाही. मुस्लिम लीगचे १२ सदस्य निवडून आले होते. त्यांच्या आणि काही अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्याने शिवसेनेची सत्ता महापालिकेत स्थापन झाली. मोरेश्वर सावे हे अपक्ष सदस्य औरंगाबादचे पहिले महापौर झाले. (पुढे त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांना खासदारकीचे तिकीट देण्यात आले आणि ते शिवसेनेचे औरंगाबाद मतदारसंघाचे पहिले खासदार झाले.) मुस्लिम लीगचे तकी हसन खान हे औरंगाबादचे पहिले उपमहापौर झाले.
आज तकी हसन खान काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, मृतवत असलेल्या मुस्लिम लीगचे नेतृत्व त्यांचे बंधू करतात.
नांदेडमधून जनता दल नामशेष
जेव्हा नांदेड नगर परिषद, नांदेड-वाघाळा महापालिका झाली, त्या वेळी महाराष्ट्रात युतीची सत्ता होती. नांदेड-वाघाळा महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस दोघांनाही पूर्ण बहुमत मिळाले नाही. जनता दलाचे ११ सदस्य निवडून आले. त्यापैकी दहा सदस्य मुसलमान आणि एक सदस्य शीख समाजाचा (गाडीवाले) होता. त्या निवडणुकीत जनता दलाचे जवळपास १९ उमेदवार निवडणुकीत होते. त्यापैकी १७ उमेदवार मुसलमान आणि दोन उमेदवार शीख होते. मी जनता दलाच्या प्रचारासाठी नांदेडला गेलो होतो. त्या वेळी जनता दलाचे नेते अ‍ॅड्. गंगाधर पटणे मला म्हणाले होते की, जनता दल मुस्लिम लीग झाले आहे. १९ पैकी १७ उमेदवार मुसलमान आहेत.
निवडून आलेल्या ११ सदस्यांना विश्वासात न घेताच जनता दल आणि काँग्रेसच्या वाटाघाटी चालू होत्या. अशोक चव्हाण यांनी जनता दलाच्या सदस्यांना गृहीत धरले होते की, त्यांना काँग्रेसला पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी सांगितले की, कोणते पद द्यायचे कोणते नाही हे नंतर पाहू, तुम्ही आधी काँग्रेसला पाठिंबा जाहीर करून टाका. ही गोष्ट जनता दलाच्या नगरसेवकांना मान्य नव्हती. त्याउलट शिवसेनेचे मंत्री असलेले जयप्रकाश मुंदडा यांनी थेट जनता दलाच्या नगरसेवकांशी संपर्क साधला आणि त्यांना उपमहापौरपद देऊ केले. जनता दलाच्या नगरसेवकांनी उपमहापौरपदाशिवाय स्थायी समितीचे सभापतीपद आणि एक स्वीकृत सदस्य निवडण्याची मागणी केली. जयप्रकाश मुंदडा यांनी सर्व मागण्या मान्य केल्या आणि जनता दलाच्या नगरसेवकांचा पाठिंबा मिळविला.
महापौरपद शिवसेनेकडे गेले. ज्येष्ठ कामगार नेते (ज्यांनी पहिल्यांदाच जनता दलातर्फे निवडणूक लढविली होती) नजीर बाबा पहिले उपमहापौर झाले. अब्दुल सत्तार स्थायी समितीचे सभापती झाले आणि जनता दलाचे तत्कालीन शहराध्यक्ष अ‍ॅड्. अब्दुल बारी स्वीकृत सदस्य निवडले गेले. जनता दलाने आपल्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली. आज नांदेड-वघाळा महापालिकेत जनता दलाचा एकही सदस्य नाही.
हा इतिहास शिवसेनेसाठी कितीही अस्वस्थ करणारा असला तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि विशेषत: दलित बांधवांच्या कधीही विस्मरणात जाऊ नये. आज शिवसेनेने दलितांच्या पाठिंब्याने मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिकेची सत्ता कायम राखण्यात यश मिळविले आहे, पण दलित नेतृत्वाने ही गोष्ट लक्षात ठेवावी की, शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर मुंबईमधून आणि औरंगाबादमधून मुस्लिम लीग नामशेष झाली. नांदेडमधून जनता दल नामशेष झाले. त्यांचे काय होईल त्यांनी विचार केलेला बरा.