विशेष : आनंदयोग : लायकी आणि क्षमतेचे तेज.. Print

 

भीष्मराज बाम  - बुधवार, २० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

तेज आणि उपासना या दोघांची ओढ एकच, वर जाण्याची- म्हणजे, लायकी आणि क्षमता वाढवण्याची! लायकी आणि क्षमता नसूनही सत्ता, संपत्ती, कीर्ती अभिलाषा धरणे, हा जुगार ठरतो.. तो भोवताली सुरू आहेच; पण स्वत:च्या लायकीची संपत्ती वाढवत नेणारी उदाहरणेही आजच्या काळात कमी नाहीत..
तेजाची उपासना अत्यंत श्रेष्ठ मानली गेली आहे. ती इतकी की, उपासनेने तेजाचे सूचन होते आणि तेजाने उपासनेचे. तेजाची ओढ वर जाण्याची आहे.

तशीच ओढ उपासनेचीही वर जाण्याचीच आहे. तेजाच्या या उपासनेचे अनेक पैलू आहेत. ते सारेच अभ्यासण्यासारखे आहेत. तेजाचे पहिले महत्त्वाचे कार्य म्हणजे सत्य प्रकाशात आणणे. अंधाराकडून प्रकाशाकडे ने, असत्याकडून सत्याकडे ने आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे ने, या तिन्ही प्रार्थना एकच मागणी करणाऱ्या आहेत. अंधार असत्य आणि मृत्यू या तिन्ही अभावात्मक संकल्पना सारख्याच आहेत. त्यांच्या विरोधी संकल्पना म्हणजे प्रकाशसत्य आणि अमृततत्त्व.
म्हणून तेजाच्या उपासनेतच सत्याची उपासनासुद्धा अंतर्भूत आहेच. उपनिषदात सत्यकाम जाबालाचे प्रकरण आहे. सत्यकाम हा जाबाली या वारांगनेचा मुलगा. त्याला आपल्या बापाचे नावही माहीत नव्हते. मग गोत्र म्हणजे कुलपरंपरा कोठून माहीत असणार? ब्रह्मविद्या शिकण्यासाठी तो हारिद्रुमत गौतम ऋषींकडे गेला. त्यांनी गोत्र विचारल्यावर त्याने आपल्याला आणि आपल्या आईलाही गोत्र माहीत नसल्याचे स्पष्ट सांगितले. त्याच्या सत्यावरच्या अशा अत्यंत कठोर निष्ठेने प्रभावित झालेल्या गौतम ऋषींनी त्याचा शिष्य म्हणून स्वीकार केला. त्याला गायी घेऊन वनात जायला सांगितले. त्याने उपासनेच्याच निष्ठेने गायींची सेवा केली. त्या अखंड उपासनेने ब्रह्म त्याच्यापुढे आपल्या सर्व कलांनिशी प्रगट झाले, तेही अग्नी आणि पशुपक्षी यांच्या मुखातून! आश्रमात परत आल्यावर गुरूंच्या मुखातून ब्रह्मविद्येचे स्पष्टीकरण ऐकल्यावर त्याच्या ध्यानात आले की, वनात झालेले ज्ञानच परत सांगितले गेले होते. त्यात नवीन भर कशाचीच पडलेली नव्हती.
प्रत्येकाने आपले काम उत्तम आणि चोख करणे, त्यासाठी आपल्या श्रमांचे योग्य तेवढेच मोल घेणे, ही सत्याची उपासना आहे. पीक काढणारा शेतकरी, वस्तूंची कारखान्यात निर्मिती करणारा उद्योगपती आणि आपल्यापर्यंत त्या आणून पोहोचवणारा व्यापारी यांनी आपापल्या श्रमांचे मोल घ्यायचेच असते. अवाच्या सव्वा किंमत लावून ग्राहकांना लुबाडायचे नसते. शासनानेही प्रजेचा विचार करूनच कर लावायचे असतात आणि बदल्यात प्रजेला न्याय आणि सुरक्षा देण्याचे काम करायचे. हे जर सर्वानी केले तर समाजच समृद्ध होत जातो. समाज समृद्ध होत नसला तर कोणाचीही वैयक्तिक समृद्धी ही कॅन्सरची विनाशक वाढ आहे.
भरमसाट फायदा मिळवणे; सत्तेचा, अधिकाराचा दुरुपयोग करून पैसा कमावणे; त्यासाठी इतरांची पिळवणूक करणे ही सारी रोगट प्रवृत्तीचीच लक्षणे आहेत. श्रम न करता हातात आलेली संपत्ती हा तर मृत्यूचा पाश आहे, कारण ती माणसाला आळशी, अहंकारी आणि निष्क्रिय बनवते. पुढच्या  पिढीसाठी फक्त आपले नाव मागे सोडायचे असते आणि त्यांना वारसा द्यायचा तो त्याहून मोठे नाव कमावण्याच्या ईर्षेचा; ज्ञान आणि कौशल्य वाढते ठेवून स्वत:ची लायकी प्रस्थापित करण्याचा! कारण हीच खरी संपत्ती असते. मीराबाईने रामरतन धनाचे वर्णन केले आहे.
खर्चे न फूटे चोर न लूटे
दिनदिन बढत सवायो।
अशीच स्वत:च्या लायकीची संपत्ती आहे. ती वाढती राहण्यासाठी अखंड उपासनेची गरज आहे.
वयाला ८० वर्षे पूर्ण झाली म्हणजे सहस्रचंद्र दर्शनाचा सोहळा केला जातो. तेवढय़ा वर्षांत अधिक मासाचे महिने धरून एक हजार महिने होतात. प्रत्येक महिन्यात मागच्या अमावास्येनंतर नवा चंद्र उगवतो. असे चंद्राचे दर्शन ज्याला हजार वेळा झाले त्याला आपण वंदन करायचे असते, कारण त्याच्या आशीर्वादात आपल्याला दीर्घायुष्य देण्याची शक्ती असते. अशा आशीर्वादावर अधिकार सांगणारा त्याचा मुलानातवंडापतवंडांचा परिवारसुद्धा खूप विस्तारलेला असतो. त्यानेही आशीर्वादाची शक्ती आणखी वाढते, कारण इतरांचे अभीष्टचिंतन राहण्याने त्यांना फायदा तर होतोच, पण तुमचीही शक्ती वाढत जाते.
पण काही व्यक्ती अशा असतात की, त्यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याला आमंत्रण नसले तरी आपण आवर्जून जायचे असते. पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले, बाबा आमटे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांसारख्या व्यक्तींचे कार्य इतके मोठे आणि चांगले असते की, चंद्र त्यांचे दर्शन घ्यायला आसुसलेला असतो. चंद्र आणि सूर्य हे परमेश्वराचे दोन डोळे आहेत. त्यांनी तो सतत संपूर्ण विश्वाच्या पसाऱ्याचे निरीक्षण करीत असतो. त्याचे लक्ष उत्तम कार्य करून ही थोर माणसे सारखे वेधून घेत असतात. भोवताली चाललेल्या घृणास्पद वादांमुळे त्यांच्या सहस्रचंद्रदर्शनाला वेगळाच अर्थ येतो.
लायकी नसताना सत्ता, संपत्ती, कीर्ती यांची अभिलाषा धरणे म्हणजे जुगार आहे. जुगारात मिळणारे यश हे कधीच टिकणारे नसते, कारण तो यमाचा पाश आहे. ज्याचा नाश करायचा असेल त्याला ईश्वर अशा जुगारात यश देतो. कौरवांनी जुगारात पांडवांचे राज्य जिंकून घेतले, पण ते टिकवण्याची लायकी कमाविली नाही. त्यामुळे अजेय योद्धे व दीडपट सैन्य असूनही त्यांचा पराभव आणि नाश झाला.
यश हा मार्गातला फक्त एक टप्पा आहे. ते मिळाल्याने किंवा न मिळाल्याने जीवनयात्रा संपत नसते. नवी शिखरे आणि नवी क्षितिजे आपल्याला खुणवायला लागतात. मार्गावरची वाटचाल हाच आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा भाग आहे. ही वाटचाल म्हणजेच तप आणि उपासना. त्यांचा कंटाळा करून प्रगती होणेच शक्य नाही. त्यांच्यामध्येच उत्साह वाढत राहिला आणि तो टिकून राहिला तर जगण्यातला खरा आनंद आपल्याला मिळतो. तोच मिळवायचा असतो.