आनंदयोग : प्रसन्न वास्तुदेवता.. Print

 

भीष्मराज बाम ,बुधवार, २७ जून २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अंगण, खेळती हवा, स्वच्छ पाणी,  चंद्र-सूर्याची किरणे आणि प्रकाश भरपूर येईल इतपत मोकळय़ा दिशा.. अशा वास्तुदेवता प्रसन्न असल्यास आपणही कार्यप्रवण होतो.. पुढल्या यशासाठी मात्र आपले प्रयत्नच ८० टक्के कारणीभूत असतात..


पुष्कळ वर्षांनंतर माझ्या जुन्या वर्गमित्राच्या घरी जाण्याचा योग आला. घरात इतके बदल झालेले होते की मला ते ओळखूच येईना. मी तसे म्हटल्यावर मित्राने सांगितले की, वडील गेल्यावर व्यवसाय नीटसा चालत नव्हता म्हणून वास्तुशास्त्रज्ञाच्या सल्ल्याने घराचा बराचसा भाग पाडून परत बांधून काढला होता. आणखी थोडे बदल करायची आवश्यकता होती, पण पत्नी ते करू द्यायला तयार नव्हती. तिला धुळीची अ‍ॅलर्जी असल्याने फार त्रास होई. माझा सल्ला विचारल्यावर अगदी जुजबी बदल करावेत आणि तेही फारच गरज असली तर, असे मी म्हटले. मित्राच्या पत्नीला ते अर्थातच पटले, पण मित्राला मात्र नाही.
भारतात वास्तुशास्त्राचा बराच विचार झालेला आहे. आठ वसू म्हणजे वसतिस्थानाच्या देवता मानलेल्या आहेत. ‘धरा’ म्हणजे खडबडीत नसलेली टणक जमीन. या स्थिर असलेल्या आणि वस्तूंना आकार आणि आधार देणाऱ्या पृथ्वीतत्त्वापासूनच भिंती आणि छत ही दोन्ही बनतात. ‘आप’ ही देवता म्हणजे स्वच्छ पाण्याचा साठा आणि पुरवठा. ‘ध्रुव’ म्हणजे दिशांचे सूचन. आपले घर नक्की कोठे आहे, त्याच्या आसपास कोणत्या खाणाखुणा आहेत, घरापर्यंत पोहोचायचे कसे, हे सारे आपल्याला पक्के ठाऊक असायला हवे आणि येणाऱ्या पाहुण्यांना ते समजावून सांगता यायला हवे. नाहीतर गोंधळ उडतो. ध्रुव म्हणजे उत्तर दिशा. नकाशातसुद्धा हीच आधी पक्की करतात आणि त्यावरूनच इतर दिशा ओळखता येतात.
‘अनिल’ म्हणजे शुद्ध मोकळा वारा. हा घरात प्राणवायू आणतो आणि त्यामुळे सर्वाचे आरोग्य चांगले राहते. आपल्याला उजेडाचीपण गरज असते. सरळ येणारे उन्ह आपल्याला सहन होत नाही. त्यामुळे हवेतल्या असंख्य धुलीकणांवरून परावर्तित होणारा प्रकाश आपल्या घरात येईल, अशी व्यवस्था करायची असते. हा प्रकाश म्हणजे ‘प्रभास’ ही वास्तुदेवता. अनिल आणि प्रभास या वास्तुदेवतांचे योग्य स्वागत होईल, अशा प्रकारे दारे-खिडक्या बसवायच्या असतात. म्हणजे घरात भरपूर उजेड आणि मोकळी हवा खेळती राहते.
तेजाशीच  संबंधित अशी आणखी एक वास्तुदेवता म्हणजे ‘प्रत्यूष’. याचा अर्थ उषादर्शन. सूर्योदयापूर्वी पसरत असणाऱ्या प्रकाशात भोवतालच्या साऱ्या वस्तू आपापले रंग आणि आकार प्रकट करीत असतात. या प्रकाशाचे म्हणजेच उषादेवीचे ध्यान करायचे असते. हे ध्यान आपल्या शरीर यंत्रणेचे घडय़ाळ, येत्या चोवीस तासांसाठी लावून देत असते. त्याच्यामुळे आपला उत्साह दिवसभर टिकतो. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना ‘प्रत्यूष’ देवतेची फार ओढ होती. ते न चुकता पहाटे उठून आसमंत निरखत असत. कोणीतरी त्यांना विचारले, ‘‘इतक्या लवकर उठून तुम्ही काय करता?’’ त्यांनी शांतपणे उत्तर दिले, ‘‘पहाट पाहतो.’’
‘सोम’ ही वास्तुदेवता अलीकडे दुर्मिळ व्हायला लागली आहे. सोम म्हणजे चंद्रदेवता, ज्यावर प्रसन्न आहे, असे अंगण. उत्तम वाढणाऱ्या वनस्पती म्हणजे चंद्राचा प्रसाद मानला जातो. चंद्र प्रसन्न असला तर आपण अंगणात लावलेली फुलझाडे आणि फळझाडे चांगली वाढतात, त्यांना पाने, फुले, फळे छान येतात आणि अंगणच नव्हे तर सारे घरच सुशोभित होते. हल्ली जागेच्या अभावामुळे अंगण फारसे कुठे दिसेनासे झाले आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी गावात उपवने आणि उद्याने लावायची असतात. चंद्र ही हृदयाची देवता आहे. तिच्याच कृपेमुळे माणसात परस्परांत प्रेमभावना वाढते आणि तिचा कोप झाला तर माणसांतली तेढ वाढते आणि लक्ष्मी त्यांचा त्याग करते. म्हणून तर प्रेमाच्या आणाभाका चंद्राला साक्षी ठेवून घेतल्या जातात. चांदणे आणि फुललेली बाग आपल्या वाटय़ाला आली नाही तर आपले आयुष्य शुष्क होऊन जाते.
सर्व वास्तुदेवतांत प्रधान मानली गेलेली देवता म्हणजे आपली संहारक शक्ती आवरून धरून आपल्या घरी राहणारा अग्नी. याला ‘पावक’ असे नाव आहे. तो आपले अन्न शिजवून ते सहज पचेल असे करतो. सूर्य मावळल्यावर आपल्याला हवा तेवढा प्रकाश देतो. ही परमेश्वराचीच विभूती आहे. गीतेत सांगितले आहे, ‘‘वसूनां पावकश्चास्मि’ (सर्व वसू देवतांमध्ये मी गृहस्वामी अग्नी आहे). कोणाहीविरुद्ध शत्रुबुद्धी न धरता सर्वाशी समान वागण्याची शक्ती या पावक अग्नीकडे मागायची असते. कारण आपल्या जवळ असलेल्या माणसांचे दोष आपल्याला प्रकर्षांने जाणवतात. मग त्यांच्या वागण्याचा संताप यायला लागतो. ती माणसे आपले शत्रूच आहेत, अशी भावना निर्माण होते. हीच शत्रुबुद्धी. ही आपल्या घरादाराची राखरांगोळी करते. आपल्याला सहजच लाभलेल्या माणसांवरच आपण प्रेम करू शकलो नाही तर इतरांशी आम्ही चांगले कसे वागणार? शत्रुबुद्धी नाहीशी झाली म्हणजे आपल्या कुटुंबाचे भाग्य फळफळते आणि आपला परिवार खूप मोठा होतो. जितका मोठा परिवार असेल तितकी इतरांचे भले करण्याची शक्ती वाढते आणि समाजाचेही कल्याण होऊ शकते.
या साऱ्या वास्तुदेवता आपल्यावर प्रसन्न असल्या म्हणजे आपले आरोग्य आणि उत्तम कार्य करण्याचा उत्साह यांचा प्रसाद आपल्याला मिळतो. आता उत्तम कार्य करण्यात दैवाचा एक भाग असतो, हे एकदम मान्य. ते अनुकूल असावे, ही इच्छासुद्धा नैसर्गिकच आहे, पण आपली इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि प्रयत्न यांचाही उत्तम कार्यात यश मिळण्यात फार मोठा वाटा असतो. या गोष्टींकडे दुर्लक्ष करून केवळ दैवाने मिळणारे यश फारच घातक ठरते. कारण त्याने आपल्या सक्षमतेबद्दल आपलाच गैरसमज होऊन अहंकार वाढीला लागतो. दैवाने आलेले यश कधीच टिकाऊ नसते.
आयुष्य म्हणजे यश आणि अपयश यांची साखळी असते. ही आपल्या प्रयत्नांनी येत असते. आपली क्षमता वाढविण्याचे तप आणि अथक प्रयत्न करीत राहायला हवे म्हणजे मग यशाच्या पुनरावृत्तीची शक्यता वाढत जाते. गीतेतच सांगितले आहे, ‘दैवं चैवात्र पंचमम्’ पाचवाच हिस्सा दैवाचा आहे. तो अनुकूल असला तरीही यशाची खात्री २० टक्केच असते. त्या २० टक्क्य़ांपेक्षा उरलेले ८० टक्के जास्त महत्त्वाचे आहेत, हे साधे गणित जर समजले नाही तर आयुष्याचे गणित चुकणारच!
दैव संपूर्णपणे अनुकूल किंवा प्रतिकूल नसते. अपयश पुन:पुन्हा यायला लागले म्हणजेच दैवच विरुद्ध आहे, असे वाटते. अशा वेळीच प्रयत्नांचा दर्जा वाढविण्याची गरज असते. प्रयत्न निर्धाराने उत्तम केले म्हणजे मग नशिबाचे फासेही अनुकूल पडायला लागतात. ते अनुकूल होतील तेव्हा होतील. आपल्या हातातले ८० टक्के का म्हणून सोडायचे? हा विचार मनात रुजवू शकणारेच अजिंक्यवीर होतात. त्यांच्या आयुष्याचे गणित चुकत नाही कधी!