विशेष : ‘नोराची सोबत’ संपली! Print

 

शक्ती साळगावकर - सोमवार, २ जुलै २०१२

हॉलिवुडची पटकथाकार-दिग्दर्शक नोरा एफ्रॉन  २८ जून रोजी निवर्तली. तिच्या सिनेमांमधून  आणि तिच्याबद्दल वाचण्यातून मिळणारी तिची सोबत  आजच्या भारतीय तरुणींनाही महत्त्वाची वाटत होती..
न्यूयॉर्कमधल्या एका कॅफेत बसून कॅथलिन केली (मेग रायन) आपल्या बॉयफ्रेंडबरोबर अत्यंत मॅच्युअर तऱ्हेने त्यांच्या नात्यातली गोडी संपल्याचं सांगते तेव्हा तो अत्यंत सहजपणे तिला विचारतो, ‘इज देअर समबडी एल्स?’ आणि ती तितक्याच सहजतेने म्हणते, ‘नो, बट देअर इज होप’. 

ही सहजता, नोरा एफ्रॉन हिच्या ‘यू’व्ह गॉट मेल’ चित्रपटात दिसते. ही सहजता एफ्रॉनच्या लिखाणाची खासियतच होती.. मग ती कादंबरी असो किंवा चित्रपटाची पटकथा असो.  तिच्या या कौशल्याचे श्रेय तिच्या पटकथा लेखक आई-वडिलांना, विशेषत: आईला जाते; जिने नोरा लहान असताना सांगितलं की, आयुष्यात सगळ्याच गोष्टी लिहून ठेवाव्यात ‘बिकॉज एव्हरीथ्िंाग इज कॉपी’. आणि तिच्या आईचा शब्द नोराने असा पाळला की, पत्रकारितेत, कादंबरी लेखनात आणि चित्रपट लेखनात तिने एका ‘हटके’ शैलीत, आजूबाजूच्या परिस्थितीचं तीक्ष्ण निरीक्षण केलं.
नोरा ही चार बहिणींत थोरली. तिच्या कॉलेजमधल्या पत्रव्यवहारावरून, तिच्या आई-वडिलांनी तिच्यावरच एक पात्र त्यांच्या  ‘टेक हर शी’झ माईन’ या सिनेमात लिहून टाकलं. वेलस्ली कॉलेजमध्ये पत्रकारितेचा अभ्यास करून, नोराने न्यूयॉर्कमध्ये आपल्या कारकीर्दीची सुरुवात वर्तमानपत्रांचा संप सुरू असताना ‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या लेखांच्या शैलीची उपरोधिक नक्कल करता करता सुरू केली.
तो काळ पत्रकारितेत नावीन्याच्या लाटेचा होता आणि स्वत:च्या भाषेत, लेखक स्वत:च्या अनुभवांवर लेख लिहू लागले होते. नोराने ‘अ फ्यू वर्ड्स अबाउट ब्रेस्ट्स’ या लेखाने खळबळ उडवली. परंतु ही फक्त सुरुवात होती. शब्दांच्या माध्यमातून नोराने विनोद आणि स्वानुभवाचा आधार घेऊन एक पत्रकार, कादंबरीकार, नाटककार आणि अगदी परवापरवा एक ब्लॉगर म्हणून कीर्ती कमावली.
शोधपत्रकार कार्ल बर्नस्टीन हा नोराचा दुसरा नवरा. राष्ट्राध्यक्ष निक्सन यांना १९७२ मध्ये पदच्युत करणारं वॉटरगेट प्रकरण ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे बॉब वूडवर्डसोबत या बर्नस्टीननं उजेडात आणलं. त्यावर आधारित ‘ऑल द प्रेसिडेन्ट्स मेन’ या  चित्रपटाची पटकथा कार्ल आणि बॉबच्या मनासारखी नव्हती आणि तेव्हा नोराने ही पटकथा त्यांच्याबरोबर पुन्हा लिहिली. शेवटी ती पटकथा वापरली गेली नसली तरी नोराला त्यानंतर टीव्हीसाठी लिहिण्याची संधी मिळाली. दरम्यान, गरोदर असताना जेव्हा तिला आपल्या पतीच्या प्रेमप्रकरणांबद्दल कळले, तेव्हा दोन्ही मुलांना घेऊन ती बाहेर तर पडलीच, पण जॅक निकल्सन आणि मेरील स्ट्रीपला घेऊन, तिने या प्रकरणाबद्दल एक सिनेमाच लिहून टाकला (हार्टबर्न). ज्या माणसाने अमेरिकेच्या राष्ट्रपतीला व्हाइट हाऊसमधून बाहेर काढले त्याला शब्दांच्या धारेवर नोराने अक्षरश: नमवले. कोर्टात जाण्याची धमकीही कार्लने दिली होती.
१९८९ साली रॉब रायनर दिग्दíशत ‘व्हेन हॅरी मेट सॅली’ या  चित्रपटाच्या अफाट यशाने नोराचे नाव पटकथालेखिका म्हणून गाजविले. एक पुरुष आणि स्त्री कधीच मित्र-मत्रीण राहू शकत नाहीत, असे म्हणणाऱ्या हॅरीला सॅली भेटते आणि दोघेही बऱ्याच वेळा भेटून मत्रीच्या नात्यातून एकमेकांच्या बारीकसारीक गोष्टींच्या प्रेमात पडतात. याच चित्रपटात, दोघं बाहेर जेवायला गेले असताना ‘बायका कामतृप्तीचं नाटक करतात’ हे सॅली टेबलावर हात आपटून साभिनय दाखवू लागते! दोन मिनिटे प्रेक्षकांना धक्का बसतो आणि एफ्रॉन आपल्या शैलीने लगेच त्यांना हसवते. एक म्हातारी बाई सॅलीकडे बोट दाखवून म्हणते, ‘आय विल हॅव व्हॉट शी इज हॅविंग’.  या  चित्रपटाची कथा आणि पटकथा प्रत्येक प्रेक्षकाला अगदी खरी आणि जवळची वाटते. आजही मुली हा सिनेमा आवडीने पाहतात, सॅलीबरोबर हसतात, रडतात आणि स्वत:ला, आपला हॅरी कधी मिळेल असं विचारतात. नोराचं लिखाण भिडतं, ते असं.
आपल्या आई-वडिलांची लेखक म्हणून हॉलीवूडमध्ये झालेली घुसमट आणि त्यातून वाढलेलं त्यांचं पिण्याचं व्यसन, हे नोरा जाणून होती. बायकांसाठी, बायकांनी बनविलेला सिनेमा जवळपास नसल्यातच जमा होता. आपण हे बदलायचं, म्हणून नोराने दिग्दíशका व्हायचं ठरवलं आणि तिने तिचा पहिला चित्रपट बनवला : ‘धिस इज माय लाइफ’. तो आपटला. पण तिने दुसऱ्या चित्रपटात- ‘स्लीपलेस इन सिअ‍ॅटल’मध्ये टॉम हॅन्क्स आणि मेग रायन ही जोडी घेतली. ‘..सिअ‍ॅटल’मध्ये नायक आणि नायिका एकमेकांना शेवटपर्यंत भेटत नाहीत, मात्र त्यांच्यातलं हळुवार प्रेम दयात घर करून जातं. ‘अ‍ॅन अफेअर टु रिमेम्बर’ (१९५७) हा चित्रपट नोराच्या आईने तिला लहानपणी दाखवला होता. तो संपल्यावर डोळे पुसतच नोरा त्यातल्या हीरोला- केरी ग्रांटला भेटली आणि ‘मी पाहिलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे’ असं त्याला सांगून टाकलं.. ‘स्लीप्लेस इन सिअ‍ॅटल’मध्ये  या जुन्या चित्रपटाचीच एक महत्त्वाची भूमिका होती. सिनेमा हिट झाला.
‘तीन लग्नं करूनही प्रेमावर आपला विश्वास कसा?’ असा प्रश्न एका मुलाखतीत (रोलिंग स्टोन मॅगेझीन, १९९३) येताच नोरा म्हणाली, ‘विश्वास नसता तर मी ही इतकी लग्नं केली असती का?’ ‘बायकांना तुम्ही तुमच्याच आयुष्याची नायिका व्हा’, असे सांगणारी नोरा ही स्वत:चं आयुष्य असंच जगत होती. निकोलस पिलेग्गी या पत्रकार-पटलेखकात तिला तिचा नायक मिळाला.. हे लग्न २० हून अधिक र्वष टिकलं.
प्रेमावरचा तिचा विश्वास व्यर्थ नव्हता.
नोरा एफ्रॉनचे सिनेमे पाहून जगभरच्या मुलींनी प्रेमाची स्वप्नं बघितली. आपला प्रियकर कसा असावा, प्रेम वास्तवात कसं फुलतं, अशा गोष्टी मला तरी नोराच्या सिनेमातूनच उमगल्या. काळ बदलला, ई-मेल- इंटरनेट सुरू झालं, तेव्हा ‘स्लीपलेस इन सिअ‍ॅटल’च्या हिट जोडप्याला (हॅन्क्स आणि रायन)- घेऊन तिने ‘यू’व्ह गोट मेल’ हा चित्रपट बनवला. ‘शॉप अराऊंड द कॉर्नर’ या कादंबरीवर आधारलेल्या या चित्रपटात एकमेकांचा दु:स्वास करणारी दोघं, संगणकापुढे मात्र मनातल्या गोष्टी बोलतात आणि प्रत्यक्ष न भेटताच एकमेकांच्या मनात घर करतात. या सिनेमात नोराने न्यूयॉर्क शहरालाही भूमिका दिलीय.. छोटी दुकानं बंद होऊन मोठ्ठी डिपार्टमेंटल स्टोअर्स शहरात येताहेत हा विषय या कथेच्या पाश्र्वभूमीत आहे. मी जेव्हा पहिल्यांदा न्यूयॉर्कला गेले, तेव्हा नोराच्या सिनेमांमधली वेगवेगळी दृश्यं आठवली आणि चक्क डीव्हीडी पुन्हा भाडय़ानं मागवून मी ‘यू’व्ह गोट मेल’ परत पहिला.
 त्याच वर्षी नोराने तिचा शेवटचा चित्रपट दिग्दíशत केला, तिच्या आवडीच्या विषयावर- खाणं आणि खिलवणं. ‘ज्यूली अँड ज्युलिया’मध्ये ज्युलिया चाईल्ड या नामांकित पाकतज्ज्ञ आणि लेखिकेचा उमेदीचा काळ हे एक कथानक, तर चाईल्डच्या फ्रेंच पाककलेच्या पुस्तकाने प्रभावित झालेल्या एका ब्लॉगलेखिकेनं सुरू केलेला स्वत:च्या उपजत गुणांचा शोध हे दुसरे कथानक. दोन्ही कथानके एकमेकांपासून काही दशकांच्या अंतरावरली, तरीही कितीतरी पातळ्यांवर समांतर होती.
प्रेक्षक/वाचक म्हणून नाही, परंतु एक लेखिका म्हणून मी नोराच्या लेखनाकडे पाहिले तेव्हा माझ्या लक्षात आले की स्त्रीसाहित्य आणि चित्रपट यांच्यावर नोराचा प्रभाव किती खोलवर आहे. पुरुषाने बनविलेले रोमँटिक चित्रपट पाहून ढसढसा रडणाऱ्या बायकांना हसतखेळत प्रेमकथा सांगणारी नोरा ही माझी हीरोइन बनून गेली. गुरुवारच्या सकाळीच ट्विटरवर तिच्या मृत्यूची बातमी वाचली. तिने लिहिलेली पुस्तके, लेख, नाटके, सिनेमे आणि ब्लॉग अजरामर असले तरीही, एक रोल मॉडेल हरपली असे वाटते.