आनंदयोग : जोडी हमारी.. Print

भीष्मराज बाम, बुधवार, ४ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
जगातल्या सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक असणारा लिअ‍ॅण्डर पेस त्याच्याबरोबर दुहेरीची जोडी जमवायला भारतातले इतर तिन्ही श्रेष्ठ खेळाडू तयार नाहीत, असे का व्हावे याचा त्याने गंभीरपणे विचार करायला हवा..
माझ्या लहानपणी आमच्याकडे रिंग टेनिस नावाचा एक खेळ खूप लोकप्रिय होता. आमच्या हनुमान व्यायामशाळेत तो खेळ सुरू करायचा असे ठरले तेव्हा आम्ही सर्वानी डोक्यावरून टोपल्यांनी माती वाहिली आणि ग्राऊंडवर रोलरसुद्धा फिरवला. खेळण्याचा उत्साह एवढा होता की अंधार पडून रिंग दिसेनाशी होईपर्यंत खेळ चालूच राही. त्या वेळचे त्या राज्यातले सर्वोत्तम खेळाडू येऊन आमच्याशी खेळले तेव्हा चांगला खेळ काय असतो त्याची आम्हाला कल्पना आली.
क्रीडा मानसशास्त्राचा हा नियम आहे. ज्यावेळेला खेळात सुधारणा करण्याच्या दृष्टीने खेळाडूंचा एखादा गट नियमितपणे एकमेकांबरोबर खेळत राहातो, त्यावेळेला त्या साऱ्याच खेळाडूंच्या खेळाचा दर्जा हा वाढतच जातो. आठदहा वर्षे एकत्र खेळत राहण्याने आम्ही सर्वजण चांगलेच खेळायला लागलो. आमच्यातले तीनचारजण इतके उत्कृष्ट खेळायला लागले की राज्यातले अजिंक्यपदही त्यांनी खेचून आणले. पुढे त्यातले दोघे राष्ट्रीय स्पर्धेतही अजिंक्यवीर ठरले.
मी पण बऱ्यापैकी खेळत असे. पण माझ्या संयोजनाच्या उत्साहामुळे मी क्लबचा चिटणीस झालो. उत्तम खेळणाऱ्या काही खेळाडूंना घेऊन आम्ही निवड समिती तयार केली होती. खेळाडूंची आपसांतली भांडणे सोडवण्याचा तेव्हाचा अनुभव पुढे क्रीडा संयोजनात कामी आला. पुढे जाणाऱ्या खेळाडूला अडचणी आणून, अपमानीत करून, मागे खेचण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी मंडळी करीत असत. तेव्हा सामना सुरू होण्यापूर्वीच खेळाडूंशी बातचीत करून त्यांचे मनोधैर्य उंचावण्याचा खटाटोप मी करीत असे. क्रीडा मानसशास्त्राच्या आवडीचा पायासुद्धा तेव्हाच घातला गेला असावा.
पहिल्यापासूनच काही मुली आमच्याबरोबर खेळत असत. सतत सरावामुळे त्यांचाही खेळ उत्तम व्हायला लागला. त्यांच्यापैकी सुद्धा दोघींनी राष्ट्रीय अजिंक्यपदापर्यंत प्रगती केली. तारुण्याची झुळूक लागल्यावर त्या मुलींवरूनही भांडणे सुरू झाली आणि माझी डोकेदुखी अर्थातच वाढली. व्यायामशाळेच्या आणि घरच्याही शिस्तीमुळे एकत्र खेळणे आणि क्वचित प्रसंगी एकमेकांबरोबर गप्पा मारणे यापलीकडे मजल जाऊ शकत नसे. तरीही काही जोडय़ा जमल्या आणि पुढे त्यांचे विवाहसुद्धा झाले. आता आजोबा-आजी झाल्यावरसुद्धा एकमेकांची थट्टा होते.
आमचे खेळाडू स्पर्धा जिंकायला लागल्यावर तर भांडणे आणि माझी डोकेदुखी आणखीनच वाढली. एकेरीमध्ये कोणी कोणत्या जागी खेळायचे आणि दुहेरीमध्ये जोडय़ा कोणत्या त्यावरून भांडणे होत. मिश्र दुहेरी प्रकारांत ही डोकेदुखी जास्त वाढली. मला अर्थात दोन उत्तम खेळाडूंची जोडी जमली म्हणजे ती अजिंक्य ठरू शकेल असे वाटे आणि मी त्या खटपटीत असे. पण चिटणीसपदाच्या माझ्या शेवटच्या वर्षांत माझा हा अंदाज एका जोडीने अगदी खोटा ठरवला. मिश्र दुहेरीमध्ये एका चांगल्या खेळाडूने दुसऱ्या तितक्याच चांगल्या खेळाडूसोबत प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये खेळावे आणि तिचे अजिंक्यपद खेचून आणावे असा माझा आग्रह होता. बहिष्कार टाकण्याची धमकी देऊन त्या खेळाडूने आपल्या मैत्रिणीसोबत खेळण्याचा आपला हट्ट पुरा केला. आमचे सारे अंदाज चुकीचे ठरवत त्या जोडीने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. नोकरीसाठी मी हैद्राबाद सोडायच्या आधीच त्या दोघांचा विवाह साजरा झाला.
पुढे क्रीडा मानसशास्त्राचा अभ्यास करायला लागल्यावर मला दुहेरी स्पर्धा उत्तम खेळायचे रहस्य उलगडल्यासारखे वाटले. पेस आणि भूपतीसारखे काही खेळाडू दुहेरीचा खेळ जास्त चांगला खेळतात. दुहेरीचा खेळ काय आणि सांघिक खेळ काय मैदानावर खेळत असलेल्या संघाला अतिशय सुसूत्र विचार करता यायला हवा. संघाचा एक वेगळा मेंदूच तयार होता आणि साऱ्या खेळाडूंच्या हालचाली इतक्या सूत्रबद्ध होतात की ते सारे एका शरीराचे अवयवच आहेत. धावत जाऊन एखादी वस्तू उचलताना आपल्या मेंदूकडून शरीराच्या निरनिराळ्या भागांना विशिष्ट हालचाली करण्याचे आदेश जात असतात आणि ते ताबडतोब अमलातदेखील आणले जातात. ही एका प्रकारची सामूहिक सिद्धीच असते. ती आपल्यामध्ये रुजवायची पात्रता एखाद्या जोडीने किंवा संघाने आत्मसात केली की मग त्यांना हरवता येणे अतिशय कठीण होऊन जाते.
पण एखादी व्याधी असली, मन उद्विग्न असले, क्रोध किंवा मोह अशा एखाद्या नकारात्मक भावनेची पकड मनावर असली तर मेंदूच नीट काम करेनासा होतो. बरोबर हालचाली कोणत्या करायला हव्या ते सुचतच नाही आणि सुचले तरी शरीराचे अवयव त्या हालचाली अचूकतेने पार पाडू शकत नाहीत. महत्त्वाचा सामना खेळताना खेळाडूवर चांगलेच दडपण असते. त्याच्या चुका होतात, अनेक गोष्टी मनाविरुद्ध घडत राहातात. भय, शोक, संताप अशा भावना मनावर पकड बसवतात. मग त्याचे प्रतिसाद चुकत राहातात, उत्साह नाहीसा होतो आणि कामगिरीचा दर्जाच  घसरतो. अशा वेळी साथीदाराचा आश्वासक स्पर्श किंवा शब्द त्याला भानावर आणायला आणि परत आपले कौशल्य उत्कृष्ट रीतीने प्रगट करायला मदत करतात.
आता एखाद्या खेळाडूूचा चेहराच बघायला नकोसा वाटत असेल तर त्याचा स्पर्श सहन होत नाही आणि शब्द अगदी विरोधी परिणाम करतात. आपल्याविरुद्ध खेळत असणाऱ्या खेळाडूबद्दलही द्वेषाची, संतापाची भावना निर्माण होऊ द्यायची नसते. काही वेळा विरुद्ध बाजूकडून मुद्दाम डिवचण्याचा प्रयत्न होत असतो. क्रिकेटमध्ये टोमणे मारून विरुद्ध बाजूच्या फलंदाजाला डिवचायचा प्रयत्न करायची अत्यंत घाणेरडी पद्धत रूढ झालेली आहे. पण त्याने भडकून जाऊन आपला मूड न घालवता शांत राहायला प्रत्येक फलंदाजाला शिकावे लागते.
टेनिसच्या खेळात दुहेरीमध्ये लिअ‍ॅण्डर पेस, महेश भूपती ही जगातल्या सर्व श्रेष्ठ जोडय़ांपैकी एक आहे. मैदानाबाहेरच्या अनेक कारणांनी ही जोडी फुटली आणि दोघांचे मतभेद इतके विकोपाला गेले की महेश भूपतीने आपल्याला पेसचे तोंड पाहाणेही नकोसे वाटते असे जाहीर केले. गेल्या काही स्पर्धात भूपतीने रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झाच्या साथीत उत्तम खेळ करून नेत्रदीपक यश मिळवले आहे. त्याने आणि पेसने महिन्याभरात सराव करून ऑलिम्पिकमध्ये खेळावा असा फतवा भारतीय टेनिस संघटनेने काढला. पण महेशने पेसबरोबर खेळायला नकार दिला. रोहन बोपण्णाही पेसबरोबर खेळायला तयार नाही.  सानिया मिर्झाला न विचारताच तिलाही पेसबरोबर मिश्र दुहेरीत खेळायचा हुकूम दिला गेला. ती भडकली पण तिने ऑलिम्पिकपुरते खेळायचे कबूल केले.
जगातल्या सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक असणारा लिअ‍ॅण्डर पेस त्याच्याबरोबर दुहेरीची जोडी जमवायला भारतातले इतर तिन्ही श्रेष्ठ खेळाडू तयार नाहीत, असे का व्हावे याचा त्याने गंभीरपणे विचार करायला हवा असे वाटते.
माणसाच्या आयुष्यात दुहेरीचा खेळ आत्मसात करायला अतिशय महत्त्व आहे. विवाह करून सुखी संसार करणे आणि मुलांना वाढवून त्यांना भविष्याची जबाबदारी पेलायला सक्षम करणे हा मिश्र दुहेरीचाच खेळ आहे. त्यामध्ये जोडी सहज जुळली आणि तशीच राहिली तर उत्तमच, पण मतभेद मिटवून जुळवून घेता येणे जास्त महत्त्वाचे आहे. प्रेम, आदर, वात्सल्य, सख्य या साऱ्या भावना कष्टाने जोपासायच्या असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले तर नुसते ज्ञान आणि कौशल्य जगण्यातला खरा आनंद घ्यायला पुरेशी ठरत नाहीत. जुळत नसेल तर जुळवून घेता यायला शिकणे गरजेचे आहे. कारण आयुष्य हा सांघिक खेळ आहे. वैयक्तिक नाही. सांघिक खेळात एकटय़ाला नाही जिंकता येत, संघच जिंकत असतो. ही जाणीव ठेवली नाही तर कर्तबगारीचा दर्जा आपल्या क्षमतेप्रमाणे राहात नाहीच, पण आपण आयुष्यातल्या फार मोठय़ा आनंदाला मुकतो.