यशवंत सुमंत - सोमवार, ९ जुलै २०१२ राज्यशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ
प्रा. राम बापट यांच्या निधनाने ‘फार मोठा विचारवंत, विद्वान आणि मोठा माणूस काळाच्या पडद्याआड गेला’ अशी सार्वत्रिक सार्थ प्रतिक्रिया उमटली. अभ्यासक, प्राध्यापक, मार्गदर्शक, समीक्षक अशा विविधांगांनी बापटसरांनी आयुष्यभर एक ज्ञानयज्ञ चालविला होता.. २ जुलै २०१२ ! पहाटे चार वाजता विवेक पुरंदरेचा फोन. बापट गेले. एक जीवघेणी विषण्णता आणि मी नि:शब्द झालो. बापटसरांचे जाणे तसे अनपेक्षित नव्हते. ८१ वय, पार्किन्सन अल्झायमर.. मार्ग स्पष्टच होता.
पण ३० जूनला त्यांचा फोन येतो भेट म्हणून. २ जुलैला पुण्यात परतताच तुम्हाला लागत असलेले पुस्तक घेऊन मी सकाळी नऊ वाजता समक्षच येतो असे मी त्यांना कळवले. पण सोमवार, २ जुलैची भेट, भेट नव्हतीच ते अंत्यदर्शन ठरले! मग फोनाफोनी, मेल्स, एसएमएस.. सारे जगरहाटीप्रमाणे. शेवटचा निरोप.. श्रद्धांजली आणि समाजातील विविध थरांतून एकच उद्गार ‘फार मोठा विचारवंत, विद्वान, आणि मोठा माणूस होता.’ पण काय होते हे मोठेपण? काय होती ही विद्वत्ता? विचारवंत तर अनेक असतात. पण बापट नावाच्या या विचारवंताचा पिंड काय होता? ना नावावर एखादा जाडजुड विद्वज्जड ग्रंथ. ना पाच दहा पुस्तके. ना डॉक्टरेट. एम.ए. झाले. संशोधनासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गेले. मार्गदर्शकाशी तार जुळत नाही हे समजताच ते सोडून परत आले. ‘एच.पी.टी.ला नाशिकमध्ये व्याख्याते म्हणून रुजू झाले आणि पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्रपाठक म्हणून स्थिरावले. प्राध्यापक पदासाठी पण पुढे अर्ज केला नाही. म्हटले तर एक साधा सरळसोट प्रवास आणि तरीही ते गेल्याचे कळताच रोमिला थापरपासून संजना कपूपर्यंत, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासकांपासून ग्रासरुट स्तरावर काम करणाऱ्या जीवनदानी कार्यकर्त्यांपर्यंत आणि कला, साहित्य, नाटक क्षेत्रापासून ते गिर्यारोहक आणि विद्यार्थ्यांपर्यंत असंख्य मंडळींचे सांत्वनपर फोन, शोकसंदेश येत राहतात. बापट नावाच्या एका विलक्षण, बहुआयामी व्यक्तीने व्यापलेल्या सामाजिक संबंधांच्या आणि मान्यतेच्या अवकाशाची ती खूण असते. अर्थात ही मान्यता होती म्हणून बापट मोठे होते असे नाही. राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक, विद्यार्थिप्रिय प्राध्यापक, स्थानिक पातळीवरील परिसंवाद, चर्चासत्रांपासून ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांतून सतत वावरणारे, परिवर्तनवादी, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांचा परिपोष करणारे मार्गदर्शक, साहित्य, कला, नाटक, सिनेमा या क्षेत्रांतील सर्जनशील कृतींची आस्थापूर्वक चिकित्सा व समीक्षा करणारी व्यक्ती ही झाली बापटांची स्थूल ओळख. पण ज्या राज्यशास्त्र सामाजिकशास्त्रांचे अभ्यासक व अध्यापक म्हणून ते जगले त्यांच्या राज्यशास्त्राविषयीच्या धारणा काय होत्या? ज्या पुरोगामी, परिवर्तनवादी क्रांतिकारी चळवळींशी व विचारांशी त्यांनी बांधीलकी स्वीकारली होती त्या चळवळींबद्दल, त्यांच्या तत्त्वप्रणालींविषयी, कार्यकर्त्यांच्या राजकीय आकलनाविषयी बापटांचे म्हणणे काय होते? ज्या साहित्य, कला, नाटक, चित्रपट, संगीत क्षेत्रात चालणाऱ्या विविध प्रयोगांबद्दल, त्यातील प्रवाहांबद्दल आणि घडामोडींचा सूक्ष्मपणे, चिकित्सकपणे, सातत्याने आणि तितक्याच संवेदनशीलतेने बापट आढावा घेत व विचार करीत, त्यांची जीवनदृष्टी व त्यांचा वैश्विक आलोक काय होता? राज्यशास्त्राचे अभ्यासक आणि अध्यापक म्हणून बापटसरांच्या राज्यशास्त्राविषयीच्या काही धारणा होत्या आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासकांकडून काही अपेक्षाही होत्या. वसाहतकालीन आणि वसाहोत्तर काळात भारतातील मुख्य प्रवाही राज्यशास्त्र हे स्थूलमानाने अँग्लो-अमेरिकी राज्यशास्त्राच्या परंपरेतच विकसित झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर क्वचित ठिकाणी ‘बूझ्र्वा’ राज्यशास्त्राचा चिकित्सक प्रतिवाद करण्यातून मार्क्सवादी राज्यशास्त्राचाही प्रभाव व त्यादृष्टीने विकास करण्याचा प्रयत्न झाला. बापटसरांना या दोन्ही परंपरांची ताकद आणि मर्मस्थाने पूर्णपणे कळली होती आणि तरीही या दोन्ही परंपरांच्या रूढ चौकटीत राज्यशास्त्र बंदिस्त होणे किंवा त्या चौकटीतच त्याचा विचार व विकास करणे हे मान्य नव्हते. विशेषत: आशियाई समाजरचनेतील गुंते, वसाहतवादी शक्तींनी त्यात केलेला हस्तक्षेप व त्यातून येणारे पेच आणि मुख्य म्हणजे भारतासारख्या एका अत्यंत प्रवाही ‘सिव्हिलायझेन’ असलेल्या समाजातील राजकारण समजून घेण्यासाठी वरील दोन्ही परंपरा अपुऱ्याच ठरणाऱ्या आहेत. याचे जबरदस्त भान बापटसरांना होते. म्हणूनच ‘मार्क्सवादी’ किंवा ‘बूझ्र्वा’ चौकटीत विकसित झालेल्या राज्यशास्त्रीय सिद्धांतातून जेवढे म्हणून भारतीय वास्तव समजून घेता येईल व स्पष्ट करता येईल तेवढे केलेच पाहिजे, असे बापटांचे म्हणणे होते आणि त्यासाठी या दोन्ही चौकटींचा कसून अभ्यास करण्याची गरज ते सतत अधोरेखित करीत. पण जेथे या चौकटी तोकडय़ा पडतात तेथे बिगर पश्चिमी समाजाच्या राजकीय अनुभवातून निर्माण झालेल्या सामाजिक व राजकीय शहाणपणाचा तसेच चिंतनाचा गंभीरपणे, मोठय़ा हिंमतीने आणि पश्चिम विरोधी गंडाच्या आहारी न जाता विचार झाला पाहिजे असे बापटांचे आग्रही प्रतिपादन होते. या दोन्ही परंपरांकडे वस्तुनिष्ठ पद्धतीने व चिकित्सक दृष्टीने पहाण्याचे बापटांना सहज साधले ते त्यांनी स्वीकारलेल्या व आत्मसात केलेल्या द्वंद्वात्मक विश्लेषण पद्धतीने. अर्थातच ही द्वंद्वात्मक दृष्टी मार्क्सवादातून त्यांच्यापर्यंत पोचली होती. प्रत्येक विचार, संकल्पना, घटित किंवा वस्तुजात हे द्विधा म्हणजे त्याला दोन विधा, आयाम असतात व त्या एकाच वेळी आंतर्विरोधाने परस्परांशी संलग्न असतात. त्या समजून घेणे म्हणजे त्यातील आंतरविर्रोध आकळणे. तो समजल्याशिवाय त्याच्या विकासाचे गतितत्त्व समजत नाही आणि ते समजल्याशिवाय घटना का घडतात, माणूस नावाची आत्मभान असलेली पण भौतिकतेने बद्ध झालेली एजन्सी या घडामोडीत काय आणि कितपत भूमिका बजावते आणि आपल्याच समाजसृष्टीची निर्मिती कशी करते हे समजत नाही. बापट या दृष्टीने मानवी इतिहासाकडे पहात होते. राज्यशास्त्र हे राजकारण नावाचा मानवी व्यवहार समजून घेण्याचे व समजावून देण्याचे शास्त्र आहे ही बापटांची धारणा होती. या राजकारणाची दोन रूपे आहेत. एक शोषणात्मक, दमनात्मक, संघर्षांत्म आणि दुसरे सहकार्यात्मक, सामाजिक पुरुषार्थाला व सिद्धीला अवकाश प्राप्त करून देणारे आणि दबलेल्या माणसांना अधिकाधिक स्वातंत्र्य देणारे, मुक्त करणारे, मुक्तिदायी! राजकारणाची दमनात्मक आणि मुक्तिदायी अशी दोन्ही रूपे समजली पाहिजेत. ती न समजल्यास माणूस एक तर राजकारणाच्या बाबत तुच्छतावादी बनतो नाहीतर भाबडा बनतो. राजकारण हा एक अव्याहत चालणारा अस्सल (ऑथेंटिक) पण कमालीचा गुंतागुंतीचा आणि सर्वस्पर्शी मानवी व्यवहार आहे आणि तो गंभीरपणे समजून घ्यायला हवा, असे बापटांचे म्हणणे होते. म्हणूनच स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत सर्वच पातळ्यांवरील राजकारणाचा अभ्यास हा राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी केला पाहिजे हे बापटांचे म्हणणे होते. बापट हे अव्वल दर्जाचे विचारवंत होते. माणूस हा स्खलनशील असतोच. प्रमादीही असतो. पण या स्खलनशीलतेवर मात करण्याची उदंड क्षमताही त्याच्या अंगी असते असा अदम्य विश्वास निर्माण झाल्याशिवाय तो परिवर्तनवादीही होत नाही ही बापटांची ठाम धारणा होती. राज्यशास्त्रासहित सर्वच सामाजिकशास्त्रांनी निव्वळ समाजव्यवस्थांचे आकलन करून न थांबता समाजव्यवस्थेतील गुंते स्पष्ट करत, त्यातील पेचांना भिडत माणसाच्या सामाजिक मुक्तीच्या व्यवहाराला सहाय्यभूत व्हावे व ती शास्त्रे अशा रीतीने मुक्तिदायी राजकारणास सहाय्यभूत कशी बनतील याचा विचार बापटांनी सातत्याने केला. या विचारानेच त्यांना एका बाजूला राजकीय व सामाजिक सिद्धांतनाच्या उद्योगास लावले तर दुसऱ्या बाजूला समतेवर आधारित आणि शोषणमुक्त समाजनिर्मितीसाठी चाललेल्या व्यवस्था परिवर्तनाच्या बाजूस हस्तक्षेपवादी बनवले. सत्तरीचे विद्रोही चळवळींचे दशक, ऐंशीचे जमातवादी व जातवादी आणि दहशतवादी उद्रेकाचे दशक, नव्वदीनंतरचे जागतिकीकरण आणि नवभांडवलशाहीच्या प्रभुत्वशाली वाटचालीचे दशक या कालखंडाचे बापट नुसते निरीक्षकच नव्हते तर त्यातील प्रत्येक महत्त्वपूर्ण घटनांचे ते भाष्यकार होते. युक्रांदच्या चळवळीच्या संदर्भात केलेली भारतातील जातवर्ग अनुबंधांची मांडणी, आणीबाणीविरोधी आंदोलनाच्या माध्यमातून केलेले लोकशाहीचे समर्थन व सिद्धांतन, मंडलोत्तर बहुजनवादाचे विश्लेषण व दलित-बहुजन यांच्यातील अनुबंध आणि विग्रहाचे विवेचन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदुत्व परिवाराच्या राजकारणाची मीमांसा, शेतकरी-आदिवासी, स्त्रीवादी, आणि पर्यावरणवादी चळवळींची केलेली आस्थापूर्वक चिकित्सा, भांडवलशाहीच्या बदलातून निर्माण झालेल्या नवउदारमतवादी राज्यसंस्थेच्या स्वरूपाची चिकित्सा, सोविएत युनियनचे विघटन आणि माओनंतरचा चीन यांचा घेतलेला मर्मभेदी वेध आणि या बरोबरीने चाललेला त्यांचा कला, साहित्य, संगीत क्षेत्रातील व्यक्तीशी ज्ञानसंवाद. या साऱ्या गोष्टी बापटांच्या व्यापक ज्ञानव्यवहाराची व वैचारिक खोलीची कल्पना देतात. बापटांचे हे सारे चिंतन परिसंवादातून, चर्चासत्रांच्या सहभागातून, अभ्यास शिबिरातून, कार्यशाळेतून प्रकट होते असे. त्यातील फारच थोडे शब्दबद्ध झाले. जे थोडेबहुत झाले ते आता संकलित स्वरूपात लोकवाङ्मय गृह प्रसिद्ध करीत आहे. समग्रता हे त्यांच्या चिंतनाचे वैशिष्टय़ होते. एकाच प्रश्नाच्या, घटनेच्या अनेक बाजू त्यांच्या क्षणार्धात लक्षात येत व त्यामुळे त्यांचे त्या प्रश्नांचे आकलन अधिक खोल व बहुआयामी बने. आज दलितांचे राजकारण, डाव्यांचे राजकारण आणि एकूणच शोषित-वंचितांचे राजकारण एका विचित्र अरिष्टात सापडले आहे. बापटसरांच्या समग्रलक्षी चिंतनाची कधी नव्हे इतकी आज निकड जाणवते. वर्गमुक्त होणे म्हणजे काय, जातमुक्त होणे म्हणजे काय, क्रांतिकारी असणे म्हणजे काय याचे अर्थ ते जे सांगत ते कितीजणांना समजले ही गोष्ट अलाहिदा. पण ते सातत्याने सांगत. अशा माणसाच्या जाण्याने पोकळी निर्माण होत नसते. उलट असलेली पोकळी कशी भरायची याची त्यांनी दाखवलेली दिशा आपल्याला सहाय्यभूत होत असते. आपण त्या दिशेने जाऊ या आणि त्यांचा वारसा समृद्ध करू या. |