आनंदयोग : डबके व्हायचे की झरा? Print

भीष्मराज बाम, बुधवार, ११ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पाणी केवळ तहान भागवत नाही.
ते आपल्याला आणखीही खूप काही देते..स्नेह, ओलावा, शांती, शीतलता, तृप्ती.. पाण्याकडून आपण, नेहमी प्रवाही राहण्याची शक्तीदेखील घ्यायला हवी!..
पुण्याला जायचे असले म्हणजे मी आवर्जून पु. ल. देशपांडय़ांकडे फोन करीत असे. भाई -सुनीताताई या रसिक आणि विद्वान जोडप्याच्या संगतीत एखादी सकाळ वा संध्याकाळ घालवायला मिळणे म्हणजे आनंदाची पर्वणीच असे. त्या दिवशी तर सारेच शुभयोग जुळून आले असावेत.

कारण दुसऱ्या दिवशी भाईंना मुंबईला जायचं होतं आणि त्यांनी आमच्याबरोबर मुंबईला यायचं कबूल केलं. दुसऱ्या दिवशी सुनीताताईंच्या हातची रुचकर न्याहारी घेऊन आम्ही मुंबईला निघालो. श्रावणाची रिमझिम चालूच होती. आम्हाला मुंबईला पोहोचायला दीडएक तास जास्त लागला. वाहतूक खोळंबायचं नेहमीचं कारण नव्हतं. भाईंना कोणतासा पॉइंट आम्हा दोघांना दाखवायचा म्हणून थोडी वाट वाकडी करून तिथे गेलो. मग कोणाच्या मळ्यात अशी मक्याची कणसं कोठेच मिळत नाहीत म्हणून तिथे! खोपोलीला रमाकांतच्या हॉटेलमधला बटाटावडा न खाता पुढे गेलो तर पापच लागणार!
प्रवासात होणारा उशीर अतिशय कंटाळवाणा वाटतो, पण वेळ ही मोठी गमतीशीर चीज आहे. अप्रिय व्यक्तींच्या सहवासात तो संपता संपत नाही नि प्रिय व्यक्तींच्या सहवासात तो कसा भुर्रकन उडून जातो, ते कळत नाही. तो प्रवास संपूच नये, असे वाटत होते. पाऊस, श्रावण, ऋतू, निसर्ग अशा विषयांवर असंख्य गप्पा झाल्या. भाईंनी आम्हाला त्यांच्या खास पॉइंटवर नेले तेव्हा दाट धुके आणि ढग यांच्यामुळे चार-पाच फुटांपलीकडचे काही दिसत नव्हते. सोबत छत्र्या होत्या, पण डोंगरातला वारा-पाऊस छत्रीला काय जुमानणार! भाई म्हणाले, ‘तपस्या केल्याशिवाय दर्शन होत नसते. आपण थोडा वेळ थांबू’
त्या दिवशीची आमची तपस्या लवकरच फळाला आली. धुके आणि ढग किंचित बाजूला झाले आणि समोरचे देखणे निसर्गचित्र अत्यंत अपूर्व अशा स्वरूपात समोर आले. खाली दरीत एक तलाव आणि त्याच्या काठावरचे एक देऊळ स्वच्छ सूर्यप्रकाशात न्हाऊन निघाले होते. धुक्याचा पडदा थोडासाच बाजूला झाला होता. आम्ही आणखी थोडा वेळ थांबलो. एक-दोनदा थोडे पुन्हा दिसलेसुद्धा, पण नंतर खालचे ऊन्हसुद्धा ढगांनी झाकले गेले. ते दर्शन मनात कोरून घेऊन जड पावलांनी आम्ही तेथून निघालो. मुंबईला भाईंना मुक्कामावर सोडले आणि घरी जाताना ड्रायव्हरला अभिमानाने सांगितले, ‘‘हे कोण होते ठाऊक होते का? हे पु. ल. देशपांडे!’’ ड्रायव्हर वयस्क होता. तो म्हणाला, ‘‘ते फार बोलतात, नाही?’’ आम्ही गार!
असेच आणखी एक दर्शन विस्मरणात जाणे शक्य नाही! आम्ही सिक्कीमला गेलो होतो. रात्री पोहोचायला बराच उशीर झाला. सकाळी नाश्ता आणून देणाऱ्या पोऱ्याला मी विचारले, ‘‘कांचनजंगा शिखर पाहायला कोठे जायचे?’’ त्याने उत्तर न देता खिडकीवरचा पडदा बाजूला केला. समोर कांचनजंगा शिखर लख्ख उन्हात सोनेरी झळाळी मिरवीत उभे होते. निसर्गदेवतेने आमच्यावर कृपाच केली होती. कारण हिमालयाची शिखरे बहुतेक वेळ धुके आणि ढग यांनी अवगुंठितच असतात. बर्फाच्छादित शिखरे आणि सूर्यप्रकाश एकत्रित पाहायला मिळणे हे भाग्यातच असायला हवे.
जलतत्त्वाला ओढ पृथ्वीतत्त्वाची आहे. अवखळ बालक आईच्या कुशीत शिरले म्हणजे ते शांत होते. तसेच पाण्याचे आहे. पृथ्वी ही समुद्रवसना आहे. ती पाण्याला त्याच्या सर्व रूपात पांघरते. कधी ते पर्वतशिखरांवरचे घनीभूत बर्फ होते, तर कधी सूर्यप्रकाश आणि वारा यांच्या संगतीत ढग बनून आकाशात जाते. कधी पृथ्वी विस्तीर्ण जलाशयांच्या स्वरूपात पाण्याची साडी नेसते तर वाहणाऱ्या नद्या ओढय़ांच्या रूपात त्या पाण्याच्या ओढण्या आणि पदर होतात. पाणी साऱ्याच रूपात मोहक आणि आकर्षक असते. त्याचे ध्यानसुद्धा सर्व रूपात आल्हाद आणि शांती देणारे असते. ते बर्फाच्या रूपात थिजलेले असो, ढगांचे आच्छादन बनून पृथ्वीमातेचे पांघरूण झालेले असो, धबधब्याच्या स्वरूपात कडय़ांवरून उडय़ा घेत असो, नद्या ओढय़ांमधून प्रवाहित होत असो की जलाशयाला मिळून शांतीचा आनंद घेत असो, साऱ्याच रूपांमध्ये त्याची आराधना करायची असते.
अतिथी अभ्यागताला श्रमपरिहारासाठी पाणी देऊन त्याची शांती करायची पद्धत आहे. रुद्रालासुद्धा पाण्याचा अभिषेक प्रिय आहे. त्या अभिषेकाच्या धारेचे ध्यान करायचे असते, पण आपण घरी किंवा देवळात अभिषेकाची धार धरतो त्याच्यापेक्षा वर्षां ऋतूत निसर्ग पर्वतावर पाऊस पाडून अभिषेक करतो त्या अभिषेकाचे ध्यान जास्त महत्त्वाचे. एका श्रावणात आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो. देवळात अभिषेक-दर्शन झाल्यावर ब्रह्मगिरीचे दर्शन घ्यायला गेलो. डोंगराच्या माथ्यावर ढगफुटी व्हावी तसा पाऊस कोसळत होता. असंख्य झरे डोंगराला बिलगून वाहत होते आणि कडय़ांवरून स्वत:ला दऱ्यांत झोकून देत होते. ते अभिषेकाचे अपूर्व दृश्य मी अजूनही कित्येक वेळा मानसपूजेसाठी वापरतो.
ध्यानासाठी विशुद्धीचक्रातली दोन केंद्रे अत्यंत महत्त्वाची मानली जातात. पहिले केंद्र जिव्हा अग्र, म्हणजे जिभेचा शेंडा हे आहे. या केंद्रातून शरीर यंत्रणेमधले आपतत्त्व नियंत्रित होते. आपतत्त्वाचा प्रधान गुण ‘रस’ हा आहे. या तत्त्वामुळे आपण खाल्लेल्या पदार्थाची चव ओळखू शकतो, एवढेच नव्हे तर अनुभवलेल्या प्रसंगांचे प्रिय किंवा अप्रिय स्वरूप या तत्त्वानेच आपल्या ध्यानात येते. ध्येयनिश्चितीसाठीसुद्धा हे केंद्र महत्त्वाचे आहे. ध्येयाची ओढ या केंद्रामुळेच लागते. साहजिकच प्रलोभनाची ओढ कमी होते. वरून खाली धावत येणारे आपतत्त्व हा ईश्वराचा कृपाप्रसाद आहे. तपस्येमुळे होणारी झीज भरून काढत तृप्ती आणि शांतीकडे नेणारे हे केंद्र आहे. स्नेह, ओलावा हासुद्धा जलतत्त्वाचा गुण असल्याने परस्परसंबंधांसाठी, नाती व मैत्री जोडून ती जोपासण्याकरताही हे केंद्र खूप उपयोगी पडते.
विशुद्धीचक्रातलेच दुसरे महत्त्वाचे केंद्र म्हणजे जिव्हा मूल. आपण आवंढा गिळतो तेव्हा घशात जिथे हालचाल होते तिथे हे केंद्र आहे. घशातच या केंद्रापाशी कंठकूप आहे. अन्नरसनलिका आणि श्वासनलिका या कुपामधूनच जातात. तहान लागल्याची जाणीव या कंठकुपात होते. ज्या वेळी एकदम भय वाटते, मोठे आव्हान पुढे येऊन उभे ठाकते त्या वेळी घशाला शोष पडतो. तोसुद्धा कंठकुपातच जाणवतो. आपले स्वरयंत्रसुद्धा कंठकुपातच आहे. तेसुद्धा हेच केंद्र नियंत्रित करीत असल्याने तेच वाणीचे आणि शब्द इथेच उमटत असल्याने ते आकाशतत्त्वाचेही केंद्र आहे. कारण आकाशतत्त्वाचा प्रधान गुण ‘शब्द’ हाच आहे. या केंद्रावर एकाग्र होऊन ध्यान करण्याने तहान आणि भूक यांची निवृत्ती होते, असे योगांत सांगितलेले आहे. काही वेळा तहान आणि भूक आवरून धरण्याची गरज भासते. तेव्हा या ध्यानाची सवय असल्यास फार उपयोग होतो.
खेळाडूंना श्रमाने आणि दडपणाने कंठशोष होतो. तेव्हा अधूनमधून घोटभर पाणी पीत राहण्याची सवय लावून घ्यावी. कंठशोष कमी झाला की दडपणही कमी होते, असा अनुभव आहे. काही मोठे खेळाडू याबाबतीत आळस करतात, असे ध्यानात आल्यावर त्यांच्याकडे पाण्याची भरलेली बाटली देऊन मॅच संपण्यापूर्वी ती संपवायला हवी, असा आम्ही दंडकच घातला होता. त्याचा अर्थातच फायदा झाला.
निसर्गाच्या पुनर्निर्मितीमध्ये जलतत्त्वाचा फार मोठा वाटा आहे. शुद्धीकरणाचा भार तर ते उचलतेच, पण स्वत:सुद्धा प्रवाहाच्या आणि बाष्पीभवनाच्या क्रियेने सतत शुद्ध आणि स्वच्छ होत राहते. यासाठी गंगास्नानाला महत्त्व आहे. त्याने शरीराचीच नव्हे, तर मनाचीदेखील शुद्धी होते. म्हणून बिघडलेले संबंध सुधारताना ‘झाले गेले गंगेला मिळाले’ असे म्हटले जाते. जलतत्त्व आपल्या शरीराचा फार मोठा भाग व्यापून असते. त्यामुळे त्याची ओढ आपल्याला सर्वात जास्त असते. त्याच्याकडे नुसते तहान भागविण्याचे साधन म्हणून पाहायचे नसते. स्नेह, ओलावा, शांती, शीतलता, तृप्ती हे सारे गुण त्याच्याकडून घ्यायचेच असतात. पण सतत प्रवाहित होत राहून शुद्ध व स्वच्छ होण्याची त्याची शक्तीसुद्धा घ्यायची. नाहीतर आयुष्य म्हणजे तुंबलेले डबके होऊन जाते. असे झालेले चालेल आपल्याला?