विशेष : कुशाग्र आणि अभ्यासू Print

 

मिलिंद कोकजे - सोमवार, १६ जुलै २०१२

‘दक्षता’ मासिक नावारूपाला आणणारे, मुंबई पोलिसांचा इतिहास लिहिणारे आणि अनेक गुन्हेगारांची ‘कुंडली’ माहीत ठेवून तपासात या माहितीचा योग्य वापर करणारे अरविंद पटवर्धन अलीकडेच निवर्तले. माजी साहायक पोलीस आयुक्त या पदाच्या पलीकडचे एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले. समाजातील अनेक घटकांना पटवर्धन यांचे मोठेपण का जाणवे, याबद्दलच्या या काही व्यक्तिगत नोंदी..


प्रत्येक गुन्हेगार त्याच त्याच प्रकारचा गुन्हा आपल्या एखाद्या विशिष्ट पद्धतीने परत परत करतो या ‘मोडस ऑपरेंडी’ सिद्धांतावर साहाय्यक पोलीस आयुक्त अरिवद पटवर्धन यांचा दृढ विश्वास होता. अनेक नवीन अधिकारी ‘मोडस ऑपरेंडी’त काही अर्थ नाही असे मानतात ते त्यांना पटत नसे. गुन्हेगार ‘मोडस ऑपरेंडी’ वापरतात आणि त्याची संपूर्ण माहिती, तसेच त्याच्या आधीच्या सर्व गुन्ह्य़ांची नीट माहिती असणे हाच गुन्ह्य़ाचा तपास करण्याचा, गुन्हेगार पकडण्याचा आणि त्याच्याकडून कबुलीजबाब घेण्याचा सर्वात परिणामकारक मार्ग आहे, असे ते मानत.
अरिवद पटवर्धन यांचे गेल्याच आठवडय़ात निधन झाले. पण आपल्या पोलिसी कारकीर्दीत, या ‘मोडस ऑपरेंडी’वरील विश्वासाच्या आधारे त्यांनी प्रचंड मोठे काम करून ठेवले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या संगणक विभागाचे प्रमुख असताना त्यांनी तोपर्यंत नोंदविण्यात आलेल्या काही लाख गुन्ह्य़ांची नोंद, त्यांचे वर्गीकरण, कित्येक लाख हातांचे ठसे, छायाचित्रे या सगळ्यांची नोंद असे प्रचंड काम करून ठेवले. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांनी राज्यातील प्रत्येक पोलीस स्थानकातील वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची (हॅबिच्युअल ऑफेंडर्स) त्यांच्या जुन्या गुन्ह्य़ांच्या रेकॉर्डसहित डिरेक्टरी तयार करून त्या त्या पोलीस स्थानकाला दिली. अशी डिरेक्टरी त्यांनी तयार केली ती ‘मोडस ऑपरेंडी’वर असलेल्या विश्वासापोटीच आणि त्याचा फायदा झाल्याचे त्याचा नीट वापर करणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितल्याचे ते सांगत असत.
गुन्हेगाराच्या जुन्या गुन्ह्य़ांची उजळणी करून त्याला सांगितली आणि त्याच्यापेक्षा आपल्याला त्याच्याविषयी अधिक माहिती आहे हे त्याला दाखवून दिले की, गुन्हेगार पोपटासारखा बोलायला लागतो यावर त्यांचा विश्वास होता. एका राष्ट्रीयीकृत बँकेतील एक चेक घोटाळ्यासंबंधात एका आरोपीला पकडूनही तो स्थानिक पोलिसांकडे काहीच बोलायला तयार नव्हता. त्याला अशाच गुन्ह्य़ात पटवर्धनांनी आधी पकडले होते. त्या पोलीस अधिकाऱ्याने पटवर्धनांची मदत मागितली (तेव्हा ते जनसंपर्क अधिकारी आणि ‘दक्षता’चे संपादक होते). त्यांनी त्याला आपल्याकडे आणण्यास सांगितले. पटवर्धनांकडे जायचे आहे कळल्यावर त्याने लगेच आपल्या गुन्ह्य़ाची कबुली दिली. पटवर्धनांनी त्याला विचारले की, इतके मारूनही तू बोलला नाहीस, पण माझ्याकडे यायचे म्हटल्यावर कबुली का दिलीस? त्या वेळी त्याने दिलेले उत्तर त्यांचा ‘मोडस ऑपरेंडी’वर असलेला विश्वास किती बरोबर होता हे सिद्ध करणारे होते. त्या आरोपीने म्हटले, मारून काही होत नाही, आम्हाला त्याची सवय असते. पण तुमच्यासमोर मी काय खोटं बोलणार किंवा गप्प बसणार. तुम्हाला तर माझी पूर्ण कुंडली माहीत आहे.
बँक चेक घोटाळ्यांचा तपास करणारा अधिकारी म्हणून पटवर्धनांची ख्याती होती. त्यांनी त्यावर पुस्तकेही लिहिली होती. या विषयातील त्यांची कौशल्ये लक्षात घेऊन निवृत्तीनंतर त्यांना काही बँकांनी दक्षता अधिकारी म्हणूनही नेमले होते. त्यांची आणखी काही वैशिष्टय़े म्हणजे नागरिकांच्या हक्कांवर त्यांचा असलेला विश्वास आणि प्रचंड स्मरणशक्ती. नागरिकांच्या हक्कांवर असलेल्या त्यांच्या विश्वासामुळेच असेल कदाचित पण त्यांना आरोपींना मारणे मान्य नव्हते. न मारताही माहिती काढता येते यावर त्यांचा विश्वास होता.
नागरिकांनी आपल्या हक्कांविषयी, अगदी पोलिसांच्या विरुद्धच्याही, जागरूक असेल पाहिजे असा त्यांचा प्रयत्न असे. ‘दक्षता’चे संपादक असताना त्यांनी असे सल्ले लोकांना जाहीरपणे दिले. बसस्टॉपवर आपल्याशी गरप्रकार करणाऱ्या एका पोलिसाला आपण कसा धडा शिकवला याविषयीचे पत्र एका महिलेने त्यांना पाठवले. ते त्यांनी ‘दक्षता’त छापले आणि ‘तुमच्याशी पोलीस चुकीचे वागत असतील तर त्यांनाही तुम्ही असाच धडा शिकवा,’ अशी संपादकीय तळटीपही छापली (आणि वरिष्ठांचा रोषही ओढवून घेतला). महिला संघटनेच्या एका प्रदर्शनाचे उदघाटन करताना महिलांना सूर्यास्त ते सूर्योदय या काळात पोलीस स्थानकात बोलवता येत नाही, असे पोस्टर त्यांनी पाहिले. त्यांनी त्या संघटनेला सांगितले, तुमचे पोस्टर चुकीचे आहे. महिलांना केव्हाही पोलीस स्थानकात बोलवता येत नाही, घरी जाऊनच त्यांची चौकशी करावी लागते. हे सर्व प्रकरण तेव्हा तत्कालीन आयुक्तांनी वेगळेच विधान केल्याने काहीसे वादग्रस्त झाले होते.
पटवर्धनांच्या प्रचंड स्मरणशक्तीची मला प्रचीती आली ती एका बातमीमुळे. मी पत्रकारितेत आलो त्याच वेळी राज्याचे विधानमंडळ रीगलजवळील इमारतीतून सध्याच्या नव्या विधान भवन इमारतीत स्थलांतरित झाले होते. त्यामुळे जुन्या इमारतीकडे येणारे मोच्रे चर्चगेटकडे जाऊन सम्राट उपाहारगृहाजवळ थांबविण्यात येऊ लागले. त्यापूर्वी कित्येक वष्रे ते विद्यापीठाजवळील काळ्या घोडय़ापाशी अडवले जात व त्या काळ्या घोडय़ाचा उल्लेख वर्तमानपत्रातील मोर्चाच्या प्रत्येक बातमीत आमच्या लहानपणी असे. त्यामुळे ऐतिहासिक काळ्या घोडय़ाचे महत्त्व संपले अशा प्रकारची बातमी मला करायची होती. त्याकरिता प्रथम काळ्या घोडय़ाची (हा एका ब्रिटिश सेनाधिकाऱ्याचा घोडय़ावर बसलेला पुतळा होता आणि तो तेथून केव्हाच हलवला होता, पण तरीही ती जागा काळा घोडा या नावाने प्रसिद्ध आहे.) माहिती मिळविणे गरजेचे होते.
    या क्षेत्रात नवीन असल्याने कोणाला भेटून माहिती घ्यायची हे माहीत नसल्याने आणि लोकांशी ओळख नसल्याने कसे पुढे जावे ते कळत नव्हते. तेव्हा कोणाच्या तरी सूचनेवरून तेव्हाच्या टाइम्स लायब्ररीचे प्रमुख असलेले डॉ. अरुण टिकेकर (नंतर ‘लोकसत्ता’चे संपादक) यांना भेटलो. त्यांनी जुन्या फाइलींमधून १९४६ साली ‘इव्हििनग न्यूज ऑफ इंडिया’ने मुंबईतील पुतळ्यांवर कित्येक दिवस रोज एका पुतळ्यावर माहिती अशी मालिकाच केली होती. त्यातील काळ्या घोडय़ाची माहिती दिली. नंतर तेथे मोच्रे केव्हापासून अडवायला लागले त्याची माहिती पोलिसांकडून घ्यायचा प्रयत्न केला. पण कोणालाच काहीच इतिहास माहीत नव्हता. परत डॉ. टिकेकरांची मदत मागितली तेव्हा त्यांनी अरिवद पटवर्धनांना भेटण्यास सांगितले.
जुन्या सचिवालय इमारतीच्या (जेथे दिवाणी व सत्र न्यायालय आहे) एका भागात तेव्हा पोलीस महासंचालकांचे कार्यालय होते आणि त्याच्या संगणक विभागात प्रमुख म्हणून पटवर्धन बसले होते. एखाद्या जुन्या ब्रिटिशकालीन अधिकाऱ्याप्रमाणे त्यांनी व्यवस्थित टाय वगरे लावला होता. (गणवेश नसेल तेव्हा बहुधा हाच त्यांचा वेश असे.) मी त्यांना माझा प्रश्न सांगितल्यावर ते म्हणाले, बसा आणि घ्या लिहून. असे म्हणून काळ्या घोडय़ाला पहिला मोर्चा केव्हा अडवला त्याची तारीख, वार, सालासहित तो कोणाचा होता, कशाकरिता काढला होता अशी सुरुवात करून पुढचा अर्धा तास ते न थांबता मला या पद्धतीने विविध मोर्चाची, मोर्चाच्या वेळी तेथे घडलेल्या घटनांची तारीख-वारासहित माहिती देऊ लागले. समोर काहीही कागद नसताना, मी अचानक जाऊन माहिती विचारल्याने त्याची तयारी करण्याकरिता कोणताही वेळ मिळाला नसताना केवळ स्मरणशक्तीच्या जोरावर त्यांनी सर्व माहिती मला दिली. पुढे अनेक जणांनी मला ती बातमी आवडल्याचे सांगितले. पण त्याचे खरे श्रेय होते ते इतकी महत्त्वाची आणि रंजक माहिती अचूक आणि लगेच देणाऱ्या पटवर्धनांचे.
इतिहासावरील या प्रेमामुळेच असेल पण त्यांनी मुंबई पोलिसांचा इतिहास लिहिला. त्यांच्या निधनाने केवळ चेक घोटाळे उघड करणारा एक चलाख, कुशाग्र बुद्धीने तपास करणारा अधिकारीच नव्हे, तर समोर येणाऱ्या कामाला पूर्ण न्याय देणारी, त्यातही काही वेगळेपण आणून आपला ठसा त्यावर पाडणारी आणि प्रसंगी पोलिसांच्या विरुद्धही पण लोकांच्या बाजूने खंबीरपणे उभी राहणारी एक अभ्यासू, शहाणी वडीलधारी व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली आहे.