आनंदयोग : ध्यान आपल्या धरणीमातेचे! Print

 

भीष्मराज बाम - बुधवार, १८ जुलै  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पृथ्वीतत्त्वाचे महत्त्व तिच्यातील धारणशक्तीने अधोरेखित होते. पृथ्वीतत्त्वाचा अंश खऱ्या अर्थाने वृक्षांमध्ये संक्रमित झाल्याची प्रचीती येते. याचसाठी वृक्षाला सृष्टीच्या निर्मितिप्रक्रियेचे मूर्तरूप समजले जाते. वृक्षराजींनी नटलेल्या पृथ्वीच्या दर्शनाचे ध्यान म्हणूनच आनंददायी असते..
एका उन्हाळय़ात काही दिवस पाचगणीला राहायचा योग आला. तिथे एक मोठे पठार आहे. मी पहाटे उठून त्या पठारावर फिरायला जात असे. पूर्व दिशेला काही खडक होते.

त्यांच्यावर बसून उषादेवतेचे आणि उगवत्या सूर्याचे ध्यान अतिशय छान होत असे. दोन-तीन दिवसांनंतर माझ्या ध्यानात आले की, एक मोठा कुत्राही तिथल्या एका खडकावर बसून खालच्या दरीतले सौंदर्य निरखीत अगदी एकाग्र होऊन ध्यान लावल्यासारखा दिसत असे. आणखी काही दिवस तो त्याच वेळेला, त्याच जागी बसलेला आढळला. माझे कुतूहल जागे झाले आणि मी चौकशी केली. तेव्हा कळले की, तो पाचगणीतल्या एका भेळपुरीवाल्याचा कुत्रा होता आणि गेली कित्येक वर्षे त्यानेही पहाटेच्या ध्यानाची सवय लावून घेतली होती. इतरही काही लोकांनी याला दुजोरा दिला. मला फार नवल वाटले. कारण दरी खूप खोल होती. निसर्गरम्य दृश्यापलीकडे तिथून दुसरे काही दिसत नव्हते. पक्षी जसे पहाटे हिंकार करून प्रार्थना करतात, तसेच पशूसुद्धा करतात, पण पशू ध्यानसुद्धा करीत असल्याचे मी कधी ऐकले नव्हते.
आपतत्त्वाच्या ध्यानाप्रमाणेच पृथ्वीतत्त्वाचे ध्यानसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. चित्ताच्या प्रसन्नतेसाठी हिरवळीने, वृक्षराजीने व निसर्गसौंदर्याने नटलेल्या पृथ्वीचे दर्शनसुद्धा उपयोगी पडते. याचसाठी निसर्गरम्य ठिकाणी जाऊन राहण्याची ओढ सर्वानाच असते. पृथ्वीतत्त्वाच्या ध्यानासाठी जिथून क्षितिजापर्यंतचे दृश्य दिसत असेल असे स्थान निवडले जाते. गिरिकंदरांतून राहण्याची ओढ योग्यांनासुद्धा यासाठीच असते. पाचही महातत्त्वांनी मांडलेला निर्मितीचा खेळ डोळय़ांसमोर उलगडत जातो. या सर्व पसाऱ्यापुढे आपल्या अडचणी आणि समस्या किती क्षुल्लक आहेत ते जाणवायला लागते. निर्मितीसाठी आपल्या साऱ्या संहारक शक्तींना आवर घालायचा असतो तेही जाणवते. मनाची प्रसन्नता घालवत भय, शोक, अतृप्ती, क्रोध, मत्सर, मोह, लोभ अशा क्षुद्र भावनांची पकड ढिली व्हायला लागते आणि चित्त प्रसन्न होत जाते.
वस्तूंना आकार देणे हे पृथ्वीतत्त्वाचेच कार्य आहे. त्यामुळे देवतेच्या सगुण साकार मूर्तीचे ध्यान हे आरंभाला तरी पृथ्वीतत्त्वाचेच ध्यान आहे. देवतांच्या स्तोत्रे आणि आरत्या यांमधून त्यांच्या रूपाचे आणि आकाराचे वर्णन असते. त्यामुळे त्या देवतेचे स्वरूप डोळय़ांसमोर उभे राहून ध्यान करणे सोपे जाते. वृक्ष हे पृथ्वीदेवतेचे रोम मानले आहेत आणि ते म्हणजे सृष्टीच्या निर्मितिप्रक्रियेचे मूर्तरूप समजले जाते. वृक्षांचे संगोपन चांगले व्हावे यासाठी सारी महातत्त्वे हळुवार होतात. ऋतू हेसुद्धा वृक्षांच्या संगोपनाचे कार्य करतात. वारा, ऊन, पाऊस या सर्वाचा मारा सहन करण्याची शक्ती वृक्षामध्ये येते. वरून खाली वाहत जाण्याचा आपला नियम मोडून आपतत्त्व, वृक्षाच्या मुळापासून वर शेंडय़ापर्यंत पोहोचते आणि त्याला पाने, फुले आणि फळे यांनी समृद्ध करते. छाया देणे हासुद्धा पृथ्वीतत्त्वाचाच गुण आहे. रानावनांत मानवी संस्कृती निर्माण होत होती. त्याला धरतीमातेनेच वृक्षांची आणि गुहांची छाया देऊन आणि त्याला अन्न देऊन त्याचे पोषण केले.
स्वाध्याय परिवारामध्ये पूज्य दादाजींनी स्वाध्यायींना वृक्षमंदिराचा प्रयोग सांगितला. आसपासच्या वीस गावांतले स्वाध्यायी आळीपाळीने वृक्षमंदिरात येऊन तिथल्या वृक्षांची देवता या भावाने पूजा करतात म्हणजे त्यांची निगा राखतात. सर्व जाती-जमातींचे लोक यानिमित्ताने एकत्र राहायला लागले व त्यांच्यामध्ये उत्तम एकोपा निर्माण झाला आणि वृक्षांची निगा इतकी सुंदर झाली, की प्रत्येक वृक्षमंदिर हे मनोवेधक आणि आकर्षक असे उपवनच झाले आहे.
वृक्ष ही निसर्गातली उत्तम पुनर्निर्माणाची प्रक्रिया आहे. आपण सगळे घाणेरडे पदार्थ एकत्र करून कुजवून त्यांचे खत तयार करतो. हे वृक्षांचे अन्न आहे. ते अन्न पचवून वृक्ष सुंदर पाने, फळे आणि फुले निर्माण करतात. टेरी ऑर्लिक नावाचे अमेरिकेतले क्रीडा मानसशास्त्रज्ञ आहेत. आदिवासींची जीवनपद्धती अभ्यासण्यासाठी ते अमेरिकेजवळच्या एका बेटावर जाऊन राहिले. आदिवासींचा एक क्रीडा महोत्सव त्यांना पाहायला मिळाला. त्यात एक प्रथा अत्यंत काटेकोरपणे पाळली जात असल्याचे त्यांच्या ध्यानात आले. कोणतीही स्पर्धा संपली की, सर्व खेळाडू आपल्या संघाच्या आणि प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक खेळाडूला स्पर्श करून नंतर एका झाडाला स्पर्श करीत.
टेरी ऑर्लिक यांना ही काय प्रथा आहे ते जाणून घेण्याची उत्सुकता वाटली. त्यांनी दुभाष्यामार्फत त्या आदिवासींच्या वृद्ध मुखियाला खेळाडूंनी असे करण्याचे कारण विचारले. त्याचे उत्तर ऐकून त्यांना आदिवासींच्या शहाणपणाचे अतिशय कौतुक वाटले. खेळ ही स्पर्धा असल्याने खेळणाऱ्यांच्या मनात प्रतिस्पध्र्याविषयी आणि स्वत:च्या जोडीदाराविषयी किंवा आपल्याच संघाच्या खेळाडूबद्दल द्वेष, मत्सर, संताप अशा वाईट भावना निर्माण व्हायची शक्यता असते. स्पर्शाने प्रत्येक खेळाडूने या भावना त्या त्या खेळाडूकडून परत घ्यायच्या आणि त्या एखाद्या झाडाला अर्पण करून टाकायच्या. झाडामध्ये हे सर्व विष पचवण्याची शक्ती असते. या भावना खेळाडूच्या मनातच राहिल्या तर त्याचे व्यक्तिमत्त्व खुरटण्याचा धोका असतो म्हणून त्या झाडाला देऊन टाकायच्या.
क्रीडा मानसशास्त्रज्ञ असल्याने टेरी ऑर्लिक यांनी या संकल्पनेचा सुंदर उपयोग केला आणि "ळ१ी्रल्लॠ" हे तंत्र विकसित केले. वाईट भावना ज्या असतील त्या स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच नाहीशा झालेल्या चांगल्या. त्यामुळे या तंत्रात स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचल्यावर सुरुवातीलाच एखाद्या झाडाला स्पर्श करून आपल्या मनात नको असलेल्या ज्या भावना आणि विचार असतील ते सर्व एखाद्या झाडाला स्पर्श करून देऊन टाकायचे. नंतरच स्पर्धेच्या ठिकाणी आपली जागा घ्यायची.
एका वर्षी दिल्लीला कडाक्याच्या थंडीत नेमबाजीच्या स्पर्धा होत्या. आयोजनही अगदीच भिकार होते. महाराष्ट्राचे सर्व खेळाडू संतापून गेले आणि पहिले दोन दिवस आम्हाला एकही पदक मिळाले नाही. मग मी सर्वाना हे झाडाला स्पर्श करून वाईट भावना झाडाला देऊन टाकायचे तंत्र समजावले आणि ते त्यांच्याकडून रोज करूनही घेतले. उरलेल्या आठवडाभरात थंडीचा कडाका वाढतच गेला, पण आमच्या खेळाडूंनी ४९ सुवर्णपदके जिंकून सेनादलालाही मागे टाकण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या वर्षी उन्हाळ्याच्या उकाडय़ात या स्पर्धा झाल्या. तिथेही हे तंत्र उपयोगी पडले आणि आम्ही सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली.
सुंदर फुले ही वृक्षाच्या आयुष्यभराच्या तपश्चर्येनेच निर्माण होत असतात. गंध हा पृथ्वीतत्त्वाचा प्रधान गुण असल्याने पृथ्वीतत्त्व हे खडकापेक्षा नाजूक फुलांमध्ये जास्त प्रमाणात आहे असे मानले जाते. देवतेच्या ध्यानामध्येसुद्धा फुलांनी शंृगारलेल्या मूर्तीचे ध्यान करायचे असते. रोजच्या ध्यानाचा शेवटसुद्धा सुंदर फुलांचा गुच्छ आपण कोणाला देत आहोत किंवा कोणी तरी आपल्याला देत आहे असे चित्रण केले जाते. गुच्छाची आकर्षक मांडणी फुलांच्या सौंदर्यात भर घालते. हे फक्त मानवांनाच शक्य असते. गुच्छांची देवाणघेवाण हा परस्परांच्या गुणवत्तेचा सत्कार आहे, हे ज्या समाजात होत असेल त्याची उन्नती होणारच हे त्रिकालाबाधित सत्य आहे.