आनंदयोग : मातेचा प्रेमळ स्पर्श! Print

 

भीष्मराज बाम, बुधवार, २५ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गती आणि हालचाल नियंत्रण करणारे वायुतत्त्व हे जितके संहारक आहे तितकेच जीवसृष्टीच्या निर्मितेत ते प्राणरूप धारण करते. सारी इंद्रिये, मन व वाणी त्याच्याच आधारावर कार्य करतात. स्पर्शाने त्याची अनुभूती मिळते..
गेल्या वर्षी अमेरिकेत असताना ‘इरिन’ या नावाचे तुफानी वादळ अ‍ॅटलान्टिक समुद्रावरून घोंघावत आले. त्यामुळे आमच्या वास्तव्याच्या शेवटल्या आठवडय़ाच्या कार्यक्रमाची पार वाताहत झाली. आफ्रिकेपासून हे वादळ निघाले आणि शक्तिमान होत अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर येऊन आदळले.

संपूर्ण किनाऱ्याच्या तिसऱ्या हिश्शाएवढा त्याचा व्याप होता. पूर्व किनाऱ्यावरच्या अनेक शहरांना या वादळाचा तडाखा बसला. न्यूयॉर्क आणि बोस्टन या मोठय़ा शहरांचा बराचसा भाग बरेच दिवस पाण्याखाली होता. अशी वादळे बहुतेक खंडांच्या किनारपट्टीवर दरवर्षी हल्ला चढवीत असतात, पण या वादळाच्या निमित्ताने अमेरिकेतल्या शासनयंत्रणेच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यपद्धतीतली सुसूत्रता आणि शिस्त पाहायला व अनुभवायला मिळाली.
हवामान खात्याचे अंदाज बरेचसे बरोबर ठरले. सहा राज्यांनी ताबडतोब आणीबाणी जाहीर केली व ज्या भागांत पुराचे पाणी शिरण्याची शक्यता होती तेथल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. फायर ब्रिगेडने स्वयंसेवकांच्या साहाय्याने उत्तम कार्य केले. पोलिसांनी आणि इतर शासनयंत्रणांनीही आपली जबाबदारी चोख पार पाडली आणि जीवितहानी सत्तर या आकडय़ापर्यंत सीमित राहिली. आपल्याकडच्या आपत्ती नियंत्रणाबद्दल न बोललेलेच बरे!
पाच महातत्त्वांपैकी वायुतत्त्व हे गती आणि हालचाल या दोन्ही बाबी नियंत्रित करते. त्याचा गुण ‘स्पर्श’ हा आहे. अग्निप्रमाणेच वायूमध्येही प्रचंड संहारक शक्ती आहे, पण जीवसृष्टीच्या निर्मितीसाठी संहारक शक्ती आवरून धरून तो प्राणाचे रूप धारण करतो आणि सर्वाचे पोषण करायला साहाय्य करतो. सारी इंद्रिये, मन व वाणी त्याच्याच आधारावर कार्य करतात.
पवनपुत्र अशी ख्याती असलेला हनुमान याची उपासनाही वायूचीच उपासना समजली जाते. जितेन्द्रिय असल्यामुळे तो अतिशय बलवान आहे आणि बुद्धिवंतांत सर्वश्रेष्ठ असल्याने तो रामाचा सेनापतीही आहे. वायूच्या म्हणजे बलाच्या उपासनेत प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण आणि शरीर व इंद्रियांचे व्यायाम असे दोन्ही भाग येतात. मन, प्राण आणि वाणी या तीन शक्ती आपल्याला सर्व कार्ये करण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामध्ये वर्तमानात राहून एकाग्र होण्याकरिता प्राणशक्तीचाच उपयोग केला जातो. डोळे व कान ही दोन इंद्रिये आपण कोठे आहोत त्याचे भान आणतात आणि श्वसन ही सतत वर्तमानात होत राहणारी क्रिया वर्तमानाचे भान जागे ठेवते.
कोणताही खेळ उत्तम खेळण्याकरिता अतिशय श्रेष्ठ दर्जाची एकाग्रता लागते. स्थळ आणि काळ या दोन्ही बाबींची जाणीव त्यामुळे फारच महत्त्वाची ठरते. तुम्ही जिथे आहात तिथे आणि त्या क्षणाला काय घडते आहे ते तुमच्या नीट ध्यानात यायला हवे आणि ते समजायला आणि उमजायला हवे. तुमचे प्रतिसादसुद्धा जलद आणि अचूक यायला हवेत. तुम्ही जो सराव करीत असाल तीसुद्धा प्राणशक्तीचीच उपासना आहे. ज्या हालचाली तुम्हाला करायच्या असतील त्या नीट लक्ष देऊन सरावाच्या वेळी तुम्ही अचूक करायचा प्रयत्न करीत असता. असे एकाग्र होऊन परत परत करण्याने निरीक्षण, आकलन, अनुमान आणि अचूक प्रतिसाद यांना लागणाऱ्या पेशी तुमच्या यंत्रणेमध्ये निर्माण होतात. म्हणजे मग उत्तम खेळ करण्याची सिद्धी तुमच्यामध्ये येते.
कशावर एकाग्र व्हायचे आणि कोणता प्रतिसाद प्रगट करायचा हे तुमच्या सिद्धीमुळे अचूक व्हायला लागते, त्यात एक सहजता येते. ती तुमच्या हालचालीत दिसून येते आणि त्या जास्त जास्त आकर्षक व्हायला लागतात. म्हणूनच जे उत्तम खेळाडू असतील त्यांचा खेळ सर्वानाच पाहावासा वाटतो. मुळात कशावर एकाग्र व्हायचे हे ठरविण्याची शक्तीच प्राणायामामुळे वाढत असल्याने नियमित प्राणायाम करायलाच हवा. प्रत्यक्ष सरावात आणि सामन्याच्या वेळी मधूनमधून मोकळे क्षण सापडतात. तेव्हा मनात भलतेच विचार येऊन ते भरकटण्याचा किंवा प्रलोभनांकडे आकर्षित होण्याचा मोठाच धोका असतो. तेव्हा तो वेळ श्वासावर लक्ष देण्याकडे वापरावा आणि प्रत्यक्ष कृती करीत असताना संपूर्ण लक्ष कृतीवर ठेवण्याची सवय लावून घ्यावी. कोणत्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यासाठी हे तंत्र उपयोगी पडते, पण ते प्रभावी ठरण्यासाठी नियमित प्राणायाम करणे आवश्यक आहे.
श्वासाबरोबर ऊर्जा शरीरात आणण्याचे आणि वापरलेल्या ऊर्जेने दूषित झालेले वायू बाहेर टाकण्याचे कार्य प्राणवायू करतो. आपण जे अन्न व पाणी सेवन करतो त्यातली ऊर्जा वेगळी करण्याचे काम समान वायू करतो. वेगळी केलेली ऊर्जा शरीरभर पसरवून तिचे साठे निर्माण करण्याचे काम व्यान वायू करतो आणि अन्नपाण्यातली ऊर्जा काढून घेतल्यावर शिल्लक राहिलेला मल बाहेर टाकण्याचे काम अपान वायू करतो. गतीसाठी आणि शरीराच्या हालचालींसाठी या ऊर्जाच्या साठय़ातली शक्ती उदानवायू वापरतो. दीर्घ श्वसन आणि प्राणायाम ही प्राणवायूची उपासना आहे. आहारातला चोथा अपानवायूचे कार्य उत्तम पार पाडण्यास मदत करतो. सहज पचणारा आणि पौष्टिक आहार घेणे ही समान वायूची उपासना आहे. व्यायामाने शरीराचे रक्ताभिसरण सुधारत,े त्यामुळे नियमित व्यायाम ही व्यान वायूची उपासना आहे. कला आणि क्रीडा यांच्या सरावाने शरीराच्या स्नायू व सांध्यांच्या हालचाली व्यवस्थित व्हायला लागतात. ही उदान वायूची उपासना आहे. हालचाल पूर्ण थांबण्याचा योगासनांचा व्यायाम हीसुद्धा उदान वायूचीच उपासना आहे, कारण हालचाल करण्याची प्रेरणा मनात निर्माण होऊन ती प्रत्यक्षात आणण्याचे कार्य उदान वायू करतो.
प्राणायाम आणि योगासने, कला आणि क्रीडा, आहार आणि विश्रांती यांच्यावर नियंत्रण या साऱ्या वायुतत्त्वाच्याच उपासना आहेत. त्याने आपले आरोग्य आणि काम करण्याचा उत्साह टिकून राहतो, दीर्घायुष्याची प्राप्ती होते, विकारांवर नियंत्रण ठेवता येऊन हातून उत्तम कार्य घडते. श्वसनक्रियेमुळे आपल्या शरीरयंत्रणेचा विश्वातील ऊर्जेशी प्रत्यक्ष संपर्क राहतो. आपण विजेचे कनेक्शन घेतले तर आपण वापरत असलेल्या सर्व साधनांना, उपकरणांना लागत असलेली वीज आपण तारांच्या साहाय्याने घेऊ शकतो, पण या सर्व तारा आणि उपकरणे यांची जेवढी शक्ती असेल तेवढीच वीज आपल्याला घेता येईल. या तारा आणि उपकरणे सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. तसे केले नाही तर सारी यंत्रणाच जळून जाईल.
शरीरातल्या सर्वच संस्था नियमित प्राणायाम, व्यायाम व आहार यांनी उत्तम स्थितीत ठेवता येतात आणि आपल्या यंत्रणेची ऊर्जा ग्रहण करण्याची, ती वापरण्याची आणि तिचा साठा करण्याची शक्तीसुद्धा वाढत राहते. ज्ञान-कौशल्य उत्तम ग्रहण करता येते आणि त्यांचा वापरही उत्तम करता येतो. समाजाला उपयोगी पडणारी कार्ये हातून घडतात.
वायुतत्त्व आपल्याला प्रत्यक्ष दिसत नसले तरी पृथ्वीभोवती त्याचे आवरण असतेच. त्यात गती आणि हालचाल ही निर्माण झाली की, स्पर्शाने आपल्याला ते जाणवते. आईबापांना आपल्या मुलाबद्दल वाटणाऱ्या वात्सल्याने त्याला प्रेमळ स्पर्श करावा आणि त्याला जवळ घ्यावे असे वाटत असते. त्याच वात्सल्याने जगाचा नियंता तुम्हाला वायूच्या हाताने कुरवाळत असतो. आपण आपल्या उपासना व्यवस्थित केल्या तर त्याच्या जास्त जवळ जातो. मग आईच्या कुशीत विसावलेल्या बालकाचा आनंद आपल्या वाटय़ाला येतो. तो मिळविण्यासाठी एवढे तप करायलाच हवे.