वार्ता ग्रंथांची.. : पन्नाशीतल्या ‘अमूल गर्ल’विषयी.. Print

 

शनिवार, २८ जुलै २०१२
एकदिवसीय सामन्यात जावेद मियाँदादने चेतन शर्माच्या अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकून पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता. त्यावेळी त्या सामन्याचे रसभरीत वर्णन अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाले होते.

मात्र त्यातील मर्म केवळ एकाच वाक्यात पकडण्याची किमया एका जाहिरातीने केली होती. ती जाहिरात होती अमूल बटरची! त्या जाहिरातीतील कॅचलाइन होती, ‘मियाँ की दाद से शर्मा गया!’ सोबत सर्वाना परिचित असणाऱ्या ‘अमूल गर्ल’ची छबी होतीच.  सामाजिक-राजकीय आदी सर्वच क्षेत्रांतील ताज्या घडामोडींवर खुसखुशीत भाष्य करण्याची ‘अमूल गर्ल’ची ही परंपरा कालपरवाची नाही. अमूलच्या या जाहिरातींनी नुकतीच ५० वर्षे पूर्ण केली. ५० वर्षांतील या जाहिरातबाजीची कायमस्वरूपी नोंद व्हावी यासाठी ‘अमूल्स इंडिया’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले. हार्पर कॉलिन्स इंडियाचे प्रकाशन असणाऱ्या या पुस्तकात अनेक लेखक तसेच प्रसिद्ध व्यक्तींनी ‘अमूल गर्ल’विषयी आपणांस काय वाटते, याचा लेखाजोखा मांडला आहे. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन, खासदार मिलिंद देवरा ही यातील काही वानगीदाखल नावे. ‘अमूल गर्ल’ची कल्पकतेने जाहिरात करणाऱ्या डिकू्न्हा कम्युनिकेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक राहुल डिकून्हा यात म्हणतात, ‘सर्वसाधारण मुली घालतात तसा ठिपक्यांचा फ्रॉक, त्याच डिझाइनची छोटी रिबीन, निळे (!) केस आणि चेहऱ्यावरील खटय़ाळ भाव ही आमच्या ‘अमूल गर्ल’ची वैशिष्टय़े असून तिच्याच माध्यमातून गेली ५० वर्षे अमूल बटरचा देशभर प्रसार होत आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. एवढय़ा वर्षांनंतरही समाजातील सर्व वयोगटांत आणि सर्व थरांत ती लाडकी असल्याने तिची केशभूषा-वेषभूषा बदलण्याचा आमचा कोणताही विचार नाही.’ परवा सुपरस्टार राजेश खन्ना यांना श्रद्धांजली वाहाताना या ‘अमूल गर्ल’च्या जाहिरातीत लिहिलेले, ‘अमूल प्रेम' हे दोनच शब्द पुरेसे बोलके ठरले!