एका इतिहासपुरुषाची कथा Print

पांडुरंग बलकवडे ,रविवार, २९ जुलै २०१२
शिवचरित्राचा आणि मराठशाहीचा चालता बोलता इतिहास म्हणजे बाबासाहेब पुरंदरे होय!
शिवभक्तीने भारावलेल्या या अवलियाने आपल्या ९० वर्षांच्या आयुष्यात ‘राजा शिवछत्रपती’सारखा अद्वितीय ग्रंथ, ‘जाणता राजा’सारखे महानाटय़ आणि आपल्या ओघवत्या वाणीतील हजारो शिवचरित्र व्याख्यानांच्या माध्यमातून देशभरातच नव्हे तर जगभरात शिवचरित्राचा अखंड जागर केला. त्यांच्या या शिवभक्तीची कुळकथाही तितकीच वेधक आहे. शंभर वर्षांपूर्वी शिवरायांच्या महान कर्तृत्वाने भारावलेल्या जेम्स डग्लस यांना शिवाजी राजांच्या देशबांधवांनाच त्यांचा पडलेला विसर पाहून फार खंत वाटते. त्याबद्दल तो आपल्या ‘बुक ऑफ बॉम्बे’ या ग्रंथात तीव्र खेद व्यक्त करताना आवाहन करतो, की कुठे तुमचे हे कवी?
कुठे आहेत तुमचे कादंबरीकार? कुठे आहे ते तुमचे इतिहासकार ज्यांना आजवर शिवचरित्र लिहावेसे वाटले नाही. त्यांच्या या प्रश्नांनी घायाळ झालेल्या बाबासाहेबांनी ऐन तारुण्यात सार्थ शिवचरित्र लिहिण्याचा संकल्प सोडला आणि तेच आपल्या जीवनाचे ध्येय मानले आणि ते साकार करण्यासाठी अविरत धडपड केली.
शिवचरित्र लेखन हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे, याची त्यांना जाणीव होती. त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. शेकडो किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांची हजारो मैलांची पायपीट केली. देशाच्या कानाकोपऱ्यातील दप्तरखाने पालथे घातले. मोडी, पर्शियन, इंग्रजी भाषा शिकून तसेच पोर्तुगीज, डच कागदपत्रांचा आणि साधनांचा सखोल अभ्यास केला.
ऐतिहासिक साधनांच्या सत्यतेवर आधारित चरित्रग्रंथ लेखन करीत असताना ते रुक्ष न होता, सामान्य वाचकालाही वाचनीय वाटावे यासाठी त्यांनी आपल्या अंगच्या प्रतिभाशक्तीला पणाला लावले. त्यातूनच हे शिवचरित्र साकार झाले आहे.
आपले शिवचरित्र सिद्ध करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील ग्रंथालये आणि दप्तरखान्यात त्यांनी आपल्याला गाडून घेतले. इतिहास संशोधक मंडळातील ग. ह. खरे यांच्यासारख्या तपस्वी संशोधकांचे विशेष मार्गदर्शन घेतले तर शं. ना. जोशी, स. ग. जोशी, शां. वि. आवळसकर, द. वा. पोतदार, य. न. केळकर अशा दिग्गज संशोधकांचे सहाय्य घेतले. एवढय़ा अथक प्रयत्नाने साकार झालेल्या शिवचरित्राच्या छपाईसाठीही त्यांना अनेक दिव्य पार करावी लागली. पुस्तकाच्या छपाईसाठी आणि आपल्या नित्याच्या खर्चासाठी त्यांना अनेक छोटय़ा- मोठय़ा नोकऱ्या कराव्या लागल्या. परंतु नोकरी करणे हा त्यांचा पिंड नव्हता. खिशात एक दमडी शिल्लक नसताना, पन्नास-साठ वर्षांपूर्वी २५ ते ३० हजार रुपयांची रक्कम उभी करताना त्यांची चांगलीच उरफड झाली.
गावोगावी हिंडून पुस्तके विक्रीचा व्यवसाय केला. हे ही नसे थोडके म्हणून रोज पुणे-मुंबई प्रवास करून पुण्याची भाजी मुंबईच्या भायखळा बाजारात नेऊन विक्रीचा व्यवसाय करावा लागला. अशा विविध दिव्यांतून साकार झालेले त्यांचे शिवचरित्र हे मराठी सारस्वताचे एक सुंदर लेणे ठरले आहे.
इतिहासाचे हे वेड घेतलेल्या या तरुणाची लोकांनी कधी टिंगल टवाळी केली, परंतु पुढे तोच तरुण आपल्या ज्ञानाने, वक्तृत्वाने, तपस्येने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला व त्याने अवघ्या महाराष्ट्राला शिवभक्तीचे वेड लावले.
हजारो श्रोत्यांना तासन्तास एकाच जागी खिळवून ठेवण्याचे सामथ्र्य बाबासाहेबांच्या अमोघ वाणीत आहे. निसर्गदत्त धीरगंभीर वाटणारा राकट आवाज, अचाट स्मरणशक्ती, प्रगट चिंतन, कठोर अभ्यासाची ताकद आणि हावभावाला अभिनयाची लाभलेली जोड यामुळे त्यांचे व्याख्यान हे ज्ञानाची मेजवानी असते. युवकांमध्ये शिवभक्तीबरोबरच देशप्रेम निर्माण करण्याचे त्यांचे कार्य अविरत चालू आहे. ‘जाणता राजा’सारखं महानाटय़ रंगभूमीवर आणून देशभरातच नव्हे तर परदेशांतही त्याचे शेकडो प्रयोग त्यांनी घडवून आणले आणि शिवकथा देशापल्याड नेण्याचे महान कार्य केले आहे.
दिलेला शब्द आणि वेळ पाळण्याच्या बाबतीत बाबासाहेब अगदी काटेकोर आहेत. सर्व विचारधारेच्या लोकांवर ते आपल्या विचारांची छाप सहज उमटवतात व त्यांची मैत्री संपादन करतात. परस्पर विरोधी विचारधारेची मंडळी बाबासाहेबांच्या मैफिलीत सहज एकत्र येतात.
७ एप्रिल १९६७ रोजी बाबासाहेबांच्या प्रेरणेतून ‘महाराजा प्रतिष्ठानची’ स्थापना झाली. शिवाजी महाराजांच्या महान जीवनचरित्राचे यथार्थ दर्शन घडविण्यासाठी प्रदर्शन, महानाटय़, चित्रपट आणि स्मारके यांची उभारणी करणे हे या प्रतिष्ठानचे मुख्य उद्दिष्ट आहे. याच माध्यमातून ‘जाणता राजा’ हे महानाटय़, विश्रामबाग वाडय़ातील प्रदर्शन, आंबेगावची शिवसृष्टीसारखे भव्य-दिव्य प्रकल्प हाती घेण्यात आले. बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहेत. जेम्स डग्लसच्या दु:खी आत्म्याला बाबासाहेबांच्या या प्रयत्नाने निश्चित दिलासा लाभला असेल. उराशी बाळगलेल्या सर्व स्वप्नांची पूर्तता झाल्याचे पहाण्याचे भाग्य बाबासाहेबांना लाभावे हीच परमेश्वराकडे प्रार्थना!-