बाबासाहेब, माझे शिवाजी! Print

माउली शिरवळकर ,रविवार, २९ जुलै २०१२
(शब्दांकन - रसिका मुळ्ये)

लहानपणापासून बाबासाहेबांच्या वाडय़ातच खेळलो. आमचे नाते हे वडील-मुलासारखे, ते नेमके कधी आणि कसे जुळले, ते सांगता येणार नाही! त्यांचे ऐटबाज वागणे, बोलणे, लांब दाढी, करारीपणा, त्यांची घोडय़ावरची रपेट या सगळ्याची लहानपणापासूनच भुरळ पडली होती.
लहानपणापासून बाबासाहेब मला शिवाजी महाराजांचे प्रतिरूपच वाटत आले आहेत.
बाबासाहेबांच्या सहवासातच मी खूप काही शिकलो. रोज हडपसर ते मुंबई प्रवास करून भाजी विकणारे बाबासाहेब मी पाहिलेत, पुस्तके विकणारे बाबासाहेब पाहिलेत. त्यांच्याकडून शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकतच आम्ही मोठे झालो. शिवाजी महाराज आणि बाबासाहेब हे समीकरण वेगळेच आहे.
आज शिवाजी महाराज असते आणि त्यांना एखाद्या लढाईचा दिवस, वार विचारला असता, तर त्यांनाही कदाचित सांगता आला नसते. मात्र, बाबासाहेब सगळे क्षणार्धात सांगतात. बाबासाहेबांनी शिवचरित्र लिहिले ही गोष्ट सर्वाना माहिती आहे. मात्र, हे शिवचरित्र लिहिण्यासाठी त्यांनी जवळपास तीन लाख किलोमीटर प्रवास सायकलवरून केला आहे. इतकेच नाही, तर शिवाजी महाराज आग्य्राहून पळाल्यानंतर त्यांनी ज्या मार्गाने प्रवास केला, त्या मार्गाने बाबासाहेबांनी चालत प्रवास केला आहे.
बाबासाहेबांच्या ‘जाणता राजा’मध्येही मी अजूनही काम करतो. माझी मुलेही जाणता राजामध्ये काम करतात. जाणता राजाच्या सर्व संघामधला मी एकमेव कलाकार असा आहे, की मला वाटले, आज काम करावे की मी स्टेजवर उभा राहतो. ‘जाणता राजा’ उभे करण्यासाठी बाबासाहेबांनी अपार कष्ट घेतले आहेत. ‘जाणता राजा’च्या निमित्ताने बाबासाहेबांमधील दिग्दर्शक मी पाहिला. ‘जाणता राजा’च्या संघात विविध वयाचे, विविध स्वभावाचे कलाकार आहेत.
प्रत्येक कलाकाराला समान वागणूक मिळते. अत्यंत शिस्त, नेटकेपणा हे ‘जाणता राजा’च्या संघाचे वैशिष्टय़!
‘जाणता राजा’मधील शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी बाबासाहेबांनी स्वतच आवाज दिला आहे. एकदा त्यांच्याबरोबर एका शूटिंगला गेलो होतो.
घोडेसवारीचा प्रसंग होता. त्या प्रसंगात अनेक महिला घोडय़ावर बसल्या होत्या. मला चांगली घोडेसवारी जमायची.
बाबासाहेबांनी त्या वेळी मला त्या प्रसंगामध्ये सामील होऊन घोडसवारी करायला सांगितले. महिलांबरोबर घोडसवारी करायची होती.. मी नाही सांगितले. बाबासाहेबांनी त्यातला एकीला हाक मारली. आणि मला म्हणाले, ‘‘पाहा, महिला घोडसवारी करतात..
तुम्ही तसेच बसा.’’ अर्थातच त्या प्रसंगासाठी मी घोडेसवारी केली. त्यांचा अजून एक जाणवलेला पैलू म्हणजे, ते एखादी गोष्ट हवी असेल, तर अत्यंत कौशल्याने ती गोष्ट मिळवतात.
अनेक ठिकाणी फिरून, अनेकांची मने वळवून बाबासाहेबांनी जुनी हत्यारे, वस्तू, पत्रे असा खजिना साठवलेला आहे. समोरच्या व्यक्तीला त्या वस्तूचे मूल्य पटवून देऊन, त्याची ऐतिहासिक महती पटवून देऊन बाबासाहेबांनी अनेक वस्तू गोळा केल्या आहेत. ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी बाबासाहेबांनी प्रसंगी वाईटपणाही घेतला आहे, अनेक प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. मात्र, त्यांना प्रत्येक ठिकाणी डावलले गेले, याची खंत वाटते. बाबासाहेबांबरोबर मी खूप ठिकाणी फिरलो. त्यांचे अनेक किस्से सांगण्यासारखे आहेत. त्यांच्याबरोबर मी एकदा स्वामीच्या शूटिंगला गेलो होतो.
तिथे सूर्यकांत मांढरे होते. बाबासाहेबांना पाहून सूर्यकांत पुढे आले आणि म्हणाले, ‘‘मुजरा बाबासाहेब.. कसे वाटतात मल्हारबा?’’ बाबासाहेबांनी सूर्यकांतवर एक नजर फिरवली आणि क्षणात म्हणाले, ‘‘अजून खूप कमी आहेत, मस्तकी भंडारा नाही, गळ्यात मल्हारीची पोत नाही, खांद्यावर घोंगडी नाही.’’ सूर्यकांतनी दिग्दर्शकाला सांगून सगळे मागवले, मागच पुढचे शूटिंग सुरू झाले. त्याचवेळी बाबासाहेबांच्याच सांगण्यावरून सूर्यकांतनी ‘धाकली पाती’ हे पुस्तक लिहिले.
बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व एकूणच आकर्षक! शिस्त ही बाबासाहेबांची ओळख, थोडेसे कडक, मात्र तरीही अत्यंत प्रेमळ! त्यांचा स्वभाव अत्यंत दानशूर. आजपर्यंत एखाद्याला जेवढी मदत करता येईल, तेवढी त्यांनी केली आहे. कधीही काही हातचे राखून ठेवले नाही. अनेकांची शिक्षणे त्यांनी केली आहेत. कोणत्याही राजकारणात न पडणारे बाबासाहेब माझ्या प्रचारासाठी आवर्जून वेळ काढत. माझ्या मुलाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिकाही बाबासाहेबांच्याच नावाने होती.
लहानपणापासून त्यांच्या भरदार आवाजात ऐकलेल्या शिवाजी महाराजांच्या, शाहू महाराजांच्या गोष्टींमधून खूप काही मिळाले. माझ्यातील ‘मवाली’चा बाबासाहेबांनी ‘माउली’ केला. बाबासाहेबांनी मला मूल्य दिले. जगण्यासाठी लागणारी शिदोरी दिली. बाबासाहेब कोणतीही गोष्ट कधी थेटपणे शिकवत नाहीत.
त्यांच्या वागण्या बोलण्यातूनच अनेक गोष्टी शिकता येतात. लहानपणापासून त्यांचा आदरयुक्त दरारा मला वाटत आला आहे. त्यामुळेच कोणत्याही अपप्रवृत्तींना मी कधी बळी पडलो नाही.
सुखात आणि दुखात मला बाबासाहेबांची कायमच साथ मिळत आली आहे. वेळ पाळण्याबाबत बाबासाहेब अत्यंत काटेकोर! एकदा बाबासाहेबांना मी विचारले, ‘‘भारतात इतके राजे होते, अत्यंत कर्तबगार सरदार होते, तुम्हाला शिवाजी महाराजच का भावले?’’ बाबासाहेबांनी उत्तर दिले, ‘‘वेळ.. शिवाजी महाराजांना वेळेचे महत्त्व नेमके माहीत होते. वेळ ओळखणे आणि ती पाळणे या दोन्ही गोष्टींमध्ये शिवाजी महाराज सामावलेले आहेत.’’ मी महापौर झाल्यावर बाबासाहेबांना मी विचारले होते, ‘‘मी आता महापौर झालो, शासन चांगले चालवण्यासाठी शिवाजी महाराजांची नीती मला सांगा.’’ त्या वेळी बाबासाहेबांनी मला शिवाजी महाराजांच्या नीतीमधील साम, दाम, दंड या तीनच गोष्टी सांगितल्या, भेद ही चवथी नीती सांगण्याचे त्यांनी टाळले. माझी महापौर पदाची कारकीर्द गाजण्यामध्ये बाबासाहेबांच्या शिकवणीचा मोठा वाटा आहे. बाबासाहेबांच्या मनी शिवाजी महाराज आहेत आणि माझ्या मनी बाबासाहेब!