प्रेरक शक्ती! Print

किरण ठाकूर ,रविवार, २९ जुलै २०१२
अध्यक्ष, लोकमान्य सोसायटी

मंगळवार, २४ जुलै २०१२ पुण्यात दुपारी बाबासाहेबांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलो. त्यांना ९० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी आयुष्यभर शिवचरित्रासाठी केलेला संघर्ष बेळगाव आणि सीमाभागातील मराठी भाषकांच्या मनात शिवचरित्राच्या माध्यमातून फुलविलेले स्फुल्लिंग आणि ‘जाणता राजा’ महानाटय़ाच्या माध्यमातून बेळगावातील आमच्या काही संस्थांना दिलेले सहकार्य हे सगळं मनात आठवत आठवत पुरंदरे वाडय़ातून बाहेर पडलो. तोच दुपारनंतर समजले की, कर्नाटक विधानसभेने मला आणि ‘तरुण भारत’ ला त्रास देण्यासाठी हक्कभंगाचे शस्त्र उपसण्याचे ठरविले आहे. संघर्ष हा आम्हा सीमावासीयांच्या पाचवीलाच पूजला आहे. तो आम्हाला नवीन नाही. तरीही आम्ही लढतो आहोत, ते शिवचरित्राच्या प्रेरणेने आणि शिवशाहिरांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वामुळे. ते आम्हा सीमावासीयांचे एक आदराचे प्रेरणास्थान आहे. आमच्यासाठी बाबासाहेब ही एक प्रेरक शक्ती आहे. माझे वडील (स्व.) बाबुराव ठाकूर आणि बाबासाहेबांचे स्नेहपूर्ण संबंध होते. संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो की गोव्याच्या मुक्तीचा लढा. बेळगाव हे त्यातले एक महत्त्वाचे केंद्र होते आणि आमचे घर तसेच ‘तरुण भारत’ कार्यालय हे आंदोलकांचे निवासस्थान होते. त्यामुळे लहानपणापासून मी अनेक थोर माणसं जवळून पाहिली. त्यातील वयानं अनेक ज्येष्ठ मंडळी आज हयात नाहीत. पण त्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून आज बाबासाहेब नव्वदी ओलांडूनही त्याच जोमाने आमच्याबरोबर कार्यरत आहेत, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. माझ्या वडिलांनी आपले सहकारी गणपतराव कुलकर्णी आणि अन्य मंडळींच्या सहकार्याने बेळगावात बाबासाहेबांच्या शिवचरित्र व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. मीही त्यात एक लहानसा कार्यकर्ता म्हणून सहभागी होतो. ती व्याख्यानं आजही आम्हा बेळगावकरांच्या काना-मनात साठवलेली आहेत. त्यावेळी बाबासाहेबांसमवेत बेळगाव परिसरातील किल्ले आणि काही ऐतिहासिक स्थळांना आम्ही भेटी दिल्याची आठवण मला आहे. पुढे आम्ही बेळगावातील आमच्या शैक्षणिक उपक्रमांच्या मदतीसाठी ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे प्रयोग व्हावेत, अशी बाबासाहेबांना विनंती केली. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आम्हाला आनंदाने मान्यता दिली. दोन-तीन वेळा मिळून एकूण १७ प्रयोग आम्ही बेळगावला केले. आमच्या संस्थांना मदत झाली. त्याबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत.
एक प्रसंग मला ऐकायला मिळाला आणि आमच्या मनातील बाबासाहेबांबद्दलचा आदर आणखीन वाढला. पत्रकारितेमधील माझे सहकारी डॉ. सागर देशपांडे यांनी मला सांगितलेला हा प्रसंग आहे. पुण्यातून कोणत्या तरी सांस्कृतिक स्पर्धासाठी प्रवेशिका मागविण्यात येत होत्या.
बाबासाहेबांसमोरच त्याबाबतची चर्चा सुरू होती. त्यापैकी संयोजन करणाऱ्या एका व्यक्तीला त्यांनी विचारले की, मराठीतून स्पर्धा होणार असतील तर मग बेळगावच्या मंडळींनाही कळवले आहे का? त्यावर त्यांनी बाबासाहेबांना सांगितले, बेळगाव महाराष्ट्रात कोठे आहे? त्यावर खाडकन उसळून बाबासाहेब त्या व्यक्तीला म्हणाले, कोण म्हणते? बेळगाव आणि आसपासचा मराठी मुलूख पूर्वीही महाराष्ट्राचा होता आणि आजही आहेच. तुम्ही बेळगावकरांना आवर्जून या स्पर्धेसाठी बोलवा. आम्ही आमच्या लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीमार्फत गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवरील एक सन्मान योजना सुरू करण्याचे ठरविले आहे. ५ लाख ५१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे त्याचे स्वरूप निश्चित केले. अर्थातच, अनेक मान्यवर नावांबरोबरच पहिले नाव समोर आले, ते बाबासाहेबांचे! पुण्यात एका शानदार समारंभात अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत बाबासाहेबांना हा ‘लोकमान्य मातृभूमी’ पुरस्कार देऊन आम्हाला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी मिळाली. त्याबद्दल मला आणि माझ्या सहकाऱ्यांना धन्य वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेकांनी लिहिले. अनेकजण त्याबाबत बोलले. परंतु, बाबासाहेबांनी ज्या महाराष्ट्रात ते लिहिले, त्यावर हजारो व्याख्याने दिली. त्याची अन्य कोणाशीच तुलना होऊ शकत नाही. बाबासाहेबांनी आता शताब्दीच्या वाटेवर आपला प्रवास सुरू केला आहे. त्यांना उत्तम दीर्घायुष्य मिळावे आणि त्यांच्या मनातील शिवचरित्रविषयक योजना प्रत्यक्ष साकारण्यासाठी आम्हालाही सहयोग देण्याची संधी मिळावी, ही ईश्वराकडे प्रार्थना.