शिवशाहिरांचा प्रेरणादायी जीवनप्रवासाचा खजिना Print

डॉ. सदाशिव शिवदे ,रविवार, २९ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

शिवशाहीर बाबासाहेबांनी गेल्या वर्षी ९० व्या वर्षांत पदार्पण केलं, त्यानिमित्ताने ‘जडण-घडण’ मासिक आणि सह्य़ाद्री प्रकाशनानं पुण्यात आयोजित केलेला कार्यक्रम माझ्यासारख्या असंख्य शिवभक्तांच्या आयुष्यातील कधीही न विसरण्याजोगी संध्याकाळ होती.
चाफ्याच्या फुलांचा घमघमाट, ऐतिहासिक काळात घेऊन जाणारे व्यासपीठ, त्यावरील तुळजाभवानीची भव्य मूर्ती, जुने खांब, कवडय़ाच्या माळांनी होणारं मान्यवरांचं स्वागत अन् जोडीला गोंधळ्यांनी भंडारा उधळत वाजवलेला संबळ.. अक्षरश: देहभान हरपून आम्ही तो कार्यक्रम कानामनात साठवत होतो. पत्रकार-संपादक अन् प्रभावी वक्ते असलेले आमचे लेखकमित्र डॉ. सागरराव देशपांडे यांनी ११ वर्षे अहोरात्र परिश्रम घेऊन बाबासाहेबांचा चरित्र ग्रंथ सिद्ध केला होता- ‘बेलभंडारा.’ तुळजाभवानीच्या मूर्तीच्या मागून एका कोनाडय़ातून हे पुस्तक व्यासपीठावर सादर झालं अन् सागररावांच्याच आगळ्यावेगळ्या कल्पनेनुसार आधुनिक अष्टप्रधान मंडळानं बाबासाहेबांच्या साक्षीनं या ग्रंथाचं प्रकाशन केलं. डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, दाजीकाका गाडगीळ, रावसाहेब शिंदे, डॉ. शां. ब. मुजुमदार असे दिग्गज एकत्र आणण्याची किमया ‘बेलभंडारा’ नं साधली होती.
बेलभंडारा पाहताच अक्षरश: आपण मंत्रमुग्ध होतो. अक्षरश: बाबासाहेबांचं बोट धरून आपण त्यांच्या जीवनात प्रवेश करतो आहोत, अशी प्रभावी भाषाशैली, आंतरराष्ट्रीय स्तरावरही नावाजलं जाईल अशा ग्रंथाचं निर्मितीमूल्य, बाबासाहेबांचा समग्र जीवनपट दाखवणारी अत्यंत दुर्मिळ छायाचित्रं, त्यांच्याविषयी राजमाता सुमित्राराजेंसह अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी नोंदवलेले अभिप्राय व लेख, दोन महत्त्वाची मानपत्रं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांच्या १३ व्या पूर्वजांना आलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं पत्रही या ग्रंथात समाविष्ट करण्यात आलं आहे.
बाबासाहेबांसारख्या असामान्य प्रतिभावंत लेखक-वक्तयाचं त्यांच्याच समोर चरित्र लिहून प्रकाशित करणं म्हणजे सिंहगडावरचा तानाजी कडा चढण्याचाच प्रयत्न म्हणावा लागेल. पण गेल्या ३० वर्षांचा बाबासाहेबांचा अत्यंत निकटचा सहवास आणि अभ्यासपूर्ण मांडणी करण्याची पद्धत यामुळं सागररावांनी ‘बेलभंडारा’ हा ग्रंथ आम्हा समस्त शिवप्रेमींसाठी, बाबासाहेब प्रेमींसाठी एक सुवर्णजडित मानाचं पानच सादर करावं, तसा सादर केला आहे. खुद्द शिवशाहिरांनी आपल्या आशीर्वादपर मनोगतामध्ये सागररावांना लिहिले आहे, ‘‘मी माझे सविस्तर आत्मचरित्र लिहावं असं माझ्या अनेक गणगोतातील जिवलगांनी आग्रहपूर्वक म्हटलं. अगदी पु. लं. नी सुद्धा. पण तो विचार आजही, अजूनही माझ्या मनात रुजत नाही. अंकूर न फुटणाऱ्या वाळूच्या खडय़ाप्रमाणे सर्वाचे हे आग्रह तसेच भिजत पडून आहेत. आता मी ते लिहीन असं मला वाटत नाही. कारण तुमच्या या ‘बेलभंडारा’ पेक्षा माझ्या जीवनात वेगळं आहेच काय?’’
कर्नाटकातून ‘लोकरस’ आडनाव घेऊन आजिच्या महाराष्ट्रात १२ व्या शतकापूर्वी आलेलं पुरंदरे घराणं इथपासून सुरू झालेल्या ‘बेलभंडारा’ तील आठवणींची बेलपानं अक्षरश: बाबासाहेबांचा ९० वर्षांचा प्रवास आपल्याला घडवतात. बाबासाहेबांनी अत्यंत जिव्हाळ्यानं आपला जीवनप्रवास, आपल्या मनीचे गूज, आपल्या व्यथा-वेदना, आपल्या काळज्या, आपला आनंद, आपल्या महत्त्वाकांक्षा, आपले संकल्प, आपली कृतज्ञता हे सारं सारं सागररावांना सांगितलं. या साऱ्याचा अत्यंत रम्य मागोवा ‘बेलभंडारा’मधून आपल्याला पाहायला मिळतो.
बाबासाहेबांचं अत्यंत समृद्ध अन् खानदानी वातावरणात गेलेलं बालपण, शालेय आणि महाविद्यालयीन जीवन, त्यांची भटकंती, इतिहास संशोधन मंडळातल्या हकिकती, शिवचरित्राची पूर्वतयारी, त्यासाठी त्यांनी घेतलेले अफाट परिश्रम, सोसलेले अपमान, अवहेलना, तुरुंगवास, दादरा-नगर-हवेली सशस्त्र स्वातंत्र्यलढय़ातील त्यांचा सहभाग, शिवचरित्र कथन, व्याख्यानमाला, मुंबईतील १९७४ मध्ये उभारलेली शिवसृष्टी, देश विदेशातील विविध क्षेत्रातील दिग्गजांचा सहवास, जाणता राजा महानाटय़ाची निर्मिती, महाराजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारण्यात येणारी शिवसृष्टी, बाबासाहेबांची दानशूरता, त्यांच्यातला रसिक मर्मज्ञ आणि असे अनेक पैलू कलात्मक रीतीनं ‘बेलभंडारा’ मधून सादर करण्यात आले आहेत.
समस्त इतिहासप्रेमींनी तो आपल्या संग्रही ठेवावा, वाचावा आणि आपणही आपापल्या क्षेत्रात बाबासाहेबांप्रमाणंच निष्ठेनं वाटचाल करावी यासाठी प्रेरणा देणारा आहे. महाराष्ट्रातल्या साहित्यविषयक संस्था, विद्यापीठं, शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांनी आपल्या संग्रही ठेवावा आणि चरित्रं कशी सादर करावीत याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारा महाग्रंथ म्हणून मराठी साहित्यविश्वात ‘बेलभंडारा’चं एका वेगळ्या उंचीचं स्थान आहे असं मला वाटतं. सागरराव देशपांडे यांची ही कुलीन, अभ्यासू लेखणी मराठी साहित्यविश्वाच्या पावनखिंडीत अनेकांना आपापल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची प्रेरणा देत राहील एवढा विश्वास ‘बेलभंडारा’ मुळं नक्कीच देता येईल.

‘बेलभंडारा’
कॉफी टेबल बुक * पाने ३७६
हार्डबाऊंड ६९९ रु. *पेपरबॅक ४०० रु. प्रकाशक : सह्य़ाद्री प्रकाशन, पुणे संपर्क : १०१, पहिला मजला, रामकृष्ण परमहंस गृहरचना, सिंहगड रोड, पुणे- ३०.