वार्ता ग्रंथांची : नोबेलचा जुगार Print

 

शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२

साहित्याच्या ‘नोबेल पारितोषिका’ची घोषणा येत्या गुरुवारी होण्याची शक्यता असल्याने नोबेलच्या जुगाराला आणखी जोर चढला आहे. हा जुगार चालतो, यात नवे काही नाही. ‘लॅडब्रोक्स’ या ब्रिटिश बेटिंग उद्योगाची जी वेबसाइट आहे, तिथे साहित्याच्या नोबेलबद्दल लागणाऱ्या बोलींची चर्चा होणे हेही एकविसाव्या शतकात नवे राहिलेले नाही.लॅडब्रोकवरल्या जुगाऱ्यांचा कल कोणत्या नावाच्या मागे आहे, याची बातमी हल्ली दरवर्षी दिली जाते आणि ‘अमक्याला यंदा कौल’ अशी आयती जाहिरात होते. त्यात अर्थ असतोच, असे नाही.

हेर्टा म्युलर (२००९) किंवा मारिओ व्हर्गाज ल्योसा (२०१०) आणि गेल्या वर्षीचे मानकरी तोमा ट्रान्स्ट्रमर ही सर्वच नावे अशा जुगारी यादीत फार खाली होती आणि ‘लॅडब्रोक्स’चा कौल सांगणाऱ्या त्या-त्या वर्षीच्या बातमीत ही नावे अजिबात नव्हती. यंदाही हाच प्रकार होणार, अशी चिन्हे आहेत! लोकप्रिय जपानी लेखक हारुकी मुराकामी यांचे नाव या जुगारयादीत गेला महिनाभर प्रथम क्रमांकावर आहे आणि सध्या तर त्यांना लॅडब्रोकने ‘तीनास एक’ अशी बोली दिली दिल्यामुळे हेच जिंकणार (जणू नोबेलचा मान ही घोडेशर्यतच!) अशी वातावरणनिर्मिती आहे! मुराकामी यांच्या लिखाणातला वास्तव-अतिवास्तव यांचा खेळ नवा आणि लोभस असतो, त्यांचा वाचकवर्गही मोठा आहे. याच यादीत गेली काही वर्षे ज्यांचे नाव नोबेलसाठी घेतले जाते, त्या महाश्वेतादेवीदेखील आहेत.. पण जुगाऱ्यांच्या लेखी त्यांची बोली ‘पन्नास : एक’ अशी आहे. समाधान इतकेच की, महाश्वेतादेवींइतके अस्सल न लिहिणारे भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दी ‘सहासष्ट : एक’ या बोलीवर आहेत!