आनंदयोग : या देवी सर्व भूतेषु.. Print

alt

भीष्मराज बाम
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुलगी, बहीण, आई, पत्नी.. स्त्रीशी असलेल्या अशा साऱ्या नात्यांचा पदोपदी अपमान करण्यासाठी धार्मिक श्रद्धांवर आधारलेल्या रूढींचा वापर सर्रास होत राहातो. काहीजण तर याही पुढे जाऊन स्त्रीचे अस्तित्वच संपवू पाहणारे. देवीने आपले बळ अशांविरुद्ध वापरले पाहिजे..
बऱ्याच वर्षांनंतर अंबाजोगाईला जाणे झाले होते. सकाळी पूजा झाल्यावर गुरुजी म्हणाले, ‘‘दुपारी तीन-चार वाजता या. म्हणजे निवांत दर्शन घेता येईल.’’ तेव्हा अगदीच गर्दी नव्हती. गाभाऱ्यात स्वस्थ बसून राहायला मला फार आवडते. आपल्या आजीजवळ असल्यासारखे वाटते. कुलस्वामिनी म्हणजे आजीच असते. आपला सगळा हूडपणा पोटात घालून फक्त प्रेमच करणारी. आजी म्हणजे आपल्याला माहीत असलेली सर्वात वडीलधारी स्त्री. कारण पणजी, खापरपणजी यांना क्वचितच कोणी पाहिलेले असते. आजीच्या वात्सल्याचा वर्षांव मुला-नातवंडांवर सतत होतच असतो, तसा या कुलदेवतेच्या वात्सल्याचा लाभ आपल्या कुटुंबातल्या साऱ्याच पिढय़ांना झालेला असतो. म्हणून तर तिला कुलस्वामिनी म्हणायचे.
तर मी तिथे बसलेला असताना एक मुंडासे बांधलेला वृद्ध शेतकरी दर्शनाला आला. त्याने देवीपुढे डोके टेकवून नमस्कार केला व वर पाहून ‘‘आई!’’ अशी हाक दिली. माझ्या अंगावर काटाच आला. मग दोन लहान मुले आली. एक सहा-सात वर्षांची ताई आणि तिचा फार तर वर्षभराने लहान असलेला भाऊ. नमस्कार करून झाल्यावर ती दोघे आपसात कौतुकाने बोलायला लागली, ‘‘आज आईचे लुगडे बघ किती छान दिसते आहे आणि कानातले, गळ्यातले दागिनेही कसे झगमगत आहेत.’’ हे ती दोघे इतक्या सहज बोलत होती की, जणू त्यांची जन्मदात्री आईच सारा शृंगार करून समोर बसलेली होती. मला वाटले, अशी श्रद्धा माझ्यात का नाही?
एका वर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पोहण्याच्या स्पर्धासाठी कोलकात्याला पोहोचलो होतो. दुर्गापूजा नुकतीच आटोपली होती. आम्ही काली बाडीला देवीच्या दर्शनाला गेलो. देवीच्या मंदिरासमोर एक लाकडी ठोकळा होता. त्यावर बकऱ्यांचे बळी देणे चालू होते. पाऊण तासात २०-२२ बकऱ्यांची मुंडकी उडवली गेली. नंतर कितीतरी वेळ त्या बकऱ्याचे धड हात-पाय झाडत राही. मी तर पक्का शाकाहारी होतो, पण आमच्या टीममधले मांसाहारी मित्रसुद्धा त्या दिवशी सामिष जेवण घेऊ शकले नाहीत. अजूनही मी मांसाहार करण्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही कारण ते दृश्य आताही डोळ्यांसमोर आहे. माझ्या श्रद्धेची मजल देवीला बळी देऊन त्या प्राण्याचे मांस आपण खायचे इथपर्यंत नाही जाऊ शकत!
२०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धाच्या वेळी नवरात्र चालू होते. मी नेमबाजीच्या संघाबरोबर दिल्लीत होतो. घरी दिवा, माळ वगैरे सर्व सोपस्कार करून माझ्या पत्नीने नवरात्राचे व्रत पार पाडले. त्याचा प्रसाद १४ सुवर्ण, १२ रौप्य आणि ४ कांस्यपदकांच्या स्वरूपात आम्हाला दिल्लीला मिळाला. आपल्यासाठी देवी नवरात्राचे नऊ दिवस असुरांशी लढत असते. तेव्हा आपणही व्रतस्थ राहायचे असते. आपला संघर्ष आपल्या प्रलोभनांशीच करायचा असतो. क्रोध, द्वेष, मत्सर अशा भावनांना आळा घालून कुटुंबात मिसळणे हासुद्धा व्रताचाच भाग असतो. रोज देवीची पूजा, आरती एकत्र करायची असते.  व्रत नीट पार पडले की समृद्धी येत असते. तीसुद्धा वखवखलेपणाने एकटय़ाने भोगायची नसते. विजयादशमीला आपल्या सर्व परिचितांना सोने वाटायचे असते.
सप्तशतीच्या पाठामध्ये आणि तंत्रांतल्या देवीसूक्तांत देवीच्या विविध स्वरूपांचे वर्णन आलेले आहे. तिची ही सारी रूपे आपण ओळखायची असतात आणि त्यांची उपासना व पूजन करायचे असते. केनोपनिषदात आख्यायिका दिली आहे. देवांना आपल्या शक्तीबद्दल अहंकार वाटायला लागला. तो दूर करण्यासाठी ब्रह्म त्यांच्यासमोर प्रकट झाले. त्याला देव ओळखू शकले नाहीत. ज्ञानाचा अहंकार असलेला अग्नी, बलाचा गर्व असलेला वायू, इंद्रिय दमनाच्या तपस्येचा अभिमान बाळगणारा इंद्र हे सारे त्याला ओळखायला असमर्थ ठरले. तेव्हा ब्रह्मविद्यारूपिणी उमा त्यांच्यासमोर प्रगट झाली आणि तिने त्यांना ब्रह्माचे स्वरूप समजावून सांगितले.
सप्तशतीत आणि देवीसूक्तात वर्णन आहे की, सारासार विवेक करणारी बुद्धी, अन्यायापासून संरक्षण करण्याची शक्ती, समृद्धी आणि तृप्ती निर्माण करणारी लक्ष्मी, स्वत:चे संरक्षण करण्याची पात्रता येईपर्यंत संगोपन करणारी माता या साऱ्या स्वरूपांमध्ये ती सर्व भूतमात्रांत निवास करीत असते. तसेच दया, क्षमा, श्रद्धा, शांती, लज्जा हे सारे गुणसुद्धा तिचाच आविष्कार असतात. देवस्थानांत जाऊन दर्शनासाठी इतका आटापिटा करणारे आपण तिचा आपल्या अगदी निकटच्या सान्निध्यात होत असलेला वावर ओळखू शकत नाही, या अडाणीपणाला काय म्हणावे, हे कळत नाही.
मदुराईला मीनाक्षीच्या भव्य मंदिरात दर्शनाला गेलो होतो. माझ्यापेक्षाही जास्त भाविक असलेले एक सहकारी माझ्यासोबत होते. मंदिरातले वातावरण खूपच प्रसन्न वाटले. माझे सहकारी म्हणाले, ‘‘स्त्रीशक्तीची मातृभावाने होत असलेली पूजा हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्टय़ आहे, असे मला वाटते!’’ पण या पूजेच्या निमित्ताने तिला आपण देवळात कोंडून टाकले आहे, असे माझे मत आहे. आईच्या, बहिणीच्या, कन्येच्या, सखीच्या व पत्नीच्या रूपांत ती ठायी-ठायी भेटत असते. स्त्रीला वरकरणी पूज्य मानणारे आपण या साऱ्या नात्यांचा पदोपदी अपमान करीत राहतो. वर आणि धार्मिक श्रद्धांवर आधारलेल्या रूढींचा असे वागण्याच्या स्पष्टीकरणासाठी उपयोग करतो. हा निव्वळ ढोंगीपणा झाला. त्याचे समर्थन संस्कृतीचे अभिमानी करायला लागतात, याचा फार खेद वाटतो.
स्त्रीला अत्याचारांपासून वाचविण्याचे शारीरिक बळ आणि ते योग्य वेळी योग्य प्रकारे वापरण्याचे संस्कार संस्कृतीने पुढच्या पिढय़ांना द्यायचे असतात. त्याऐवजी दुबळ्यांना चिरडून टाकणे हाच न्याय असल्याचे संस्कार केले जातात. स्त्रीच्या बापाकडून हुंडा, मानपान मोजून घेणे हा हक्कच असल्याचे मुलांच्या मनावर ठसविले जाते. मग मुलगे म्हणजे मोठी संपत्ती आणि मुलगी म्हणजे खर्चाला काळ, असे वाटायला लागते. तिला गर्भात असतानाच मारून टाकावे. ते जमले नाही तर जन्मल्याबरोबर तिला संपवून टाकावे, असे भ्याड विचार समाजात रुजतात. कायद्याने भ्रूणहत्या करणे गुन्हा असतानासुद्धा ते करून गडगंज संपत्ती कमावणाऱ्या डॉक्टर मंडळींची प्रकरणे गाजत आहेत, पण ते मागतील तितके पैसे मोजून गर्भपात करून घेणारे लाखो लोक आपल्या समाजात निर्माण होत आहेत, त्याचे काय?
स्त्रीचे संरक्षण करण्याची ब्याद नको म्हणून तिला बुरखा घालायला लावणारे नाहीतर तिचा बालवयातच विवाह उरकून टाकणारे लोक मर्द कसे म्हणायचे? जाहिरातींतून, सिनेमा, टीव्ही चॅनेलवरून स्त्रीदेह म्हणजे एक भोग्य वस्तू आहे, याचाच प्रचार केला जातो. मग युवावर्गात स्त्रीला एकटीला गाठून तिच्यावर बलात्कार करणे हे समर्थनीय आहे, अशीच भावना बळावते. स्त्रीने काय करायचे, कसे वागायचे हेसुद्धा पुरुषांनी ठरवायचे आणि तिचे संरक्षण करण्याऐवजी जमतील तसे धिंडवडे काढायचे. धर्म आणि रूढी यांच्या पायावर उभी असलेली खाप पंचायत बलात्कार करणाऱ्यांवर बहिष्काराचे शस्त्र उगारीत नाही. याऐवजी आपल्या समाजात बलात्कारित स्त्रीच बहिष्कृत होते. एवढे सारे करून आपण लोक देवीच्या देवळात दर्शनाला जायचे धाडस करतो, हे नवलच आहे.
तिने आपल्या साऱ्या शक्ती, शस्त्रे, अस्त्रे या लोकांवरच वापरावीत. आपली मुले म्हणून दया दाखविणे बंद करावे, असे वाटते!