बया दार उघड...:‘युद्धप्रतीकांच्या दरबारात ‘अजाबळी’ची प्रथा Print

सुहास सरदेशमुख , औरंगाबाद
alt

तुळजापूरच्या पायथ्याशी असणाऱ्या सिंदफळ गावात राहणारे   मेंढपाळ गजेंद्र लांडगे यांचे घर कुडाचे. घरातील पाटी कोणाचेही सहज लक्ष वेधून घेते - ‘बिनडागाचा अजाबळी’! महानवमी दिवशी त्यांच्या घरातून बळीचा बकरा वाजत-गाजत जातो. त्याला कोणतीही जखम होऊ नये म्हणून घरातील सर्व सदस्य काळजी घेतात. बळीचा बकरा बिनडागाचा असावा, व्यंग असू नये यासाठी वयाच्या पंचाहत्तरीत लांडगे विशेष लक्ष देतात. नुकतेच त्यांनी पोलीस ठाण्यात अर्ज करून अजाबळीच्या मिरवणुकीची परवानगी मागणाऱ्या अर्जावर अंगठा उठविला.

ते बळीचा बकरा तुळजाभवानीच्या मंदिरात पोहोचवतील, नऊ दिवस देवीची गाणे म्हणतील आणि नवरात्र साजरे करतील. युद्धदेवतेच्या चरणी होणारा हा विधी अनुभवण्यासाठी तोबा गर्दी होते. असाच बळी कोल्हापूरच्या महालक्ष्मीसमोरही होतो. आता त्याचे स्थान बदलले आहे. कोल्हापुरातील महालक्ष्मीच्या मंदिरापासून पाच-सहा किलोमीटरवर टेंबलाईचे मंदिर आहे. तेथे बळीची प्रथा आहे. हा बळी कुष्मांडाचा. म्हणजे कोहळ्याचा. हा सोहळाही युद्धदेवतेचेच प्रतीक. तुळजाभवानी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी ही दोन्ही रूपे महिषमर्दिनीची.
शक्तिपीठातील हे विधी असे कसे? भाग जंगलाने व्यापलेला. साथीच्या आजाराने लोक मरत, हिंस्र श्वापदांची भीती असे, शक्तीची परीक्षा घेतली जाई, जगण्यासाठी संघर्ष करावा लागे. अशा ठिकाणचे भाविक पिढय़ान्पिढय़ा देवीची उपासना करतात. जेथे दुष्काळ, तेथे जगण्याचे साधन म्हणजे लूट किंवा राजदरबारी नोकरी पत्करणे. अशा समाजरचनेत देवताही युद्धांशीच संबंधित असणारच.  हाच धागा जर्मन लेखक रूलॅड जॉन्सन या लेखकानेही मांडलेला. त्यांनी तुळजाभवानीवर विशेष संशोधन केले. त्यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत शक्तिपीठाचा महिमा वर्णिला आहे. असल्या पुस्तकी आणि वैचारिक मांडणीची फारशी चिंता न वाहता तुळजापूरच्या पायथ्याशी राहणारे मेंढपाळ गजेंद्र लांडगे बळीचे बकरे वाढविण्यावर विश्वास ठेवतात. तुळजापूर येथे न्यायालयाने महानवमीच्या एका बळीला मान्यता दिली आहे. मात्र, नवरात्रात सात बळी दिले जातात. कोल्हापूर हे देखील महिषामर्दिनीचेच ठाणे. येथे बळी दिला जातो, तो कुष्मांडाचा. हे कोल्हासुराच्या शिराचे प्रातिनिधीक रूप. कोल्हापुरातील हा प्रतीकात्मक बळी पंचमीला होतो, तुळजापुरी महानवमीदिवशी.
तुळजाभवानी खऱ्या अर्थाने युद्धदेवता. अगदी मंदिरात शिरतानाही कानात नगाऱ्याचा मोठा आवाज घेऊन तुम्ही पायऱ्या उतरल्या, की संबळाचा आवाज कानी पडतो. तो ध्वनी ऐकल्यावर रणभूमीवरचे रोमांच उभे राहिले नाही तरच नवल. या वाद्याच्या आख्यायिका देखील युद्धाशीच निगडित आहेत. ‘चंड व मुंड’ या राक्षसांना मारल्यानंतर त्याच्या मुंडक्यांना चामडे लावून केलेले वाद्य म्हणजे संबळ, अशी कहाणी तुळजापुरात लहानगाही सांगतो. याच संबळाबरोबर वाजविल्या जाणाऱ्या तुणतुण्याचीही एक कहाणी. एकदा परशुरामाने एका राक्षसाला मारले. त्याचे शिर त्याच्या परशूला होते. पण त्याच्या आतडय़ाचा एक भाग खाली दांडय़ाला अडकला, ते ताणले गेले. त्याचा आवाज म्हणजे तुम्णतुणे. तुळजाभवानीच्या सेवेत असणारी वाद्य्ो देखील रणभूमीशी संबंधित.
मंदिराची रचना दुर्गासारखी. मजबूत तटबंदी, खोल जाणाऱ्या पायऱ्या, मंदिरात राहण्यासाठी ओवऱ्या, रणरागिणीच्या दरबारातील अनेक उत्सवही थेट हलकल्लोळ माजविणारे. महानवमीच्या दिवशी दिला जाणारा बळी ही शाक्तांची परंपरा. त्याआधी ब्राह्मणांना अनुष्ठानासाठी वर्णी द्यावी लागते. एरवी तुळाजापूरच्या मंदिरात पूजाविधीत मंत्रोच्चार नाहीत. पुजारी जातीने मराठा. दररोजची पूजा तंत्रोपासना. बापुजी साळुंके शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयातील इतिहासाचे  प्रा. ए. डी जाधव म्हणतात, ‘हा प्रदेश तंत्रोपासकाचा. त्यामुळे बळी देण्याचा विधी लोकसंस्कृतीचा भाग असू शकतो. पण त्याच वेळी ब्राह्मणांना अनुष्ठानासाठीही वर्णी दिली जाते. याचा अर्थ असा, की आर्य-द्रविड संस्कृतीचा मिलाफ या भागात कदाचित झाला असावा.’
तुळजाभवानीच्या मंदिराच्या मागच्या बाजूच्या दरवाजास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आहे. दररोज देवीच्या अंगावर घातल्या जाणाऱ्या ७८ किलो दागिन्यांमध्ये शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक मौल्यवान अलंकार आहेत. आद्य मातेचे वंदन करतानाच तिच्या शक्तीची ही रूपे नवदुर्गेच्या रूपाने सर्वत्र पुजिली जातात. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चांद्रघटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धरात्री हे दुर्गेचे अवतार महाराष्ट्रासह अनेक प्रांतात पुजिले जातात. अगदी नेपाळमध्येही तुळजाभवानीचे मंदिर आहे. शक्तिउपासकांसाठी तुळजाभवानी, करवीरनिवासिनी महालक्ष्मी ही नेहमीच श्रद्धास्थानं राहिली आहे. मग तो राजा असो अथवा बळीसाठी वर्षभर मेंढा सांभाळणारा मेंढपाळ.