बया दार उघड...:‘कवडी’मोल Print

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद, गुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२

कवडी हे देशभर मातृदेवतेचे प्रतीक म्हणून मिरविले जाते, मग देवीचे ठाणे कोणतेही असो. कवडीची लाखोंची उलाढाल होते. पण या कवडीच्या व्यवसायात असणाऱ्यांची मात्र बऱ्याचदा फरफट होते. तुळजापुरात पापनाशनगर ही झोपडपट्टी. शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला. सिमेंटच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसक्या घरांची रांग. खातूनबी आणि नाजूरबी तेथे राहतात. खातूनबीचे वय डोळ्यांतील मोतीबिंदूंचा हिरवा रंग सांगून जातो. घरात पुरुष माणूस फक्त नावापुरते मिरविण्याचा, तेही कोणी विचारले तरच. तीन मुलांनी वेगळे संसार थाटले. खातूनबी  एकटय़ा पडल्या, आता मुलगी आणि नातवंडासह घरात नऊ जणी. धुण्याभांडय़ाचं काम करतात. उरलेल्या वेळात कवडीच्या माळेला लागणारा गोफ विणतात. तुळजापुरात अशा असंख्य जणी. त्यांच्यासाठी ‘कवडी’ची किंमत लाखमोलाची!  
चलनात कवडीमोल हा शब्द शून्याला समांतर वापरला जात असला तरी घाऊक बाजारात चारशे ते पाचशे क्विंटल कवडय़ांची खरेदी होते, हा लाखोंचा व्यवहार आहे.
कवडय़ा दोन प्रकारच्या. एकीला ‘अंबुकी’ म्हटले जाते. ही कवडी रंगाने जरा पिवळी, तर दुसरी कवडी राखाडी रंगाची. ती मातंगीची. येडेश्वरी, मातंगी, रेणुका, यल्लमा या रूपात देवीला पुजणारे भाविक राखाडी रंगाच्या कवडय़ा वापरतात. असे का, हे कोणी सांगत नाही. तुळजापुरात पुजाऱ्यांची माळ चौसष्ट कवडय़ांची आहे. ही संख्या चौसष्टच का?  पुजाऱ्यांना सांगता येत नाही. पण त्याचा संबंध चौसष्ट कलांशी असावा.
 भक्ती, वैराग्य आणि चलन अशी कवडीची तीन रुपे. प्रत्येकाची श्रद्धा निराळी. कवडीची आभूषणे मिरविण्याची पद्धतही वेगळी. आंध्रातील भाविक कवडीचे आभूषण उलटय़ा बाजूने वापरतात. गोल चकत्यावर कवडीचा मागचा भाग फोडून ‘साज’ तयार केला जातो. कवडय़ांची माळ आणि आभूषणारे बनविणाऱ्यांची तुळजापुरात एक वस्तीच आहे. संत रोहिदास नगर अशी पाटी असणाऱ्या या वस्तीत लहानांपासून वृद्धांपर्यंत गोफावर कवडी टाचली जाते. कवडीच्या खाचेत ओला कागद भरून त्याला दोऱ्याने विणले जाते. अनेकजणींच्या संसाराला आता कवडीमुळे हातभार लागत आहे. कवडीच्या माळा तयार करण्यासाठी लागणारे गोफ विणले जातात. राधाबाई कांबळे यांना संसाराचा गाडा ओढताना कवडय़ासाठीचे गोफ तयार करणेच कामी आले. त्या म्हणतात, ‘‘नवरा विजेच्या खांबावर चढून जोखमीची कामे करायचा. त्याला तशी वीज मंडळात नोकरी नव्हती; पण सगळं काम यायचं. एके दिवशी खांबावर चढला आणि कोणीतरी वीजप्रवाह सुरू केला. तो गेला तेव्हापासून गोफ विणते आहे. पैसे कमी मिळतात, पण भाविकांचा ओघ वाढल्याने वर्षभर काम असते.’’ राधाबाईसारखेच शाहीन शेख, नाजूरबी, खातूनबी प्रत्येकीच्या समस्या निराळया. पण जगण्याचा आधार म्हणजे हे  गोफ विणण्याचे काम. गोफासाठी लागणारा वाख सोलापूरहून खरेदी केला जातो. त्याचे दरही आता वाढले आहेत. अंबाडीपासून तयार होणारी वाख पीक पद्धतीत बदल झाल्यामुळे मिळेनाशी झाल्याने या महिलांच्या समस्येत भर पडली आहे.
कवडय़ांची माळ विणणाऱ्या बहुतेक महिलांना माळ गळ्यात का घालायची हे माहीत नाही.  
‘लज्जागौरी’ या रा. चिं. ढेरे यांनी लिहिलेल्या पुस्तकात प्रत्येक प्रांतात कवडीचे पूजन ‘सुफलनकारक’ मानले जाते. त्या पुस्तकातील संदर्भ प्रत्येकाने अभ्यासावेत असेच आहेत. आंध्र प्रदेशात विवाहानंतर वधूपित्याला कवडी भेट दिली जाते. पंजाबात मुलगी सासरी जाताना तिला चरखा भेट देतात, त्याला कवडय़ा चिकटविलेल्या असतात. ओरिसातही रुखवत दिले जाते. त्याला ‘जगथीपेढी’ असे म्हणतात. त्यातही कवडय़ा दिल्या जातात. विवाह समारंभात महाराष्ट्रात सुपारी सोडविण्याचा खेळ पूर्वी नवरा-बायकोमध्ये होत असे. ओरिसात सुपारीऐवजी कवडी वापरली जाते. राजस्थानात विवाहप्रसंगी वधू-वराच्या मस्तकी लोंबतील अशा पद्धतीने कवडय़ा बांधल्या जातात. तर, आसाममध्ये वडीलधारी मंडळी नवदाम्पत्यासमोर कवडय़ांचा खुळखूळ आवाज करतात.
देशभरातल्या या पद्धतीना नवनिर्माणाची पूजाच म्हटली जाते. कवडीची ही रुपे माहीत नसतानाही तुळजापुरात मात्र कवडय़ांचा व्यवहार लाखोंचा आहे. त्यात अनेक महिलांच्या वेदनाही आहेत. आईच्या दरबारात नवनिर्माणाचे हे साहित्य आभूषण म्हणून भाविकांपर्यंत पोहोचावे यासाठी अनेक जणी झटतात. त्यांच्या व्यथा आणि अडचणी समजून घेणारा कोणीच नाही!
 कवडय़ाची माळ गळ्यात मिरविणे म्हणजे, स्त्रीच्या नवनिर्मितीच्या शक्तीला वंदन करणे होय. त्यामुळेच कवडय़ांची माळ तुळजापुरात नवरात्रात आवर्जून घेतली जाते. तर, महालक्ष्मीचा उपासक पोतराजही कवडी अंगावर मिरवितो. एखादा माणूस देवाघरी गेला की, कवडय़ाची माळ आणि परडी होमकुंडात विसर्जित करण्याची प्रथाही पाळली जाते.
कवडय़ांच्या आभूषणांचे अनेक प्रकार आहेत. आडवे कंगन, उभे कंगन, चार पदरी, दुपदरी माळ, डोक्यावरचा टोप अशी आभूषणे अंगावर मिरविणारा ‘भुत्या’लक्ष वेधून घेतो. आंध्र आणि कर्नाटकातून आलेल्या भाविकांमध्ये कवडी अंगावर मिरविण्याची पद्धत आहे.