बया दार उघड...:परडी : लीनतेचे प्रतीक Print

सुहास सरदेशमुख , औरंगाबाद - शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२

आईच्या दरबारात आल्यावर ‘राजा असो वा रंक’ जोगवा मागतोच. ‘पाच घरी मीठ-पीठ मागून त्या शिध्यातून चरितार्थ भागविण्याची तयारी असावी एवढी लीनता अंगी दे,’ अशी प्रार्थना करतो. ज्या पात्रात जोगवा मागायचा ते पात्र म्हणजे परडी. बांबूच्या कामठीची वीण घट्ट बांधणाऱ्या नागनाथ सावंतांचा भाव नवरात्रात चांगलाच वधारलेला असतो, कारण परडी बनविणारे कुशल कारागीर आता फारसे राहिले नाहीत. सावंतांच्या घरी आता हिरवे बांबू भिजत घातलेले असतात, कारण बांबूच्या कामटय़ा कराव्या लागतात. त्यासाठी घरातील इतर सदस्यही मदत करतात. नवरात्रात परडीची विक्री मोठय़ा प्रमाणात होते.
आई भवानीच्या दरबारात परडीचं एक वेगळंच महत्त्व. हे भिक्षापात्र.. परडी आणि परसराम अशी जोडी. परडी म्हणजे ताट आणि परसराम म्हणजे वाटी. बारीक वीण करून बनविलेले हे पात्र आणि आरोग्य याचा संबंध अगदी सांस्कृतिक कोशातही नोंदविलेला आहे. परडी हे साथरोग दूर करण्याचे साधन मानले जायचे. हळद-कुंकू, लिंबू आणि प्रसाद घातलेली परडी एका गावातून दुसऱ्या गावात नेली जायची. अखेर ती समुद्रात विसर्जित केली जात. यामुळे साथरोग नाहीसे होतात, असा समज होता. आजही असाध्य आजारासाठी परडीचा उपाय शोधणारे अनेकजण आहेत. परडी भरणे हा पूजाविधीचा भाग आहे. परडी-कवडय़ांची माळ घेऊन जोगवा मागणारे भक्त सर्व स्तरांतील. भवानी मंदिरासमोर भिक्षापात्र म्हणून परडी घेऊन बसणाऱ्या कोणत्याही महिलेला विचारले की त्या सांगतात, ‘‘आम्ही तर गरजू आहोत, अगदी शाहू महाराजांनी आणि छत्रपतींनीही परडी हातात घेतली. ‘आई’ राजा आहे आणि तिच्या दरबारात आम्ही सारे लहान आहोत याचे निदर्शक म्हणून परडी आणि जोगवा असावा. भवानी चरणी लीन होण्याची वृत्ती सांगण्यास ते पुरेसे आहे. घरात जो पदार्थ असेल त्याचा नैवेद्य हे तर तुळजापूरच्या मंदिराचे वैशिष्टय़च. दररोज भवानीला भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. ज्या भागात जे पिकते तेच देवतांच्या नैवेद्याचा भाग असते. अशा कोणत्याही पदार्थाने परडी भरता येते. असा नैवेद्य घेऊन जाणे जसजसे अवघड होऊन गेले तसतसे शिधा सुरू झाला असावा. त्यातही मीठ-पीठाचे महत्त्व वाढत गेले. गावोगावच्या महिला परडय़ा भरतात. ते पीठ बाजारच्या दिवशी विकले जाते. मंदिरातील होमकुंडात हजारो लोक नवस म्हणून पिठा-मिठाच्या परडय़ा भरतात आणि नवरात्रात ५० क्विंटल पीठ मंदिरात येते. त्याचा मंदिर प्रशासनाला लिलाव करावा लागे. ती डोकेदुखी होऊ लागल्याने पिठाचा लिलाव न करता मंदिरातील परिवार देवतांसमोरील सर्व वस्तू पुजाऱ्यांनी घ्याव्यात आणि काही रक्कम मंदिर प्रशासनास द्यावी, असा नवा व्यवहार रूढ झाला. परडी बनविणाऱ्यांची गरज वाढतीच आहे. जागतिक बाजार व्यवस्थेत पारंपरिक व्यवसाय करणारे काहीजण हा व्यवसाय टिकवून आहेत.
तुळजापुरातील पुजाऱ्यांच्या घरातील परडी मात्र जरा वेगळी आहे. म्हणजे रचना वेगळी. ताटातील मोठी वाटी किंवा वाडगे असा त्याचा आकार, पण तो तसा का हे मात्र कोणाला माहीत नाही. तुळजापुरातील काळभैरवाच्या मूर्तीच्या हातातदेखील अशाच प्रकारचे पात्र आहे. एखाद्याच्या घरात मृत्यू झाला तर सुतकानंतर परडी बदलली जाते.