वार्ता ग्रंथांची.. : हार आणि जीत Print

 

शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
ब्रिटिश लेखिका हिलरी मँटेल यांनाच दुसऱ्यांदा ‘बुकर पारितोषिक’ मिळाल्याचे गेल्या मंगळवारी जाहीर झाले, तेव्हा अनेक भारतीय वाचकांच्या भुवया उंचावल्या. याचे एक कारण म्हणजे, एकाच लेखिकेच्या कादंबरी-त्रयीपैकी पहिल्या कादंबरीला (वूल्फ हॉल) बुकर पारितोषिक मिळाले असताना दुसऱ्याही कादंबरीला मिळणे, हा प्रकार विक्रम वगैरे खुशाल ठरो, पण तो औचित्याला धरून नाही. या औचित्यभंगाची चर्चा तर ब्रिटिश वाचकांमध्येही आहे.

भारतीयांच्या नापसंतीसाठी आणखी वेगळे कारण आहे, ते म्हणजे या हिलरीबाईंच्या कादंबऱ्या कळत नाहीत. म्हणजे भारतीयांचे ‘इंग्लिश विंग्लिश’ कमकुवत आहे म्हणून नव्हे, तर हिलरी यांच्या कादंबऱ्यांमधले टय़ूडर राजघराण्याच्या    काळातले इंग्लंड आणि त्यातली ती पात्रे यांच्याशी आजच्या ग्लोबल भारतीय वाचकाचा काहीही संबंध नाही, म्हणून! ज्या ‘ब्रिंग अप द बॉडीज’ या कादंबरीला यंदा बुकर मिळाले, ती अ‍ॅन बुलीन आणि आठवा हेन्री यांची कहाणी आहे. अर्थात, थॉमस क्रॉमवेल या राजनिष्ठ सल्लागाराचे प्रमुख पात्र तिच्यात आहे आणि क्रॉमवेलच्याच सल्ल्यामुळे हेन्रीने त्याची एकेकाळची पट्टराणी अ‍ॅन बुलीन हिचा शिरच्छेद केला, हा तपशील कल्पनेने भरला आहे.  बुकर पारितोषिकानंतर हे पुस्तक ब्रिटनमध्ये खपू लागले, पण भारतात त्याला थंडा प्रतिसाद आहे. जीत थायिल यांच्या ‘नाकरेपोलीस’ या कादंबरीने पाच संभाव्य बुकर-विजेत्यांच्या यादीत यंदा प्रवेश केला होता. मुंबईतील अमली पदार्थाचे विश्व चितारणाऱ्या या कादंबरीचा सन्मान झाला असता, तर भारतीय वाचकांना बुकरचे कौतुक अधिक वाटले असते. बुकरची हार आणि जीत यांच्यात देशांच्या सीमा कायम आहेत, हेच खरे!