बया दार उघड...:मूर्ती की तांदळा? Print

 

सुहास सरदेशमुख , औरंगाबाद - शनिवार, २० ऑक्टोबर २०१२

य माई, येडाई, सटवाई, यल्लम्मा, यल्लुआई, येडेश्वरी, रेणुका अशी देवीची अनेक रूपे. दर्शन साधारण दोन प्रकारे होते. काही ठिकाणी देवीची अष्टभूजा मूर्ती असते, तर काही ठिकाणी तांदळा रूपात दर्शन होते. असे का? मूर्ती किंवा तांदळा, असा एकच प्रकार देवींच्या मंदिरांमध्ये का दिसून येत नाही? देवीचरणी हजेरी लावणाऱ्या भक्तांच्या मांदियाळीत काही प्रश्नांची उत्तरे मिळतात, तर काही प्रश्नांची उत्तरे इतिहासकारांनी भाषिक अंगाने पूर्वीच सोडवून ठेवली आहेत. नवरात्रात तृतीयपंथी जोगते महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांची यात्रा करतात, तर मुंबईतील ग्रँटरोड भागातील महिलांचीही मोठी गर्दी असते. असे का? याचे उत्तर नवनिर्माणाच्या शक्तीत दडले आहे. रेणुकेची आख्यायिका बऱ्याच गोष्टी अधोरेखित करते.


रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी. ती जेव्हा पाणी आणे, तेव्हा एकही थेंब सांडला जात नसे. तिचे पावित्र्य तेवढे होते. एके दिवशी तलावात एका गंधर्व जोडप्याची जलक्रीडा पाहून तिचे मन विचलित झाले आणि अंगावर पाणी सांडले. जमदग्नी ऋषींना राग आला. त्यांनी मुलांना आईचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली. परशुरामाने आईचा शिरच्छेद केला. आज्ञेचे पालन झाल्यानंतर तो शोकाकूल अवस्थेत होता. आज्ञेचे पालन झाल्याने जमदग्नी ऋषी खूश होते. त्यांनी परशुरामाला वर

मागायला सांगितले. पुन्हा रेणुकेला जिवंत करा, असा वर परशुरामाने मागितला. शिरच्छेद केल्यानंतर रेणुकेचे शिर अस्वच्छ पाण्यात पडले. त्यामुळे समोरून येणाऱ्या कोणत्याही महिलेचे शिर जोडून देऊ का, असे जमदग्नीने विचारले आणि अन्य एका महिलेचा शिरच्छेद करून तिचे शिर रेणुकेच्या धडाला चिकटविले. एक महिला नाहकच मारली गेली, याची खंत परशुरामाला होती. म्हणूनच त्याने त्या महिलेला सांगितले, प्रत्येक पूजेच्या वेळी तुझा मान पहिला असेल. नांदेडच्या रेणुका मंदिरात मातंगी देवीचा मान पहिला आहे. वास्तविक रेणुका आणि एलम्मा या दोन्हीही देवता ‘लज्जागौरी’चे  प्रतिनिधित्व करतात. शिर नसलेल्या देवीची आराधना या लज्जागौरीच्या स्वरूपात होते. लज्जागौरी हा शब्द ‘लंज्जा’ या अर्थाने दक्षिण भारतात वापरला जातो. तेव्हा त्याचा अर्थ नग्न स्त्री किंवा गणिका असा होतो. अनावृत माता अथवा जगन्माता म्हणून लज्जागौरीकडे पाहिले जाते. जेथे-जेथे न घडविलेल्या तांदळ्याचे दर्शन होते, तेथे-तेथे रेणुकेचे वास्तव्य असते. लज्जागौरी आणि रेणुकेचा हा संबंध रा. चिं. ढेरे यांनी खूप वर्षांपूर्वी अभ्यासकांसाठी उपलब्ध करून ठेवला आहे. नांदेडच्या रेणुका मंदिरातही अशा स्वरूपाची आख्यायिका सांगितली जाते. जिच्याकडे नवनिर्माणाची शक्ती आहे, ती शक्ती पुढच्या जन्मी का असेना, मिळावी, यासाठी तृतीयपंथी साडेतीन पीठाची तीर्थयात्रा आवर्जून करतात. ‘लंज्जा’ हा शब्द तपासला की, ग्रँट रोडवरील महिलांची दर्शनासाठी गर्दी का, या प्रश्नाचेही उत्तर मिळते. लोकसंस्कृतीतील या कथा पद्धतशीरपणे रचलेल्या आहेत. महिमा वाढविण्यासाठी आणि स्थापनेचा उद्देश स्पष्टपणे कळावा, असाही त्यामागचा हेतू असतो. मातंगी, यमाई, येडाई आणि रेणुका या एकरूप देवता आहेत. त्यांचा विस्तार केवळ महाराष्ट्रापुरता नाही, तर कर्नाटकातील देवींची अनेक ठाणी आणि आख्यायिकांना नवनिर्मितेचाच आधार आहे. कोल्हापूर, तुळजापूरसह शक्तिपीठांमधील हा महिमा मराठवाडय़ात अनेक ठिकाणी पाहावयास मिळतो. महालक्ष्मी, तुळजाभवानी यांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातील मंदिरात जेथे मूर्त्यां आहेत, त्याचा संबंध बहुतांश युद्धदेवतेशी लावला जातो. शिर नसलेली आणि उत्तानपाद लज्जागौरींच्या मूर्तीचे पूजन म्हणजे तांदळ्याची पूजा. अशी पूजा नांदेडच्या माहूर येथील देवीच्या मंदिरात होते. तशीच ती अंबाजोगाई येथेही पुजली जाते. सर्व ठिकाणी परशुराम आणि देवीच्या आख्यायिका आहेत. प्रत्येक ठिकाणी महिमा वाढविता यावा अशी कथेची रचना असते.
 हे सगळे लिहिण्याचे काय प्रयोजन? कोल्हापूरमध्ये महिलांना गाभाऱ्यात प्रवेश द्यावा की नाही, लाडू तयार करणाऱ्या महिला कामगारांच्या मासिक पाळीमुळे मंदिर अपवित्र होते काय? अशा अनेक प्रश्नांची सध्या चर्चा सुरू आहे. भक्तीची अशी रूपे जर नवनिर्मितीशी जोडलेली असतील तर नैसर्गिक जडणघडण अपवित्र कशी? यावर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्यां वर्षां देशपांडे म्हणाल्या, ‘‘अर्थकारण हे या वादाचे मूळ आहे. एकवेळ पुरुषबीज जतन करून वंश वाढविता येईल. मात्र, अजूनही बाईच्या गर्भपिशवीला पर्याय निघालेला नाही. खरे तर स्त्रीसत्ताक किंवा पुरुषसत्ताक पद्धती असणे हेच मुळात लोकशाहीविरोधी आहे. महालक्ष्मीच्या मंदिरात महिलांना      प्रवेश नाकारणारे स्वत:चे अस्तित्वच नाकारत आहेत. खरे तर महालक्ष्मी ही मातम्ृदेवता; तिच्या पूजेचा अधिकार फक्त   पुरुषांनाच का? त्यामुळे पुरुष पुजारीच हटवा अशी मागणी आहे.’’