विशेष : न संपणारी गोष्ट! Print

राजा ढाले, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२

कलाशिक्षकांचे गुरू असा गौरव झालेले ज्येष्ठ कलाशिक्षक दि. वि. वडणगेकर हे येत्या गुरुवारी, २४ रोजी वयाची ८० वर्षे पूर्ण करत आहेत. कोल्हापूरच्या कलावर्तुळात राहतानाच दि.वि. सरांनी आधुनिकतावादाचाही अभ्यास केला. या अभ्यासाचा संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत नेला. पण ऐंशीव्या वर्षीही एका कलासंस्थेसाठी ‘दि.वि. सर’ विनावेतन काम करताहेत, हा फक्त त्यांचा मोठेपणा की कलासंस्थांना जगवण्यातला आपला खुजेपणा? त्यांच्याच एका कधीकाळच्या शिष्याचं हे मुक्तचिंतन..


हेन्री मूर, पाब्लो पिकासो, एम. एफ. हुसेन ही विसाव्या शतकातील नावं जागतिक दृश्यकलेच्या प्रांतातील अवाढव्य माणसांची नावं आहेत. त्यांची शिल्पकला आणि चित्रकला ही आता मानवजातीचा अमूल्य असा ठेवा आहेत. जगातल्या या अमूल्य ‘ठेव्या’त आणि माझ्यात एक आंतरबंध निर्माण करणारा आणि मला त्याच्याशी बांधून ठेवणारा एक अदृश्य धागा वसतो आहे; आणि त्याच्या मधोमध सुप्तपणे उभे असलेले, माझ्या कुमार वयातले माझे चित्रकलेतले गुरू दिनकर वडणगेकर ऊर्फ विद्यार्थ्यांचे ‘दि. वि. सर’ अपरिहार्यपणे दिसतील. ते जर माझ्या संस्कारक्षम वयात, माझ्या आयुष्यात आलेच नसते अथवा क्षणभर त्यात आपुलकीने डोकावलेच नसते; तर बालपणातच माझे जुळलेले ऋणानुबंध, मधल्या काळात, माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक स्थित्यंतरानंतरही आजवर टिकून राहिलेच नसते.
ड्रॉइंग टीचर्स डिप्लोमा हा कोर्स पुण्यातून पहिल्या श्रेणीत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर दि. वि. वडणगेकर यांची शासकीय पातळीवर १९५३ साली शिक्षक म्हणून नेमणूक  इस्लामपूर हायस्कूल येथे करण्यात आली होती. या हायस्कूलमध्ये त्याचवर्षी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या चित्रकलेच्या सरकारी परीक्षांचे वर्ग त्याच वर्षांपासून वडणगेकरसरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले. हे वर्ग हायस्कूलमधल्या विद्यार्थ्यांना जसे खुले होते, तसेच बाहेरच्या विद्यार्थ्यांनाही खुले होते. त्या बाहेरच्या विद्यार्थ्यांपैकी या वर्गाला प्रवेश घेणारा मीही एक विद्यार्थी होतो.
 मी इस्लामपूरमधल्या ‘शाळा नंबर एक’ या विवक्षित नावानं ओळखल्या जाणाऱ्या प्राथमिक शाळेतला पाचवीच्या वर्गातला विद्यार्थी होतो आणि त्याच वर्षी माझ्या अन्य दोन मोठय़ा भावांसह पुढील शिक्षणासाठी मुंबई सोडून इस्लामपूरला आलो होतो. छोटय़ा चुलत्यानं आम्हाला त्या वर्षी इस्लामपुरातल्या ‘समता विद्यार्थी वसतिगृहा’त वर्षभरासाठी आणून दाखल केलं होतं. तेच आमचे पालक होते आणि इथेच वडणगेकर सर आणि मी असे समोरासमोर आलो!
ते दिवस माझे चित्रकलेत रंगण्याचे होते. इस्लामपूर हायस्कूलच्या इमारतीतला तो पहिला दिवस आठवतो. प्रिन्सिपल बिळाशीकरांच्या केबिनबाहेरच्या एका दरवाजावर लटकलेलं नि प्रथमदर्शनी दिसणारं, लक्ष वेधून घेणारं, वडणगेकरांचं जलरंगातील ते पन्हाळगडाचं निसर्गचित्र! त्यातलं ते ओथंबलेलं पावसाळी वातावरण मान दुखेपर्यंत डोळ्यांनी पीत होतो नि पाहत होतो. रस्त्याने जाताना, ‘पंडित’ या आडनावाच्या पेन्टरचं घर लागत असे. त्या दुमजली घराच्या वरच्या व्हरांडय़ात दर्शनी भागात, त्यानं काढलेलं दिलरुबा वाजवणाऱ्या तरुणीचं चित्र मला खुणावत असे. तो पंचविशीतला पेन्टरही आमच्या वर्गात होता. एक ठोंबरे नावाचा चांगला विद्यार्थीही मला आठवतो. सर तेव्हा अवघे विशीचा उंबरा ओलांडू पाहणारे एक युयुत्सू युवक आणि जलरंगावर अत्यंत मास्टरी असलेले एक गंभीर प्रकृतीचे चित्रकार होते, एवढं मला हटकून आठवतं. आणखी एक गोष्ट सरांबद्दल  सांगावीशी वाटते ती माझ्याबद्दल त्यांना तेव्हा वाटत असलेल्या आत्मीयतेची.
त्याचं असं झालं की, एलिमेन्टरी परीक्षेच्या शेवटच्या पेपरच्या वेळी घडलेली फजिती! मी प्राथमिक मराठी शाळेत शिकणारा मुलगा. मला हायस्कूलमध्ये नोटिसबोर्डावर लागलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकातील बदल माहीतच नव्हता. मी पेपर तीनचा आहे असं समजून आलो तर समोर चिंताक्रांत चेहऱ्याने हायस्कूलच्या दरवाजात फेऱ्या घालणारे वडणगेकर सर मला दिसले. त्यांनी वर पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्याच्या आभाळातून क्षणभरातच आशा-निराशेचे ढग सैरावैरा पळताना मला दिसले. ‘काय रे, तुला पेपरची बदललेली वेळ कळली नाही का? जा पळ! फक्त पाच मिन्टं उरलीत.’ तो पेपर मेमरी ड्रॉइंगचा होता. कोंबडी आणि तिच्या भोवतीनं चालणारी इतस्तत: विखुरलेली पिलं भराभर रेखाटली आणि पेपर सुटायच्या आधी उरलेली तीन मिनिटं मी स्वस्थ बसून राहिलो. सरांनी हे दुरून पाहिलंच असेल. मी ती परीक्षा पास झालो होतो. पण तिचं सर्टिफिकेट माझ्या कधीच हाताला लागलं नाही. कारण त्यानंतर मी मुंबईला निघून आलो होतो आणि पुढच्या वर्षभरात सरही तिथून निघून गेले होते.
परंतु, इस्लामपूरमधल्या माझ्या वर्षभरातल्या त्या वास्तव्यात सरांचं आणि माझं तेवढंच नातं होतं का? नाही. त्यापेक्षा ते नातं अत्यंत वेगळं आणि विलक्षण होतं. मी अवघा दहा-बारा वर्षांचा मुलगा आणि ते माझे तरणेबांड टीचर. तेव्हा ते बॅचलर होते. आपल्या मातीच्या (वा भेंडय़ाच्या) भिंती असलेल्या घरात, समोरच्या भिंतीला बाभळीच्या काटय़ाने टाचलेलं सरांचं एक पुस्तकाच्या आकाराचं जलरंगातलं राम-सीतेचं रोमॅन्टिक चित्र होतं. त्यातला पलंगावर बसून सीतेला जवळ खेचणारा भरजरी वस्त्रे ल्यालेला राम, तिचा हात डोक्यामागून खांद्यावर खेचून तिच्या मुखकमळाजवळ आपला मुखडा नेत होता. व्वा! काय ते चित्र! ते चित्र कितीतरी वेळ मी भान हरपून पाहतच राहिलो. इतक्यात सरांनी आपल्या बांधून ठेवलेल्या बाडाच्या पोतडीतून आपल्या अनमोल चित्रांचा खजिना माझ्यासमोर उघडा केला. ती चित्रं बहुश: जलरंगातली होती. त्यातलं एक स्टिल-लाइफ अजून माझ्या स्मरणात तरळतंय. एका स्टँडवर पाय उचलून सावध उभा असलेला नि आपल्याकडे टवकारून पाहणारा कोंबडा! त्याचे डोळे जिवंत. आपणाला पाहणारे. डोईवरचा झोकदार लाल तुरा नि पंखातली सोनमन्हेरी मलमल! या सगळ्यातून सर मला काहीतरी सांगत होते. शिकवित होते.
ते वर्ष संपून गेले. आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. त्यानंतर माझ्याही वाटा वेगळ्या झाल्या. रंगांच्या भाषेपेक्षा मला शब्दांची आणि कवितेची भाषा जवळची वाटू लागली. मला रंग-आकारांतून अभिव्यक्त होण्यापेक्षा शब्दातून आणि त्यातही विचारातून व्यक्त होणे अधिक जवळचे नि जरुरीचे वाटू लागले.
आणि सर, तुमच्या रस्त्यापासून मी अलग झालो. परंतु त्या वाटेपासून मी विलग (असंबद्ध, विसंगत) झालेलो नाही. सर, तुमच्यापासून मला दूर जावे लागले याबद्दल मी आपली मनोमन क्षमा मागतो. पण चित्रकला माझ्यापासून दूर गेलेली नाही. मधून मधून मी चित्रेही काढतो. तिला ‘प्रॅक्टिस’ लागत नाही. तिला निव्र्याज ‘मेंदू’ लागतो. सर, सर्व प्रकारच्या घाणीपासून मी माझा ‘मेंदू’ स्वच्छ व अलिप्त ठेवला आहे-  हेच तर मी तुमच्यापासून शिकलो आहे. म्हणूनच मी तुम्हाला ‘स्वच्छ आणि निर्मळ मनाचा माणूस’ म्हणतो आहे.
सर! येत्या २४ ऑक्टोबरला आपल्या वयाला ८० वर्षे पूर्ण होतील. पण म्हणून तुमची उपेक्षा संपेल असं नाही. काही वर्षांपूर्वी आपल्यासारख्या माझ्या गुरुवर्याचं घर मी कोल्हापूरात शोधू लागलो. तेव्हा ते मला शाहू महाराजांसारख्या क्रांतिकारकाच्या वास्तव्याने पुनित झालेल्या कोल्हापुरात आणि त्याला पर्यायी नाव असलेल्या ‘कला-पुरा’त सापडलं. पण कुठे? तर कुंभारवाडय़ात.  आपण जातीने कुंभार असलात, तरीही आपल्या अलीकडच्या काही पिढय़ा कलावंत म्हणून वावरताहेत नि चित्रकार म्हणून या देशात नावारूपास नि लौकिकास आल्या आहेत. जसे की, कलातपस्वी गणपतराव वडणगेकर. आदल्या पिढीतच पारंपरिक कारागीराचे रूपांतर चित्रकारात झाले, ही एक महान घटना. असे असताना ‘कलामंदिर’ या त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेची इथे हेळसांड व अवहेलना का होत आहे?
विशेषत: १९९० साली सरकारी नोकरीतून  निवृत्त झालेले प्रा. दि. वि. वडणगेकर हे आपल्या काकांनी स्थापन केलेल्या ‘कलामंदिर’ या संस्थेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी १९९० पासून विनावेतन झटत आहेत. का व कशासाठी? कलेच्या रूपानं पुरोगामित्वाची चळवळ चालविणाऱ्या या मंडळींची आणि त्यांच्या  संस्थांची सरकारने चालविलेली उपेक्षा का?  त्यांना अनुदाने ना तत्सम सुविधा का नाहीत? एकूण दि.वि. सर ही एक न संपणारी गोष्ट आहे!