बया दार उघड...: सांस्कृतिक पर्यटनाचे दार बंदच! Print

सुहास सरदेशमुख , औरंगाबाद - मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२

दररोज होणाऱ्या भरमसाट अभिषेकांमुळे तुळजापुरातील देवीच्या मूर्तीची सच्छिद्रता वाढते आहे. काही अंशी मूर्तीची झीज होत आहे. या पुरातत्त्व विभागाच्या अहवालाकडे आता दुर्लक्ष झाले आहे. आजही अभिषेक होतात, ते वाढावेत असा प्रयत्न पुजारी करतात. त्यांचा चरितार्थ भागतो, पण प्रश्न कायम आहे. देवीची मूर्ती महत्त्वाची की अभिषेक? उत्तर कोणी देईल का?
रूढिपरंपरेत अर्थकारण येतेच. ते कोणालाच बाजूला करता येणार नाही. पण किमान सचोटीने काही प्रयोग नव्याने करता येतील. तुळजापूर, कोल्हापूर, रेणुकादेवीच्या सेवेत हजारभर गोंधळी असतील.

तुळजापूरच्या राजाभाऊ गोंधळींकडे तशी यादी तयार आहे. गोंधळातील संबळाची ओळख स्वतंत्र वाद्य म्हणून निर्माण करता येईल का? या वाद्याचा इतिहास कोणी इंग्रजीसह अन्य भारतीय भाषांमध्ये मांडेल? हजारांहून अधिक गोंधळय़ांनी एकाच वेळी तालासुरात संबळ वाजवले तर? असे काही प्रयोग नव्या विक्रमांपर्यंत नेता येतील. केवळ एवढेच नाही तर विदेशी पर्यटकांना आकर्षित करता येईल एवढी ताकद या वाद्यात आहे. पण असे प्रस्ताव कोण मांडणार आणि असे प्रस्ताव अंमलबजावणीत येतील याची खात्री तरी कोण देणार?

भारतात ५१ शक्तिपीठे. पण महिमा केवळ पोथ्यांमध्ये दडलेला. तशी व्यवस्थाच आहे. ही शक्तिपीठे विदेशी पर्यटकांना आकर्षित करू शकतील? भारतात धार्मिक तीर्थस्थळांचे पर्यटन बौद्ध साखळीतील पर्यटनस्थळांतच दिसते. पर्यटन विभागानेही त्याचे नवे मार्ग करण्याचे ठरविले आहे. अर्थात त्याचा वाव आणि व्याप्तीही तेवढी आहेच. पण देवीची ठाणी आणि समाजरचनेचा अभ्यास जगासमोर मांडल्यास ही देवस्थानेही जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे होऊ शकतील. पण आपल्याकडे इतिहास पर्यटनाच्या अंगाने बघण्याची पद्धतच विकसित झाली नाही. खरेतर मंदिरांच्या सुधारणेचे अनेक प्रस्ताव. पण चर्चा केवळ भौतिक अंगाने होते. रस्ता किती रुंद असावा, पाणी कोठून आणावे, सौरदिवे असावेत की नको? अलीकडे तर तीर्थस्थळांची चर्चा अपहाराच्या अंगाने अधिक होते. त्यामुळे सरकारी पद्धतीने सुधारणा झाली किंवा केली, अशा वातावरणात सांस्कृतिक पर्यटन विकसित तरी कसे होणार? मूलत: देवस्थाने ही पर्यटनस्थळे होऊ शकतात, ही मानसिकताच नसल्याने प्रश्न निर्माण झाले आहेत. पोथ्यांमधील चमत्काराच्या सुरस कथांवर विश्वास ठेवा आणि पूर्वजांनी जे केले तसेच करा, असेच सांगितले जाते.
कोणत्याही मंदिरात जा, नव्या चित्रपटांतील गाण्यांच्या चालीवर बसवलेली गाणी ऐकायला मिळतात. काही वेळा ती लोकप्रियही होतात. पण त्याने महिमा वाढतो? जगण्याच्या सवंग कल्पनेत देवांची आराधनाही त्याच पद्धतीने तर होत नाही ना? अनेक प्रश्न. काही अर्थकारणातील, काही परंपरांचे. हे प्रश्न सोडविण्याची क्षमता निर्माण व्हावी, अशी समाजरचना उभी राहील का? प्रश्नाच्या उत्तरासाठी पुन्हा नाथांच्या शब्दांचा आधार घ्यावा लागेल, ‘बया, दार उघड!’