आनंदयोग : शारदोत्सव Print

भीष्मराज बाम ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

उत्सव साजरे करणे म्हणजे व्रतस्थ राहणे, सत्य व न्यायावर निष्ठा वाढवणे. आपल्या दुर्गुणांशी, लोभाशी, मोहाशी संघर्ष करायचा हे तर आपलेच काम आहे, ते न करता देवाने मात्र आपल्यावर दयाच दाखवावी, अशी अपेक्षा करणे पोरकटपणाचे आहे..
आपण भारतीय उत्सवप्रिय आहोत. वसंत आणि शरद हे दोन ऋतू उत्सवाचे आहेत. वसंत ऋतूत होळी आणि रंगपंचमी हे सार्वजनिक साजरे करायचे सण. पण शरद ऋतूतल्या सणांचा दिमाख जास्त. कारण सुगीचे दिवस असतात.

नवे धान्य घरात आलेले असते. मग नवरात्र, विजयादशमी, नवान्न पौर्णिमा आणि दिवाळी हे सारे सण थाटांत साजरे होतात. दुर्गापूजेची खरी गंमत बंगालमध्ये! आपल्याकडे आता गणपती उत्सवाला तसे थोडेफार स्वरूप आलेले आहे, पण बंगालात अगदी नास्तिक म्हणवणाऱ्या मार्क्‍सवादी कम्युनिस्टांचे राज्य असतानासुद्धा दुर्गापूजा तेवढय़ाच दणक्यात साजरी केली जात असे. त्यांच्याकडे षष्ठीपासून या पूजेच्या उत्सवाला सुरुवात होते. घरी कोणीच स्वयंपाक करायचा नाही. भरपूर भाज्या घालून बनवलेल्या खिचडीचा आणि तऱ्हेतऱ्हेच्या मिठायांचा नैवेद्य दुर्गादेवीला असतो आणि संध्याकाळी जत्राच भरलेली असल्याने सर्वानाच इच्छाभोजन असते. कलकत्त्यांत एकदाच दुर्गापूजेचा उत्सव पाहाण्याचा योग आला. पण हैद्राबाद, दिल्ली आणि मुंबई या साऱ्याच ठिकाणी बंगाली मित्रमंडळीच्या सहवासात या उत्सवाचा आनंद लुटता आला.
मुंबईला चेम्बूरमधल्या बंगाली काली बाडीत आणि जवळच्या शाळेत मोठय़ा प्रमाणावर दुर्गापूजेचा उत्सव साजरा होतो. नृत्याप्सरा हेमामालिनी दरवर्षी एक नृत्यनाटय़ाचा कार्यक्रम तेथे सादर करते. आपल्याकडे दसऱ्याचा रावण दहनाचा सोहळाही अनेक ठिकाणी होतो. विजया दशमीलाच रावणाचा वध रामाने केला म्हणून आपणही तो दिवस विजयाचा म्हणून आनंदोत्सवात साजरा करायचा. कुत्स ऋषींनी गुरू विश्वामित्रांना सुवर्ण दक्षिणा देण्यासाठी रघुराजाकडे मदत मागितली. रघुराजाने सुवर्ण मिळवण्यासाठी इंद्रावर स्वारी केली. इंद्राने साऱ्या अयोध्येवरच सुवर्णमुद्रांचा वर्षांव केला. विश्वामित्रांची गुरुदक्षिणा देऊनसुद्धा असंख्य मुद्रा शिल्लकच राहिल्या. रघुराजाने त्या वेशीबाहेर आपटय़ाच्या झाडाखाली ठेवल्या आणि नगरांत दवंडी दिली की कोणीही जाऊन ते सुवर्ण भांडार लुटून न्यावे. नागरिकांनी त्या दिवशी जाऊन ते सारे सोने लुटून आणले आणि आपापल्या परिवारांत वाटून टाकले. म्हणून विजयादशमीला आपटय़ाच्या पानांची सुवर्णमुद्रा म्हणून देवाणघेवाण करण्याची प्रथा पडलेली आहे.
गुजरातमध्ये या नवरात्रातल्या नऊ रात्रींचा जागर रासदांडिया खेळून केला जातो. आता ते लोण महाराष्ट्रातही सगळीकडे पसरले आहे. गरबा आणि दांडियाचे समूहनृत्य युवावर्गात लोकप्रिय झाले नसते तर नवल. ९ दिवस आणि ९ रात्री देवी असुरी प्रवृत्तींशी-राक्षसांशी लढत असते. म्हणून आपणही जागरण करायचे असते. दहाव्या दिवशी तिने विजय मिळवला म्हणून विजयादशमी. पांडवांचा विराटाच्या दास्यातला अज्ञात वाससुद्धा याच दिवशी संपला असे मानले जाते. याच दिवशी अर्जुनाने एकटय़ाने सर्व कौरववीरांचा पराभव करून विराटाचे गोधन परत मिळवून आणले. आपल्याला काय, उत्सवासाठी निमित्तच हवे असते. कोणीतरी कोणावर तरी विजय मिळवला म्हणून चालत नाही. आपल्याला सत्याची आणि न्यायाचीच बाजू जिंकायला हवी असते. मग विजयोत्सव साजरा करण्यात अर्थातच आनंद वाटतो.
पूर्वी राजे-महाराजे विजयादशमीच्या मुहूर्तावर स्वारी किंवा मोहिमेवर निघत असत. त्या दिवशी सीमा ओलांडायची आणि दिग्विजय करून भरपूर संपत्ती घेऊन परत येत असत. लहान मुलांप्रमाणे प्रजाजनांच्याही चांगले आणि वाईट यांच्या कल्पना स्पष्ट असत. आपली बाजू न्यायाची आणि सत्याची. इतर सर्वाची बाजू ही वाईट. त्यामुळे विजयाचा आनंदोत्सव मोकळेपणाने साजरा होत असे.
शत्रुसैन्य बाहेरचे असले म्हणजे त्याचा नि:शंकपणे संहार करता येत असे. पण ज्यावेळेला युद्ध आपसातच असे त्यावेळी मात्र पंचाईत होत असे. जे आपले आप्त वाटतात त्यांच्या चुका पोटांत घातल्या जातात, त्यांना सहज क्षमा केली जाते. मग या चुका आपल्या स्वत:च्याच असत्या तर? मग तर त्यांचे समर्थनसुद्धा केले जाते. खरा संघर्ष आपल्याच चांगल्या आणि वाईट बाजूंमध्ये असतो. मूल लहान असते त्यावेळी त्याला आपण चांगले वागण्यासाठी प्रलोभने दाखवीत असतो. आपल्यामध्ये सुधारणा होण्यासाठी व्रते ही आवश्यक असतात. ती आपण निष्ठेने करावीत यासाठी सण आणि उत्सव असतात. आपले लक्ष लहान मुलांप्रमाणेच त्यातल्या चैनीच्या आणि करमणुकीच्या भागाकडे म्हणजे प्रलोभनांकडे असते. व्रताचा भाग दुर्लक्षितच राहातो. इतर प्रांतातल्या सणांचा आणि उत्सवाचा भाग चटकन उचलला जातो आणि लोकप्रिय होतो. पण त्या उत्सवासाठी व्रत कोणते करायचे याकडे लक्षच जात नाही.
मुन्शी प्रेमचंदांची ‘ईदगाह’ या नावाची अतिशय सुंदर कथा आहे. म्हातारी अमिना आपला ६/७ वर्षांचा नातू हमीद याला घेऊन दारिद्रय़ात जीवन जगत असते. ईदच्या दिवशी हमीदचे दोस्त ईदगाहवर नमाजसाठी जातात. खरे आकर्षण तिथे भरणाऱ्या जत्रेचे असते. अमिना वाचवून ठेवलेले ६ पैसे देऊन हमीदला त्यांच्याबरोबर पाठवते. त्याचे दोस्त मिठाई, खेळणी यांच्यावर पैसे खर्च करतात. छोटय़ा हमीदला मात्र रोटय़ा करताना आजीचे भाजत असलेले हात आठवतात. खेळण्यांचा आणि मिठायांचा मोह निग्रहाने बाजूला सारून तो सगळे पैसे आजीसाठी लोखंडाचा एक चिमटा विकत घेण्यात खर्च करतो. आजीला याहून चांगली भेट कोणती असेल?
आपल्याला होत असलेले सारे ताप, त्रास हे देवाने दूर करावेत असे बालवयात वाटणे साहजिकच आहे. पण मोठेपणीसुद्धा आपण तसाच हट्ट धरायला लागलो तर कसे चालेल. आपल्या दुर्गुणांशी, लोभाशी, मोहाशी संघर्ष करायचा हे तर आपलेच काम आहे, ते न करता देवाने मात्र आपल्यावर दयाच दाखवावी, अशी अपेक्षा करणे पोरकटपणाचे आहे. उपासतापास हे आपल्याला मिळत नाही म्हणून करायचे नसतात तर आपल्याजवळ भरपूर असतानाही स्वत:वर नियंत्रण ठेवता यावे यासाठी असतात. व्रत करून देवाजवळ जायचे, एकाग्र होऊन पूजा, आरती करायची आणि फक्त प्रसादच नाही तर येणारी समृद्धीसुद्धा सर्वामध्ये वाटून टाकायची. रघुराजाच्या आख्यायिकेत ऋषींपासून, राजापासून ते साऱ्या प्रजाजनांपर्यंत सारेच देऊन टाकायला आसुसले होते. ही भावना समाजात रुजली तर सोनेसुद्धा आपटय़ाच्या पानांइतकेच सहजतेने देता येते आणि आपटय़ाच्या पानांनासुद्धा खऱ्या सुवर्णमुद्रांचे मोल येते.असेच होऊ दे!