विशेष : बहुप्रसव, लोकप्रिय आणि दर्जेदार! Print

विलास  गिते, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२

साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुनील गंगोपाध्याय यांनी  बंगाली प्रेमकवितेला नवीन आयाम दिला;  तर कादंबऱ्यांमधून तत्कालीन कोलकात्याचे व त्यातील मध्यमवर्गीय तरुण-तरुणींच्या विश्वाचे विलक्षण चित्र रेखाटले. नुकतेच सुनीलबाबूंचे निधन झाले.  या असामान्य लेखकाची, बंगाली साहित्याच्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ अभ्यासकाने करून दिलेली ओळख..
बहुप्रसव, दर्जेदार आणि लोकप्रिय या तीनही निकषांवर उतरणारे लेखक फार कमी असतात. सुनील गंगोपाध्याय हे बंगाली लेखक अशा दुर्मीळ लेखकांपैकी एक होते. दोनशेपेक्षा अधिक पुस्तके लिहिणारे सुनीलबाबू २००८पासून साहित्य अकादमीचे अध्यक्षही होते.

सुनील गंगोपाध्याय यांनी कविता, कादंबरी, लघुकथा, लघुनिबंध, ललित लेख, प्रवासवर्णन, समीक्षा आणि बालसाहित्य अशा सर्वच साहित्य प्रकारांमध्ये दर्जेदार लेखन करून बंगाली तसेच भारतीय साहित्य समृद्ध केले.
सुनील गंगोपाध्याय यांचा जन्म १९३४चा. त्यांनी ‘अर्धेक जीवन’ या आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे, ‘मी पूर्व बंगालच्या एका निर्वासित आणि अत्यंत गरीब कुटुंबातला मुलगा. कॉलेज जीवनाच्या सुरुवातीपासूनच एखादी टय़ूशन आणि अनेक प्रकारच्या फुटकळ पार्ट-टाइम नोकऱ्या करीत मी माझ्या शिक्षणाचा खर्च भागवीत होतो आणि त्यामुळेच मी कधीही स्वत:ला अभ्यासात झोकून देऊ शकलो नाही. एरवीही मी काही फार बुद्धिमान विद्यार्थी नव्हतो. शिवाय तेव्हाच मला कवितेचा किडा डसला होता आणि मी कवितालेखन सुरू केलं होतं. कवितेचं लघुनियतकालिक प्रकाशित करणं आणि कॉलेजमधले तास बुडवून कॉलेज स्ट्रीटवरच्या कॉफी हाऊसमध्ये अड्डेबाजी करणं याच्यामध्ये मला अगदी पारमार्थी स्वरूपाचा आनंद मिळत असे.’
टय़ूशन्स घेण्याव्यतिरिक्त सुनीलबाबूंनी एका इन्शुरन्स कंपनीत ट्रेनी ऑफिसर म्हणून आणि आता बंद पडलेल्या एका बंगाली वृत्तपत्रात एका विभागाचा संपादक म्हणून काम केले. काही काळ युनेस्कोच्या प्रौढ शिक्षण योजनेत, तर काही काळ एका सरकारी कार्यालयात कारकून म्हणून नोकरी केली. या सरकारी नोकरीतील एक मजेशीर आठवण त्यांनी आत्मचरित्रात लिहिलेली आहे.
एकदा, रजेचा अर्ज न देता सलग तीन महिने ते गैरहजर राहिले. तीन महिन्यांनंतर ते कार्यालयात गेले आणि आपल्या खुर्चीवर बसले. आपले अधिकारी आपल्याला रागावतील किंवा आपल्याला नोकरीतून काढून टाकण्यात येईल असे त्यांना वाटले होते. पण तसे काहीच झाले नाही. त्यांची नोकरी चालूच राहिली. अर्थात् नंतर त्यांनीच काही काळाने ही नोकरी सोडली.
अशा नोकऱ्या करीत त्यांनी कोलकाता विद्यापीठातून एम.ए. ची पदवी मिळवली. नंतर ‘आनंद बजार पत्रिका’ या वृत्तपत्रसमूहाच्या संपादकीय विभागात ते स्थिरावले.
‘कृत्तिबास’
१९५३ साली सुनील गंगोपाध्याय यांनी दीपक मजुमदार आणि आनंद बागची यांच्याबरोबर ‘कृत्तिबास’ हे कवितेला वाहिलेले लघुनियतकालिक सुरू केले. तिसऱ्या अंकानंतर मात्र सुनीलबाबू एकटेच ‘कृत्तिबास’ची संपादकीय जबाबदारी सांभाळू लागले. १९५० आणि ६०च्या दशकातील सर्वच प्रमुख बंगाली कवींच्या कविता प्रथम ‘कृत्तिबास’ या लघुनियतकालिकात प्रकाशित झाल्या. (‘कृत्तिबास’ हे बंगालीतील एक प्राचीन कवी. त्यांनी केलेला रामायणाचा अनुवाद ‘कृत्तिबासी रामायण’ म्हणून प्रसिद्ध आहे.)
सुनीलबाबूंचा पहिला कवितासंग्रह होता, ‘एक एवं कयेकजन’ (एक आणि काही जण, १९५८) त्यांचे इतर महत्त्वाचे कवितासंग्रह म्हणजे ‘आमार स्वप्न’ (माझे स्वप्न, १९७२), बंदी जेगे आछि (१९७४), जागरण हेमवर्ण (१९७४), आमि की रकम भाबे बेंचे आधि (मी कशा प्रकारे जगतो आहे, १९७५) इत्यादी.
विषय, शब्दकळा, प्रतिमासृष्टी, शैली, भावनात्मक व बौद्धिक दृष्टिकोन यांच्या संदर्भात या कवितेने बंगाली वाचकांना नवीन काहीतरी दिले. त्यांनी बंगाली प्रेमकवितेला नवीन आयाम दिला. त्यांच्या ‘नीरा’ मालिकेतील प्रेमकविता बंगालीतील सर्वात उत्कट प्रेमकविता मानल्या जातात.
असे असले, तरी ‘सादा पृष्ठ’ (पांढरे पृष्ठ) ‘तोमार संगे’ (तुमच्यासंगे) हे त्यांचे कवितासंग्रह कवीला एक गंभीर अशी सामाजिक भूमिका बजावायची असते याची जाणीव दाखवतात. या संग्रहातील कवितांमधून त्यांनी सामाजिक विषमता, धार्मिक कट्टरपणा, मूलतत्त्ववाद, जातीयवाद आणि दहशतवाद यांच्याविरुद्ध आवाज उठवलेला आहे. खरे तर सुनीलबाबू कट्टर मार्क्‍सवादी होते. आणि श्रेणीविहीन समाजरचना तयार होण्यामध्येच मानवाची मुक्ती आहे, असे ते मानीत.
कादंबऱ्या
‘आत्मप्रकाश’ (आत्मप्रकटीकरण) ही त्यांची पहिली कादंबरी १९६६ साली प्रकाशित झाली. या कादंबरीत त्यांनी कोलकात्यातील नोकरी नसलेल्या, दिशाहीन आणि संतप्त तरुणांचे परिणामकारक चित्रण केले आहे. त्यानंतर सुनीलबाबू एकामागून एक कादंबऱ्या लिहीत गेले. या कादंबऱ्यांमध्ये तत्कालीन कोलकात्याचे व त्यातील मध्यमवर्गीय तरुण-तरुणींच्या विश्वाचे चित्रण आहे. त्यांच्या ‘अरण्येर दिनरात्रि’ (अरण्यातील दिवस व रात्री) आणि ‘प्रतिद्वंद्वी’ (प्रतिस्पर्धी) या कादंबऱ्यांवर सत्यजित राय यांनी चित्रपट काढले, तर ‘ओरा तीनजन’ (ते तिघेजण) या कथेवर मृणाल सेन यांनी चित्रपट काढला.
गंमत म्हणजे आपल्या लघुनियतकालिकाच्या छपाईचे बिल देता न आल्याने छापखाना मालकाच्या विनंतीवरून सुनीलबाबूंनी त्याच्या मासिकाच्या विजयादशमी विशेषांकासाठी ‘अरण्येर दिनरात्रि’ ही कादंबरी लिहून दिली होती. तो अंक प्रकाशित झाल्यावर काही दिवसांनी खुद्द सत्यजित राय यांनी फोन करून ‘अरण्येर दिनरात्रि’ या कादंबरीवर चित्रपट काढण्याची इच्छा सुनीलबाबूंना कळवली. तेव्हा मला आनंद आणि उत्तेजनेने रात्रभर झोप आली नाही, असे सुनीलबाबूंनी आत्मचरित्रात नोंदवलेले आहे.
महत्त्वाकांक्षी महाकादंबऱ्या
‘एक एवं कयेकजन’ (१९७४), ‘सेई समय’ (दोन खंड, प्रथम खंड १९८१, दुसरा खंड १९८२) आणि ‘प्रथम आलो’ या सुनीलबाबूंच्या महत्त्वाकांक्षी महाकादंबऱ्या आहेत. ‘एक एवं कयेकजन’ ही भारताचा स्वातंत्र्य लढा आणि जहाल बंगाली क्रांतिकारकांचे त्या लढय़ातील कर्तृत्व या विषयावरील कादंबरी आहे.
‘सेई समय’ (तो काळ) आणि ‘प्रथम आलो’ या महाकादंबऱ्या १९ व्या शतकातील बंगालमधील पुनर्जागरणावर लिहिलेल्या आहेत. या कादंबऱ्यांमध्ये त्या काळातील बंगालमधील सामाजिक, सांस्कृतिक-बौद्धिक व वैचारिक क्षेत्रातील प्रवाहांचे व मंथनाचे चित्रण आहे. मराठीत विशिष्ट व्यक्तींवरील चरित्रात्मक कादंबऱ्या अनेक आहेत, पण अशा विशाल कालखंडाच्या पटावरील कादंबऱ्या नाहीतच म्हटले तरी चालेल. (‘प्रथम आलो’ या कादंबरीचा ‘पहिली जाग’ या शीर्षकाने रंजना पाठक यांनी केलेला मराठी अनुवाद साहित्य अकादमीने प्रकाशित केला आहे, तर ‘सेई समय’ चा अनुवाद मृणालिनी गडकरी करीत आहेत.)
‘सेई समय’ या कादंबरीसाठी त्यांना १९८५चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्याआधी त्यांना १९७२ मध्ये ‘आनंद पुरस्कार’ आणि १९८३ मध्ये ‘बंकिम पुरस्कार’ मिळाला होता. याच वर्षी पं. बंगाल सरकारने त्यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरवले होते.
प्रवासवर्णने
सुनीलबाबूंनी पहिला विदेशप्रवास आयोवा, अमेरिका, येथील पॉल अँजेल यांच्या आमंत्रणावरून केला. अँजेल कोलकात्यात आले असताना त्यांनी सुनीलमधील गुण हेरले आणि त्यांना आयोवा विद्यापीठाच्या ‘क्रिएटिव्ह रायटिंग प्रोग्राम’साठी आमंत्रित केले. ‘तेव्हा माझ्या मित्रांनी वर्गणी काढून मला सूट शिवून दिला होता’ हेसुद्धा सुनीलबाबूंनी नोंदवले आहे. नंतर त्यांनी अनेकदा विदेश प्रवास केला व उत्तम प्रवासवर्णने लिहिली.
‘छबिर देशे, कवितार देशे’ हे त्यांचे युरोपचे प्रवासवर्णन अप्रतिम आहे. प्रवासवर्णनाच्या ओघात युरोपियन कवी व चित्रकारांची चरित्रे आणि कर्तृत्व त्यांनी ओघवत्या भाषेत लिहिली आहेत.
ललितलेखन व समीक्षा
सुनीलबाबूंनी ‘नीललोहित’ या टोपणनावाने लघुनिबंध व ललितलेख लिहिले. ते ‘नीललोहितेर अंतरंग’ आणि ‘नीललोहितेर चेना - अचेना’ या पुस्तकांमध्ये ग्रंथित केलेले आहेत.
‘सनातन पाठक’ या टोपणनावाने त्यांनी ‘देश’ या नियतकालिकात समीक्षालेखन केले.
लहान मुलांसाठीही त्यांनी लेखन केले. त्यांची ‘तीन नंबर चोख’ (तिसऱ्या क्रमांकाचा डोळा, १९७४), सत्त्यि राजपुत्र (खरा राजपुत्र १९७४), ज्यान्त खेलना (जिवंत खेळणे, १९७६), सबुज व्दीपेर राजा (हरित देशाचा राजा, १९७९), हलदे बाडीर रहस्य ओ दिने डाकाती (पिवळ्या घराचे रहस्य व दिवसा दरोडा) ही पुस्तके बालवाचकांत प्रिय आहेत.
असा लेखक आता बंगालीत विरळाच!