आनंदयोग : जुळवून घेणे जमेल? Print

भीष्मराज बाम - बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सतत बदलणाऱ्या परिस्थितीचे भान राखून आपला तोल ढळू न देता योग्य तेच प्रतिसाद देता यायला हवेत. भवताल वा माणसे आपल्याला बदलता येत नाहीत, पण स्वतमध्ये बदल घडवणे कष्टसाध्य असते. माझी भोपाळला बदली झाली तोपर्यंत मला मुंबईची चांगलीच सवय झालेली होती. मुंबईला पहिल्यांदा आलो तेव्हा या इतक्या बहुरंगी आणि बहुढंगी शहराची कोणाला सवय होऊ शकेल असे वाटले नव्हते. कॅडबरी, गोदरेज यांसारख्या परिचित ब्रॅण्डच्या कंपन्यांची नावे वाचून नव्याने मुंबईत येणाऱ्या खेडय़ातल्या पाहुण्याला जसे नवल वाटले असेल तसे ते आम्हालाही वाटले होते.

दादरच्या फुटपाथवरच्या सुपर मार्केटचे भयंकर आकर्षण वाटले होते. इतके की एखादी गरजेची वस्तू घ्यायला बाजारात गेलो की अनेक अनावश्यक वस्तूसुद्धा घेतल्या जायच्या. पहिले कितीतरी दिवस आपण एखाद्या जत्रेतच राहात असल्याची भावना मनात असे.
मी पोलीस ट्रेनिंग कॉलेजमध्य बिलियर्ड्स व स्नूकर हे खेळ नव्याने शिकलो होतो. त्या खेळाचे व नेमबाजीचे सुद्धा मला जवळजवळ व्यसन लागल्यासारखे झाले होते. मुंबईत हे दोन्ही खेळ खेळायला मिळणार याचा मला आनंद झाला. घराच्या बाजूलाच दादर क्लब होता. वरळीला म्हणजे ऑफिसच्या वाटेवरच नेम बाजीची रेन्ज होती. पण याचा आनंद फारसा टिकला नाही. दादर क्लबमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे बिलियर्ड आणि स्नूकर खेळाडू होते. अध्र्या तासाचे गेम्स असत. त्यात २५ मिनिटे प्रतिस्पध्र्याचाच खेळ होई आणि ४/५ मिनिटे खेळायला मिळत. वरळीच्या रेन्जवर स्पर्धा होत आहेत हे समजल्यावर मी मोठय़ा उत्साहाने नाव नोंदवले. प्रत्यक्ष स्पर्धा करताना आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर उभे राहण्याचेच दडपण आले. त्यातून माझे रिव्हॉल्व्हर आणि गोळ्या पोलीस खात्यांत दिले जाणारे.. सर्वात जुन्या मॉडेलचे. माझ्या गोळ्या निशाणावर तिरप्या किंवा आडव्या लागत होत्या. त्यामुळे एका वेळी दोन गोळ्या लागत असल्यासारखे वाटे. स्पर्धा संपल्यावर सर्व नेमबाज माझे रिव्हॉल्व्हर पाहायला भोवती गोळा झाले.
नोकरी पोलीस खात्यातील असल्याने सरावाला क्वचितच वेळ मिळत असे. पण नेमबाजीचे प्रशिक्षक कॅप्टन ईझिकेल यांच्याशी परिचय झाला. त्यांच्याकडून मानसिक सरावाचे धडे घेतल्यावर नेमबाजीमध्ये झपाटय़ाने सुधारणा झाली. ते प्रयोग बिलियर्ड्स व स्नूकरमध्ये केल्यावर ते खेळही मी चांगलाच खेळायला लागलो. हा फरक जाणवल्यामुळे मला अनेक उत्तम खेळाडूंची मैत्री लाभली आणि पुढे तेसुद्धा माझ्याबरोबर मानसिक सरावाचे प्रयोग करायला लागले.
मुंबईत रुळल्याने भोपाळला गेल्यावर एखाद्या मोठय़ा खेडेगावात आल्यासारखे वाटले. मुलांच्या शिक्षणासाठी आई, पत्नी व मुले मुंबईतच रहाणार होती. भोपाळला मला एक जुना भला थोरला बंगला मिळाला होता. त्या आठ-दहा खोल्यांच्या घरात मी एकटाच राहात असे. एखाद्या भूतबंगल्यातच राहात आहोत असे वाटे. दिल्लीच्या माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मला सांगितले होते, ‘‘मुंबईला इतकी वर्षे राहून तुला घडय़ाळाच्या काटय़ांप्रमाणे आयुष्य जगायची सवय झाली असेल. भोपाळच्या लोकांना तू कॅलेण्डरची जाणीव करून देऊ शकलास तरी तुझी ती मोठी कमाई असेल!’’
त्यांचे सांगणे खरेच होते. मध्य प्रदेशांतले लोक अतिशय अगत्यशील. पण काम करण्याची आणि तेही वेळेवर करण्याची फारशी कोणालाच सवय नव्हती. ऑफिसमधले कामही दोनएक तासांत संपत असे. भरपूर वेळ हातात शिल्लक राही. मग मी मध्य प्रदेशात खूप भटकलो. बंगल्यातच एक एअरवेपनची रेन्ज तयार करून सराव केला. जवळच एक क्लब होता. तिथे बिलियर्डचे टेबल होते म्हणून त्या क्लबमध्ये नाव घातले. पण ते जुनाट, कपडा गुळगुळीत झालेले टेबल पाहूनच मी हबकून गेलो. आपल्याला चांगले बिलियर्ड खेळता येत असल्याचा माझा गैरसमज पहिल्या गेममध्येच नाहीसा झाला. पण दौऱ्यात मी माझा क्यू आणि एअर पिस्तुल घेऊन जायला लागलो. इंदुर, रायपूर, बिलासपूर, ग्वाल्हेर वगैरे ठिकाणी चांगल्या टेबलवर खेळायला मिळाले. भरपूर मित्रमंडळी मिळाली. त्या साऱ्यांना मी माझ्या नेमबाजीच्या कौशल्याने चकित करून सोडले. वासरांतल्या लंगडय़ा गाईचा मान मला मिळायला लागला. मी जाईन तिथे तऱ्हेतऱ्हेच्या मिठाया आणि सुग्रास भोजन यांनी माझा सत्कार व्हायला लागला. वर्षभरातच मी सुखासीन आणि चांगला गुटगुटीत झालो. ऑफिसचे काम म्हणजे कटकट अशी माझीही धारणा व्हायला लागली. फक्त कुटुंबापासून दूर राहावे लागत असल्याची बोच तेवढी शिल्लक होती. पण तेवढय़ात एक चांगली संधी आली. अगदी थोडेसे काम आणि मुंबईतले पोस्टिंग. चार वर्षे आराम करता आला असता. मी लगेच होकार कळवून टाकला आणि सामान बांधून तयार होऊन बसलो. पण प्रत्यक्षात हातामध्ये भलतीच ऑर्डर येऊन पडली. पोस्टिंग मुंबईतच, पण संपूर्ण भारतात सर्वात जास्त कामाचा ताण असलेली पोस्ट होती.
गणेश चतुर्थीच्या दिवशीच मुंबईत येऊन चार्ज घेतला आणि निवृत्त होईपर्यंत तिथेच राहिलो. हा संपूर्ण काळ एखाद्या वावटळीत किंवा वादळात सापडलो असल्याची भावना होत राहिली. पानिपताच्या लढाईत तीर्थयात्रा आणि चंगळ करायला गेलेल्या भिक्षुकाला एकदम घोडय़ावर बसून हातात तलवार घेऊन गिलच्यांवर स्वारी करायला पाठवावे तसे झाले. पण त्या कामाचीही सवय पडली आणि हातून चांगले काम झाले. त्याबद्दल पदके देऊन कौतुकसुद्धा झाले.
क्रीडा मानसशास्त्रात परिस्थितीशी जुळवून घेता येणे या गुणाला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. सारा भवताल, वातावरण, बरोबर किंवा विरुद्ध असलेली माणसे यांपैकी कशावरच आपले नियंत्रण राहू शकत नाही. नियती म्हणतात ती हीच. पण सतत बदलणाऱ्या परिस्थितीचे भान राखून आपला तोल ढळू न देता योग्य तेच प्रतिसाद देता यायला हवेत. मला अजिंक्यवीर बनणे सहजसाध्य जरी नाही तरी कष्टसाध्य होते. याहून जास्तीची अपेक्षा ठेवली तर अपयश आणि निराशाच वाटय़ाला येतात. ते टाळायला हवे.