वार्ता ग्रंथांची.. मुंबई अशी, जयपूर तसं! Print

शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
जयपूरला भरणारा ‘लिटरेचर फेस्टिव्हल’ गेल्या सहा वर्षांत बराच प्रसिद्ध झाला आहे. इतका की, जानेवारीच्या अखेरच्या दिवसांत कुणी टूरिस्टसारखा न दिसणारा, पण परराज्यातला प्रवासी सवाई माधोसिंग रस्त्यावर चलायचं म्हणाला की रिक्षावालाच विचारतो, ‘उस मेलेमें जाना है?’ पण मुंबईतही ‘लिट फेस्ट’ भरतो आणि त्याचंही यंदा तिसरं वर्ष आहे, याची कल्पना बऱ्याच मुंबईकरांना नाही!

नोबेलचे मानकरी आणि मुंबईच्या अधोविश्वाला साहित्यात  स्थान देणाऱ्या पहिल्या इंग्रजी लेखकांपैकी व्ही. एस. नायपॉल मुंबईत दोन दिवस अगदी जाहीर कार्यक्रमांत वावरत होते. हा ‘लिट फेस्ट’ येत्या रविवापर्यंत सुरू राहणार आहे, त्याचं वेळापत्रक  ‘लिटलाइव्ह. इन’ या संकेतस्थळावर पाहाता येईलच. हा उत्सव जिथं भरला आहे, त्या राष्ट्रीय संगीत नाटय़ केंद्रात (एनसीपीए) गेल्याशिवाय  गर्दीची कल्पना येत नाही, पण लोकांचा प्रतिसादही मिळतो आहे.
असे उत्सव भरवताना किती लोकानुनय केला जातो, याचा एक नमुना म्हणजे जग्गी वासुदेव नावाचे साधगुरू  यंदाच्या मुंबई लिटफेस्टमध्ये सन्माननीय निमंत्रित होते. त्यांच्या शिष्यगणांनी भर लिटफेस्टमध्येच एक शिबिरही ‘अटेंड’ करण्याची संधी साधली. गुरूंच्या नावावर भरपूर पुस्तकं आहेत, ती वाचनीयही आहेत. परंतु उत्सव लोकप्रियतेचा की साहित्याचा, असे प्रश्न आयोजकांनी बाजूला ठेवले. जयपूरमध्ये याउलट तऱ्हा दिसते. तिथं काही धनदांडगे प्रकाशक, ज्या लेखकांना यंदा गाजवायचंय त्यांची फळीच घेऊन येतात. आगामी किंवा अगदी नुकत्या प्रकाशित झालेल्या पुस्तकांवरही एकदीड तास चर्चा रंगवली जाते. आता सांगा, अशा उत्सवांमध्ये ग्रंथांची वार्ता कुणाला समजू शकेल का?