विशेष : वंगचित्रकार कुट्टी Print

सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२

दिल्लीच्या प्रेस क्लबमध्ये व्यंगचित्रकार कुट्टी यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनाची तयारी आम्ही काही व्यंगचित्रकार मित्र करत होतो. ती व्यंगचित्रे प्रामुख्याने ‘आनंद बाजार पत्रिका’ आणि  ‘आजकल’ या बंगाली दैनिकांतील होती. ती पाहून तिथे असणारा एक बंगाली पत्रकार एकदम भावनावश झाला. आम्हाला सांगू लागला, ‘मी लहानपणापासून कुट्टी यांची व्यंगचित्रं पाहतोय. आम्हा बंगाली पत्रकारांच्या दोन तीन पिढय़ा कुट्टी यांची व्यंगचित्रं पाहातच वाढल्या आहेत.

कुट्टी यांच्या व्यंगचित्रांच्या रेषा आमच्या रक्तात आहेत. आमचं वृत्तपत्रीय सांस्कृतिक जीवन हे त्या काळात कुट्टी यांच्या व्यंगचित्रांनीच समृद्ध केलंय!’
पी. के. एस. कुट्टी हे मल्याळी व्यंगचित्रकार. इतर अनेक मल्याळी व्यंगचित्रकारांप्रमाणे तेही दिल्लीला गेले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शंकर यांच्याकडून त्यांनी व्यंगचित्रकलेचे धडे घेतले आणि आपली स्वतंत्र कारकीर्द सुरू केली. (काही काळ ते मुंबईच्या फ्री-प्रेसमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते.) दिल्लीत असताना त्यांनी कलकत्त्याचं बंगाली वृत्तपत्र ‘आनंद बाजार पत्रिका’ यांमध्ये व्यंगचित्रे काढायला सुरुवात केली अन् तेही एकही बंगाली शब्द माहिती नसताना. त्यांची सर्व व्यंगचित्रं इंग्रजीत असायची, नंतर त्यांचं बंगालीत भाषांतर व्हायचं. हा प्रकार जवळपास चाळीस वर्षे चालला. पहिल्या पानावर मोठय़ा आकारातलं राजकीय व्यंगचित्र सतत येत असल्याने ते बंगाली वाचकांमध्ये खूपच लोकप्रिय झाले. बंगाली वृत्तपत्रांचा खप हा देशात सर्वाधिक असल्याचा फायदाही कुट्टी यांना झाला. एकदा कोलकात्याच्या बुक फेअरमध्ये कुट्टी स्वत:च्या व्यंगचित्रांच्या पुस्तकावर स्वाक्षरी करून देणार असं जाहीर केलं गेलं. त्या वेळी तिथे एवढी गर्दी उसळली की, शेवटी कुट्टी यांना तिथून गुप्तपणे बाहेर न्यावं लागलं. कुट्टी यांच्या बंगाली लोकप्रियतेचे असे अनेक किस्से आहेत. विद्यमान राष्ट्रपतीही त्यांच्या व्यंगचित्रांचे चाहते आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेत वयाच्या नव्वदाव्या वर्षी कुट्टी यांचं निधन झालं.