Print

शनिवार , २९  सप्टेंबर २०१२

स्त्री सबला झाली ?
१५ सप्टेंबरच्या ‘चतुरंग’ मधील ‘मुली-चांगल्या आणि वाईट घरातल्या’ या डॉ. मंगला आठलेकर यांनी लिहिलेल्या लेखाने मन हेलावून गेले. अजूनही स्त्री किती बंधनात जखडलेली आहे हे लक्षात आले. कोणतीही स्त्री देहविक्रयाचा पर्याय नाइलाजाने, दारिद्रयातून सुटका मिळण्यासाठी पत्करत असते. पशांची निकड म्हणून तर कधी कुठल्याशा आमिषाला बळी पडून फसवणूक झाल्याने बिचाऱ्या मुली कायमच्या या मार्गाला लागतात. इथे आल्यावर परतीचे मार्ग बंद होतात.
या मुली यात होरपळत असतील, यात शंका नाहीच. त्यांनी देहविक्रय करण्याला नकार दिला तर त्यांचे दलालच त्यांच्यावर बलात्कार करून त्या मुलींना नग्नावस्थेत कोंडून ठेवून आणखी न सांगता येणारीही शिक्षा करतात. खरेच हा लेख वाचून मन सुन्न झाल्याशिवाय राहात नाही. आज महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने ती सबला झाली आहे, ती सुशिक्षित झाली आहे हे नाही पटत. देहविक्री करणाऱ्या स्त्रीयांना कोणते आरक्षण आहे? कोणती सुरक्षितता आहे तिला? लेखिकेने म्हटल्याप्रमाणे एकेका दिवसाला या मुलींना १०-१५ पुरुषांना शरीरसुख द्यावे लागते. हे वाचून मन सुन्न झाले. खरोखर अंधारात जावून बसावेसे वाटले. यात चांगल्या आणि वाईट घराचा प्रश्नच येत नाही मुळी, मुलगी ती मुलगीच आणि स्त्री ती स्त्रीच. कधी ही विकृती नाहीशी होईल? कधी या निसर्ग चक्राचे पावित्र्य जपले जाईल कोणास ठाऊक ?
- गौरी गोगटे,नाशिक

दावा निर्थक
१५ सप्टेंबरच्या चतुरंगमधील महेंद्र कानिटकर यांचा ‘प्रेम आणि अहंकार’ हा लेख वाचला. त्यात एका प्रेमविवाहाचं उदाहरण दिलं आहे. त्यातल्या पत्नीला माहेरच्या सदाचाराचा, नतिकतेचा अहंकार असल्याचे समुपदेशकांनी सांगितले आहे. पण त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या तपशिलात दोघांनी (भावी पतिपत्नींनी) लग्नापूर्वी ज्या मर्यादा ठेवणं आवश्यक होतं त्या मर्यादा ओलांडल्या, त्याचबरोबर मुलींनी ‘पार्टी’ संस्कृतीतल्या मुलाकडून लग्नाआधी मद्यपानही शिकून घेतलं असा उल्लेख आहे. असं असेल तर मुलीचा आपण सदाचारी व नतिकतेचं वातावरण असलेल्या घरातल्या आहोत हा दावा निर्थक व अप्रस्तुत आहे हे समुपदेशकांनी तिच्या नजरेस आणून द्यायला हवं होतं. म्हणजे ती अंतर्मुख झाली असती.
 -शरद कोर्डे, ठाणे

साक्षर झालो, सुशिक्षित नव्हे!
८ सप्टेंबरच्या पुरवणीतील ‘प्रवाहाविरुद्ध पोहणे’ हा लेख विशेष आवडला. वानगीदाखल घेतलेल्या श्व्ोता, नीता, अरुणा, सीमा यांसारखेच विचार असणाऱ्या अनेकजणी आज समाजात आहेत. खरे पाहता संस्कृती प्रवाही नि शील-शालीनता धरून असावी, पण असे होताना अत्यल्प प्रमाणात दिसते. लेखातील उदाहरणांमधून वेगळ्या पातळीवरचा स्त्री-संघर्ष दाखवला असला तरी वास्तवातही अधिक प्रमाणात आहे. आणि दुर्दैवाने तिचे पाठीराखे असणारे (वडील, भाऊ, नवरा, सासरा, आई, सासू ) तिची पाठ सोडतात .
विधवा तर सोडा, पण पहिली बायको वारल्यानंतर दुसरे लग्न गाजावाजा न करता केल्यास दुसऱ्या पत्नीला धार्मिक विधी करण्याचा अधिकार नाकारला जातो. या दांभिकपणाला मी फार विरोध केला, पण मलाच लोकांनी खोटे पाडले. लग्नात अक्षता म्हणून धान्य वापरले जाते, त्यामुळे ते वाया जाते. शिवाय सगळ्याच अक्षता नव दांपत्याच्या डोक्यावर पडत नाही, त्यामुळे शास्त्रापुरते वर-वधूच्या मागे असणाऱ्यांनी अक्षता टाकाव्यात, उर्वरितांनी टाळ्या वाजवून शुभेच्छा दिल्यासही कार्य सिद्धीस जाईल, असे मी सुचवले होते. पण हे विचार मी स्वत:च्या लग्नातही अमलात आणू शकले नाही याचे वाईट वाटते.
उपवासाच्या साबुदाण्याचीही अशीच कथा. माझ्या प्रकृतीला ते जड जाणारे, पण शंकराच्या उपवासाला म्हणे वरईचे तांदूळ चालत नाहीत. (आता हे खुद्द शंकराने साक्षात्कार दिल्याप्रमाणे सगळे अगदी ठामपणे सांगतात). आईला अनेकदा समजावले. पण तिच्या बुद्धीला पटेना, शेवटी मी उपास करणे सोडले. अशा वेळी वाटतं, अध्यात्म नि शास्त्र यांची सांगड घालायला आपण शिकलोच नाहीत, फक्त साक्षर झालो, सुशिक्षित नव्हे!
साक्षी गोडसे, मुंबई