Print

शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
चंगळवाद धोक्याची घंटा
‘संयमाचा कडेलोट’ हा डॉ.अनुराधा सोवनी यांचा लेख अतिशय आवडला. अशी टोकाची भूमिका ताणामुळे येते, ताण हा स्पध्रेमुळे येतो आणि स्पर्धा हव्यासातून येते. हव्यास हा भोगवादी व चंगळवादी व्यवस्थेचा एक भाग आहे. भोगवादाला अंत नाही. भारतीय संस्कृती ही गरजेपुरते मिळवणे, निसर्गाप्रमाणे राहणे याची कास धरणारी आहे. शारीरिक कष्ट करणे, एकत्र मिळून उत्सव साजरे करणे, एकमेकांच्या सुखदु:खात सामील होणे यावर आपला विश्वास आहे. त्यामुळे चंगळवादापासून दूर राहा. सर्व ठीक होईल.
- शैलेश, ई-मेलवरून

क्रोधाचा निचरा महत्त्वाचा
‘संयमाचा कडेलोट’ या लेखातून माझ्याच मनातले विचार कागदावर उतरवल्यासारखे वाटत होते. मनातली चीड प्रत्येक वेळी संबंधित व्यक्तीपर्यंत नाही पोहोचली तरी चालते, पण ती वेळच्या वेळी बाहेर मात्र पडली पाहिजे. गर्दीच्या रस्त्यावरून वाहन चालवताना हा अनुभव नेहमी येतो. चिडचिड होत राहते, बोलून काय फायदा अशा विचाराने ती मनात दाबली जाते आणि एखाद्या चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने बाहेर पडते. अगदी खून, मारहाण असेच व्हायला पाहिजे असे नाही. कारण नसताना कुणावर तरी खेकसणे, गाडीचा/घराचा दरवाजा जरा जोरात आपटून लावणे, फोन उचलताना जोरात बोलणे हेसुद्धा वैताग आणि चिडचिड किंवा क्रोध चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बाहेर पडण्याचीच उदाहरणे आहेत.
- राधा मराठे, ई-मेलवरून

‘आधुनिक फंडा’ आवडला
‘प्रेग्नन्सीचा आधुनिक फंडा’ हा लेख (८ सप्टेंबर) आवडला. मला वाटले होते आम्हीच खूप जागरूक आहोत पण तुमचा लेख वाचून कळले आजची तरुण पिढी जबाबदार पालकत्व स्वीकारत आहे आणि आम्ही योग्य दिशेने जात आहोत. मस्त लेख.
- सुचित्रा, ई-मेलवरून

मुद्दा बरोबर, रोख चुकीचा
‘मुली चांगल्या आणि वाईट घरातल्या’ हा डॉ. मंगला आठलेकर यांचा लेख (१५ सप्टेंबर) वेश्या व्यवसायातील स्त्रियांच्या विदारक जीवनाचे यथार्थ वर्णन करणारा आहे. चांगल्या घरातल्या मुली या मिथकाचीही त्यांनी योग्य चिकित्सा यात केली आहे. पण या लेखाचा रोख मात्र मला पूर्वग्रहदूषित वाटतो.
लेखिकेने एकूण पुरुष या समाजालाच यात सरसकट दोषी धरलं आहे. मुंबईतील फोरास रोड, पुण्यातील बुधवार पेठ येथील कुंटणखाने हे बहुतेक करून बायकाच चालवतात हे वास्तव आहे. पुण्यात मध्यंतरी कल्याणी देशपांडे या सेक्स रॅकेट चालवणाऱ्या बाईंनी हैदोस घातला होता.
शेवटी पुरुष प्रधान संस्कृती आपण म्हणतो ते बहुतेकवेळा त्यांच्या हाती सत्ता एकवटलेली असते म्हणून आणि सत्ता व्यक्तीला भ्रष्ट करते ती स्त्री किंवा पुरुष असा भेद करत नाही. आपल्या देशात  अनेक स्त्री नेत्यांनी ही अनेक पातळीवर भ्रष्टाचार करून हे लिंगभेद नष्ट करणारे महान कार्य केले आहे!
समाजात चांगले-वाईट असे पुरुष असतात तशा स्त्रियाही असतात याचे भान आपण सर्वानीच ठेवायला हवे. ज्या रधोंच्या नावाने ही लेखमाला लिहिली जात आहे तेही पुरुषच होते याचे स्मरणही आपण यानिमित्ताने करू या!
अनघा गोखले मुंबई.

समाजात चांगले पुरुष आहेतच
अनघा गोखले यांची  ‘मुली चांगल्या आणि वाईट घरातल्या’ या लेखावरची प्रतिक्रिया वाचली.
१. समाजात चांगले पुरुषही आहेत. याबाबत कुणाचेच दुमत नाही. मी अत्यंत स्पष्ट  शब्दांत समाजातल्या चांगल्या पुरुषांनी स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रश्नात लक्ष घालावे, अशा न्यायप्रिय पुरुषांचाच स्त्रियांना आधार वाटतो, असे गेल्या लेखात म्हटलेले आहे. शिवाय र.धों.च्या निमित्ताने या स्तंभासाठी मी हे लेख लिहितेय ते त्यांच्या विचारांचे पुन्हा एकदा समाजाला स्मरण व्हावे म्हणूनच. र.धों. आणि महर्षी कर्वेसारखे पुरुष होऊन गेले म्हणून आज आपण एवढे व्यक्त करू शकतोय. मीच नव्हे तर प्रत्येक स्त्रीने त्यांचे ऋणी राहायला हवे. त्यामुळे प्रश्न ‘चांगले पुरुष’ आहेत का, हा नाहीच आहे. प्रश्न ‘चांगल्या घरातल्या मुली आणि वाईट घरातल्या मुली’ असा भेद समाजाने करावा का, हा आहे.
२. कुंटणखाने स्त्रिया चालवतात हे सर्वानाच ठाऊक आहे. या स्त्रिया निर्भर्त्सनेला पात्र आहेतच, पण या स्त्रिया दलालांच्या, राजकारण्यांच्या, गुंडांच्या आणि पोलिसांच्या बळावरच हा उद्योग करायला धजावतात. त्यामुळे वेश्याव्यवसाय जिवंत ठेवणाऱ्या या व्यवस्थेवर प्रहार करायला हवा. त्यात हे सारेच घटक येतात. कुंटणखान्यांच्या मालकिणी, सुनेला जाळणारी सासू, राजकारणातल्या भ्रष्टाचारी स्त्रिया हे पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रॉडक्ट आहेत. या विकृतीला धर्म, जात, िलग ही ओळख नाही. मी या विकृतीच्या विरोधात लिहिते. स्त्री किंवा पुरुषांच्या विरोधात नाही.
३. समाजात चांगले पुरुष आहेत. पण आपल्याला न भेटलेले, आपल्या वाटय़ाला न आलेले वाईट पुरुषही खूप आहेत. अशा वाईट पुरुषांचं भक्ष्य ठरलेल्या स्त्रियांविषयी मी लिहिते. अशा स्त्रियांची संख्या खूप मोठी आहे आणि ती दिवसेंदिवस वाढते आहे. तुम्ही त्यांचा विचार करणार की नाही? स्त्रियांनीच पीडित स्त्रियांबद्दल सहानुभाव बाळगू नये, त्याऐवजी दुष्ट स्त्रियांची उदाहरणे देत बसावे ही खेदाची गोष्ट आहे.
४. मला आशेची गोष्ट ही दिसते की, इतर अनेक स्त्रियांच्या बरोबरीनेच पुरुषांच्याही खूप तळमळीच्या प्रतिक्रिया येतात. स्त्रियांवरचा अन्याय थांबण्यासाठी ‘प्रत्यक्ष काम हाती घ्यावे, आम्ही बरोबर आहोत,’ असे कळवणारे पुरुष आहेत. अशा चांगल्या पुरुषांच्या असण्यानेच समाज टिकून आहे यावर माझाच नव्हे तर साऱ्या स्त्रियांचा विश्वास आहे.
डॉ. मंगला आठलेकर