ई-मानस : मंगळवार, १८ सप्टेंबर २०१२ Print

मंगळवार, १८ सप्टेंबर २०१२
असीमने हासडलेली चित्र-शिवी..
alt

असीम त्रिवेदीला पोलिसांकरवी झालेली अटक चुकीची आहे. त्याला देशद्रोहासारखे कलम लावणे हास्यास्पद आहे. (पाहा सोबतचे वसंत सरवटे यांचे व्यंगचित्र) अशा क्षुल्लक गोष्टीने देशद्रोह घडत नाही. ज्याने होतो त्याचा तपास चालू करावा, अशी सर्वाची उघड इच्छा आहेच.
मात्र असीम त्रिवेदीचे चित्र व्यंगचित्र नव्हते, हास्यचित्रही नव्हते.. ती चित्र-शिवी होती. चांगला लेखक/ व्यंगचित्रकार/ वादविवादपटू अतिशयोक्तीचा आधार घेतो हे खरे; परंतु अतिशयोक्तीतून वास्तव, मुद्देसूद प्रकटीकरण आणि योग्य मांडणी यामुळे तो कलाकार ठरतो.कुठलीही शिवी अतिशयोक्ती ठरू शकत नाही. ती रागातून आलेली हतबलता किंवा कमी दर्जाचे वाक्चातुर्य असते, जे कलाकार नसलेल्यांत आढळते. चार सिंह असलेले (सारनाथच्या अशोकस्तंभावरचे) चिन्ह हे ऐतिहासिक दर्जा प्राप्त वास्तुनमुना आहे, जो भारत सरकारने राष्ट्रचिन्ह म्हणून वापरला आहे. ते सिंह म्हणजे नेते- प्रजा यांचे प्रतीक नव्हे. तेच काहीसे संसदेचे.
कमी दर्जाची अभिव्यक्ती कितपत मान्य करायची हे मात्र आपल्यावर अवलंबून आहे. तशी चित्रे आवडणारे - त्याचे समर्थन करणारे समाजमन आपल्याकडे तयार झाले आहे. वेळोवेळी आपल्याला विकृती समाजात किती प्रमाणात भिनली आहे, हेही दिसून येते. तसेच काहीसे याचे.
- श्रीनिवास आगवणे

पीओपी प्रदूषणकारकच
alt
‘इकोफ्रेंडली गणेशमूर्ती म्हणजे काय?’ या पत्रात (१२ सप्टेंबर) म्हटल्याप्रमाणे, प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) आणि शाडू माती हे दोन्हीही नैसर्गिक घटकच आहेत. मात्र ते गुणधर्माने वेगवेगळे असल्यामुळे शाडूची मूर्ती एक फुटापेक्षा वाढवणे कठीण, तर पीओपीला उंचीची मर्यादाच नाही. त्याचबरोबर शाडूपेक्षा पीओपीच्या मूर्तीवर रासायनिक रंग-किमया जास्त खुलवता येते, म्हणूनच हा सहजसोपा पर्याय सर्वानीच स्वीकारला. थोडक्यात भक्तीच्या उंचीपेक्षा मूर्तीची उंची वाढल्यानेच पीओपीचे महत्त्व वाढले.
पीओपी हे पाण्यात जरी ४० टक्के विद्राव्य असले तरी उरलेला अविद्राव्य घटक तळास बसून घट्ट होतो; त्यामुळे पाण्यातील नैसर्गिक झरे बंद होतात. आयआयटी-मुंबई सोबत ठाण्यातील शिक्षण संस्थांनी ठाण्यामधील तलावांचा अभ्यास केला, तेव्हा आम्हास हे प्रकर्षांने जाणवले. पीओपी पाणी प्रदूषित करत नसले तरी त्यास जोडून येणाऱ्या घात रंगांमुळे व जडधातूने पाणी प्रदूषित होतेच. नैसर्गिक जलस्रोत बंद झालेल्या तलावामध्ये सतत पीओपीच्या मूर्ती विसर्जित केल्यामुळे पाण्यातील पीओपीच्या तरंगत्या सूक्ष्मकणांची संख्या कितीतरी पटीने वाढते. गणेश विसर्जनाच्या काळात तलावातील हजारो माशांचा मृत्यू हा फक्त पीओपीच्या सूक्ष्म कणांमुळेच होतो, याचीही आम्ही नोंद घेतली होती. हा पीओपी-प्रदूषणाचाच परिणाम होता.
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक म्हणजे प्रदूषणच. सहनशीलतेचा अंत हेसुद्धा प्रदूषणच. शास्त्र म्हणते, गणेशविसर्जन हे वाहत्या पाण्यातच करावयास हवे. नदी वाहात असते हेच मुळी आम्ही विसरलो आहोत! शाडू तर केव्हाच लुप्त झाली आहे म्हणून पीओपी हा पर्याय होऊ शकतो का? सण-उत्सव साजरे करावेत मात्र नैसर्गिक स्रोत आणि सुदृढ पर्यावरणाचा योग्य सन्मान राखूनच.
- डॉ. नागेश टेकाळे, मुलुंड पश्चिम.